देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या साधर्म्यातून जसे भारतात हिंदू ब्राह्मण तसे हे बॉस्टन ब्राह्मिन असा शब्द तयार झाला. >>> बोस्टन ब्राह्मिन हा शब्द भारतातल्या ब्राह्मण शब्दावरून घेतला आहे अमेरिकनांनी? की ब्राह्मिन/ब्राह्मण ही दोन्ही संस्कृतींना माहित असलेल्या एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती आहे किंवा कसे?

बॉस्टन ब्राह्मिन शब्द कधी ऐकलं नव्हता आणि त्याची जी व्युपत्ति सांगण्यात येत आहे ती देखील पटत नाहीये

The physician and writer Oliver Wendell Holmes, Sr. coined the term "Brahmin Caste of New England" in an 1860 article in the Atlantic Monthly.[4] The term Brahmin refers to the highest-ranking caste of people in the traditional Hindu caste system in India. In the United States, it has been applied[by whom?] to the old, wealthy New England families of British Protestant origin which became influential[when?] in the development of American institutions and culture.

https://en.wikipedia.org/wiki/Boston_Brahmin

डावी/उजवी विचारसरणी या संज्ञा फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान उदयास आल्या पण आज जगभर वापरल्या जातात. निओ-नाझी/व्हाइट सुप्रिमिस्ट या संज्ञा विशिष्ट स्थळी/काळी जन्माला आल्या तरी विविध देशात आता त्या प्रकारच्या प्रवृत्तींना संबोधण्यासाठी वापरल्या जातात. त्याचप्रमाणे ब्राह्मण हा शब्द बोस्टनच्या उच्चवर्णीयांना संबोधण्यासाठी वापरला गेला यात इतके आश्चर्य का वाटते आहे ते कळेना.

जे ब्राह्मण/मराठा/शिपी/माळी वगैरे वगैरे ज्ञातीत जन्माला आले ते ही फॅक्ट नाकारू शकत नाहीत. पण या ज्ञातीत जन्माला आलो म्हणून तीच माझी ओळख ठेवायची का नाही हा मात्र तुमच्या हातातला प्रश्न आहे. तसे करताना आरक्षणादी बाबी का आहेत याचा तटस्थपणे अभ्यास करून त्याबद्दल मत बनवले तर 'आम्ही जात मिरवायची नाही पण अमूक तमूक मात्र जात्याधारीत आरक्षण मिळवतो' याचे उत्तर मिळेल. स्वतःची ओळख जातीशिवाय बनवता येत असेल 'ब्राह्मणवाद' हा शब्द खटकणार नाही. स्पेक्ट्रमच्या दुसर्‍या टोकाला असणार्‍यांनी 'आरक्षण हीच सर्वोत्तम व्यवस्था आहे, उच्चवर्णीयांना जातीवरून त्रास दिला जातच नाही' हे समज थोडे पुन्हा तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच स्वातंत्र्याच्या ४०/५० वर्षे आधीपासून ते आत्तापर्यंत सत्ता हाती ठेवलेल्या जाती व त्यांची झालेली नव-उच्चवर्णीय ओळख याचा अभ्यास करणेही गरजेचे आहे. यात प्रामुख्याने उतरंडीच्या वरच्या बाजुच्याच जाती येतात.

स्वाती२, यांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच सुरेख आहे. त्यांनी सांगितलेली माहितीही रोचक आहे.

त्याबद्दलचा हा लेख दिसला.

ब्राह्मणवाद या शब्दाचा (प्रवृत्तीचा) संबंध जातीपेक्षा वर्चस्वावर जास्त आहे; त्याला वर्चस्ववाद म्हणा हवं तर. भारतात काहिकाळ ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवलं म्हणुन त्यात "ब्राह्मण" हा शब्द आलेला आहे. शब्दशः अर्थ काढुन त्यांना संशयाच्या भोवर्‍यात टाकणं चूकिचं आहे. जास्त दूर कशाला जा, या लेखात हि लेखकाने तोच अर्थ गृहित धरलेला आहे असं दिसुन येतंय. आपली स्वतःची परिस्थिती चांगली झाली कि ती टिकवण्याकरता दुसर्‍यावर वर्चस्व गाजवणं हा मनुष्यस्वभाव आहे. आणि याला कोणतीहि जात, धर्म, देश, प्रांत अपवाद नाहि...

कितीही वर्ग विहिन व्यवस्था म्हटले तरी ती तशी नसते. अशा वेळी त्या समाजातला जो एलीट असा समूह असतो त्याला संबोधताना दुसर्‍या एखाद्या वर्ग व्यवस्था असलेल्या समुहातला शब्द उधार घेवून नवा शब्द बनवला गेला यात न पटण्यासारखे काय हे कळले नाही. आपण ब्राह्मण असा उच्चार करत असलो तरी इथे Brahmin असेच म्हणतात.
इथे राजघराणे प्रकार नाही तरी काही कुटुंबांचा उल्लेख American dynasty असा उल्लेख होतो तसेच हे देखील.

थॅनोस आपटे, आपला 16th July 9-58 हा प्रतिसाद आवडला. खरोखर, भारतीय द्वीपकल्पाच्या इतिहासामध्ये 'brahmanical culture' ही संज्न्या वापरली जाते आणि ती शास्त्रशुद्ध आहे. विशेषत: 'temple architecture' या विभागात ही संज्ञ नेहमी येते.
निम्न जातींमध्येही उपजातींच्या उतरंडी असतात हेही खरेच आहे.

ब्राह्मण लोकसंख्येच्या फक्त तीन साडेतीन टक्के आहेत हे बोलले जाते.‌ तर ते एवढ्या महाकाय प्रदेशावर वर्चस्व कसं काय प्रस्थापित करू शकले असतील. आजही आदिवासी समाज हिंदूत गणला जात असला तरी त्यांच्या चालीरीती , दैवतं ही वेगळी आहेत. सतराशे साठ राज्य असणाऱ्या देशात प्रत्येक राज्याचे कायदे,नियम वेगळे असणार. तेव्हा इंग्रजांच्या आधी व नंतर ब्राह्मणी वर्चस्व होतं असं मला वाटत नाही. बळी तो कान पिळी या न्यायाने सर्वकाळ लढाया चालू होत्या. पेशवे जरी होते तरी बहुतेक भाग मुसलमानी अंमलाखाली बरीच शतके होता. स्वराज्याचे पुढे राज्य विस्तार करुन चौथाई वगैरे वसूल करणे या गोष्टींत रुपांतर झाले. बडोदे, ग्वाल्हेर, इंदूर सारखी राज्यं सरदार लोकांनी स्थापली. हे जात उतरंड वगैरे इंग्रजांनी पद्धतशीर लोकांच्या मनात भरवले असावे कारण त्यांच्या प्रशासनामध्ये क्लास वन अधिकारी ते क्लास फोर चपराशी ही रचना आहे.

बॉस्टन ब्राह्मिन शब्द इथे अनेकदा ऐकलेला आहे आणि त्याचा स्वाती२ यांनी सांगितलेला उगमही.

मला ब्राह्मणवाद शब्द खटकतो, पण लेखात तो मुद्दाम डिवचायला लिहील्यासारखा वाटला नाही - लेख मनापासून लिहीलेला आहे आणि व्यापक विषयावर आहे. त्यामुळे त्यावर बोलून सगळी चर्चा या चांगल्या लेखाऐवजी त्या शब्दाच्या ट्रॅक वर जाण्यात आपला हातभार नको म्हणून लिहीले नव्हते. पण तसे झालेच एनीवे Happy

फा - सहमत! मलाही कुणाला डिवचण्यासाठी ब्राह्मणवाद शब्द आला असं नाही वाटलं.

आता वातावरण फारच तापलंय म्हणून विचारतो - ते अमेरिकन चॉप्सी, अमेरिकन डायमंड वगैरे अमेरिकेशी संबध नसलेली नावं नाही का आली आपल्याकडे, तसच हे बॉस्टन ब्रॅह्मिन्स! Wink

कशाला उगीच ताप करायचा? लेख वाचा, विचार पटले तर हो म्हणा, नाहीतर विचारांचा प्रतिवाद करा. उगाच हा त्याचा, तो ह्याचा डुप्लिकेट आयडी, हाच शब्द का वापरला, इथे असं होतं का/तिथे तसं होतं का, हजार-पाचशे वर्शांपूर्वी काय झालं, एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती काय वगैरे फाटे कशाला फोडायचे?

आता वातावरण फारच तापलंय म्हणून विचारतो - ते अमेरिकन चॉप्सी, अमेरिकन डायमंड वगैरे अमेरिकेशी संबध नसलेली नावं नाही का आली आपल्याकडे, तसच हे बॉस्टन ब्रॅह्मिन्स! >>फेफ, त्यापेक्षा आर्य (वैदिक काळ)/ ईरानियन (प्रोटो-ईंडो ईरानियन)/ नाझी-आर्यनचा संदर्भ घेऊन समजणे सोपे आहे पण कोणाला समजावयाचे आणि कशाला?

1. अमेरिकेत white supremacist आणि रेसिस्ट हे दोन वेगळे शब्द वापरले जातात. एकाद्या नॉन व्हाईट व्यक्तीने रेसिझम केला तर त्याला white supremacy म्हणत नाहीत.
तसंच ब्राम्हणवादापेक्षा जातीयवाद/ caste system शब्द योग्य ठरेल. ब्राम्हणेतर व्यक्तीने जातीयवाद केला (कदाचित ब्राम्हणाविरुद्धच) तर तो ब्राम्हणवाद नाही.

2. बोस्टन ब्राम्हण हा शब्द व्हाईट सुप्रीमसी किंवा रेसिझमला समानार्थी म्हणून वापरला जात नाही. या लोकांची अमेरिकेतील ओळख ही हार्वर्डचे संस्थापक, राष्ट्राध्यक्ष , लेखक, कवी, तत्ववेत्ते अशी आहे. यात भारतीय ब्राम्हणांना खटकावं असं काही नाही.

3. शंभर वर्षात ब्राम्हण समाजात प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. दलित व्यक्तीची सावली पडली म्हणून अंघोळ करण्यापासून ते कुठे दलित सून/जावई स्वीकारण्यापर्यंत झालेला बदल दिसतोय तर जुने शब्द का बदलले जाऊ नयेत?

4. ब्राम्हणवाद आणि ब्राम्हण वेगळे असं तुम्ही म्हणाल पण तसं ते समाजातील सर्वांपर्यंत पोचत आहे का? का या शब्दाचा गैरवापर किंवा ब्राम्हणद्वेष्ट्यांकडून मुद्दाम खोडसाळ वापर होतो आहे? ज्याने confusion , misunderstanding, misuse होतो तो शब्द मुद्दाम वापरण्यामागे असे गैरसमज व्हावेत हाच उद्देश असू शकतो.

ब्राह्मणवाद या शब्दाचा (प्रवृत्तीचा) संबंध जातीपेक्षा वर्चस्वावर जास्त आहे; त्याला वर्चस्ववाद म्हणा हवं तर. भारतात काहिकाळ ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवलं म्हणुन त्यात "ब्राह्मण" हा शब्द आलेला आहे. शब्दशः अर्थ काढुन त्यांना संशयाच्या भोवर्‍यात टाकणं चूकिचं आहे. जास्त दूर कशाला जा, या लेखात हि लेखकाने तोच अर्थ गृहित धरलेला आहे असं दिसुन येतंय. आपली स्वतःची परिस्थिती चांगली झाली कि ती टिकवण्याकरता दुसर्‍यावर वर्चस्व गाजवणं हा मनुष्यस्वभाव आहे. आणि याला कोणतीहि जात, धर्म, देश, प्रांत अपवाद नाहि...

राज यांची वरील पोस्ट परफेक्ट आहे.

छान चर्चा चालू आहे. मधले बरेच खोडसाळ प्रतिसाद डोळ्याआड केलेत.

>>पंजाबी लोकांचं वागणं पटलेलं आहे कारण जातीपातीच्या बुरसटलेल्या कल्पना मागे पडल्या आहेत तरी सोशल मीडिया वर त्या लिहीणं हे मुद्दाम केलेलं कृत्य असणार. त्यामुळे या गोष्टी चव्हाट्यावर आणणं त्यांना आवडले नसेल. कारण अगोदर व्यवस्थित चांगली वागणूक देत होते.
Submitted by खान९९ on 14 July, 2019 - 04:33 << मलाही हेच वाटलेले. त्याने सोमीवर काय लिहिले हे इथे स्पष्ट नाहीय. वरील लेखासारखे संयत काही असले तर ठीक पण जाती जाती मध्ये किती दुष्टावा आहे अश्या स्वरूपाचे टोकाचे काही असले तर अश्या मित्रांपासून मी थोडी दूरच राहिले असते.

>>पण त्यांना प्रश्न असू शकतात, आपल्या नजरेआड बरेच मोठे जग आहे , इतकी जाणीव लोकांना असली तरी बऱ्याच प्रश्न सुटण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार होईल.
Submitted by सिम्बा on 14 July, 2019 - 09:42 >>
सिम्बा स्पोट ऑन!
साधना, स्वाती यांचे प्रतिसाद आवडले.
मला स्वत:ला कधी जातीवादाला मुख्यत: त्याच्या काळ्या बाजूला सामोरे जावे लागले नाही. पण माझे तसेही साधे सरळ सुरक्षित पांढरपेशी शहरी मध्यमवर्गीय जीवन. त्यामुळे असे होणे साहजिक आहे. आमचे जीवन "जगा आणि जगू द्या" पठडीतील.
परंतु माझ्या लहानपणी, गद्धे पंचविशीत आजूबाजुला जातीधर्मावरून कधी कटू वातावरण वाटले नव्हते. जातपात नव्हती असे नाही. पण त्याची एवढी चर्चा नव्हती. कदाचित तेव्हा आता इतकी माध्यमे सर्वदूर पसरली नव्हती त्यामुळे असेल. कदाचित त्या वयात काही गोष्टी आम्हाला जाणवल्या नसतील. पण हल्लीच्या पिढीत जात, धर्म आणि त्याच्या समाजाच्याअस्मिता ह्याबद्दल फार टोकाचे विचार दिसतात आणि त्यामुळे दु:ख होते. आपण मागेच चाललो आहोत असे वाटते. कदाचित मिडलाईफ क्राईसीस असावा.

छान चर्चा सुरु आहे.

<< शंभर वर्षात ब्राम्हण समाजात प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. दलित व्यक्तीची सावली पडली म्हणून अंघोळ करण्यापासून ते कुठे दलित सून/जावई स्वीकारण्यापर्यंत झालेला बदल दिसतोय तर जुने शब्द का बदलले जाऊ नयेत? >>

---------- प्रचंड सुधारणा झाल्या असे म्हणणे म्हणजे आपणच आपल्याला फसवल्यासारखे आहे. अजुन खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

आजच्या काळात दलित व्यक्तीची सावली पडली म्हणुन अंघोळ वगैरेचे प्रकार होत नसतील... थोडेफार कायद्याचे भय, थोडा शिक्षणाचा परिणाम आणि कायमची पाण्याची टंचाई हे काही कारणे असतील. याला प्रचंड सुधाराणा म्हणायच्या?

सून / जावाई म्हणुन त्यांना "स्विकारणे" फार लांबची गोष्ट आहे. साक्षी मिश्रा यांचे उदाहरण ताजे आहे. काल साक्षी यांचे पतीवर (कोर्टाच्या आवारातच) हल्ला झाला होता... "स्विकारल्या " जाण्याचे प्रमाण लाखात एखादे असेलही पण बहुतेक सर्व प्रकरणात प्रचंड खळ खळ, खुप मानसिक त्रास, मार - हाण आणि अगदी टोकाची प्रतिक्रिया म्हणजे जिवाने मारणे असे प्रकार होत असतात.

दलितांनी चांगला अभ्यास करावा, खूप शिकावे, चांगली नोकरी आणि चांगला व्यवसाय करावा... शैक्षिणिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठी कर्तबगारी मिळवावी, मिळवल्यावर टिकवावी.... हे सर्व स्वबळावर केल्यास संपुर्ण जग नतमस्तक होते.... दुनिया जरुर झुकेगी. हे जग (आर्थिक, शैक्षणिक, शारीरिक, इतर कला गुण ... ) केवळ सामर्थ्यालाच मान देते.

<< ब्राह्मणवाद या शब्दाचा (प्रवृत्तीचा) संबंध जातीपेक्षा वर्चस्वावर जास्त आहे; त्याला वर्चस्ववाद म्हणा हवं तर. भारतात काहिकाळ ब्राह्मणांनी वर्चस्व गाजवलं म्हणुन त्यात "ब्राह्मण" हा शब्द आलेला आहे. शब्दशः अर्थ काढुन त्यांना संशयाच्या भोवर्‍यात टाकणं चूकिचं आहे. जास्त दूर कशाला जा, या लेखात हि लेखकाने तोच अर्थ गृहित धरलेला आहे असं दिसुन येतंय. आपली स्वतःची परिस्थिती चांगली झाली कि ती टिकवण्याकरता दुसर्‍यावर वर्चस्व गाजवणं हा मनुष्यस्वभाव आहे. आणि याला कोणतीहि जात, धर्म, देश, प्रांत अपवाद नाहि... >>

------- आपली स्वत:ची परिस्थिती चांगली झाल्यावर इतरांना (जे आज दलदलीत आहे) मदत करुन त्यांनाही आपल्यासोबत घेणे / आणणे हा मनुष्यस्वभाव आहे.

वर्चस्व ठेवणे, गाजवणे, टिकवणे हे कमकुवत आणि असुरक्षितपणाचे लक्षण आहे.

तसंच ब्राम्हणवादापेक्षा जातीयवाद/ caste system शब्द योग्य ठरेल. ब्राम्हणेतर व्यक्तीने जातीयवाद केला (कदाचित ब्राम्हणाविरुद्धच) तर तो ब्राम्हणवाद नाही
>> मला हेच सुचवायचे होते. vt, उदय धागा योग्य ट्रॅकवर आणल्याबद्दल आभार.

कुलूप घलण्याची सूचना करण्यामागे हेतू चांगला होता. इथे त्यानंतरही चांगली चर्चा झाली आहे हे पाहून खूपच समाधान वाटले.

जवळ जवळ सर्वांनीच अत्यंत संयमाने, जबाबदारीने लिहीले आहे. मला दुसरी बाजूही दिसतेय. अगदी खरे सांगायचे तर खोडून काढणे वगैरे प्रकार नकोत. दुसरी बाजू माहीत करून घ्यावी. ओके, यामुळे वागणूक अशी असते असा सहजपणा असायला हवा. परस्पर सहवासाने काही किंतु निघून जातात. परस्परसंबंध नसतील तर काल्पनिक भीतीपोटी अनेक चुकांचे समर्थन होत राहते.

सर्वांची नावे घेता येणार नाहीत. पण मला स्वाती २ यांच्या प्रतिसादाचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. बोस्टन ब्राह्मण (ब्राह्मिण) या संज्ञेशी त्यांनी ओळख करून दिली आहे. इतरांचा अभ्यास सुद्धा थक्क करणारा आहे.

मला असे वाटायचे की यात काय अभ्यास करायचा ? पण माझा तो गैरसमज गळून पडला. जागतिक स्तरावर सुद्धा डोळे उघडे ठेवून पाहीले तर मानवी संबंधांकडे पाहण्याचा दृष्टीकोण किती व्यापक होतो हे मला इथल्या प्रतिसादांमुळे समजले.
मला कुठल्या मुहूर्तावर इथे लिहावेसे वाटले कोण जाणे, पण ती गोष्ट चांगली झाली माझ्याकडून असेच आता वाटत आहे. नाहीतर इतके बारीक आणि वेगवेगळे पैलू मला समजलेच नसते.

सर्वांचे अगदी अगदी मनापासून आभार.
(ज्यांची नावे घेतली नाहीत त्यांनी नाराज होऊ नका बरं का )

ब्राह्मणवाद आणि जातीयवाद यात काय फरक आहे ?
इथे दिलेल्या लिंका वाचताना या पानावर जाता येणार नाही असा संदेश येत आहे. इतर विकीपीडीया व बाकीचे वाचले. गोंधळच जास्त झाला.
मला असे वाटत होते की जातीयवाद म्हणजे आपल्या जातीच्या माणसाला झुकते माप देणे. जातीच्याच माणसात संबंध ठेवणे. इतर जातींच्या माणसांना लाभ मिळू न देणे.
तर ब्राह्मणवाद म्हणजे जातीजातीत श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा मुद्दा भिनवून दहीहंडी सारखी व्यवस्था कायम करणे. वरच्या माणसाला खालच्या माणसाकडे पाहून आपण त्याच्या वर आहोत हा अहं सुखावणे हा ब्राह्मणवाद.
यावर वाचलेली पुस्तके आजच्या काळाशी किती सुसंबद्ध आहेत याची मला कल्पना नाही.

फक्त आज जे काही आहे त्यावरच मी लिहीले आहे.
जिथे जातपात कल्पनाच नाही तिथे आपण गेलो तर ? हा प्रश्न आहे. पण इथे काहींनी म्हटल्याप्रमाणे डोक्यात ही कल्पना असेल तर या कल्पनेशी परिचित असलेली दोन माणसे परदेशात एकमेकांना भेटली की आपोआपच डोक्यातली व्यवस्था एकमेकांना लागू होईल.
मग यावर उपाय काय आहेत ?
आंतरजातीय विवाह हा उपाय मला तोकडा वाटतोय. का हे सांगता येत नाही. कदाचित पुढची चर्चा वाचताना उत्तर मिळून जाईल.

कांदामुळा भौ .( कांदा मुळा नाव आषाढी एकादशी निमित्त कानावर आलेल्या अभंगामुळे सुचलं का?)
आता माझा शेवट, शेवटचा प्रश्न:-
जर आपण स्वत: ओबीसी मध्ये मोडत नसता आणि समजा जन्मानं ब्राह्मण असता ( समजा फक्त) . तर तुम्ही लेखाला हे शीर्षक दिले असते काय?
(तुम्ही मान्य केलंय की ब्राह्मणवाद म्हणजे अहं सुखावणं . तर तो क्षत्रिय, वैश्य वाद का नाही? की केवळ उतरंडीत सर्वोच्च स्थानी ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविण्याची सोय आहे काय?)

थोडासा लांबलचक लिहिलेला प्रतिसाद चुकून डिलीट झाला. तोच टप्प्याटप्याने लिहीत आहे.
संपूर्ण मध्ययुगात आणि आधी क्षत्रियांची सत्ता राहिली असली तरी सामाजिक वागणुकीचे नियम ब्राह्मण ठरवीत आणि क्षत्रिय त्यांचे पालन करीत. हे नियम म्हणजेच धर्म होता. समाजात एकमेकांशी व्यवहार कसा असावा, कोणासाठी कोणत्या रूढी अथवा नियम असावेत हे ब्राह्मण ठरवीत. दैनंदिन कृत्ये, गृह्यकृत्ये प्रत्येक जातिगटासाठी वेगळी असत आणि अर्थात ती ब्राह्मणच ठरवीत. ब्राह्नणांनी केलेल्या नियमांप्रमाणे आणि त्यांच्या मतानुसार समाज चाले. या समाजव्यवस्थेला ब्राह्मनिकल असे नाव आहे आणि ते विद्वन्मान्य आहे.

2) यातले पुष्कळसे नियम ब्राह्मणांना अनुकूल आणि सवलतीचे होते. कोणतीही सर्वंकष सत्ता शेवटी जुलमी आणि भ्रष्टाचारी बनते या कालातीत नियमानुसार ही धर्मसत्ताही तशी बनली. हे जगातील सर्वच समाजांत घडले. काही समाजांनी ही सत्ता वेळीच झुगारून दिली. आपल्याकडे अर्वाचीन काळापर्यंत ती टिकली. काही दयार्द्र ब्राह्मण आणि संतसज्जनही होते पण ते अल्पसंख्य होते. (ते अल्पसंख्य असणे हेही एक वैश्विक सत्य.)

३) संत चोखामेळा यांचा ' धाव घाली विठू आता' गा अभंग प्रसिद्ध आहे. ' बडवे मज मारिती ऐसा काय केला अपराध' किंवा ' शिव्या देती म्हणती महारें देव बाटवीला' ह्या ओळी चटका लावतात. विषमता सार्वत्रिक आहे, विशेषत: आर्थिक विषमता. मात्र, जन्माधारित विषमता असू नये हे मान्य होण्यासारखे आहे. गरीबी कमी व्हावी, लोकांना संधीचा लाभ घेता यावा, किंबहुना समान संधी असाव्यात यासाठी संपन्न समाजात कल्याणकारी योजना असतात. निदान प्राथमिक स्तरावर (elementary level)वर सवलतयुक्त संधी असाव्यात. एखादे मूल गच्चीवरून पतंग उडवतेय तर एखादे जमिनीवरून; तेव्हा त्या पतंगाच्या उड्डाणउंचीत सुरुवातीला फरक राहाणार. Level playing field सर्वांना मिळावे. नंतर ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार ज्याची त्याची वाटचाल राहील.

हीरा, छान प्रतिसाद
ब्राह्मणवाद हेच नाव का हे खरे तर भरकटीकरण आहे. पण विषय निघालाच आहे तर होऊन जाऊ द्या. पण नंतर आजच्या काळाकडे परत येऊयात.
मायबोलीवर ब्राह्मणवादावर पुरेशी चर्चा झालेलीच नाही का ? खरं वाटत नाही हे. उपक्रम वर शोधलेत का कुणी ?

ब्राह्मणेतर समाजात ज्या आक्षेपार्ह चालीरिती आहेत त्यापैकी एक म्हणजे जातपंचायत. गुजरातमधले ताजे उदाहरण आहेच.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-thakor-community-bans-...

अशाने ब्राह्मणवाद / जातीयवाद घट्ट होईल की निवळेल ?
ही ब्राह्मणवादाची अपत्ये आहेत. पण आता निम्न जातींनी तो प्रतिष्ठेचा विषय केला आहे. राज्यघटना अशा फतव्यांना मान्यता देत नाही. भादवि खाली देखील अशी फर्माने दंडनीय आहेत. पण शासन यावर काही करत नाही.

ठाकोर समाजाची मतं जर सरकार मधील पक्षाला हवी असतील तर राज्यघटना, समानता, जातीयवादाचे उच्चाटन याला तिलांजली दिली जाते. यास अपवाद कोणताही पक्ष नाही. अगदी मनुवादाच्या विरोधात आरोळी देत आलेला बहुजन समाज पक्ष आता प्रस्थापित झालेला आहे. मायावती आता ब्राह्मण, ठाकूर यांच्या मतांसाठी समता वगैरे गोष्टी विसरायला तयार आहेत.

भारतात राजकारण असे सर्वोच्च स्थानी जाऊन बसले आहे. आता जागृती करणे, समाज प्रबोधन करणे हे हास्यास्पद विषय झाले आहेत. उलट जातजाणिवांना फुंकर कशी घालता येईल, दोन जातींना लढवता कसे येईल, एका जातीला दुसरीविरूद्ध असुरक्षित वाटण्यासाठी काय करता येईल याची धोरणे आखणे हेच प्रत्येक पक्षाच्या थिंक टँकचे काम उरलेले आहे.

छान लिहिलाय लेख. असं मनातलं नीट लिहीता यावं असं खूप वाटतं. धन्यवाद.
विषयाला धरून असलेले प्रतिसादही छान.

Pages