कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Submitted by कुमार१ on 29 March, 2021 - 01:19

या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................

31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.

इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.

महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड

या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी

समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.

एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे

१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.

२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.

३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :

सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :

१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर
हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती डॉक्टर, त्याबद्दल धन्यवाद.
ज्यांची रक्त पातळ व्हायची औषधे सुरू आहेत, त्यांनी लस घेतली तर चालेल का? माझ्या आईवडिलांनी नुकतीच करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. इथे वाचलंय आणि इतरही परिचितांना डॉक्टरांनी सांगितले आहे की एक ते तीन महिने नंतर लस घ्यायला हरकत नाही. पण दोघांनाही रक्त पातळ होण्याची औषधे करोना पूर्वी पासून सुरू आहेत..

प्राचीन,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर जानेवारीमध्ये दिले होते. अशा लोकांनी लस घेण्यास काहीच हरकत नाही, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांनी तेव्हाच स्पष्ट केलेले आहे

https://www.livemint.com/news/india/covishield-and-covaxin-safe-for-pati...

रक्त पातळ करणार्या औषधात दोन प्रकार असतात :
१. aspirin and clopidogrel यासारखी औषधे औषधे घेणाऱ्या लोकांनी तर लस अगदी बिनधास्त घ्यावी.

२. Heparin सारखी औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फारतर ते एखाद दिवस औषध थांबवू शकतील आणि मग लस देऊ शकतील. लसीचे इंजेक्शन देताना पातळ प्रकारची सुई आणि थोडी विशेष काळजी घेतली जाईल.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर जानेवारीमध्ये दिले होते>>ओः, तरीही आत्ता पुन्हा शंकानिरसन केलेत त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. सध्या इकोस्पिरिन सुरू आहे त्यांचे.

१ मे पासून सगळ्यांना लस मिळणारे तेव्हा जर कोणी स्तनदा माता असतील ज्यांना लस घेऊ की नको हा प्रश्न पडलाय, त्यांच्यासाठी खालील लिंक देतेय. त्यानुसार जर आईने लस घेतली तर तिच्यापासून बाळाला पण अँटिबॉडीज मिळतील

https://www.google.com/amp/s/www.india.com/lifestyle/breastfeeding-mothe...

पोटावर झोपण्यासंदर्भात -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर २२ एप्रिल रोजी या संबंधी माहिती दिली गेली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/COVID19ProningforSelfcare3.pdf
इथे ते होम आयसोलेशन करणार्‍या रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
अर्थात तज्ज्ञांमध्ये मतविभिन्नता असूच शकते.

डॉ कुमार, आताच दै लोकमत मध्ये ब्लॅक फंगस विषयी वाचले. त्याच्या विषयी माहिती तुम्ही द्यालच. पण थोडे अती क्रमण करतेय त्या बद्दल माफी असावी. त्यातले काही मुद्दे इथे कॉपी पेस्ट करतेय.

ब्लॅक फंगस

स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवलेले ब्रेड किंवा सडलेली फळे, भाज्या हे देखिल ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकते. म्हणून, या सर्व गोष्टी पूर्णपणे स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचे संक्रमण वेगानं पसरत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या फंगसला न घाबरता सावध राहण्याची गरज आहे. कारण हा आजार काही नवीन नाही. ब्लॅक फंगसनं याआधीसुद्धा लोकांना संक्रमित केलं होतं. सध्या या आजराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण ब्लॅक फंगसप्रमाणे काही बुरशीजन्य घटक तुमच्या घरातही लपलेले असू शकतात.
१) घरात असलेल्या ब्लॅक फंगसला कसे ओळखाचे. या संक्रमणापासून कसा बचाव करायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. संक्रमणापासून बचावासाठी कोणती सावधगिरी बाळगायची हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चाइल्डकेयर हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. राजन गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
२) तज्ञ म्हणतात की ब्लॅक फंगस आर्द्र ठिकाणी वेगाने पसरते. हे बहुतेक घराच्या आतील ओलसर भिंतींवर लागू होते आणि भिंतीवर बुरशीचे वावर होण्यापूर्वी ओलसरपणाचा वास सुरू होतो. म्हणून लक्षात ठेवा, घराच्या भिंती वारंवार स्वच्छ करत राहा. घाण साचू देऊ नका.
३) घराच्या स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवलेले ब्रेड किंवा सडलेली फळे, भाज्या हे देखिल ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकते. म्हणून, या सर्व गोष्टी पूर्णपणे स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे. भाज्या धुतल्यानंतरच वापरा आणि खराब होत असलेल्या भाज्या लगेच फेकून द्या.
४) तज्ञ म्हणतात की ब्लॅक फंगसचे प्रमाण आर्द्रतेत वेगाने पसरते. म्हणून लक्षात ठेवा, घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा आणि ताजी हवा आत येऊ द्या आणि घराच्या आत उपस्थित आर्द्र हवा बाहेर काढण्यासाठी क्रॉस वेंटिलेशन वापरा. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फर्निचर वगैरे भिंतीजवळ न ठेवणे.
५) जर आपण घरात उपस्थित कोणत्याही प्रकारच्या बुरशीचा शोध घेत असाल तर मग मास्क आणि ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे आणि शक्य असल्यास सेफ्टी गॉगल देखील वापरा. ब्लॅक फंगसचे परीक्षण करताना मास्क, ग्लोव्हज आणि सेफ्टी गॉग्लस पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. लक्षात घ्या की घराच्या भिंतींवर किंवा इतरत्र फारच बुरशीचे वातावरण असल्यास, ते काढण्यासाठी एखाद्या प्रोफेशनल व्यक्तींची मदत घ्या.
बचावाचे उपाय
धूळ असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर करा
माती, धूळ अशा ठिकाणी जाताना पायात बुट, सॉक्स, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घाला.
वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्या.
डायबिटीस कंट्रोल, इम्यूनोमॉड्यूलेटिंग ड्रग किंवा स्टेरॉयड्सचा कमीत कमी वापर करून तुम्ही या
आजारापासून लांब राहू शकता.
ब्लॅक फंगसची लक्षणं
ब्लॅक फंगसच्या लक्षणांबाबत प्रत्येकालाच माहित असायला हवी. वेळीच उपचार केल्यास या आजारपासून सुटका मिळवता येऊ शकते. जीभ आणि हिरड्यांमध्ये त्रास होणं, तोंडाला सूज येणं, सर्दीमुळे नाक गळणं, डोळे जड झाल्याप्रमाणे वाटणं, डोकेदुखी, दृष्टी कमी होणं
घाणेरड्या मास्कमुळे पसरू शकतो ब्लॅक फंगस
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क घातला जातो. मात्र याच मास्कमुळे ब्लॅक फंगसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कच्या माध्यमातूनही ब्लॅक फंगसचा धोका आहे. ब्लॅक फंगस डोळ्यांमधून प्रवेश करत नाही. तो नाकावाटे शरीरात जातो. तिथून तो डोळ्यांवर, मेंदूंवर परिणाम करतो, अशी माहिती मॅक्स हेल्थकेअरच्या औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. निशेष जैन यांनी दिली.
ब्लॅक फंगस नाकावाटे पुढे सरकतो. डोळे, मेंदूवर आघात करत असल्यानं तो जीवघेणा ठरतो. ब्लॅक फंगस नाकावाटे प्रवेश करत असल्यानं मास्कबद्दल संशय व्यक्त होत आहे. एकच मास्क बरेच दिवस वापरणं ब्लॅक फंगसला निमंत्रण ठरू शकतं, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. एकच मास्क बरेच दिवस स्वच्छ न करता वापरल्यास त्यात फंगस तयार होतं. ही बुरशी अतिशय सूक्ष्म असल्यानं ती डोळ्यांना दिसत नाही. त्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते, असं डॉ. जैन यांनी सांगितलं.
जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर, ब्लॅक फंगस संक्रमण आणखी जीवघेणं होऊ शकते. पण जास्त काळजी करण्याची गरज नाही.
कोरोना व्हायपसच्या दुसऱ्या लाटेनं ब्लॅक फंगससारख्या जीवघेण्या आजाराला जन्म दिला आहे. व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणातून बरं होताच ब्लॅक फंगस, पोस्ट कोविड डिसीज अशा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजाराला म्यूकोरमायकोसिस असंही म्हणतात. हा एक बुरशीजन्य आजार आहे जो सामान्यत: प्रवेश घेताना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असणार्या रूग्णांमध्ये दिसला आणि बर्याच काळासाठी ज्यांना स्टिरॉइड्स देण्यात आले होते. त्याच्यामध्येही दिसून आला.
जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर, ब्लॅक फंगस संक्रमण आणखी जीवघेणं होऊ शकते. पण जास्त काळजी करण्याची गरज नाही. दंतचिकित्सकाच्या मते, तीन सोप्या टिप्स वापरल्यास तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास बुरशीसह व्हायरल आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.
तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या
कोविडमध्ये दिलेली औषधे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. मधुमेह असलेल्या आणि नसलेल्या लोकांमध्येही रक्तातील साखरेची पातळी वाढविण्यासदेखील ते जबाबदार असतात. हे बुरशीच्या वाढीचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते. दंतचिकित्सकाच्या म्हणण्यानुसार, विषाणू तोंडातून शरीरात प्रवेश करीत असल्याने तोंडाची स्वच्छता राखणे फार महत्वाचे आहे.
ब्लॅक फंगसची लक्षणं
ब्लॅक फंगसच्या लक्षणांबाबत प्रत्येकालाच माहित असायला हवी. वेळीच उपचार केल्यास या आजारपासून सुटका मिळवता येऊ शकते. जीभ आणि हिरड्यांमध्ये त्रास होणं, तोंडाला सूज येणं, सर्दीमुळे नाक गळणं, डोळे जड झाल्याप्रमाणे वाटणं, डोकेदुखी, दृष्टी कमी होणं
ब्लॅक फंगसपासून बचावासाठी वापरा या तीन टिप्स
कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बरं झाल्यानंतर काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला जातो. पण कोरोना काळात दिले जात असलेले स्टेरॉईड्स तोडांतील बॅक्टेरिया आणि फंगसला वाढवतात. त्यामुळे सायनस किंवा फुफ्फुसांचे आजार उद्भवू शकतात.

गुळण्या करण्याची सवय
कोविडच्या रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका जास्त असतो. म्हणूनच रोग्यांनी स्वत: ला या आजाराच्या परिणामापासून वाचवण्यासाठी कोविड -१९ बरे केल्यावर तोंडाची स्वच्छता राखली पाहिजे. तज्ज्ञ म्हणतात की कोविड नंतर, चाचणी करा. जेव्हा चाचणी नकारात्मक असेल तर सर्व प्रथम आपला टूथब्रश बदला आणि स्वच्छ धुवायची सवय लावा.
टुथब्रथ आणि टंग क्लिनर स्वच्छ ठेवा
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या सर्व गोष्टी घरातील इतर सदस्यांसह शेअर करू नये. विशेषत: आपला टूथब्रश प्रत्येकानं सांभाळून ठेवावा. बॅक्टेरियांना लांब ठेवण्यासाठी ब्रश आणि जीभ क्लिनर व्यवस्थित स्वच्छ ठेवा. विशेषज्ञ एंटीसेप्टिक माउथवॉशची शिफारस करतात. दुसर्या लाटेत यापूर्वी इतका संसर्ग आजपर्यंत पाहिला गेला नव्हता. म्हणूनच, रुग्णानं बरे झाल्यानंतर तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे.
काय नाही करायचं?
आपण ब्लॅक फंगसला वाढण्यापासून रोखू इच्छित असाल तर लक्षणं दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा. नाकातील सर्व प्रकरणांना बॅक्टेरियातील सायनोसायटिस म्हणून विचारात घेण्याची चूक करू नका, आणि विशेषतः कोरोना आणि इम्युनोसप्रेशनच्या बाबतीत, अशी चूक अजिबात करू नका.
बचावाचे उपाय
धूळ असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर करा
माती, धूळ अशा ठिकाणी जाताना पायात बुट, सॉक्स, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घाला.
वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्या.
डायबिटीस कंट्रोल, इम्यूनोमॉड्यूलेटिंग ड्रग किंवा स्टेरॉयड्सचा कमीत कमी वापर करून तुम्ही या
आजारापासून लांब राहू शकता.

डॉ कुमार ही वरील लेखातली माहिती आहे. यावर आपण जरुर लिहावे. सर्व माहिती व उपाय एका ठिकाणी असावे म्हणून इथे दिले. तरीही जर माझा हा प्रतीसाद पटला नाही तर विना संकोच मा प्रशासकांना हटवायला सांगणे. कारण ४ तासानंतर मी तो संपादीत करु शकणार नाही.

तुमच्या प्रत्येक लेखात इतकी बहुमूल्य माहिती असते की किती वेळा तुमचे आभार मानावे हे कळत नाही.

रश्मी,
धन्यवाद. चांगली माहिती आहे मास्क वेळच्या वेळी धुवावा यावर मी देखील भर देईन. गरजेनुसार दिवसासाठी २ स्वतंत्र मास्क्स असावेत.

बाकी या आजाराविषयी माझ्या लेखमालेच्या सध्याच्या चालू भागात चर्चा चालूच आहे. तुम्ही तिथे सहभागी होऊ शकता. हा भाग आता जुना असल्याने इथे चर्चा वाढवायला नको.

नव्या भागाचा दुवा (https://www.maayboli.com/node/78680) देऊन ठेवतो. तिथे झालेली चर्चा आपण आधी वाचावी आणि मग नंतर काही नवे प्रश्न जरूर उपस्थित करावेत.

>>डॉ कुमार, आताच दै लोकमत मध्ये ब्लॅक फंगस विषयी वाचले. त्याच्या विषयी माहिती तुम्ही द्यालच. पण थोडे अती क्रमण करतेय त्या बद्दल माफी असावी. त्यातले काही मुद्दे इथे कॉपी पेस्ट करतेय.

ब्लॅक फंगस

स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवलेले ब्रेड किंवा सडलेली फळे, भाज्या हे देखिल ब्लॅक फंगसचे कारण ठरू शकते. म्हणून, या सर्व गोष्टी पूर्णपणे स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे.>>
हेसर्व कोणासाठी लागू आहे?

सर्वांना विनंती की ही चर्चा आता इथे वाढवू नका
वरील मुद्द्यावर मी एक स्वतंत्र परिच्छेद सध्याच्या चालू धाग्यावर उद्या प्रकाशित करेन.

धन्यवाद

Pages