कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
==>
इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे लसही प्रत्येक वर्षी घ्यवी लागेल का ?


इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे लसही प्रत्येक वर्षी घ्यवी लागेल का ?

चांगला आणि अपेक्षित प्रश्न.
नुकताच या विषयावरील एका समक्ष परिसंवादात मी भाग घेतला होता. तिथे यावर तज्ञांमध्ये बराच खल झाला. त्याचा सारांश देतो:

१. जर विषाणू पुरेसा सौम्य झाला आणि या रोगावरील प्रभावी औषध सहज उपलब्ध झाले तर काळजीचे कारण नाही.
२. पण, जर का विषाणू विपरीत वागू लागला आणि औषधही समाधानकारक नसेल, तर मग पुन्हा एकदा भर लसीकरणावरच राहतो.

३. अशा परिस्थितीत वार्षिक बलवर्धक लसीकरणाचा विचार करावा लागेल. अर्थात, असे वाढीव लसीकरण सर्वांसाठी की अधिक धोका असलेल्या निवडक लोकांसाठी, याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेता येईल.

अत्यंत गंभीर होणारे आजार आहेत जसे रेबीज,hiv, ह्या सारख्या आजारावर आणि ज्या आजारावर उपचार काम करत नाहीत फक्त त्याच आजारावर लस असावी
जे आजार साथी चे नाहीत,गंभीर नाहीत,उपचार उपलब्ध आहेत त्या वर लसी निर्माण करण्याची काही गरज नाही.
उत्तम आहार आणि रोज व्यायाम हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
त्या प्रमाण माणसाच्या रोग प्रतिकार शक्ती ला सारखा बाहेरून support देवून तिला कुचकामी करणे पण अयोग्य आहे.
होवू ध्या आजार,इन्फेक्शन उपचार करता येतील.
पण प्रतिकार करण्याची शरीराला सवय तर लागेल

संसर्गजन्य आजाराची लस निर्मिती हे अतिशय कष्टाचे काम असते. इतिहासात डोकावले असता असे लक्षात येईल, की अनेक गंभीर आजारांविरुद्धची लस तयार होण्यासाठी काही दशके वैज्ञानिकांना झगडावे लागले होते.
सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपण चालू आजाराची लस जेमतेम वर्षभरात बनवू शकलो.
लसींच्या इतिहासाचा एक तुलनात्मक तक्ता पाहणे रोचक ठरेल :

vacc dur table.jpg
( रोगजंतूचा शोध याचा अर्थ : अमुक एका जंतूंमुळे तो आजार होतो हे सिद्ध झाल्याचे वर्ष)

BREAKING: UK reports 88,376 new daily coronavirus cases, the most since the pandemic began

Scary

सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपण चालू आजाराची लस जेमतेम वर्षभरात बनवू शकलो.
वरच्या तक्त्यात लस effectiveness असा अजून एक कॉलम पाहिजे होता. कोविड सोडून इतर किती लसिंना बूस्टर डोस ची गरज वाटली आहे?

<< सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आपण चालू आजाराची लस जेमतेम वर्षभरात बनवू शकलो. >>
महत्त्वाचे कारण म्हणजे हा रोग प्रचंड प्रमाणात संसर्गजन्य आहे आणि लोक मरत होते, अन्यथा इतक्या तातडीने १ वर्षभरात उपाय शोधला असता का? याबद्दल शंका आहे.

झ दा ,
कोविड सोडून इतर किती लसिंना बूस्टर डोस ची गरज वाटली आहे?

>>>
अशा कितीतरी लसी आहेत !! तुमच्या माहितीसाठी भारतीयांसाठी शिफारस असलेला हा लेख इथे पाहता येईल
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4928530/
त्या लेखातील तक्ता क्रमांक दहा पहावा.

इथे एकच उदाहरण देतो.
इंफ्लूएन्झा आणि न्युमोनिया यांच्या लशी सर्वांसाठी वय 65 नंतर ( मृत्यूपर्यंत) दरवर्षी देण्याची शिफारस आहे.
लहान मुलांच्या नियमित लसीचे बलवर्धक डोस तर सर्वांना परिचित असतील.

… परिणामकारकतेचा जो मुद्दा आहे त्याबाबत जरा वेळाने स्वतंत्र परिच्छेद लिहितो

झ दा,
आपल्याला जर दोन लसींच्या परिणामकारकतेची तुलना करायची असेल, तर त्या दोन्ही एकाच काळात निर्मिलेल्या असाव्यात. पन्नास वर्षापूर्वी शोधलेली एखादी आणि आज शोधलेली एखादी यांची तुलना गैरलागू आहे.

आपल्याला सध्याच्या विविध लसींची तुलना करायची असल्यास त्या समाजात मोठ्या प्रमाणात दिल्यानंतर त्यांचा 1/2/5/१० अशा वर्षांचा विदा गोळा केल्यावर ती खरी वैज्ञानिकदृष्ट्या योग्य तुलना राहील.

एखादी लस निर्माण झाल्यानंतर त्याचा पाच ते दहा वर्ष अभ्यास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यात परिपूर्णता येते. तोपर्यंत अनुभवानुसार लसीमध्ये सुधारणा करीत राहाव्या लागतात.

एक जुने उदा. पाहू. गालगुंडा वरची लस 1952 च्या सुमारास तयार केली होती. ती तशी दुर्बल होती. त्यामुळे त्याचे संशोधन चालूच राहिले. एकीकडे जी लस उपलब्ध आहे ती वापरावी लागली. पुढे 1965-70 च्या दरम्यान त्याची चांगली सुधारित आवृत्ती उपलब्ध झाली.

एक जुने उदा. पाहू.
छान माहिती. शंका दूर केल्याबद्दल आभारी आहे.

एक अंदाज आहे 380 trilion प्रकारचे विषाणू मानवी शरीरात असतात.
सर्व माहीत असलेल्या विषाणू ची detection test केली तर ते त्यांचे अस्तित्व जाणवेल.
प्रश्न फक्त हाच आहे तो विषाणू मानवी शरीराला नुकसान पोचवण्यात सक्षम आहे का?
करोडो लोकांच्या शरीरात covid चे विषाणू टेस्ट केले तर सापडतील पण .
त्यांनी आजार निर्माण च झाला नाही .
ह्या अवस्थेत.
किती covid रुग्ण सापडले ह्या आकड्या ची काही गरज नाही.
किती लोक serious झाले हा आकडा महत्वाचा आहे.
लोकांना भीती दाखवून भयंकर प्रमाणात फायदा कमावला जात आहे
उत्परीवर्तीत covid विषाणू वाढू ध्या काय अडचण आहे.
कशाला पाहिजे बूस्टर.
साधी लक्षण असतील आजाराची तर कशाला
त्याची भीती पाहिजे.

विषाणू ची रचना जितकी जटील नसेल त्या पेक्षा करोडो पटी नी मानवी शरीराची रचना जटिल आहे.
सर्व संकटावर मात करण्याची कुवत मानवी शरीरात आहे.

>>>सर्व संकटावर मात करण्याची कुवत मानवी शरीरात आहे.>>>
ही कुवत प्रत्येक शरीरामध्ये कायमच असती तर कशाला आजार झाले असते ? कुवत कमी पडते म्हणून तर औषधोपचारांची गरज असते.

अनुभवानुसार लसीमध्ये सुधारणा करीत राहाव्या लागतात.
===>
अन त्यायोगे आपणासही..

सर,
आपल्या वेगाने बदलणार्‍या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे , अस दिसत आहे.

हा विषाणू फुफुस वर हल्ला करत नाही असे
वाचनात आले .
Delta हा खतरनाक होता .ऑक्सिजन पातळी कमी करून रुग्णाला गंभीर अवस्थेत पोचवत होता.
पण हा omicron तितका धोकादायक नाही असे आज पर्यंत च्या बातम्या वरून तरी वाटत.

चांगली बातमी
हे औषध दोन गोळ्यांचे संयुग असून त्याला आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

Paxlovid बदल अजून काही माहिती:

हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.

रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

ही देखील अशीच प्रारंभ शूर बातमी नसो ही ईश्वरचरणी प्रार्थना... आजवर अशा अनेक यशस्वी बातम्यांचे पुढे अं मलबजावणीच्या बाबतीत काय झाले हे केवळ त्या संशोध्कालाच ठाऊक!!!

आताशिक औषध प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. आता ते उद्योग त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करतील.
नंतर औषध प्रत्यक्ष बाजारात येईल. त्यानंतर दोन आठवड्यांनी काहीतरी समजेल अशी आशा आहे.

delmicron
“जगासमोर २०२२ मध्ये ‘डेल्मिक्रॉन’चं मोठं संकट निर्माण होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी त्याबद्दल मतमतांतरे आहेत.”
https://www.loksatta.com/do-you-know/explained/explained-what-is-new-del...

तूर्त या नव्या शब्दामुळे घाबरून जायचे कारण नाही. अमेरिका आणि युरोप मध्ये काही भागांमध्ये डेल्टाचे रुग्ण खूप आहेत तर काही भागांमध्ये ओमायक्रोनचे.
अशाप्रकारे शास्त्रीय आलेख काढला असता त्यात दोन peaks दिसतात. याला एकत्रितपणे delmicron असे म्हटले जाते. हे विषाणूचे नवे उत्परिवर्तन वगैरे नाही.
अद्याप तरी या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना, सीडीसी अमेरिका किंवा महाराष्ट्र कोविड कृती दल यापैकी कोणीही अधिकृतपणे नव्या प्रकाराची घोषणा केलेली नाही.

https://www.businesstoday.in/coronavirus/story/is-delmicron-a-new-covid-...

ओमायक्रॉन ही एक प्रकारे कोरोनाविरुद्धची नैसर्गिक लसच आहे. ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर कुणीही गंभीरपणे आजारी पडत नाही. उलट या व्हेरियंटची लागण झाल्याने शरीरात कोरोनाविरुद्ध प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार होतात. या अर्थाने ओमायक्रॉन हा कोरोनाविरुद्ध लसीसारखेच काम करतो, असे ख्यातनाम इम्युनोलॉजिस्ट तसेच ‘जेएनयू’तील (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) डॉ. गोवर्धन दास यांनी स्पष्ट केले आहे.

देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी ओमायक्रॉन हा शाप नसून वरदान असल्याचेच जणू म्हटलेले आहे.

ओमायक्रॉन हे डेल्टा व्हेरियंटचेच सौम्य स्वरूप आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनमध्ये म्युटेशन्स (बदल) जास्त प्रमाणात झालेले असले तरी ओमायक्रॉन हा डेल्टाप्रमाणे लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत नसल्याचेच चित्र सर्वत्र आहे, असेही डॉ. दास यांनी म्हटले आहे.

वेळ पुढे सरकत गेली तसा कोरोना विषाणू कमकुवत होत गेलेला आहे. लस तयार करताना शास्त्रज्ञ जे तंत्र वापरतात ते असेच असते. जो आजार रोखायचा, त्याच आजाराची कमकुवत प्रतिपिंडे मानवी शरीरात लसीच्या रूपात टोचली जातात. यामुळे विषाणूविरुद्ध यशस्वी मुकाबल्यासाठीची रोगप्रतिबंधक क्षमता शरीरात वाढते. याच सूत्रानुसार आम्ही जेवढे या विषाणूशी लढू, तेवढी आमची ‘इम्युन सिस्टीम’ (रोगप्रतिकारक क्षमता) कोरोनाविरुद्ध अधिक मजबूत होईल. या अर्थाने ओमायक्रॉन व्हेरियंट ही कोरोनाविरुद्ध सर्वांत प्रभावी लस आहे.

ओमायक्रॉन गरीब देशांना लाभदायक

मॅक्स हेल्थकेअर समूहाचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप बुद्धिराजा यांनी सांगितले, ओमायक्रॉन ही कोरोनाविरुद्धची नैसर्गिक लस असल्याच्या डॉ. दास यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. ज्या गरीब देशांत लसीकरण झालेले नाही, त्यांच्यासाठी ओमायक्रॉन व्हेरियंट हे वरदानच आहे. मोजक्या लक्षणांसह हा व्हेरियंट लोकांना संक्रमित करेल आणि मोठ्या लोकसंख्येत कोरोना प्रतिबंधक क्षमता विकसित होईल.

ओमायक्रॉन आमच्यासाठी नैसर्गिक लस ठरेल : आयसीएमआर

‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे (आयसी एमआर) शास्त्रज्ञ डॉ. एन. के. मेहरा यांनीही डॉ. दास यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, ओमायक्रॉन आमच्यासाठी वरदान सिद्ध होऊ शकतो. तथापि या व्हेरियंटमुळे प्रत्येक देशात एकसारखे संक्रमण होते की नाही, ते पाहणे आवश्यक ठरेल. त्यामुळे तूर्त कोरोना नियमावलीची अंमलबजावणी आवश्यक आहे.

निसर्गात सक्रिय राहण्यासाठी विषाणू निसर्गाच्या अनुकूल बदल स्वत:मध्ये घडवत असतो. कोरोना विषाणूसोबत असेच घडते आहे. ओमायक्रॉन अधिक संक्रमक आहे. पण, निसर्गानुरूप कमकुवतही आहे. प्राणघातक विषाणू एका व्यक्‍तीला संक्रमित करून त्याच्यासह स्वत:ही नष्ट होतो. पण त्याचा सौम्य व्हेरियंट निसर्गात सक्रिय राहून वेगाने पसरतो व लोकांची रोगप्रतिबंधक क्षमता वाढवतो.
– प्रा. डॉ. अमिताभ बॅनर्जी, डी. वाय. पाटील वैद्

Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला
काल अमेरिकी औषध प्रशासनाने आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे
वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा

https://www.fda.gov/news-events/press-announcements/coronavirus-covid-19...

omicron.png
हे डॉ फहीम युनुस VP/Chief Quality Officer/Chief of Infectious Diseases. University of Maryland UCH यांनी काल शेअर केलं आहे.

Pages