कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Submitted by कुमार१ on 29 March, 2021 - 01:19

या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................

31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.

इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.

महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड

या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी

समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.

एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे

१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.

२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.

३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :

सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :

१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर
हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉह्न्सन & जॉह्न्सन वर अमेरीकेत तात्पुरती का होइना, बंदी आणलेली आहे. ७ मिलिअन लोकांमध्ये ६ केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्या. म्हणजे १ मिलिअन मागे १ सुद्धा नाही. पण सर्व स्त्रिया होत्या व १८-४८ वयाच्या होत्या. ३ आठवड्यांपर्यंत लसवंत लोकांना स्वत:कडे लक्ष ठेवायला सांगीतले आहे.

मुलीने गेल्याच आठवड्यात घेतली. टेन्शन!!!
https://www.cnn.com/2021/04/13/health/johnson-vaccine-pause-cdc-fda/inde...

Breaking News: All the vaccines which have been granted emergency approval for restricted use by USFDA, EMA, UK, MHRA, PMDA Japan or WHO will be granted emergency use approval in India.

काल मार्केट कोसळलं पण फार्मा कंपन्यांचे भाव वधारले होते

या सगळ्यामधे जिथे या विषाणूचा उगम झाला त्या चायनात मात्र नम्बर्स खाली गेलेत. त्यावर काही अभ्यास होऊन जगासाठी उपलब्ध आहे का? चायनाने कसे कन्ट्रोल केले ते वाचायला नक्की आवडेल.

AZ आणि J&J या दोन्ही लसी समान तंत्रज्ञानावर आधारित आहेत (वाहक विषाणू). दोघांच्याही बाबतीत अत्यंत दुर्मिळ प्रमाणात होणारा रक्तगुठळ्या हा गंभीर दुष्परिणाम आहे. AZ च्या बाबतीत आता तो नामांकित वैद्यक नियतकालिकात प्रसिद्ध झालेला आहे. ज्यांनी कोणी या लसी घेतल्या असतील त्यांच्या वाट्याला असे चुकूनही काही न येवो ही सदिच्छा. J&J ची सखोल चौकशी होईल, बघूया काय होतंय.

चीनच्या बाबतीत असे आहे, की तिथे कुठल्याच बातम्या खुलेपणाने देण्याचे धोरण नाही. त्यामुळे वैद्यकीय स्त्रोतांमध्ये बाकी जगाच्या बातम्या आपल्याला खुल्या स्वरूपात वाचायला मिळतात. पण चीनचे जे काही थोडे बहुत हाती लागते ते सगळं गाळून आलेले असते ! बघूया कुठे काही अधिकृत सापडले तर…..

गेल्या वर्षी चीनला लागून असलेल्या व्हिएतनाम की कुठल्या तिस-या जगातल्या देशाने कोविडमुक्ती मिळवली होती. कुणाकडे आहे का त्याबद्दल माहिती ?

इस्त्रायल मधे ८५% लसीकरण झाल्याने रोजच्या हजारो केसेसचे प्रमाण दोन आकड्यांमधे आले आहे. अमेरीकेत अनेक राज्यात १० एप्रिलपर्यंत निर्बंध सैल झाले आहेत. ब्रिटन आता कोरोनामुक्तीकडे आहे.
लॉकडाऊन हा उपाय नसून लसीकरण हा आहे असे मला वाटू लागले आहे. हे बरोबर आहे का ?

थंडीवरती शेकोटी , स्वेटर , कोफी पिणे , घरात हीटर ठेवणे असे उपाय आहेत

जोवर महागडा पर्याय उपलब्ध होत नाही , तोवर जे असेल त्यावर भागवावे लागते ,

लस ही निरोगी लोकांना उपयुक्त आहे , पण लस सर्वत्र नसल्याने आता ऑलरेडी इतके पेशन्ट झाले तर त्यांना आता लस उपयोगी ठरणार नाही , सध्या त्यांना उपचार करणे व प्रसार थांबवणे महत्वाचे आहे

ते बरे झाले की त्यांनाही लस द्यावी लागेल

ब्लॅककॅट सर,
निरोगी म्हणजे ? जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, ६० च्या (आता ४५ च्या ) वर आहेत त्यांना लस देताहेत ना ?
WHO ने कोविड आता लवकर जाणार नाही असे सांगितले आहे. अशा परिस्थितीत वारंवार लॉकडाऊन कुठपर्यंत करणार ?
लस द्यावीच लागेल. रशियाची लस मागवली आहे अशी बातमी आहे.

रेमडिसीवर वर जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिकूल अहवाल दिला आहे. तरीही त्याचा काळाबाजार चालू आहे.

लोकसंख्या व लस निर्मिती हे प्रमाण अगदी व्यस्त आहे

आजवर ज्या रोगावर लशी निर्माण झाल्या आहेत , त्यांचे टार्गेट पॉप्युलेशन लिमिटेड आहे , पोलिओ , डीपीटीला लहान मुले , हेपाटायटीस ला हेल्थ वर्कर इ इ

पण इथे सगळीच लोकसंख्या बेनेफिशरी आहे , तितक्या प्रमाणात उत्पादन तर हवे

Who नी जगात कोणी काय उपचार करावेत हे ठरवू नये असे मला वाटत.फक्त सल्ले द्यावेत.सर्व तज्ञ डॉक्टर ना त्यांची मत मांडायचे आणि उपचार करायचे स्वतंत्र हवे.
असे माझे वैयतीक मत आहे.

माझ्या ताई च्या चार वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट positive आला आहे.
ताई आणि जीजाजी सुद्धा positive आहेत.
बाळाला फक्त ताप येतोय बाकी काही त्रास नाही. Admit करावे की घरीच isolation मधे ठेवावे? लहान मुलांना गंभीर त्रास होऊ शकतो का? काय काळजी घ्यावी?

मुलांमधील कोविड सहसा सौम्य असतो. मुलाला पूर्णपणे वेगळ्या खोलीत घरी ठेवा. त्याचा ताप नियमित वेळाने मोजत रहा आणि अन्य काही लक्षणे आढळल्यास बालरोगतज्ञ यांचा सल्ला घ्यावा

औषध महानियंत्रकांची ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी
(https://www.loksatta.com/desh-videsh-news/dcgi-approval-for-covid-19-vac...)

ही लस 'वाहक विषाणू + करोनाविषाणूचे जनुक' या प्रकारातील आहे.

डॉ कुमार सर, मी व माझी पत्नी , दोघेही वरिष्ठ नागरिक, आज कोव्हिशील्डचा २ रा डो़झ घेत आहोत
सहा आठवडे झाले १ ल्या डो़अ नंतर... तेव्हा काही त्रास झाला नव्हता
.... त्या नंतर काय परिणाम- रिअ‍ॅक्शन्स अपेक्षित आहेत ? पूर्व दक्षता म्हणून पॅरॅसिटॅमॉल घ्यावी का?
कोविड संबंधी काय काळजी घ्यावी?
किती दिवसांनी सकारात्मक संरक्ष्ण मिळेल? परदेशात प्रवास करता येईल का?
आमच्या येथे अत्यंत चांग ली व्यवस्था आहे.
गुरुजी रुग्णालय, गंगापूर रोड, नाशिक

सौम्य लक्षणे असलेला postive व्यक्ती जास्त लक्षणे असलेल्या positive patient च्या संपर्कात आला तर त्याचा covid वाढू शकतो का?

रेव्यु,
अपेक्षित प्रतिक्रिया म्हणजे ताप, थोडीफार स्नायू दुखी आणि इंजेक्शन ची जागा दुखणे ( हे सर्व व्यक्तिसापेक्ष ).
मुद्दामहून आधी पॅरासिटॅमॉल घेऊ नये असे माझे मत.
लक्षणे आली तर त्यांच्या तीव्रतेनुसार ठरवावे हे बरे.

** दुसर्‍या डोसनंतर १४ दिवसांनी सकारात्मक संरक्ष्ण
परदेशात प्रवास हा थोडा गहन विषय आहे. कारण विषाणू विविध अवतार सारखे धारण करतो आहे. जर जाणे अत्यावश्यक नसेल तर काही महिने थांबावे असे आपले माझं मत.

माझ्या ताई च्या चार वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट positive आला आहे.
ताई आणि जीजाजी सुद्धा positive आहेत.
बाळाला फक्त ताप येतोय बाकी काही त्रास नाही. Admit करावे की घरीच isolation मधे ठेवावे? लहान मुलांना गंभीर त्रास होऊ शकतो का? काय काळजी घ्यावी? >>

अमृताक्षर, ऑक्टोबर २०२० मधे माझी पुतणी ( ७ वर्षे ) आणि माझी मुलगी ( १० वर्षे ) दोघिना कोरोना होउन गेला. २ दिवस थोडा ताप येत जात होता. आणि ३-४ दिवस दोघी पण थोड्या मलुल होत्या. बाकी काहीही विषेश त्रास झाला नाही.
१५ दिवसांपुर्वी नत्यातली २ लहान मुले ( ६ व ८ वर्षे ) पॉसिटीव्ह होती. १ दिवस ताप आला नंतर वास चव गेली ७-८ दिवस. त्यामुळे दोघेही वैतागली होती. भुक लागत होती पण चव नाही. आता एकदम ठीक आहेत.

मुलांना जास्त त्रास होत नाही असे घरातले निरीक्षण आहे. बाकी तुमच्या ताई ला सांगा की बाळा च्या पेडी सोबत टच मधे रहा. फळे , सरबत , पाणी ई त्यांना देत रहा.४ वर्षाच्या बाळाला अगदीच वेगळे ठेवणे शक्य नाहीये पण मग आइ बाबानी मास्क जमेल तितका वेळ घाला .
आम्ही मुलीला आणि पुतणी ला वेगळे ठेवु शकलो नाही कारण मुले नाही ऐकत हो. घरातुन बाहेर पडता येत नाही हे आहेच..त्यात आणी एका खोलीत किती वेळ ठेवणार मुलांना. आम्ही घरचे सगळेच पॉसिटीव्ह होतो त्यामुळे घरातल्या घरात चालुन गेलं. फक्त मुलांना मिठी मारणे, खुप जवळ घेणे टाळता येइल.
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. काळजी करु नका.

सौम्य लक्षणे असलेला postive व्यक्ती जास्त लक्षणे असलेल्या positive patient च्या संपर्कात आला तर त्याचा covid वाढू शकतो का? >>

माझ्यासाठी याचे उत्तर हो असे आहे. माझ्या नवर्‍याला अजिबात लक्षणे नसलेला कोवीड होता. सासु सासर्‍यांना थोडा ताप कोरडा खोकला असे होते. त्यांना अ‍ॅड्मिट करण्यासाठी माझ्या नवर्‍याला दिवसभर कोविड हॉस्पिटल मधे एक्स रे, सीटी स्कॅन अशा सेक्शन मधे फिरावे लागले. या सगळ्यामधे खुप दगदग झालीच शिवाय इन्फेक्शन वाढले असावे. कारण २-३ दिवसांनी नवर्‍याला भयंकर त्रास सुरु झाला. सासु सासरे ३ दिवसांनी डीस्चार्ज मिळुन घरी आले पण नवर्‍याला नंतर १० दिवस दवाखान्यात रहावे लागले. इन्फेक्शन लंग्स ला पोचले होते.
त्यामुळे ज्याक्षणी कोविड कळेल, त्याक्षणा पासुन पूर्ण आराम करणे गरजेचे आहे असे मला वाटते. आमच्या बाबतीत काही पर्यात नव्हता त्यामुळे आई वडीलांसाठी त्याला दवाखान्यात जावेच लागले. असो. देवकृपेने आता सगळे बरे आहेत.

कोवॅक्सिन चा दुसरा डोस जास्तीत जास्त किती दिवसांनी (प्रमाणित ६ आठवड्या पेक्षा हि जास्त) घेतला तर चालतो? आज पहिल्या डोसनंतर चार आठवडे पूर्ण झाले; पण रुग्ण संख्या पाहता दुसरा डोस घेण्यासाठी बाहेर जायला खूप भीती वाटत आहे.

कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने अशी त्यांची शिफारस आहे.
भीती, अनुपलब्धता ....असे काही मुद्दे असल्यास आपलाच निर्णय.

जितकं वाचतंय त्यावरून एक चित्र तयार झालंय डोक्यात. बरोबर कि चूक ते जाणकार सांगतीलच.

- सततचे लॉकडाऊन करून कोरोना जाणार नाही. काही काळ थांबेल. मग पुन्हा लाट येईल. लॉकडाऊन मधे जे सुरक्षित राहतील त्यांना वाधा होऊ लागली की लाटा येतात.

- ज्या देशांत लॉकडाऊन केला नाही, तिथे हर्ड इम्युनिटी तयार झाली. पण त्या वेळी उपचार नसल्याने गंभीर आजार असलेले, वृद्ध मृत्युमुखी पडले.
जर लाईफ सपोर्ट सिस्टम असेल आणि गंभीर रूग्णांची काळजी घेतली तर मृत्यूदर कमी होईल आणि इतरांच्यात हर्ड इम्युनिटी तयार होईल. ८०% लोकांच्यात ती झाली कि लाट येणार नाही.

- हर्ड इम्युनिटी साठी निरोगी लोकांना सोडून देणे आणि नाजूक प्रकृती किंवा वयोमान असलेल्यांना व्हॅक्सीन देत राहणे. यामुळे त्यांच्यात अ‍ॅण्टीबॉडीज तयार होतील.

- शेवटचा टप्पा म्हणजे सर्वांनाच व्हॅक्सीन देणे. जसजशी उपलब्ध होईल. तस तशी.
नेजल स्प्रे मुळे कोरोना शी लढण्यासाठी शरीराला जास्त कालावधी मिळतो असे नुकतेच वाचले . त्याला मान्यता कोण देणार ?

रेमिडेसीवीर आणि टोसिमीलीझुअ‍ॅब साठी पुण्यात भयंकर हाल चालू आहेत पेशंटच्य नातेवाईकांचे.
लवकर जास्त रेमिडेसेवीर बनोत. मागेच संशोधन झालं होतं ना, की रेमिडेसीवीर प्रभावी नाही? आणि तरीही डॉक्टर रोज २ लिहून देत आहेत. बातम्या बघूनच घाबरायला होतं. ११०० चे इंजेक्शन २६००० ला वगैरे विकत आहेत.

अनु, सहा इंजेक्शन देतात ही, पहिल्या दिवशी दोन , मग पुढचे चार दिवस एक रोज .

मम्मी पप्पांना दिली होती तेव्हा ५५००/- एका इंजेक्शनसाठी घेतले होते, स्वस्तातले हवे तर तुम्ही आणा सांगितले होते जे आम्हाला शक्य नव्हते.

ह्म्म
सगळंच कठीण आहे. सध्या रेमिडेसीवीर चा लिलाव चालू आहे.
सरकार यावर बंदी आणायचे प्रयत्न करतं आहे. यश येईल अशी आशा.

Remdes. हे औषध प्रशासनाची पूर्ण मान्यता असलेले एकच औषध आहे; बाकी सर्व औषधे आपात्कालीन मंजुरी या तत्त्वावर चालू आहेत. डब्ल्यूएचओ प्रणित प्रयोगांमध्ये ते फारसे उपयुक्त नाही असे त्यांचे मत होते.
परंतु भारत. युरोप आणि अमेरिकेतील अनेक डॉक्टरांचे त्याबद्दलचे मत उपयुक्त असे आहे. त्यामुळे मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या या आजारात या औषधाचा वापर गेल्या वर्षीपासूनच चालू आहे.

कुमार सर, रोज हे जे नवीन कोरोना बाधितांचे आकडे समोर येतात त्यात लक्षणं असणारे किती आणि काहीही लक्षणं नसणारे किती अशी आकडेवारी मिळवणं शक्य आहे का? जर ८५% बाधितांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत हे खरं असेल तर मग आपण खऱ्या बाधितांच्या संख्येचा अंदाज लावू शकतो का?
आणि जर हा विचार बरोबर असेल तर मग या अंदाजाने आलेल्या संख्येवर नियोजन व्हायला हवं होतं ना? म्हणजे जेव्हा पुण्यात आकडे हजाराच्या आसपास होते तेव्हा खरे आकडे साडेसहा हजार असले पाहिजेत. आता यातले साडेपाच हजार आपण ओळखलेलेच नाहीत आणि ते कोरोना पसरवू शकतात. हे कोणाच्या लक्षात आले नाही का? Isn't this common sense? Of course आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे कारण आपण ती जाऊ दिली.
हे मी लिहिलेलं शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? की माझ्या विचार करण्यात काही चूक होते आहे?
देव ना करो पण जर तिसरी लाट आली तर अशा प्रकारच्या नियोजनाचा फायदा होईल ना?

Thank u कुमार सर आणि स्मिता श्रीपाद.. तुमचा प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं.. ताईच्या बाळाचे नाव सुद्धा श्रीपाद आहे..तो बाहेर जायचं म्हणून सारखा रडतो..पण आता काय करणार काही इलाज नाही..

Pages