ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटमोगरी.... Biggrin नेटकी पण चालेल.

एकाचवेळी 2 अथवा अधिक सोमिंवर लीलया प्रतिसाद देणारा/री : नेटव्यसाची

नीट (दारू) पिऊन नेटवर येणारे : नीटनेटका/की

चाकरमान्यांचे हाल Happy Happy

तसेच 'बळीराजा हवालदिल' हे सुद्धा .. पाऊस पडला, नाही पडला, जास्त पडला... बळीराजा हवालदिल. साधं 'शेतकरी संकटात' नाही लिहिता येणार का ?

बादवे, चाकरमानी हा शब्द विचित्र वाटतो - जो स्वतः 'चाकर' असेल त्याला कसला मान ?

जालराक्षस = जालावर धुमाकूळ घालणारा / री
जालसाज - जालावर कारस्थानं करणारा / री
जालपाठी - जालावर वाचण्यासाठी (फक्त) येणारा
मानव कोळी - धागे विणणारा

मला वाटतं 'नेटजीवी' बेस्ट.
आणि चाकरमानी च्या जोडीला 'छोकरमानी' पण रुढ करा. 'नोकरी-छोकरी' असा कॉम्बो आहेच.

" काल सर्व दूर झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला " किंवा पाऊस नसेल तर मग " बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले. "

>> बळीराजा सुखावला
>> तळीराम

Lol
अजून एक वृत्तपत्रीय ठोकळा
"पोलीसही चक्रावले"

व्यवहारी जगात कुणीही बळीराजा, तळीराम, चक्रावले म्हणत नाही. बहुतेक जण शेतकरी, दारुड्या, गोंधळले इत्यादी शब्द वापरतात.

कोणत्याही पदार्थाचं कौतुक करायला "अमूक म्हणजे स्वर्गसुख" ही उपमा कंटाळवाणी आहे. कच्च्या पपईच्या भाजीपासून ते हिरवी बोरं, लाल मुळे वगैरे कशालाही येताजाता स्वर्गसुख म्हणणार्यांचा जरा हेवाच वाटतो. यांना किती सोपं आहे स्वर्गसुख मिळवणं असं काहीतरी..

@ सुनिती.,

होय, ते सहज मिळणारे 'स्वर्गसुख' अती झाले आता Happy

पांढराशुभ्र / वाफाळता भात-पिवळेधम्म वरण-साजूक तुपाची धार वगैरेही. सगळ्यांचे स्वर्गसुख त्यातच.
अरे बाबांनो, एखाद्याने खिचडी किंवा गेलाबाजार आमटीभात / रस्सा भात ओरपून 'स्वर्गसुख' मिळवायला काय हरकत आहे ? Happy

"करीना ने सांगितले शाहिद बद्दल बेडरूम मधले 'हे' सिक्रेट" (प्रत्यक्षात हे 'शाहिद बेडरूममध्ये लाईट बंद करून झोपतो' अश्या लेव्हल चे निरुपद्रवी काहीतरी असतेय >>>> आई ग्ग! खूप हसतेय Rofl

ते सेटिंग गोल राहिलेय का?
तिचं किंवा त्याचं ३रं लग्नं आणि हनिमून- अरबाझ'स हनिमून लोकेशन गिव्स यु कपल गोल्स..
सारा, तिचा भाऊ गिव्स यु सिब्लिंग गोल्स म्हणे.. Uhoh

वृत्तपत्रांच्या लाईफस्टाईल / महिला पुरवण्या आणि अनेक सोशल मीडिया पेजेस तर 'छानपैकी' आणि 'मस्तपैकी' ह्या दोनच विशेषणांवर निभावतात उदा.:

छानपैकी भाजी चिरली, मस्तपैकी फिरायला गेलो, छानपैकी पावभाजी खाल्ली, मस्तपैकी मेकअप केला, छानपैकी झोप घेतली, मस्तपैकी पार्टी केली, छानपैकी साडी नेसली.... अरे काय चाललंय काय ? स्वयंपाक करणे, फिरायला जाणे, कपडे नेसणे, खाणेपिणे, झोपणे, मौजमजा सगळ्यांना ही दोनच विशेषणे ? Grow up guys Happy Happy

अफगाणिस्तानातले पेपर उलट लिहितात असं कानावर आलं आहे. म्हणजे 'कंदाहार वि. सामन्यात काबूलचे जोरदार पानिपत, नऊ गडी राखून विजय' Proud

जुन्या काळातले वृत्तांकन-
लाल महालातला थरार! महाराजांनी कापली 'या' खानाची 'इतकी' बोटे!!
शनिवारवाडा हादरला! 'काका मला वाचवा' म्हणत धावला 'हा' पेशवा. 'हिने' केला 'ध चा मा'!
आळंदीत रेडा गायला वेद! 'या' संताने उडवली धमाल!
जावळीत राडा! 'या' खानाचे फाडले पोट!

अफगाणिस्तानातले पेपर उलट लिहितात असं कानावर आलं आहे. म्हणजे 'कंदाहार वि. सामन्यात काबूलचे जोरदार पानिपत, नऊ गडी राखून विजय
;:हहपुवा: बेस्ट !

मोरोबा Lol

ते
महाराजांनी कापली 'या' खानाची बोटे, जाणुन घ्या किती
असे लिहिले असते मीडियाने.

मोरोबा, Lol

ते रेड्याच्या वेदपठणाचं स्थान पैठण ऐवजी आळंदी झालंय. पण तुम्ही ज्या फॉर्मसाठी लिहीलंय त्यात ते ही खपून जाईल. Happy

तसंही जुन्या काळी आजची मिडीया असती तर शाहिस्तेखानाची बोटं कापून आल्यावर महाराजांना 'कसं वाटतंय तुम्हाला'? किंवा अफझलखानाचं पोट फाडून आल्यावर 'काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना' असे बिनडोक प्रश्न विचारले असते. Happy

ह्या सतरा पानांत ' कातिल' हा शब्द येऊन गेलाय का? नसेल तर ॲडवावा. संस्थळांवर विशेषत: मायबोलीवर हा शब्द लोकप्रिय आहेसं दिसतंय. शेजारीच फिरनीचा सदाहिट धागा कितव्यांदा तरी वर आलाय. त्यात फिरनी कातिल दिसतेय, पणत्या कातिल दिसताहेत, ग्लास कातिल, मडकं कातिल, रंग कातिल, चव कातिल असं सगळं कातिलच कातिल आहे. (धागा आणि प्रतिसादसुद्धा कातिल आहेत.)

हाहाहा हीरा =)) Lol Lol Lol
मापं काढणं बरं जमतं हाहाहा!!!
जस्ट किडिंग.

मोरोबा, फेफ, कातिल विनोद!
वाघनखांचे रहस्य, सय्यद बंडाने केली कमाल, कट्यार पोटात घुसली, 'त्या ' च्या गळ्यावर फिरली सुरी. चाकूचा चमत्कार. चिरले चिलखत, धप्पकन कोसळला 'तो' -- वगैरे वगैरे.

Pages