देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राह्मणवाद या शब्दाला आक्षेप घेऊन भुऊ धोपटायचा खेळ जुनाच आहे.
सातींनी या संज्ञेला घेऊन चर्चा सुरू केली होती.
https://www.maayboli.com/node/58230
हा धागा वाचायला गुजरात ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
https://www.maayboli.com/node/6486
याबद्दल मराठीत अन्य काही मिळालं नाही. पण इथे हिंदीत लिहिलेलं
पुरेसं स्पष्ट आहे.
एक बात बहुत लंबे समय से अनुभव कर रहा हूँ और बहुत स्पष्टता से बताना चाहता हूँ कि ब्राह्मणवाद की निंदा को ब्राह्मणों और भारतीय संस्कृति की निंदा नहीं समझा जाना चाहिए. भारतीय संस्कृति ब्राह्मण संस्कृति नहीं है और न ही भारतीय संस्कृति के निर्माता एकमात्र ब्राह्मण हैं.. ब्राह्मणवाद समाजशास्त्रीय विमर्श का एक शब्द है. इससे ब्राह्मणों का सम्बन्ध नहीं है. एक दलित या मुसलमान भी ब्राह्मणवादी हो सकता है.

ब्राह्मणवाद का सम्बन्ध दमन और शोषण की मानसिकता से है. मेरे कई ब्राह्मण मित्र हैं जो ब्राह्मणवादी कर्मकांड, शोषण और अंधविश्वास के विरोधी हैं. वे मेरे लिए प्रेरणा के स्त्रोत हैं. मैं उनका बहुत सम्मान करता हूँ. साथ ही कई कई दलित और मुसलमान या इसाई मित्र है जो धार्मिक ढकोसलों में फसे हुए हैं और अपनी अप्रोच में ब्राह्मणों से ज्यादा ब्राह्मणवादी हैं वे न जाने कहाँ के आध्यात्मिक और धार्मिक बकवास लेकर चले आते हैं और इंसानों के विभाजन को सही ठहराने लगते हैं.

शुद्ध ब्राह्मणवादी लोग जन्म के आधार पर उंच नींच मानते हैं और छुपे हुए ब्राह्मणवादी कर्म के आधार पर ऊंच नीच मानते हैं. मैं उन लोगों को प्रगतिशील समझता हूँ जो जन्म और कर्म दोनों के आधार पर कोई विभाजन नहीं बनाता

.....इसलिए ब्राह्मणवाद की निंदा को आप ब्राह्मण या हिन्दू संस्कृति की निंदा मत समझिये,

ब्राह्मणवाद या शब्दाचा ब्राह्मण जातीशी संबंध नाही.
https://www.google.com/amp/s/www.firstpost.com/india/are-brahmins-scapeg...>>>>

हे खूप सोयीस्कर आहे. ब्राह्मणवाद ह्या शब्दाचा ब्राम्हण जातीशी संबंध नाही हे माझेही मत आहे, पण जे ब्राह्मणांना शिव्या घालतात ते सहमत होत नाहीत. कारण त्यांना हवे तेव्हा हवे तसे अर्थ काढायचे असतात.

धागा वाचला तेव्हाच ब्राह्मणवाद शब्द खटकला होता पण बोलले नाही कारण धागा तेव्हाच भरकटला असता. असो. आता भरकटतोय.

Chala ,
एक झेंडाधारी मिळल्याबरोबर बाजारबुणगे सैन्यात भरती होऊ लागले.

जातिभेदाबद्दल चर्चा होऊच द्यायची नाही हा अजेंडा असलेल्या लोकांना ब्राह्मणवाद या संज्ञेचे चांगले निमित्त साधता येते.

लेख चांगला आहे. आवडला. डोक्यात जे विचार आले ते मनमोकळेपणे लिहील्यासारखा वाटला.

लोकहो एखादा शब्द खटकला तरी लेखकाने तो मुद्दाम कोणत्याही जातीला टार्गेट करायला वापरलेला नाही हे जाणवते, त्यामुळे खटकला तरी सोडून द्यायला काय हरकत आहे?

आता लेखकाला राजस्थान मध्ये शूद्र लेखले, त्याच्या मित्राला पंजाबी लोकांनी टाळायला सुरुवात केली, इतर उदाहरणातही जात लक्षात घेऊन वागणूक मिळाली व या सर्वाला कारणीभूत ब्राह्मणवाद= ब्राह्मण आहे हे सुचवलं आहे. यापेक्षा या लोकांचा लाडका शब्द मनुवाद लिहीला असता तर मग मंडळींनी बरेच तारे तोडले असते व त्याला धागा भरकटवणे संबोधले नसते तर बुप्रवादी चर्चा म्हटलं असतं.

>>> ब्राह्मणवाद या शब्दाचा ब्राह्मण जातीशी संबंध नाही. >>>

म्हणजे समाजवाद या शब्दाचा समाजाशी संबंध नाही, साम्यवाद या शब्दाचा साम्यतेशी संबंध नाही, मानवतावाद या शब्दाचा मानवतेशी संबंध नाही, विवेकवाद या शब्दाचा विवेकाशी संबंध नाही . . . असंच ना?

लेख उत्तम आहे.
फक्त
महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही>>>
या वाक्याशी सहमत नाही. याचा अनुभव सरकारी कार्यालयांमध्ये पदोपदी येतो.
domicile/ रेशन कार्ड इ. साठी गेल्यानंतर केवळ ब्राह्मण आडनाव दिसल्याने मुद्दाम अडवणूक करणे, टोमणे मारून अपमान करणे इ. गोष्टी नुकत्याच अनुभवल्या आहेत.

या लेखात सर्वात जास्त काय आवडलं असेल ते म्हणजे व्याख्या न करणे.
खरंच आहे. आपण हे हे करतो त्याला अमूक तमूक म्हणतात हे समजून घेण्यासाठी पन्नास बुकं वाचायची हे थोर आहे. ब्राह्मणवाद म्हणजे काय हे जाणून घ्यायची गरज नाही पडली कधी. पण ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण हे वेगवेगळे आहेत.

आपण ज्याला हिंदू म्हणतो तो धर्म नाही असे हिंदुत्ववादी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तसा निकाल दिलेला आहे. त्यामुळे धर्म या शब्दाच्या एका व्याख्येनुसार इथले कायदेकानू ज्या कुठल्या संस्थेद्वारे नियंत्रित केले जात त्यास ब्राह्मणी धर्म असे नाव आहे. ब्राह्मणी धर्मामुळे जो इझम निर्माण होतो तो ब्राह्मणवाद.

तो उतरंडीवर आधारीत आहे. गंमत म्हणजे तो रिलेटिव्ह देखील आहे. म्हणजे एखाद्या समूहाने आता आम्हाला तुमच्यात नाही रहायचे म्हणून वेगळे व्हायचे म्हटल्याने त्यांचे सामाजिक स्थान बदलत नाही. कारण उर्वरीत समाजासाठी त्यांची ओळख बदलत नाही. त्यामुळेच धर्मांतर जरी झाले तरी ही व्यवस्था जशीच्या तशी तिकडे प्रवास करते. मुस्लीम धर्मात जात नाही. पंथ आहेत. मात्र भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, लिंगायत या सर्वांमधे ब्राह्मणी व्यवस्था जशीच्या तशी गेली आहे. त्यामुळे जातीची उतरंड जशीच्या तशी तिकडे गेली, फक्त बाटली बदलली, दारू तीच राहिली.

ही व्यवस्था कुठे जमिनीवर नसते तर ती डोक्यात असते.
त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर ती तशीच काम करेल. डोक्यातून ती नष्ट झाली तर आणि तरच ती नष्ट होईल.

एकट्या दुकट्याने मी जात सोडली असे म्हणून ती जात नाही. देवीच्या लसीकरणासारखेच आहे ते.
गंमत म्हणजे ब्राह्मण १००% निघून गेले तरी त्यांची जागा नंबर २ घेतील. आणि ब्राह्मणवाद चालूच राहील. अगदी अस्पृश्यांमधेही काही जाती निम्न असत. त्यातही उच्चनीच असे. म्हणजेच ब्राह्मणवाद फक्त ब्राह्मणांच्यातच नाही तर सर्वात खालच्या माणसाच्या डोक्यातही असायचा. ही व्यवस्था ब्राह्मणांनी संचालित केली, नियंत्रित केली म्हणून तिचे नाव ब्राह्मणवाद असे पडले.

असे मला वाटते.

कुणीही याला धागा भरकटवणे म्हणा अथवा काहीही. भारतात ब्राह्मणवाद, मनुवाद म्हणत भुई धोपटत सत्तासुंदरीशी लग्न लावणारे भरपूर आहेत. जात आधारित जनगणना करण्याचा आग्रह करणारे व ते मान्य करून तशी जनगणना का केली गेली असेल. कोणतीही निवडणूक जातीय समीकरणांवर लढवली का जाते.
एरवी तीन- साडेतीन टक्के असे ज्यांना लेखले जाते त्या इतक्या कमी लोकसंख्येच्या समुहाचा बाऊ कसा काय केला जातो.
लक्ष्मण माने यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी मागासवर्गीय समाजातच उच्च नीच चालू होते. त्यांना सुध्दा नवल वाटले होते. ती परिस्थिती आताही आहे. कायद्यामुळे कोणी कुणाला कमी लेखत नाही. पण जातीची सीमारेषा मनात कायम आहे. हि मानसिकता सर्व हिंदू समाजाची आहे यामुळे फक्त ब्राह्मणवाद शब्द वापरणं चुकीचे आहे.

आमच्या मराठा जातीत नीच गुन्हेगार आहेत असे सांगणारेच आता याला मराठावाद का म्हणत नाहीत, ब्राह्मणांना का झोडपता म्हणून कोल्हेकुई करू लागले आहेत हे पाहता जातीअंत नजीक येऊन ठेपल्याचे दिसते आहे.

हा सगळा पसारा पहाता,आपल्या हयातीत जात जाणार नाहीच.निदान साधनांनी पहिल्या पानावरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण वागत गेलो तरी पुष्कळ आहे.

जाता जाता: गेल्या ७-८ वर्षांत अनुभवायला आले की २०-२२ वर्षांची मुले आपापल्या जातीविषयी कट्टर होत आहेत.हे खूप खेदजनक आहे.जात्याभिमान बाळगताना दुसर्‍या जातीविषयी, विशेषतः तथाकथित उच्च जातीविषयी (खुला प्रवर्ग म्हणा हवे तर) आत्यंतिक द्वेष आढळत आहे.अर्थात याबद्दल दु:ख नसून एकूणच सर्व वाईट वाटतेय.

थॅनोस येड्या म्हणूनच सत्याची बाजू मांडत आहे. तुला ती कोल्हेकुई वाटणार. माझं वाक्य नीट ध्यानात घे. मराठा जातीत गुन्हेगार आहेत. सर्व जातच गुन्हेगार नाही.

झोंबणारं वास्तव स्वीकारायला शिक्षण आणि नोकरी वगैरे जातीच्या कुबडया न वापरता कमवायची कूवत लागते.
दुर्दैवाने आरक्षण लाभार्थी उच्च वर्गीयाइतके बुद्धिवान नाहीत म्हणून तर भीक मागतात ना कॉलेज एडमिशन किंवा नोकरीसाठी ! कारण ओपन कैटेगरीमध्ये जिंकायची जिद्द नसते आणि लहानपनापासून फुकट खायची सवय अंगात मुरलेली असते.

माझ्या मराठा जातीत अनेक नीच, गुन्हेगार सुध्दा आहेत. तरी मला जातीचा अभिमान अजिबात वाटत नाही.
प्रतिसाद परत वाच.

अज्ञानी हे पटलं नाही. संसदेने कायदा करून आरक्षण दिलं आहे. ते मान्य आहे. पण लेखक जो काही बोलत आहे ते दुर्दैवाने खरं असलं तरी ब्राह्मणांना जबाबदार धरणं मला मंजूर नाही.

आतापर्यंत जी चर्चा झाली त्यात योगदान दिलेल्या सर्वच सेन्सीबल प्रतिसादकांचे आभार. सर्वांनी समजून घेऊन भर घातली व अत्यंत उत्तम चर्चा घडवून आणली. खरेच अशा चर्चा पारापारावर झाल्या तर मला नाही वाटत निराशा दाटून येईल. मला हे खूपच सकारात्मक चित्र वाटले.

आपल्याकडून अजून जाणून घ्यायला आवडले असते. मात्र अशा संवेदनशील विषयावर इथे आतापर्यंत झाली ती चर्चा उत्तम झाली आहे हे चित्र असेच रहावे या करता प्रशासकांनी धाग्याला कुलूप लावावे ही नम्र विनंती.

लेख चांगला आहे. आवडला. डोक्यात जे विचार आले ते मनमोकळेपणे लिहील्यासारखा वाटला. >>+१

ब्राह्मणवाद या शब्दात खटकण्यासारखे काही नाही. हिंदू वर्ण व्यवस्थेत ब्राह्मण हे उच्च स्थानी मानले जात. धर्मसत्ता त्यांच्या हातात आणि साहाजिकच इतरही अधिकार त्यांच्या हातात असत. इतर समाजाला अनेक मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जाई. ते साम्य वापरुन तयार झालेला हा शब्द . इथे अमेरीकेत बॉस्टन ब्राह्मिन असा शब्द प्रचलित आहे. आता या गटातली मंडळी तर हिंदूही नाहीत, तर ब्राह्मण असायचा काय संबंध? तर बॉस्टन भागातील पारंपारीक उच्चवर्णीय मंडळी. तसेच इथे ब्राह्मणवादाचा मतितार्थ एका विशिष्ठ छोट्या समुहाच्या हातात सत्ता आणि जीवन साधने एकवटणे आणि त्यांनी उर्वरीत समाजाला त्यापासून वंचित ठेवणे. असे वर्तन करणारा समुह कुठल्याही जातीचा, धर्माचा असू शकतो. सर्वांना समान वागणूक मिळणे-देणे हे नैतिक दृष्ट्या योग्य असे मानणारी व्यक्ती, मग ती कुठल्याही जातीधर्माची का असेना तीला आपण ब्राह्मणवादी म्हणत नाही. लोकं ब्राह्मणवादी असतात किंवा नसतात. व्यक्तीचे मूळ विचार काही प्रांत, देश बदलला म्हणून झटपट बदलत नाहीत. फक्त एका प्रदेशात रहाताना व्यक्तीच्या वर्तनातला तो बाह्मणवाद लगेच लक्षात येतो तर दुसर्‍या प्रदेशात समुहाचे पाठबळ कमी आहे या कारणास्तव लक्षात येत नाही. एका बाजूने व्यक्ती ब्राह्मणवादाने पिडीत आहे आणि त्याचवेळी स्वतः विचाराने ब्राह्मणवादी असल्याने दुसर्‍याला असमानतेने वागवत आहे असेही बघायला मिळते.
लेखकाचा प्रश्न आहे की मराठी लोक असे वागतात का? याचे उत्तर हो आणि नाही. तुमचा संपर्क कुणाशी आला, कुठल्या परीस्थितीत आला, त्यांनी तुम्हाला कसे वागवले, तुमच्या उपस्थितीत ते इतरांशी कसे वागतात यावरुन तुम्ही शेवटी मत ठरवता. केवळ व्यक्ती अमुक प्रांतातली, जातीची, धर्माची आहे म्हणून लगेच उदारमतवादी, समानतेचा पुरस्कार करणारी होत नाही.

स्वाती २
क्या बात ! अतिशय सुंदर प्रतिसाद. मी कुठेतरी सेव्ह करून ठेवू का ?

स्वाती २ फक्त एक शंका सोडवा. अमेरिकन बोस्टन ब्राह्मिण यातील ब्राह्मिन शब्द कुठून आला असावा?>>

भारत : हिंदू धर्मातल्या वर्ण व्यवस्थेत जसे ब्राह्मण उच्च वर्णिय, समाजावर त्यांचा प्रभाव अधिक. त्यांची स्वतःची अशी एक जीवन पद्धती.

अमेरीका : अमेरीकेत जे लोकं अगदी सुरवातीला आले ते मेफ्लावर आणि नंतर अजून एका या जहाजातून ( त्याचे नाव विसरले) हे लोकं ब्रिटिश. सुरवातीच्या कॉलनी करणारी ही मंडळी. यांच्या वंशजाचा आर्थिक, सामाजिक, राजकिय प्रभाव बघता ही मंडळी एकप्रकारे जणू अमेरीकेतले उच्चवर्णीयच . न्यूइंग्लंड भागातील ही ठराविक कुटुंबं. इथले उच्च शिक्षण, कला, इतर सांस्कृतीक गोष्टी यावरही यांचाच प्रभाव. वंशावळ बघता अमेरीका ब्रिटिश कॉलनींच्या रुपात होती तेव्हा यांचे पूर्वजही सत्तेच्या पदावर होते. त्यांचा एकंदरीत वावरही थोडा वेगळा. बोलण्याची विशिष्ठ पद्धत, काय योग्य वर्तन काय अयोग्य यांचे अलिखित नियम असणे आणि ते पाळणे , विवाह संबंध देखील शक्यतोवर त्या ठराविक समुहात .

या साधर्म्यातून जसे भारतात हिंदू ब्राह्मण तसे हे बॉस्टन ब्राह्मिन असा शब्द तयार झाला.

अवांतर. माझं मत..
मुंगी, मधमाशी या सारख्या प्राण्याची कामं वाटून घेऊन समुहाचा फायदा सर्वांना हाच हेतू वर्णाश्रम व्यवस्थेत होता. कर्मावर आधारित व्यवस्था पुढे जन्म आधारित बनली,कारण कर्म कौशल्य आई-वडिलांकडून सहजच मुलांकडे जात होतं. नंतर ही व्यवस्था काही स्वार्थी लोकांनी बिघडवली, याच वेळेस परकिय आक्रमणं होऊन समाजात फूट पाडली गेली.
बायबलमध्ये सुध्दा येशूने धर्माचा आधार शोषणासाठी घेणाऱ्या लोकांना धमकावले. तिकडे सुध्दा हेच सुरू होते पण वेगळ्या रूपात. येशूने सर्व सामान्य लोकांना जागरूक केले तेव्हा तो धर्माच्या ठेकेदारांना थ्रेट बनला होता तेव्हा त्याला संपवलं.
आता एकविसाव्या शतकात होऊन गेलेल्या गोष्टी कवटाळून काहीच साध्य होणार नाही. दुसऱ्या कडे एक बोट केले तर तीन बोटे आपल्या कडे असतात.

Pages