च वै तु हि

Submitted by शंतनू on 15 October, 2018 - 05:48

सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.

आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'... किंवा 'अमुक अमुक असं जेव्हा घडतं तेव्हा कुठेतरी सांगावंसं वाटतं की....' किंवा '.... असं आपल्या मनाला जेव्हा कुठेतरी जाणवतं तेव्हा....'. कधी कधी एखादा कवी देखील लिहून जातो की 'हृदयात कुठेतरी हलल्यासारखं वाटतं'. ह्या मंडळींना कदाचित वाटत असावं की ह्या 'कुठेतरी' शिवाय पाहिजे ते गांभीर्य वाक्याला येणार नाही.

कुठेतरी मध्ये ठिकाणाबद्दल एक अनिश्चितता आहे, तर काही जणांना ठिकाणाची निश्चितता मांडायला आवडतं. जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने 'या ठिकाणीच' घडत असतात. 'आज या ठिकाणी आपल्याला भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत... त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे ...' किंवा बोलण्याच्या भरात ह्या वक्त्यांना अचानक संतवचनांची किंवा कवितांची आठवण होते तेव्हा '... याठिकाणी संत तुकारामांनी सुध्दा म्हणून ठेवलेलं आहे...' वगैरे वगैरे.

न्युज चॅनलवर कधी कधी एखादा राजकीय पुढारी चर्चेत भाग घेतो. चर्चा अगदी जोरात चालू असते. मग मध्येच कधीतरी ह्या पुढाऱ्याला त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याची संधी दिली जाते. तेव्हा अगदी हटकून सगळे पुढारी 'निश्चितपणे' शब्द वापरतात. आठवून पहा.. 'आज तुमच्या माध्यमातून मी हे निश्चितपणे सांगू इच्छितो की आमचा पक्ष निश्चितपणे सामान्यांच्या पाठीशी उभा राहील... जंतेचे प्रश्न आम्ही निश्चितपणे मांडू....'.

असाच एक माझा आवडता शब्द म्हणजे 'वगैरे'. खरं तर एकापेक्षा जास्त गोष्टी किंवा कृती असतील तर वगैरे शब्द वापरावा असं व्याकरण सांगतं. पण मी हा शब्द फारच मुक्तपणे वापरतो. 'आज मी खेळायला वगैरे गेलो होतो' इथपर्यंत ठीक आहे.. पण 'आज काय वाढदिवस वगैरे आहे की काय!' हे जरा फारच झालं. वैभव जोशी यांची तर 'वगैरे' शब्दावरून एक संपूर्ण कविताच आहे. आपल्यापैकी अनेकांनी सचिन खेडेकरांनी केलेलं हे सादरीकरण वगैरे पाहिलंच असेल.

मागे मी बेंगलोरला राहत असताना कर्नाटकी हिंदीची अशीच मजा आली होती. (काही अज्ञ लोकांसाठी सूचना - बेंगलोरमध्ये हिंदी बोलतात बर का.) वेटर येऊन विचारायचा - 'सार (म्हणजे sir), क्या होना?' यावर 'मेरे पापा कहते है की मै बडा होकर इंजिनियर बनुंगा' हे उत्तर अपेक्षित नसून 'टी या कापी' हे अपेक्षित असतं. 'छुट्टा होना तो इधर नही, कोई दुसरा दुकानमे पुचना' असं कोणी दुकानदार खेकसायचा. कानडी लोकांबरोबर कधी जनगणमन म्हणलं आहे का? शेवटच्या ओळीत ते 'जनगण मंगळदायक जय हे' असं म्हणतात. 'ळ'चा अभिमान ही तर दक्षिणेतल्या भाषांची स्पेशालिटी! कर्नाटकी हिंदीवर एक आख्खा लेख होऊ शकेल, तो नंतर केव्हा तरी. पण तो 'क्या होना' अजूनही डोक्यातून जात नाही.

इंग्रजी बोलताना अडखळणे टाळण्यासाठी तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर like, की, actually आणि means या शब्दांचा अनवधानाने वापर केला जातो. 'I was telling you... की she is my .... like ... not so favorite singer... means.. actually she is not that bad ... but like ... you know'.

संस्कृत काव्यामध्ये याच प्रकारे वै, , हि आणि तु हे चार एकाक्षरी शब्द वापरले गेलेले आहेत. 'भोजनान्ते च किं पेयं, जयन्त: कस्य वै सुत:' यासारख्या वाक्यांमध्ये च, वै वगैरे शब्द केवळ ते वाक्य छंदात (मीटरमध्ये) बसवायला मदत करतात. पुढे पुढे हे प्रकार इतके वाढले की केरळ मधल्या 'तोल' नावाच्या संस्कृत कवीने ह्या गोष्टीची खालिल श्लोकात खिल्ली उडवली आहे. -

उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः।
एष आह्वयते कुक्कु च वै तु हि च वै तु हि॥

पहिल्या वाक्यात राजाला उठून तोंड धुवायला सांगताना 'मुखं प्रक्षालयस्व' पर्यंत अर्थ पूर्ण लागतो, मग तो पुढचा 'टः' काय आहे? या वाक्यात (या ठिकाणी) मुखं प्रक्षालयस्व पर्यंत ७ अक्षरे आल्यामुळे वृत्तात एक अक्षर कमी पडतं. दुसऱ्या वाक्यात कोंबडा आरवतो आहे हे सांगताना 'एष आह्वयते कुक्कुट:' असं पाहिजे पण इथे एक अक्षर जास्त आहे. तेव्हा ह्या कवीने दुसऱ्या ओळीतला 'ट:' काढून सरळ पहिल्या ओळीत टाकला. आणि त्यावर कडी म्हणजे 'कोंबडा आरवतो आहे' हे अर्ध्या ओळीत सांगून झाल्यावर पुढे काही सांगावंसं राहिलं नाही, मग उरलेली ओळ कशी पूर्ण करायची? तर ह्या करामती कवीने सरळ 'च वै तु हि च वै तु हि' टाकून दिलं. टीका करावी तर अशी!

असेच आणखी काही विशेष शब्द कुठेतरी विशेषत्वाने वगैरे वापरलेले तुम्हाला माहिती असल्यास या ठिकाणी निश्चितपणे सांगा.

- शंतनु

(हा लेख २०१५ मध्ये लिहिलेल्या माझ्याच ब्लॉगवरून पुनःप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा! शेवटचं उदाहरण जरी समस्यापूर्तीबद्दल असलं तरी लेखाचा विषय तो नाही, 'अतिपरिचयात् अवज्ञा झालेले शब्द' - हा आहे.

..... असेच आणखी काही विशेष शब्द कुठेतरी विशेषत्वाने वगैरे वापरलेले........

टीव्ही बातम्यांमध्ये
- 'नेमकं काय घडलंय'
- 'हे जे आहे - ते जे आहे'
- 'जसे की तुम्ही बघू शकता'
- 'खरे सांगायचे तर'
- 'तसे बघायला गेलं तर'

तुमच्या कानडी-हिंदी ड्युएटच्या प्रतीक्षेत.

शीर्षक वाचून शाळेत हा 'शब्द' वाचल्याचं आठवलं. मराठीच्या धड्यात की संस्कृतच्या, ते काही आठवत नाहीये मात्र! आणि नक्की अर्थ आणि संदर्भ, काहीच आठवत नव्हतं.
लेख वाचून थोडं थोडं आठवलं.

छान लिहिलं आहे. मजा आली वाचायला..

छानच लिहिले आहे. ' कुठेतरी' बद्दलचं अगदी पटलं. आधी ऐकायला छान वाटायचं. पण आता अती होतोय हा शब्द.
' क्या होना' पण ऐकलं आहे Happy ' नेमकं' हाही शब्द हल्ली खूप ऐकू येतो वाहिन्यांवर. नेमकं काय म्हणणं आहे, नेमकं काय घडलं आहे इत्यादी.

कुठेतरी, या ठिकाणी, वगैरे हे फिलर मजेदार आहेत. पण निश्चितपणे हा फिलर आहे का? मला अतिपरिचायात त्याची धार गमावुन बसलेला शब्द वाटतो आणि म्हणून वाट्टेल तिथे वापरलेला. पण तो वापरल्याने वाक्याला नक्कीच एक ठोस परिणाम लाभलेले वाटते.
लेख आवडलाच Happy

सही लिहीले आहे Happy मलाही पटकन "या ठिकाणी"च आठवले. आमच्या आधीच्या ऑफिस मधे एक देसी मुलगी तर प्रत्येक वाक्यात एक 'like' वापरायची. साधे उत्तर दिले तरी त्यात ५-६ "लाइक" असत Happy

"पाहिजे" या अर्थाने "होना" जास्त हैदराबादी हिंदीत ऐकले आहे. कर्नाटकातही प्रचलित आहे माहीत नव्हते.

माझ्या ऑफिसमधला एक ऑझी कायम "बीट्स अँड पीसेस" हा शब्द वापरत असतो... आपल्याकडे "वगैरे..." वापरतात तसा...
लेख आधीही वाचलाच आहे, आवडलाच Happy

निश्चितपणे तुमचा ब्लाॅग वगैरे कुठेतरी असणार पण नेमका कुठे सांगू शकाल का? You know i like to read म्हणजे I mean it's just like breathing you know, like i mean it's so natural वगैरे.
बाकी च वै तु हि वगैरे you know आवाक्याबाहेर.

ब्लाॅग वाचायची इच्छा आहे, पत्ता देऊ शकाल का इथे प्लीज? धन्यवाद.

वाह! आज ह्या ठिकाणी, हा लेख वाचून निश्चितपणे असं म्हणता येईल की कुठेतरी हा लेख मस्त जमल्याचं वगैरे जाणवलं आहे. Happy

अनया, विनिता.झक्कास , अनिंद्य, सानी, वावे, अमितव, फारएण्ड, हर्षल, मऊमाऊ, फेरफटका आणि मानव पृथ्वीकर - तुम्हा सर्वांचे आभार! अनिंद्यने सुचवलेला 'नेमकं' शब्द पण बातम्यांमध्ये फार दिसतो. अमितव, काही राजकारणी लोक 'निश्चितपणे' हा फिलर म्हणून वापरत असल्याचं मी पाहिलं आहे.

फारएण्ड, लाईकवाईज मी स्वतः पण पूर्वी इंग्रजीत वाक्यात अडखळलो की लाईक टाकायचो. पण पुढे पुढे मला माझ्या त्या भाषेची 'लाईकी' कळली (प्राज्ञ परिक्षेची पातळी लोकांना चटकन लक्षात आली आहे, हे दिसायचं Happy ).

हर्षल, 'बीट्स अँड पीसेस' फार लोकांकडून नाही ऐकला. माझा गोरा प्राध्यापक 'बेसिकली' फार वापरतो. मला आधी वाटायचं की फक्त आपणच तसं बोलत असू. पण छे!

मऊमाऊ, तुमची उत्सुकता पाहून आनंद झाला. पण मी एक-एक करून इथे माझे जुने लेख टाकणारच आहे. मी थोड्या वेळाने ते टाकतो, याबद्दल क्षमस्व. अगदी हवीच असेल तर लिंक विपु मध्ये देतो.

तर ह्या करामती कवीने सरळ 'च वै तु हि च वै तु हि' टाकून दिलं. टीका करावी तर अशी!
--- काय टिका केली आहे कवीने? च वै तु हि च वै तु हि हे म्हणजे काय?

आम्हाला दहावीत संस्कृत च्या तासाला हा श्लोक शिकवला होता. ही टीका
अशा कवी.न्वर आहे
जे नीट कविता करता येत नसल्या मुळे यमक स्वर मात्रा जुळवण्यासाठी च वै तु हि चा आपल्या श्लोकात भरपुर वापर करतात.
किन्वा शब्द मोडतात वा जुळवतात.

मस्त लेख शंतनू!

या "तोल" किंवा तोलनला विनोदाची चांगली जाण होती. याने मल्याळम्-संस्कृत अशा धेडगुजरी भाषेत काव्ये करणार्‍यांची पण मस्त खिल्ली उडवली आहे. आत्ता श्लोक आठवत नाही पण भावार्थ असा की जर एखाद्या स्त्रीला तुम्ही मांजराच्या डोळ्यांची (पूच्चकन्नी का असाची काही तरी मल्याळी शब्द आहे) म्हणालात तर तिला राग येईल पण जर तुम्ही तिला "गणपतिवाहननयने" असे म्हणालात तर केवळ तुम्ही संस्कृत वापरलेत म्हणून ती प्रसन्न होईल Happy

बाकी "च वै तु हि" सारखे चिनी मध्ये, खासकरून मँडारिनमध्ये "हाओशिआ" असते. जर अगदी लक्ष देऊन चिनी लोकांचे, त्यातही अमेरिकेत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचे मॅंडारिन ऐकले तर त्यात ज्यांच्या बोलण्यात "हाओशिआ" चा अतिरेक असतो ते सहसा बेजिंग किंवा आसपासच्या प्रांतातून आलेले असतात. "हाओशिआ" आणि इंग्रजीतल्या भरणा करायला वापरल्या जाणारे "लाईक" समानार्थी आहेत.

मस्त लिहिलंय. Happy
ओळखीत एक 'अ‍ॅक्च्युअली' आणि एक 'बेसिकली' आहेत. एक प्रत्येक वाक्याआधी 'तुम्हाला सांगतो,' आहेत तर एक प्रत्येक वाक्यानंतर 'कळलं की नाही?' पण आहेत.
'चहाच टाका वहिनी, कळलं की नाही?' Proud

निलिमा आणि अमितव, बरोबर, त्याच अर्थाने टीका म्हणायचं होतं मला. पायस (आणि रीया - बरोबर शंका विचारलीत), ती गोष्ट मी पण वाचली होती मागे. त्यात 'गणपतिवाहनारिनयने' असं आहे. उंदराचा अरि (शत्रु) म्हणजे मांजर. (अमितव, Lol Lol :D)
लेख आवडल्याचं कळवल्याबद्दल सर्वांचे आभार.

लेखाचा विषय इंटरेस्टींग आहे. शेवटचा श्लोक (की सुभाषीत ?) आणि ते रचणारा बेस्ट! Happy

मजा म्हणजे असे फिलर्स टाकायची सवय जगात बरेच लोकांनां असते. माझ्याच एका एक्स मॅनेजर ला बर्‍याच वाक्यांच्या शेवटी, "राईट"? असं म्हणायची सवय होती.
वाक्याच्या शेवटी "... अ‍ॅण्ड ऑल" असं म्हणायची सवय ही असते बर्‍याच (भारतीय) लोकांनां.

बहुतेक शाळेत असल्यापासून दुसरं काही बोलायला सुचलं नाही की "सही आहे" असं म्हणायचं फॅड आलं आणि ती सवय मला अजूनही आहे.

सशल, मला वाटतं ते "... अ‍ॅण्ड ऑल" हे मराठी '.... वगैरे'चं सरळ भाषांतर आहे. जसं 'एकेक चमचा'चं 'वन वन स्पून' करतात तसं.

Pages