देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जात जन्मापासून चिकटते कारण जन्मापासून कळत नकळत संस्कार होत जातात ज्यात 'आपल्यात असे करतात' हे ब्रम्हवाक्य असते.. जर जन्मापासून समान वर्तणूक मुलांसमोर ठेवली, उच्च नीच भावना मनावर बिंबवल्या नाहीत तरच ते मूल एक माणूस म्हणून वाढू शकेल.

तुमच्या बाबतीत जन्मापासूZन तुमच्यावर काय संस्कार झालेत हे दिसतेय. यात चूक बरोबर काही नाही, कारण संस्कार करणारे मुद्दाम ठरवून चांगले वाईट संस्कार करत नसतात. आपण जे करतोय त्याचे परिणाम समजून घेण्यात त्यांना रस नसतो, तो संस्कार झालेला नसतो.
त्यामुळे तुम्ही पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलात तरी जात तुमच्या मनातून जाणार नाही. तुम्हाला खरेच यातला फोलपणा पटला असेल तर इथेच राहून तुमचे वागणे तुमच्या विचाराना सयुक्तिक ठेवा. लगेच इतरही असेच करतील ही अपेक्षा बाळगू नका, तसे होणार नाही. तुमचया मुलांवर समानतेचा संस्कार करणे, तुमच्या संपर्कात येणार्याशी समान व्यवहार ठेवणे एवढेच तुमच्या हातात आहे. तेवढे करा.

मलाबी काहीसा असाच अनुभव दिल्लीत गेल्यावर आला. प्रशासनात भयंकर जातीवाद आहे. नॉर्थइन्डियन लॉबी विरुद्ध साऊथ इंडियन लॉबी. ब्राह्मण-राजपूत विरुद्ध इतर सर्व अशे उघड गट आहेत. महाराष्टात सुद्धा अशेच गट आहेत अधिकाऱ्यांच्यामधे. महाराष्ट्रात मराठाबहुल राजकारणामुळे काही वाटत नाही पण बाहेर हे सर्व जाणवत राहत. माझ्या मेव्हण्याच्या बहिणीच्या नवऱ्याच्या वडिलांचं नाव भागवत आहे. मागच्या वर्षी त्याच पोस्टिंग सौथ इंडियन रिजन ला झालं. तिथल्या वरिष्ठांनी नाव पाहून आधी विचारलं तुमचा नागपूरशी काही सम्बन्ध आहे का आणि बाकी चौकशी न करताच ते कसे कनेक्टड आहेत वगैरे सांगायला सुरुवात केली. काही सम्बन्ध नाही म्हटल्यावर लगेच मख्ख चेहरा करून बोळवण केली.

तुम्ही तुमचा प्रश्न खूप छान मांडलाय. महाराष्ट्रात एका मर्यादित वर्तुळात राहिले तर जातीयवादाची फारशी झळ बसत नाही हे खरे आहे. पण सर्वत्र ही स्थिती नाही. तुम्ही लिहिलेली स्थिती असावी याचा अंदाज येतो.

मी स्वतः आयुष्यात अजूनही जातीमुळे फटका किंवा भेदाभेद अनुभवलेला नाही याचे कारण मर्यादित वर्तुळातील वावर व महाराष्ट्राबाहेरील कुणाशीही टुरिस्ट म्हणून वगळता अजून कसलाही संबंध नाही हे आहे. पण उत्तर प्रदेशात उच्च-नीच जातीतील सामान्य माणूस माझ्यासारखे आयुष्य व्यतीत करू शकत नाही. तिथे जातीयवादाचा सामना सगळ्यांना करावा लागतोच हे ऑफिसमधल्या क्लीग्सकडून ऐकतेय. खरेतर त्यामुळेच आपल्या घराबाहेर जात प्रश्न किती तीव्र आहे हे लक्षात आले.

यातला फोलपणा पटला असेल तर इथेच राहून तुमचे वागणे तुमच्या विचाराना सयुक्तिक ठेवा. लगेच इतरही असेच करतील ही अपेक्षा बाळगू नका, तसे होणार नाही. तुमचया मुलांवर समानतेचा संस्कार करणे, तुमच्या संपर्कात येणार्याशी समान व्यवहार ठेवणे एवढेच तुमच्या हातात आहे. तेवढे करा.>>>>>>> पूर्णतः सहमत!

लेख चांगला लिहला आहे.

तुमच्या यादव मित्राला पंजाबी उच्चवर्णवाल्यांकडून जशी वागणूक मिळाली तशीच अमेरिकतल्या माझ्या एका ओबीसी मित्राला तिथल्या मराठी उच्चवर्णकडून मिळाली आहे. सुरवातीला सगळ्या समारंभाना बोलवलं जायचं. मग एकदा बोलताबोलता सहजच 'आपल्यात कसं असंतसं असतं ना' आलं. त्याने 'आमच्यात असं काही नसतं' म्हणलं की हळुह्ळु तिथून काढता पाय घेतला. पुढे या लोकांकडून कधी बोलावण आलं नाहीच पण इतर लोकदेखील टाळायला लागले. संथ पण लक्षात येईल अशी प्रोसेस होती.

भारतात सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक समारंभात कोणीही जात विचारत नाही. सोयरे संबंध , घरगुती समारंभ, धार्मिक कार्यक्रम यावेळेस जात विचारात घेतली जाते. राजस्थानी लोक जिंदा दिल आहेत, तेव्हा तिकडे जात पात पाळतात हे पटलेले नाही. निदान बाहेरील लोकांना तरी जात विचारत नाहीत. पंजाबी लोकांचं वागणं पटलेलं आहे कारण जातीपातीच्या बुरसटलेल्या कल्पना मागे पडल्या आहेत तरी सोशल मीडिया वर त्या लिहीणं हे मुद्दाम केलेलं कृत्य असणार. त्यामुळे या गोष्टी चव्हाट्यावर आणणं त्यांना आवडले नसेल. कारण अगोदर व्यवस्थित चांगली वागणूक देत होते.

जात ही नाही जात हे वास्तव आहे. भारतापुरता मर्यादित असलेला हा प्रश्न स्थलातरींताच्या मानसिकतेने जागतिक बनु पहात आहे.

मला आजही अनेक जातीचा न्युनगंड असणारे जात लपवणारे लोक भेटतात. अनेक संधी असूनही आपल्या मागासलेपणाचे खापर ब्राह्मणांवर फोडत असतात. त्यांचे विचार ऐकून मी त्यांना टाळतो. प्रत्येक जातीचे कंपू आहेत. आता काही टिव्हीवर चॅनेल सुध्दा आलेले आहेत आणि बेधडक विधाने चाललेली असतात. मी ब्राह्मणेतर असूनही मला ब्राह्मणां विषयी द्वेष,मत्सर वाटत नाही. माझ्या मराठा जातीत अनेक नीच, गुन्हेगार सुध्दा आहेत. तरी मला जातीचा अभिमान अजिबात वाटत नाही.

मागे नर्मदा परिक्रमेवर आधारित सौ चितळे यांची एक यु ट्यूब मालिका पाहिली. त्यात त्यांनी सांगितले होते की परिक्रमेच्या रस्त्यावर बरीच गावे भेटतात. रात्रीचा मुक्काम त्या वेळेस असेल त्या गावात करायचा. कुठल्याही गावी गेल्यावर पहिला प्रश्न 'पंडित हो क्या?' म्हणजे जातीची चौकशी. ब्राम्हण आहे कळल्यावर एकदम खास वागणूक. परिक्रमा करणाऱ्यांच्या वाट्याला वेगवेगळ्या गावात गावकऱ्यांनी घेतलेल्या सत्त्वपरीक्षा येतात, ते करावे लागतेच. पण पंडित आहे म्हटल्यावर जी खास वागणूक मिळते ती इतरांच्याही वाट्याला येईल असे नाही.

राजस्थानात कोणी जात विचारत नाही वाचल्यावर हे एकदम आठवले. मेट्रो शहरात कोणी जात विचारणार नाही, विचारले तर अपमान वाटेल. पण एकदा याच्याबाहेर पडले की जात विचारणे व ती सांगणे हे अपमानास्पद समजले जात नाही, एवढेच.

नर्मदा परिक्रमासारखी खतरनाक अचिव्हमेंट मिळवणाऱ्या सर्वांना दंडवत. इथं कोणाचा काही अनुभव? धागा तसला ? आयर्नमॅन ट्रायलॉथॉन किरकोळ भासत याच्यापुढे

संयत लिखाण, आवडले.

>>>>>
मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.>>>>
नेमके प्रश्न माहिती नसतील तरी चालतील एकवेळ,
पण त्यांना प्रश्न असू शकतात, आपल्या नजरेआड बरेच मोठे जग आहे , इतकी जाणीव लोकांना असली तरी बऱ्याच प्रश्न सुटण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार होईल.

छान लेख!
उत्तरेत जातीवाद जास्त पाळला जातो हे काहीसे पाहून बरेचसे ऐकून, वाचून माहीत होते. बिहारमध्ये कुठल्या तुरुंगातील कैद्यांनी आम्ही खालच्या जातीच्या लोकांनी शिजवलेले अन्न खाणार नाही म्हणुन गोंधळ केला होता अशी बातमी काही वर्षांपूर्वी होती, तेव्हा किती उघडपणे हे चाललेय याची कल्पना आली.
पण एकंदरीत जातीवादाचे प्रमाण, व्याप्ती एवढी जास्त आहे याची कल्पना नव्हती.

आणि परदेशात पण हे होतेय हे वाचून भारतातील निदान मोठ्या शहरात परिस्थिती बरी आहे असे म्हणावे लागेल.

शहरी ब्राह्मण लोक शुद्ध बोलतात, मोजून मापून व बहुतेक वेळा सात्त्विक अन्न घेतात. बोलताना आवाज सौम्य असतो. शक्यतो शिवराळ, गलिच्छ बोलतच नाहीत. टापटीपीने राहतात. गायन, वादन, नृत्य, अभिनय यासारखे छंद जोपासतात. या त्यांच्या संस्कारी जीवनामुळे ते थोडेसे वेगळे पडतात तसेच त्यांनाही मोठ्या मोठ्याने बोलणारे, शिव्या देत बोलणारे, अघळपघळ वागणारे लोक फार जवळ करणे नकोसे वाटत असतील. असे राहून राहून मला वाटते.

अवांतराबद्दल क्षमस्व !

माझ्या लहानपणीची गावाकडची आठवण आहे.
खेड्यात थोडं मोकळं ढाकळं बोलायचे. कुणाचा रं तू ... असं शहरातून गावात आलेल्या मुलांना म्हातारं विचारतं झालं की कुणीतरी ह्यो माळ्याचा, सुताराचा असं थेट सांगायचे. आता बदल झाले असतील.

कोकणात ब्राह्मणआळी, अमूक आळी असे सांगतात. शहरात आडनाव आणि गाव विचारतात.
थोडक्यात जात ही संपूर्ण ओळख समजली जाते. ती नाही समजली तर ओळख अर्धवट आहे असे विचारणा-याला वाटत राहते. त्यापेक्षा गावात थेटच उल्लेख होतो हे खटकण्यासारखं नाही. कित्येकदा विचारणारा मनाने चांगला असतो. असे अनुभव आहेत.

छान लेख आहे... , आवडला आणि त्यात व्यक्त केलेल्या विचारांची सहमत... भारतात असतांना मला जातीवरुन कुठलाही विशेष असा त्रास झाला नाही आणि मी पण कुणाला कमी/ जास्त लेखले नाही.

<< मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ? >>
-------- ज्यांना आपण रॅशनलिस्ट्स, पुरोगामी समजतो ते खरोखरच तसे आहेत का? लोक जसे बोलतात तसेच त्यांचे आचरण आहे का निव्वळ पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरला आहे?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.///

जातीव्यवस्था हे वास्तव आहेच. ते नाकारण्याचा प्रश्न नाही.
पण ओबीसी समाज हा उत्तरेत सत्ताधारी समाज आहे व ब्राम्हण-बनिया-रजपूत-ओबीसी हा एकसंध अलायन्स दिसून येतो. राजस्थान सीएम अशोक गेहलोत, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, मध्यप्रदेशचे शिवराज चौहान, यूपीत अखिलेश यादव आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे सगळे नेते ओबीसी आहेत ज्यांना across caste lines स्वीकारार्हता मिळालेली आहे. आणि अर्थात नरेंद्र मोदीना या राज्यांत मोठा जनाधार आहे ज्याच्या जोरावर ते दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. मोदी भक्तांमध्ये सर्व जातीचे लोक असतात आणि मोदी इज अ फोर्स हु बाईंडस देम टूगेदर. वाराणसीतली मोदींची रॅली आणि भक्तांची frenzy कोण विसरू शकेल!
तुम्हाला आलेला अनुभव मी नाकारत नाही पण हा एक मोठा बदल तिथे फार वेगाने होत आहे जो अगदी सरळ समोर दिसतो- ज्यात ब्राम्हण-बनिया-ठाकूर-ओबीसी-इतर हिंदू हे एकत्र येत आहेत व जातीच्या भिंती ठिसूळ होत आहेत. यांची मतं एकमेकांना सहज ट्रान्सफर होताना दिसतात.

दुर्सरीकडे काही लोकांना हेच नको आहे. याना जाती नष्ट व्हायला नको आहेत. जातीपलीकडे लोकांनी स्वतःला हिंदू म्हणून identify करणं तर अजिबातच नको आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेला टिकवून ठेवण्याचे केविलवाणे प्रयत्न एका बाजूने कर्मठ हिंदूकडून आणि दुसऱ्या बाजूने हिंदू धर्म विरोधकांकडून सुरूच राहणार. त्यासाठी सोशल मीडियाचा वापरही नक्कीच होणार.

सामान्य जनता यात काय करू शकते? तर साधना यांचा सुरुवातीचा प्रतिसाद आहे त्याप्रमाणे स्वतः योग्य प्रकारे वागणं, कोणत्याच जातीबद्दल तिरस्कार न बाळगणं, पुढच्या पिढीवर तसे संस्कार करणं हे नक्कीच करता येईल.

प्रामाणिक लेखन.

हा वरचा प्रतिसाद वाचून , जातिभेद विसरून एकमेकांना विष्णुमय मानणारे वारकारी आपल्या गावाच्या वेशीत परतले की पुन्हा त्याच जातीभेदाच्या बंधनांत अडकतात, ते वाचल्याचं आठवतं.
सध्या उत्तर प्रदेशच्या सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या मुलीची बातमी गाजतेय. तिने एका दलित तरुणाशी विवाह करायचं ठरवल्यावर वडिलांनी तिचं कसं कौतुक केलंय ते ती सांगतेय.

यांची मतं एकमेकांना सहज ट्रान्सफर होताना दिसतात.>>>>>
निवडणुकीत मते trf होणे आणि सामाजिक आयुष्यात जात न मानणे याचा संबंध काय?

तसे भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या गुन्हेगाराला सुद्धा भरघोस मते मिळाली आहेत म्हणून समाजात गुन्हेगारांची स्वीकाराह्यत वाढली आहे असे म्हणावे का?

चिवट, त्यांनी काही लोकांना हिंदू विरोधी असं सर्टिफिकेट दिलंय. त्यांच्याबद्दल असावं.

जे लोक जातिभेद आहे, असं म्हणतात ते हिंदु विरोधी आहेत असं मायबोलीवर आणि एकंदर सगळीकडेच गेली अनेक वर्षं बोललंच जातंय. असं बोलणारे म्हणतात, आहेच कुठे जातिभेद?

लेखाचा विषय हा भारतीय समाजातील सर्वात दाहक अश्या प्रश्नावरती आहे. तरीसुध्दा लेखाची मांडणी करताना मनातील विचार ज्या संयत भाषेत व प्रामाणिकपणे मांडलेत ते पाहता लेख छान जमला आहे.

https://theprint.in/opinion/inter-caste-marriage-isnt-the-problem-marryi...

प्रिन्टमध्ये आलेला हा लेख या संदर्भात वाचण्यासारखा आहे.

सर्वप्रथम एक उत्तम लेख लिहिल्याबद्दल लेखकाचे आभार. तुम्ही लेखात न लिहिलेली पण अध्यार्‍हुत धरलेली बाब म्हणजे 'परदेशात गेल्यावर भारतीयांच्या विचारात बदल होवून ते अधिक रॅशनलिस्ट होतात'. हे गृहितक मुळात चुकीचे आहे. परदेशात जाणार्‍या लोकांत शारिरीक कष्टकरी (मुख्यत्वे अरब राष्ट्रात जाणारे), पांढरपेशे कष्टकरी (पाश्चिमात्य देशात गेलेले गेल्या ५०वर्षातील बहुतेक लोक, यात ९५/९७पासून पुढे गेलेले आयटी क्षेत्रातले लोक, उच्चशिक्षणासाठी जाऊन तिथेच स्थाइक झालेले हे प्रामुख्याने येतात) आणि एक छोटा टक्का हे अपवादात्मक हुशार/शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ वगैरे.

यातले ब्लु/व्हाइट कॉलर कष्टकरी भारताबाहेर गेल्यावर त्यांच्या भारतात असताना झालेल्या समजांना छेद जाईल अश्या कुठल्या घटना त्यांच्या आयुष्यात घडण्याची शक्यता कमी असते. लहानपणापासून झालेल्या संस्कारांकडे तटस्थ अभ्यासाच्या नजरेतून बघण्याची इच्छा असणारे व तसे करणार्‍यांचे प्रमाण भारतात व भारताबाहेर साधारण सारखेच राहणार. जे समज/विचार घेऊन ते जातात साधारण त्यांनाच ते कवटाळून बसतात. याउलट भारतात राहिले तर बदलत्या समाजात काही अनुभव येउन त्यांचे विचार बदलण्याची शक्यता अधिक असावी.

जे परदेशात स्थायिक होतात त्यांच्या पुढच्या पिढीत जाती/धर्माबाहेर जाऊन लग्न करण्याचे प्रमाण अधिक दिसेल मात्र त्याचे कारण जातीभेदाच्या संकल्पनेतून मुक्ति नसून ती संकल्पना हा आयुष्याचा भागच नसणे हे अधिक असावे. तसेच पाश्चिमात्य देशात स्थायिक झालेल्यांना तिथले स्थानिक लोक कनिष्ट वाटत नाहीत म्हणून ही लग्ने पुढल्या पिढीत होतात. आफ्रिकेसारख्या देशात जिथे स्थायिक भारतीयांकडून स्थानिक समाजाला कनिष्ट समजले जाते तिथे पिढ्यान पिढ्या गेल्या तरी स्थानिकांशी होणार्‍या लग्नाचे प्रमाण नगण्य राहते.

आफ्रिकेसारख्या देशात जिथे स्थायिक भारतीयांकडून स्थानिक समाजाला कनिष्ट समजले जाते तिथे पिढ्यान पिढ्या गेल्या तरी स्थानिकांशी होणार्‍या लग्नाचे प्रमाण नगण्य राहते.
>> टवणे सर इथं कनिष्ठ लेखणे नसावे तर काळ्या रंगाची संतती नको असेल. आणि खरं सांगायचं तर चेहरेपट्टी वगैरे बाबतीत भारतीय आफ्रिकन लोकांपेक्षा देखणे आहेत. निसर्गतः माणूस आपल्या पेक्षा छान दिसणारा कडे आकर्षित होतो हे माझं वैयक्तिक मत आहे.

टवणे सर लिंक आधी दिल्याने दुर्लक्ष झाले. मला असे वाटले की प्रिंट मधे काय आहे हे खाली लिहीले आहे. अ‍ॅमी यांचा प्रतिसाद वाचल्यावर गोंधळ झाला. नंतर सर्व प्रकार लक्षात आला. कोल्हापूरचे उदाहरण दुर्मिळ आहे. खरे तर जातव्यवस्थेत ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ असलेल्या जातींकडे सत्ता सातत्याने असल्याने वरीष्ठ असल्याचा समज याला कारणीभूत असावा. खरी कारणे वेगळीच असतील.

ऑनर किलिंग / यौनशुचिता / जातव्यवस्थेतून खालच्या जमातीत आपल्या घरातल्या स्त्री ने लग्न केल्याने जाणारी प्रतिष्ठा / एखाद्या समूहाच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करून हत्या (गुजरात दंगे, मध्यप्रदेश नन्स प्रकरण) असे वेगवेगळे किंवा एकापेक्षा जास्त पदर वेगवेगळ्या घटनांना असतात. प्रत्येक घटनेची केस स्टडी वेगळी. त्यात थंब रूल असा नसतो.

Pages