कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अभिवादन

उपचार चुकीचे झाले ह्या मुळे खूप लोकांचे मृत्यू झाले असे खूप लोकांना वाटते
>>> नवीन रोग, प्रचंड रुग्णसंख्या आणि संक्रमणाची शक्यता १००% अशा परिस्थितीत डॉक्टरांनी फ्रंट लाईन युनिट म्हणून काम केले. जागतिक आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्येक देशाच्या सरकारने ठरवलेल्या नॉर्म्सप्रमाणे त्यांना शक्य ते उपचार केले. त्यामुळे लोकांचे जीव वाचले आहेत.
उपचार सर्व व्यक्तींना सूट झाले नसले तरी प्रत्येक डॉक्टर हा रिसर्च सायंटिस्ट नसतो. तसेच प्रत्येक रुग्ण हा सारखा नसतो. त्यामुळे डॉक्टरांनी मार्गदर्शन डावलून काहीतरी नाविन्यपूर्ण उपचार शोधून काढावेत ही अपेक्षा चुकीची आहे. तरीही काही डॉक्टरांनी धाडसाने इतर उपचार सुचवले आहेत.
गैर व्यवहार झाले असले तरी गैर प्रवृत्ती सर्वच क्षेत्रात असतात. त्यातही टाळी दोन हातांनी वाजते.
सैन्याच्या जनरलची स्ट्रॅटेजी सर्वत्र योग्य ठरली नाही म्हणून फूट सोल्जर्सना धारेवर धरण्यात काही अर्थ नसतो.

गेल्या तीन वर्षात कोविडबाधितांची सेवा करताना अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्य बजावताना (आणि रुग्णांना) मृत्यू आला होता. >>>> विनम्र श्रद्धांजली.
_____/\____

गेल्या तीन वर्षात कोविडबाधितांची सेवा करताना अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्य बजावताना (आणि रुग्णांना) मृत्यू आला होता. >>>

भावपूर्ण श्रद्धांजली.... ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही...

https://youtu.be/sMU-ypMyjSU?si=V1ORZGnBgx2B_Q4X
टाटा स्टील ची ही जाहिरात काळीज चिरत जाते..पुन्हा पाहण्याची हिम्मत होत नाही....

अनिश्चित आणि पूर्णतः नवीन अश्या कोविडच्या त्या भयानक स्थितीत प्राप्त परिस्थितीनुसार डॉक्टरांनी जे योगदान दिले त्याला विनम्र अभिवादन!

जर्मनीतील एका 62 वर्षीय माणसाने कोविड लस एकूण 217 वेळा घेतल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यापैकी 130 वेळा घेतल्याचा कायदेशीर पुरावा आहे. वैज्ञानिकांनी या माणसावर काही चाचण्या करून त्याच्या प्रतिकारक्षमतेचा सखोल अभ्यास केला. त्यातून असे दिसले, की त्याच्या मूलभूत प्रतिकारशक्तीवर कोणताही दखलपात्र परिणाम (चांगला अथवा वाईट) झालेला नाही.

हे एक अजब प्रकरण आहे खरे !
https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-3099(24)00134-8/fulltext

कोविड संसर्गानंतर कालांतराने त्या व्यक्तीला मधुमेह (प्रकार-१) होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. काही तरुणांमध्ये हे आढळून आले.

गंभीर कोविडने मृत्यू झालेल्यांच्या शवाविच्छेदनातूनही काही उपयुक्त माहिती हाती लागली आहे. कोविडचा विषाणू स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींवर हल्ला करतो आणि त्यांचा बऱ्यापैकी नाश करतो असे प्राथमिक संशोधनात आढळले आहे.

भावी संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेल.

मी खरं सांगू का कुमार सर, हे एकेटे दुकटे शोध कुठेतरी रॅन्ड्म प्रकाशित होतात अन पुढे काही होत नाही.... कोविड दरम्यान असे अनेक औषधोपचार प्रकाशित झाले अन तिथेच राहिले.... सनसनाटी पस रवणार्या पत्र्कारितेचा तर हा भाग नाही?

माझ्या मते असे संशोधन दीर्घकालीन असते. त्यातला असा एक टप्पा असतो. कदाचित एखाद्या पुढच्या टप्प्यावर चित्र अधिक स्पष्ट होते. त्यानुसार संशोधनाची दिशा बदलता येते.

वैद्यक इतिहासातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे इन्सुलिनचा शोध. आज हे औषध जीवरक्षक आहे हे निर्विवाद आहे. परंतु त्याचा शोध कित्येक दशके चालू होता. अनेक टक्केटोणपे खाऊनच संशोधनाला योग्य दिशा मिळाली. (https://www.maayboli.com/node/64203).

अशी बरीच उदाहरणे देता येतील. या संदर्भात मी सकारात्मक राहणे पसंत करेन.

सोमवारी सकाळपासूनच कोविड ची लक्षणे दिसत असल्याने घरीच टेस्ट केली व पॉझिटिव्ह आली. फॅमिली डॉक्टर ने प्लॅक्सोविड पाच दिवस सकाळ संध्याकाळ तीन गोळ्या घ्या असे सांगितले पण दुसर्‍या एक डॉक्टर ने त्याची गरज नाही असे सांगितले. ताप (टायलॅनॉल मुळे कदाचित) बर्‍यापैकी नियंत्रणात आहे, नाक चोंदणे, डोळ्यातून पाणी वगैरे आहे, अगदीच अशक्तपणा नसला तरी थोडासा आहे. जे लोक स्टॅटिन्स वर आहेत त्यांनी प्लॅक्सोविड घेताना स्तॅटिन्स बंद ठेवीत असेही कळले. जे लो डोस अ‍ॅस्पिरिन वर आहेत त्यांनी चालू ठेवायला हरकत नाही. कुमार सर जास्त प्रकाश टाकतीलच होपफुली !

विकु,
विश्रांती घेऊन लवकर बरे व्हा !
जे लोक स्टॅटिन्स वर आहेत त्यांनी प्लॅक्सोविड घेताना स्टॅटिन्स बंद ठेवावीत
>>>
बरोबर. शिफारस खालील प्रमाणे आहे :
ज्यांना पूर्वी lovastatin / simvastatin यापैकी गोळी चालू असेल त्यांनी ती Paxlovid सुरू करण्याआधी किमान 12 तास थांबवावी. तसेच कोविड उपचार संपल्यानंतर पाच दिवसांपर्यंत रोखून धरावी.

याचे कारण असे आहे :
Paxlovid हे औषध शरीरातील एक विशिष्ट enzyme यंत्रणा दाबून टाकते, जी statin च्या चयापचयासाठी अत्यावश्यक असते. म्हणून कोविड उपचारादरम्यान जर statins चालूच ठेवल्या तर त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम तीव्र होऊ शकतील.

कोविड आता फ्लुप्रमाणेच वर्ल्डवाइड रेगुलर फिनामिना झाला आहे. वेळच्यावेळी शॉट्स घेणे इज द बेस्ट डिफेंस मॅकनिझम. गेल्या आठवड्यात युरपमधील किकॉफ नंतर बर्‍याच जणांमधे लक्षणं दिसुन आली, मी बचावलो.. अपटुडेट शॉट्समुळे...

Pages