ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्देवा , काय भयानक मजा केलीये लोकांनी इथे ४ वर्षापुर्वी.. Rofl (प्रतिसाद दिलाही असेल पण सगळं विसरायला झालं होतं).
१२ व्या पानावर मार्क्ट्वेननी भयंकर लिहिलंय Rofl

अरेच्चा! हा धागा आधी वाचला नव्हता, नाहीतर माझा चवैतुहि इथेच टाकला असता. फारच भारी (-पुन्हा ठोकळेबाज शब्द) आहे हा धागा आणि वरच्या प्रतिक्रिया.

हो बरे झाले हां धागा सापडला Lol
नवकवी जमातीच्या पावसावरील ( खरंतर एकन्दरीत सर्वच ) काव्यउपमांची नोंदी करायला ह्याची पावसाळ्यात खुप गरज लागते

वृत्तपत्रातल्या सदरांच्या नावात 'अमुक अमुक होताना/करताना/जोपासताना/शिकताना' अशा 'ताना'न्त शब्दांचा कंटाळा आलाय. त्याचप्रमाणे 'तिचं' अमुक, 'तिच्या' तमुक अशा शीर्षकांचासुद्धा.

वृत्तपत्रात आजकाल अवतरणात 'हे' 'ते' वगैरे लिहिणं फार वाढलं आहे. अगदी फाल्तू वाटतं ते. लोकसत्तातल्या मनोरंजन विभागातली ही शीर्षके पहा:
- LGBTQ विषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर निशिगंधा वाड यांनी मागितली माफी
- ‘मला माहित नव्हतं..’; अखेर बिग बींनी मागितली ‘त्या’ महिलेची माफी
- ‘त्या’ घटनेनंतर तब्बल ६ महिने विद्याने आरशात पाहिला नाही चेहरा; कारण वाचून बसेल धक्का
- अर्जुन रामपाल – रजित कपूर पहिल्यांदाच एकत्र; ‘या’ चित्रपटात शेअर करणार स्क्रीन
- ‘ती’ माझी मोठी चूक होती; मायकल जॅक्सन लूकमध्ये बिग बींनी शेअर केला फोटो

>> 'हे' 'ते' वगैरे लिहिणं फार

अगदी सहमत. पण हे आजकाल नाही. खूप पूर्वीपासूनच (फक्त प्रिंट मिडिया होता तेंव्हापासून) मला हे खटकते आहे. 'त्या' अपघाताची, 'त्या' प्रकरणी इत्यादी.

अजून एक वृत्तपत्रीय ठोकळेबाजपणा म्हणजे 'ठरले', 'ठरला', 'ठरणार' ह्या शब्दांचा अतिरेक. ह्या बातम्या बघा:

  • नववर्ष बारामतीकरांसाठी ठरणार महत्वाचे...
  • अर्ज माघारीचे चार दिवस ठरणार महत्त्वाचे
  • 'हे' ठरणार राज्यातील पाहिले कोरोना लसीकरण केंद्र
  • चीनचा उद्योगपती ठरला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
  • नायलॉन मांजा ६५ पक्ष्यांसाठी ठरला कर्दनकाळ
  • नदीत बुडणाऱ्या युवकासाठी वाहतूक पोलिस ठरले देवदूत
  • सतेज पाटील पुन्हा ठरले "किंग मेकर"
  • पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी `ते` ठरले देवदूत

क्रियापद अलीकडे घेतलं आणि अवतरणचिन्हात सर्वनाम घातलं की साध्या वाक्याचं रूपांतर मथळ्यामधे होतं!! Wink

आजकाल सरसकट सगळ्या व्यापाऱ्यांना/उद्योजकांना "अदानी, अंबानी" वगैरे म्हणतात Proud

हो

उपमा हा थोडा पातळ व अखंड रहायला हवा , लापशीसारखा

काही लोक उपम्यात ठराविक पदार्थच घालून करतात व अगदी जास्त कोरडा करतात , मग त्याचे ठोकळे पडतात

असला ठोकळेबाज उपमा मला अजिबात आवडत नाही

ठोकळेबाज उपमा Lol

बाय द वे हे वृत्तपत्रातल्या ‘त्या’ 'ती' 'ते' वाल्या बातम्या वाचताना, एकजण दुसऱ्याला काहीतरी सांगत आहे दोघांनाही ते कशाविषयी बोलतात माहित आहे, आणि मधल्यामध्ये आपण मात्र मुर्खात निघत आहोत असे वाटत असते. ‘त्या’ घटनेनंतर, ‘त्या’ वक्तव्यानंतर, ‘या’ चित्रपटात, ‘त्या’ महिलेची... "अरे गाढवा आम्हाला पण कळू दे ना" अशी चिडचिड होते Lol

ही पद्धत पूर्वी असती तर 'ती' गाणी कशी लिहिली असती? पहा:

'तो'च चंद्रमा नभात
निघाले आज 'तिकडच्या' घरी
'त्या' तिथे पलिकडे 'तिकडे'
गेले 'ते' दिन गेले (हे वाचून तर कुणाला तरी दिवस गेले आहेत असं वाटेल)

'तो'च चंद्रमा नभात

शनी व गुरूसारखे किती तरी चंद्र असलेला ग्रह असेल , ठराविक चंद्र फेवरेट असेल अशी कल्पना मनात आली.
मगं तो खाणाखुणासाठी वापरला. 'तो' च.... Biggrin

हे असंच तिकडच्या/ तिकडेंसाठी...
चार पाच प्रिया नावाच्या मुली असतील., त्यापैकी नक्की कुठल्या झोपडीतील प्रिया तर ही आणि व्हाइसवर्सा .

असं अवतरण चिन्ह वापरलेले दिसले की माझ्या मनात नाही नाही 'त्या' शंका येतात. Biggrin

Biggrin

गंमत म्हणजे लोकसत्ता ज्या राजकारण्यांचे पेड पीआर करते तिथे नाव छापलेलं असतंच.
म्हणजे मोहित सवारांनी केली गरिबांची मदत असं. तिथे 'या' राजकारण्याने केली गरिबांची मदत असं नसतं.

शनी व गुरूसारखे किती तरी चंद्र असलेला ग्रह असेल , ठराविक चंद्र फेवरेट असेल >> जबरी!

असंच ते चौदहवी का चाँद ह्या ठोकळेबाज उपमेबद्दल मला लहानपणीपासून शंका आहे. चौदहवी म्हणजे शुक्ल चौदहवी की वद्य? ही शुड बी स्पेसिफिक, यु नो? दोन्हीमध्ये चाँद अगदी वेगळ्या आकाराचा (कॉम्प्लिमेंटरी म्हणता येईल) असतो. नंतर वाटलं की वद्यच असावी कारण मराठीतली त्याला समांतर उपमा 'चंद्राची कोर' अशी आहे. पण पुढे इंग्लिश शिकल्यावर वाटलं की चंद्रावरच्या खड्ड्यांमुळे core दिसण्याचे जास्त चान्सेस शुक्ल चौदहवीला आहेत. असो!

वर्तमानपत्रांतील क्रिकेट सामान्यांच्या वर्णनातील काही ठराविक वाक्य -

-तळाच्या फलंदाजांनी विजयश्री खेचून आणली
-अमुक ठिकाणी भारताचे पानिपत
-अबक संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला
-कांगारूंना धूळ चारली

आणि वरच्या तो, ती , ते च्या विभक्ती-विभक्ती खेळात अजून एक
तू तेव्हा तशी

कांगारूंना चारली धूळ... Lol खरंच आहे. एक लाख वेळा छापले गेले असेल हे आजवर. किती तेच तेच तेच. अक्षरशः ठोकळ्यांच्या नुसत्या पाट्या टाकत बसलेले असतात दिवसभर.

क्रिकेटच्या बातम्यांत "व्हाईटवॉश" हा अजून एक ठोकळा वापरतात. असा पराभव करून व्हाईटवॉश दिला, 'व्हाईटवॉश' टाळण्यासाठी प्रयत्न, इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी... इत्यादी
---

"चिमुरडा" "चिमुरडी" असे दोन ठोकळे सापडले आहेत आजकाल पेपरवाल्याना.
चिमुरड्याला एकटं सोडणं पालकांना पडलं महागात
चिमुरडीने थांबवली गाडी
या चिमुरड्याने केले असे काही, पाहून आश्चर्यचकित व्हाल
---

हे "केले असे काही..." चा ठोकळा सुद्धा फेसबुक फीड द्यायला बसवलेला ट्रेनी संपादक (चिमुरडा संपादक म्हणू का?) इतका वापरतो इतका वापरतो कि वाचून वात येईल. लोकांनी न्यूजफीड वर क्लिक करावे म्हणून ती वाक्यरचना क्लिकबैट असते मान्य, पण त्याचा आता ठोकळा झालाय.

Pages