कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Submitted by कुमार१ on 29 March, 2021 - 01:19

या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................

31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.

इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.

महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड

या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी

समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.

एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे

१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.

२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.

३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :

सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :

१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर
हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर

रेमिडिसीवर म्हणजे अमृत नाही असा व्हिडीओ खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी काल बनवला आहे. इथेच म्हटल्याप्रमाणे २७००० रूपयांना आता ते मिळतेय. इतके ते प्रभावी आहे का ? माझ्या माहितीप्रमाणे एका विशिष्ट स्टेजमधेच ते दिले जाऊ शकते. इथे कोल्हेंचा व्हिडीओ कसा अपलोड करता येईल ? युट्यूबची लिंक मिळाली की टाकता येईल. या औषधाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलायला हवा. ती संजीवनी वनस्पती नाही हे बरोबर ना ?

जिज्ञासा,
आकडेवारी हा विषय खूप क्लिष्ट आहे. मी सुद्धा त्यात फार लक्ष नाही घालत कारण मग डोके बधिर होते. सवडीने बघू.
रा भु
remdes संजीवनी नाही हे बरोबर. परंतु अद्याप विशिष्ट आणि रामबाण असे या रोगावर औषध अद्याप तरी सापडलेले नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात जे उपयुक्त ते वापरावे लागते ही सध्याची मर्यादा आहे.

सर, माझा मुद्दा लोकांमधे असलेल्या गैरसमजामुळे झालेला तुटवडा हा आहे. त्याच्या मर्यादा स्पष्ट करणे गरजेचे झाले आहे. नाहीतर ज्यांना लाभ होऊ शकतो त्यांना हे औषध मिळत नाही ही परिस्थिती आहे सध्या.

ज्यांना गरज नाही / ज्यांना गरज आहे आणि / जे आता हे औषध देऊनही उपयोग नाही अशा स्थितीत आहेत अशी माहिती दिली गेली पाहीजे.

remdes हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :

* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.

अशा रुग्णांसाठी हे गरजेचे आणि उपयुक्त आहे. संबंधित डॉ त्यांच्या अनुभवानुसार परिस्थिती पाहून निर्णय घेतात.
इतकी माहिती सर्वांसाठी पुरे.

मुंबई मधल्या बऱ्याच लॅब मध्ये काल टेस्टिंग बंद होते. जेंव्हा जास्त विचारपूस केली तेंव्हा कळाले की दिवसाला लॅब्सला 100 पर्यंतच टेस्टिंग करायला सांगितले आहे. हे असे का? आता लॉकडाऊन मध्ये अजून टेस्टिंग कमी होणार. हे आकडे लपवण्यासाठी तर नाही ना?

सरकारच्या नवीन नियमानुसार आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.... त्यामुळे गरज नसलेले अनेक जण फक्त प्रोटोकॉल म्हणून टेस्टसाठी गर्दी करत आहेत.... त्यामुळे लॅब्जवर खुप ताण आला आहे आणि ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना appointment साठी तिष्टत रहायला लागण्याची शक्यता आहे.... ज्यांनी टेस्ट करुन घेतल्यायत त्यांचे रिपोर्ट यायला सुद्धा वेळ लागतोय असे ऐकले.
माझा एक कलीग काल गेला होता तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यापुढे ३००च्या वर नंबर होते आणि प्रायव्हेट लॅब्ज appointment देत नाहीयेत असे त्याच्याकडून समजले!

हे मुंबई मनपाचे ट्विटर हँडल आहे.
https://twitter.com/mybmc
इथे करोनासंबंधीचे रोजचे आकडे दिले जातत. त्यात किती टेस्ट्स केल्या त्याचेही आकडे असतात. रविवार वगळता टेस्ट्सचे आकडे कधी कमी झालेले दिसले नाहीत.

मुंबैतल्या खाजगी लॅब्स आपली कपॅसिटी वाढवत आहेत अशी इंडियन एक्स्प्रेसची बातमी

आता हाती आलेल्या परिचितींकडून खात्रीशीर माहितीनुसार रेमिडेसीवीर ची लिलावात सांगितलेली किंमत ४५००० होती. किंवा 'अहमदनगर ला १२००० ला मिळेल, तिथे ड्राइव्ह करुन घेऊन या' असे सल्ले. तिथेही धाड टाकून काळाबाजार करणार्‍यांना पकडले आहे.
रेमिडेसीवीर चे उत्पादन करोना कमी झाल्यावर कमी केले होते, आत परत वाढवले तर यावर कंट्रोल येईल. शिवाय हॉस्पिटल्स नी थोडं नीट लक्ष घातलं, गैर व्यवहार होऊ दिला नाही तर. (आय होप यात कोणी मोठ्या नावांचा कट नसावा, असे आता म्हणणे हे कॉन्स्पिरसी थिअरी सारखे ठरेल.)

जाऊदे, डॉ कुमार यांचा उपयुक्त धागा या इतर राजकारणाने वेगळीकडॅ जायला नको. शनिवारी हे सर्व ऐकलं आणि खूप विचार केला इतकंच.
सरकार प्रयत्न करत आहेच. हळूहळू ही कृत्रिम टंचाई कमी होईल.

मी_अनु
यात राजकारण अजिबात नाही. कोविडकाळात असे होऊ नये. जर नागरिकांनी शिस्त पाळायची असेल आणि व्यावसायिकांनी नसेल पाळायची, सत्ताधा-यांनी नसेल पाळायची तर औषधांचा तुटवडा होऊन रोगी मेले तर कोण जबाबदार ?
अनेक जण रेमिडिसीवर ची उपयुक्तता किती आहे हे कळकळीने सांगताहेत. त्यामागचा उद्देश अत्यंत प्रामाणिक आहे. सर्वांनी विकत घेऊ नये आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना त्याचा फटका बसू नये.
यात राजकारण कसले आलेय ?
महामारीच्या काळात कसले फायदे कमावताय ?

रानभुली, मी फक्त हा धागा साईड ट्रॅक होऊ नये इतकेच म्हणतेय.
यातल्या कोणत्याही बाबतीत (मला प्रत्यक्ष कळलेली ४५००० आणि नगर ची बातमी सोडता) प्रूफ नाहीत त्यामुळे बोलण्याला अर्थही नाही.
रेमिडेसीवीर केव्हा लिहून द्यायचे हे प्रत्येक डॉ च्या रिस्क टेकिंग वर असणार. आणि कुमार नी सांगितलेल्या मेडिकल कंडिशन वर.

अडचणीच्या काळात तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे, फायदा कमावणे हा मनुष्य स्वभाव आहे. स्वाईन फ्लू च्या वेळी डेटॉल, सॅनिटायझर, एन ९५ मास्क, धूप सगळं महागात मिळत होतं. किंवा आपल्याला गरज नसलेले अगदी मोठे डबे घ्यायला लावत होते.
त्यातल्या त्यात उत्पादन वाढल्यास सध्या लोकांना जी असुरक्षितता आहे ती कमी होईल. (आजचे २ मिळाले, उद्याचे ४ मिळतील का? जास्त पैसे देऊन घेऊन ठेवतो, उद्या कोण धावपळ करणार.)
फेब २०२० मध्ये सॅनिटायझर ची टंचाई निर्माण करण्यात आली होती.नंतर सॅनिटायझर बनवणारे खूप उत्पादक झाले आणि ती कमी झाली. एक दिवस येईल की रेमिडेसीवीर चे आता जे 'गुलबकावलीचे फूल' स्टेटस आहे ते कमी होऊन एक नॉर्मल औषध असे राहील.

नव्या (कोविड) औषधांचे संशोधन आणि मान्यता याबद्दल अमेरिकी औषध प्रशासनाने जाहीर केलेली अधिकृत माहिती (https://www.fda.gov/drugs/coronavirus-covid-19-drugs/coronavirus-treatme...) :

१. विकसित होत असलेली औषधे : 600 हून अधिक
२. प्रशासनाने आढावा घेतलेली : 440
३. आपात्कालीन मान्यता दिलेली : 10
४. पूर्ण मान्यता दिलेले दिलेले : फक्त 1 (Rmdv).

नव्या औषधांच्या संदर्भात छापील आणि विविध इ- वृत्तमाध्यमे आणि ढकलपत्रे यातून बरेच काही प्रसृत होत असतं. परंतु जोपर्यंत ते अधिकृत वैद्यकीय स्त्रोतांमध्ये (CDC/WHO/ICMR/महाराष्ट्र को. दल) वाचायला मिळत नाही, तोपर्यंत त्याच्यावर मी कुठलीही टिपणी करणार नाही.
धन्यवाद

The Solidarity Trial published interim results on 15 October 2020. It found that all 4 treatments evaluated (remdesivir, hydroxychloroquine, lopinavir/ritonavir and interferon) had little or no effect on overall mortality, initiation of ventilation and duration of hospital stay in hospitalized patients.

The Solidarity Trial is considering evaluating other treatments, to continue the search for effective COVID-19 therapeutics.

So far, only corticosteroids have been proven effective against severe and critical COVID-19.

https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/global-r...

डॉक्टर सहकार्यांनो
>> https://indianexpress.com/article/explained/maharashtra-double-mutant-fo...
Explained: B.1.617 variant and the surge>>
या संदर्भात कोव्हिशील्ड, या म्यूटंटसाठी प्रभावी आहे असे निर्मात्याचे म्हणणे आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.
मी आता २रा डोज घेतला आहे.... काही संरक्ष्ण मिळेल का?

Remdesvir हे अँटीव्हायरल आहे.भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) 'कोव्हीड-१९'वरील उपचारासाठी या अन्वेषणात्मक विषाणूरोधी औषधाच्या निर्मिती आणि विक्रीला परवानगी मिळाली आहे

याच्या वापराने कोरोना लवकर बरा होण्यास मदत मिळते.
Remdesivir मुळे कोरोनाचा व्हायरल लोड कमी होण्यास मदत होते. Remdesivir कोरोना विषाणू बनण्याच्या प्रक्रियेला आळा घालतो. कोरोना विषाणूचे जनुक Ribo Nucleic Acid (RNA) चे बनलेले असतात. Remdesivir या RNA जनुकांच्या निर्माणात आवश्यक असलेल्या महत्वाच्या विकरांमध्ये (enzymes) बदल/ ढवळाढवळ घडवून आणतात. त्यामुळे विषाणूंचे पुरुत्पादन थांबते. माफक ते तीव्र Moderate to Severe लक्षणे असणाऱ्या रुग्णामध्ये वापरतात.
सध्या दुसऱ्या लाटेत, मागणी अचानक वाढल्याने Remdesvir चा तुटवडा आहे.
कच्या मालाची अनउपलब्धता, उत्पादनातील अडचणी, टेस्टिंग, गुणवत्ता तपासणी QC आदी कारणांमुळे विलंब होत आहे.

कुमार सर, वरील माहिती बरोबर आहे का?

ऋतु,
>>>>>
जनुक Ribo Nucleic Acid (RNA) चे बनलेले असतात. Remdesivir या RNA जनुकांच्या निर्माणात आवश्यक असलेल्या महत्वाच्या विकरांमध्ये (enzymes) बदल/ ढवळाढवळ घडवून आणतात. त्यामुळे विषाणूंचे पुरुत्पादन थांबते. >>>
हा शास्त्रीय भाग अगदी बरोबर.
विपणन वगैरे बद्दल मला कल्पना नाही

आजाराच्या कोणत्या स्टेज वर कोणते औषध लागू पडेल हे उपचार करणारे dr च ठरवू शकतील.remdisvir ही विषाणू प्रतिबंधित औषध असले तरी तर रोगाच्या कोणत्या स्टेज वर उपयुक्त आहे हे डॉक्टर ठरवू शकता ..
एकदा ती स्टेज ओलांडून गेली की ते औषध काहीच कामाचे असणार नाही उपचार करण्यासाठी.
ह्या साठी स्वतः dr होवू नका.

आजाराच्या कोणत्या स्टेज वर कोणते औषध लागू पडेल हे उपचार करणारे dr च ठरवू शकतील.remdisvir ही विषाणू प्रतिबंधित औषध असले तरी तर रोगाच्या कोणत्या स्टेज वर उपयुक्त आहे हे डॉक्टर ठरवू शकता ..
एकदा ती स्टेज ओलांडून गेली की ते औषध काहीच कामाचे असणार नाही उपचार करण्यासाठी. >>> +१

ह्या साठी स्वतः dr होवू नका. >> करेक्ट. इथे तरी कुणी स्वतः डॉक्टर होत नाहीये. त्याचा मर्यादीत वापर आहे. पण ते अमृत आहे असा समज पसरल्याने आणि लोकांनी घाऊक घेऊन ठेवल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेवर गरजूला मिळणे हे महत्वाचे आहे. राजकीय लोक तर वाटप करायला लागलेत.

मानवी इतिहास साक्षी आहे कोणती ही साथ जास्त दिवस टिकत नाही.
तो निसर्गाचा सर्वोच्च नियम आहे .
साथीची सुरुवात , mutation, विविध लाटा सर्वोच्च पातळी आणि त्या नंतर साथ कमी होवून नष्ट होते .
हाच निसर्गाचा नियम आहे.
अनंत काळापर्यंत मूटेशन आणि व्हायरस धोकादायक अवस्थेत राहत नाही.
असे झाले असते तर मानव जात कधीच नष्ट झाली असती.
जास्तीत जास्त चार वर्षा पर्यंत साथीचा रोग अस्तित्वात असण्याची मानवी इतिहासात नोंद आहे.
त्याच नियम नुसार काही महिन्यात corona च virus माणसाचा मित्र होईल आणि साथ नष्ट होईल.
लस फक्त निमित्त असतील साथ संपण्या साठी.
लस साथ नष्ट करू शकत नाही ते काम निसर्ग च करणार .
लस फक्त हानी कमी करेल..
ज्यांनी लस घेतली त्यांनाच आफ्रिकन strain नी अटॅक केला असा इस्त्रायल च अभ्यास आहे .असे वाचनात आले आहे

असे काही नाही

1920 ची साथ 3 वर्षे चालली होती
त्या आधी प्लेग ची साथही भरपूर वर्षे चालली होती

ज्यांच्या लशी आहेत , फ्ल्यू , मेंदूताप , टीबी , कॉलरा ते रोग आजही आहेतच , ह्या रोगात पाय लुळे पडणे , खंगुन मरणे वगैरे झाले तरी प्रत्येक माणूस इमर्जन्सीत मरत नाहीत , त्यामुळे हातात वेळ मिळतो , इतक्या मोठ्या प्रमाणावर आयसीयू वगैरे लागत नाहीत.

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.
https://www.loksatta.com/mumbai-news/recognition-of-the-production-of-co...

विषाणू चा संसर्ग झाल्या नंतर(हे तर ठरवणे मुश्किल आहे कधी संसर्ग झाला ते) किंवा रिपोर्ट positive आल्यानंतर चार पाच दिवस कोणतीच लक्षण जाणवली नाहीत तर ती व्यक्ती पुढे गंभीर होण्याची शक्यता असते का?
म्हणजे कोणतीच लक्षण नसलेल्या बाधित व्यक्ती ल उपचार ची गरज असते का?
किती दिवसानंतर लक्षण दिसणे अपेक्षित असते त्या दिवसापर्यंत कोणतीच लक्षण दिसली नाहीत तर पुढे दिसण्याची शक्यता असते का?
एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतींनी मांडला आहे कारण मला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट व्हावे म्हणून.

कोणतीच लक्षण नसलेल्या बाधित व्यक्ती ल उपचार ची गरज असते का? >>>
= लक्षणविरहित पण चाचणी +

घरीच विलगीकरण.
उपचार म्हणून क व ड जीवनसत्त्वे आणि जस्ताची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.

Pages