देशी ब्राह्मणवादास सीमारेषा सुद्धा अडवू शकत नाहीत काय ?

Submitted by कांदामुळा on 14 July, 2019 - 00:53

मला अशा गोष्टी व्यवस्थित मांडण्याचा अनुभव कमीच आहे. थेटच मुद्द्यावर येतो.

भारतात त्यातही महाराष्ट्रात राहून मला जातीयवाद म्हणजे काय हे जाणवलं नव्हतं. माझ्या दृष्टीने उच्च असणारी माझी जात, खालच्या जातीच्या माणसाला पाहून किंचितसुखावणारा) सुखावणारा माझा अंहं, मला एकंदर जातव्यवस्थेत मी कुठे आहे हे समजू देत नव्हती. त्यातही जरा सत्ता उपभोगणा-या घराण्यात जन्म झाल्याने सगळे कसे रूबाबात चालले होते. त्यामुळे जातीयवादाबाबत बोलणा-यांना मी तुच्छ समजत होतो.

पण कॉलेजच्या प्रवेशाला वडलांनी जात प्रमाणपत्र काढून आणले तेव्हां मी ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे मला समजले. हा माझ्या दृष्टीने धक्काच होता. मागासवर्गीय या शब्दाचा मला अत्यंत तिटकारा होता. पण माझ्या नावाला हा शब्द जोडला गेला. पण थोड्याच दिवसात सर्वच जण बिनदिक्कतपणे जातीचा अर्ज आणतात आणि प्रतिष्ठीत म्हणूनही वावरतात हे सवयीचे झाले. पुन्हा सर्व पूर्ववत झाले.

मध्यंतरी आम्ही मोटरसायकल्स वर राजस्थानात गेलो होतो. तेव्हां मात्र स्व अभिनामाच्या ठिक-या उडाल्या. राजस्थानात ब्राह्मण आणि राजपूत सोडले तर सर्वच जण पिछडा म्हणजे शूद्र समजले जातात. आम्हाला थेटच जात विचारायचे. माझी जात सांगितली की अरे भाई ब्राह्मण हो ? क्षत्रिय हो ? असे विचारले जायचे. या दोन्ही प्रश्नांना नकारार्थी उत्तरे दिली की मग याने शूद्र हो असा प्रश्न यायचा. हा अनुभव जवळपास सर्वच ठिकाणी आला. शूद्रांना पाणी देताना आजही राजस्थानात वेगळे भांडे दिले जाते. आम्ही सांगितले की महाराष्ट्रात आम्हाला खूप मान आहे. आम्ही सवर्ण आहोत. पण ते सांगायचे की आम्ही वर्ण बघतो. जे या दोन वर्णाचे नाहीत ते सर्वच शूद्र म्हणजे पिछडा. एकाने विचारले की ओबीसी मे आते हो का ? मी हो म्हटल्यावर तो हसला. म्हणजे या पुढे मी काय समजावणार ?

त्यांच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. महाराष्ट्रात इतकी उघड जातव्यवस्था नाही. त्यामुळे मध्यमजातींना ती जाणवत नाही. यामुळे आपण भारी आहोत असे उगीच वाटते. राजस्थानातल्या अनुभवाने डोळे उघडले. नंतर उत्तर प्रदेश बिहारचे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी झाले. त्यांनी जातव्यव्स्थेचे जे वर्णन केले त्यामुळे सुन्नच झालो. इथे जातीचा उल्लेख हा अगदी सर्रास आहे. थोडक्यात जे आहे ते आहे. लपवाछपवी नाही.

मी पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात असे नाही हे सांगायला बघायचो. पण त्यांच्याकडून व्यवस्थित चिरफाड झाली. महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात मराठा वर्चस्व आहे तर उर्वरीत महाराष्ट्रात ओबीसी. त्यातही कुणबी वर्चस्व जास्त आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व प्रशासन आणि पूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यात असायचे. आता आयटीत आहे. राष्ट्रीय पक्ष हे बहुत करून ब्राह्मणांचे अंकीत आहेत. माध्यमांमधे ब्राह्मणी वर्चस्व आहे. न्यायव्यवस्थेत ब्राह्मण वर्चस्व आहे.

पण राज्याराज्यात त्या त्या प्रदेशातल्या प्रबळ जातींचे वर्चस्व आहे.
मी आता जेव्हां विचार करतो तेव्हां ज्या समूहांना कुठेच प्रतिनिधित्व नाही, त्यांना आपल्या तक्रारी मांडताना, समस्या मांडताना किती अडचणी येत असतील असा विचार येतो. तरी देखील माझ्या पेक्षा कनिष्ठ समूहांचे प्रश्न मला भिडतात असा माझा दावा नाही. ज्याप्रमाणे मी पुरूष असल्याने माझ्याकडे स्त्री जाणिवा नाहीत किंवा अन्य जेण्डरच्या जाणिवा असणे शक्य नाही त्यामुळे मला त्यांच्या समस्या जाणवणेही शक्य नाही हे सत्य आहे तसेच जातजाणिवांचेही होत असावे.

मात्र मी जेव्हां मला वरीष्ठ समजून या व्यवस्थेचे फायदे उपटत होतो तेव्हां मला कोणतेही दोष तीत दिसत नव्हते. तसेच माझ्यापेक्षा वरीष्ठ जातींचे होत असावे असे मला आता वाटते.

कदाचित या जातजाणिवांमुळे या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोण भिन्न भिन्न असावा. यातूनच मतभेदांना सुरूवात होत असावी. हे मतभेद अत्यंत टोकाचे आहेत. इतके की त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

जातीव्यवस्थेचे मला लाभ वाटत होते तोपर्यंत इतरांच्या नुकसानीची मला पर्वा नव्हती. मी त्याकडे डोळेझाक करीत असे. कदाचित त्यावर चर्चाच होऊ नये असे मला वाटत होते. मी फक्त त्यांचे लक्ष लाभांकडे कसे जाईल आणि ते गुणगाण कसे करतील यास सामोपचाराचे धोरण समजत होतो. माझ्या ठसठासणा-या गळूला धक्का लागू नये त्याप्रमाणे मला लाभ पोहोचवणा-या बाबींकडे लक्ष वेधले जाऊ नये ही माझी हास्यास्पद धडपड आता मला मजेशीर वाटते.

या काळात अनेक लोकांशी संपर्क आला. उत्तम श्रोता असल्याने मी ते ऐकत गेलो. वाचत गेलो. मी फुले आंबेडकरी साहीत्य वाचत गेलो. अंतर्बाह्य बदलत गेलो. मी कधीही हिंदुत्ववादी पक्षांचा नव्हतो. मात्र सौम्य हिंदुत्ववादी होतोच. त्यामुळे फारसे काही विशेष वाटत नव्व्हते.

आपण जर देश सोडून गेलो तर आपल्याला या काळ्या वास्तवापासून सुटका मिळेल असे विचार मनात घोळू लागले होते.
मात्र एका मित्राने आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने ते फेसबुकवर सुद्धा मांडले. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार तो परदेशात स्थायिक झाला होता. तिथे भारतीयांना पाहून त्याचे देशप्रेम जागृत झाले ( कदाचित आपला माणूस परदेशात भेटणे यामुळे सुरक्षित वाटले असावे). त्याने त्याच्याशी दोस्ती केली. त्याच्यामुळे अनेक भारतियांशी मैत्री झाली. पुढे त्याला अनेक ठिकाणी बोलावले जाऊ लागले. ते ही घरी येत. सण, उत्सव साजरे होते. हे सर्व पंजाबी होते. पंजाबी उत्सवप्रिय असतात. सतत सेलिब्रेशन मूड मधे असतात. हे दिवस आनंदात गेले.

पुढे तो त्याच्या सोशल अकाउंटवरून भारतातल्या जातव्यवस्थेबाबत लिखाण करू लागला. त्याचा अकाउंटला नवीन मंडळी सुद्धा होती. त्यांच्या वाचनात हे सर्व येऊ लागले. त्यांना धक्का बसला. हळू हळू या सर्वांनी त्याच्याशी संपर्क कमी केला. पुढे तर त्याला बोलवणे कमी झाले. अगदी लग्नसमारंभात सुद्धा आमंत्रण देणे टाळले जाऊ लागले. आता तर वाळीतच टाकले आहे.

याने एक दोघांना विचारले देखील. पण त्याला उत्तर मिळाले नाही. त्याला इग्नोर करणे चालूच आहे. पहिल्यांदा जो मित्र भेटला त्याच्या घरी हा गेला असता अनवॉण्टेड गेस्ट सारखी ट्रीटमेंट त्याला मिळाली. नंतर सूचकपणे कुछ भी उटपटांग लिखते हो, देश के खिलाफ कुछ भी बकवास करते हो.. हमे डेकोरम मेण्टेन करना है वगैरे वगैरे त्याने कळवले. त्याला कटवले.

हा मित्र यादव आहे. बाकीची पंजाबी मंडळी उच्चजातीची आहेत.
अलिकडे जातव्यवस्थेच्या वास्तवावर बोलणे हा देशद्रोहद्रोहला जातो. प्रतिष्ठीत चर्चेच्या संकेतस्थळावर या विषयावर लिहीणे अप्रतिष्ठीत समजले जाते. भलतेच मुद्दे काढून मूळ विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न होतो. अथवा दाहकता कमी करण्याचा प्रयत्न होतो. अथवा उच्चजातींकडूनच आम्हालाच द्वेषाची वागणूक मिळते म्हणून आम्ही इकडे आलो असा कांगावा केला जातो.

परदेशात उच्चजातींच्या संस्था आहेत. विवाहसंस्था आहेत.
ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच म्हणा. पण इकडे आल्याने आता खालच्या जातींकडून जातीयवादाचे टोमणे ऐकायला मिळत नाहीत हे सुख आहे असे एकाने सांगितल्याचे मित्राने नमूद केले आहे.

मी सुद्धा अनेक (रेडीफ सारख्या) स्थळांवर परदेशस्थ भारतियांची शेरेबाजी वाचलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी करून अब तुम्हारा सडा हुआ संविधान हमारा कुछ उखाड नही सकता असे सांगितलेले असते.

परदेशात गेल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही हा विचार कदाचित देशात असताना कायद्याने कारवाई होईल म्हणून समंजस रहायला भाग पाडत असेल का ? मी अशी शेरेबाजी कधी केली नाही. कराविशी वाटली नाही. कदाचित सुख अनुभवले पण किमान खालच्यांना हिणवावे अस्से वाटले नाही हा फरक असेल. लिमिटेड का असेना सेक्युलॅरिझम असावा हा. कशाला काय म्हणतात याच्यात मला जायचे नाही. व्याख्यांमधे मला इंटरेस्ट नाही. मी गावातला माणूस आहे. मला माणसामाणसातला व्यवहार कळतो. त्याला साखरेत लपेटून मांडणे आम्हाला जमत नाही. जे आहे ते रोख ठोक बोलायची सवय आहे.

परदेशात गेल्यावर तरी जातीयवादाला गाडण्याची संधी मिळू शकते. पण तसे होत नाही हे दुर्दैवी आहे.
मराठी लोक असे वागतात का ? उघड वागत नसतील ही खात्री आहे. पण एखाद्याचे विचार कळाल्यानंतर देखील त्याला आपल्यात स्थान मिळते का ? असे म्हणण्याचे कारण म्हणजे देशातून येणा-यात निम्न जातींची आता कुठे सुरूवात आहे. तर वरीष्ठ जाती तिकडे किमान तीन पिढ्यांपासून सेटल झालेल्या आहेत.

त्यांचे जे सांस्कृतिक जग आहे, त्यात वेगळ्या विचाराला स्थान आहे का ?
मी जर उद्या गेलो आणि मी गणपती बसवणार नाही, वर्गणी देणार नाही, मी शिवजयंती करणार, फुले जयंती करणार, शाहू जयंती करणार असे म्हणू लागलो तर माझ्या विचारांचा सन्मान होतो का ? की पंजाब्यांप्रमाणे इथेही वागतात ?
कम्फर्ट लेव्हलप्रमाणे आपल्या संस्कृतीचा मनुष्य आपल्या सर्कलमधे असावा हे स्वाभाविक आहे. मात्र रॅशनलिस्ट्स, पुरोगामी यांच्याकडून थोड्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांप्रमाणे ते माझ्याशी वागतील का ?

की परदेशात गेल्यावर थेट आपल्या विचारांचे लोक शोधून मी त्यांच्याशीच मैत्री करावी आणि आपला कम्फर्ट झोन शोधावा ?
(परदेशात जाईन की नाही हे माहीत नाही. मी हा तात्विक प्रश्न विचारला आहे)

कृपया , या लेखाचा उद्देश कुणालाही न दुखावणे हा आहे. मला ज्यावर चर्चा करायची आहे तो विषय समजावून घेऊन चर्चा करावी ही नम्र विनंती. माझे लिखाण प्रक्षोभक, आक्षेपार्ह किंवा खोडसाळ वाटल्यास आपण ते काढू शकता. मात्र जर या ठिकाणी चर्चा झाली तर आनंद होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वतः जात मानत नसल्याने "माझी जात" असा अभिमान नाहीच आहे.
* मला कनिष्ठ जातींकडुन नेहमीच्या व्यवहारात कडवटपणा फारसा जाणवलेला नाही. अर्थात हा माझ्या दृष्टीकोनाचा परीणाम असु शकतो>>>>> सहमत.तरीही २०-२२ वर्षांच्या तरूणांमधे, स्वतःच्या जातीचा वाढता अभिमान(?) मात्र गेल्या ८-१० वर्षांपासून खूप जाणवतोय.वाईट वाटतेय.पण काही करू शकत नाही.आपल्यापुरती सुधारणा करावी या मताला केव्हाच आलेय.

आता बोलायचं तर कोणताही समाज घ्या, सोशल मीडिया वर स्वत:ची जातच सर्वश्रेष्ठ आहे असे सांगून आक्रमकपणे इतरांची निंदा नालस्ती करत असतात. याला कोणताही अपवाद नाही. तुकडे तुकडे गॅंग पध्दतशीरपणे फूट पाडत आहे. आपण,आपली मुलेबाळे सेफ ठेवून इतरांना उकसावण्याचे काम तथाकथित लोक करतात.

मागे लोकसत्ताचे संपादक बहुतेक केतकर यांनी ब्राह्मणांना वस्तुस्थिती ची जाणीव करून दिली म्हणून रोष ओढवून घ्यावा लागला होता हे आठवतं.

सध्या दिसत असलेली कटुता ही नैसर्गिक नाही - ती निखारे घालून घालून फुलवलेली आहे. पिढयनपिढ्या जे लोक पिचले गेले त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या आंदोलन करणार्‍या फौजा तयार करून आपला राजकीय फायदा पदरात पाडून त्यांना पुन्हा वार्‍यावर सोडण्याकरता ती निर्माण केलेली आहे.>>

अगदी बरोबर. आणि या गोन्धळाचे राजकीय फायदे उपटणारे फुरोगामी, त्यानी आणलेल्या सज्ञा पाश्चत्य समाज कसा वापरतोय याची मखलाशी करतील, पण भारतातील किती व्यक्तीन्ना ती सन्ज्ञा किन्वा तो शब्द फुरोगाम्यान्कडुन का वापरला गेलाय हे समजतेय, याची काळजी करणार नाहीत. या प्रव्रुत्तीमुळेच सामान्य माणसाशी फुरोगाम्यान्ची नाळ कधी जुळली नाही.

सनव यांनी दुसर्‍या धाग्यात "जातीव्यवस्था मनुने प्रस्थापित केली आणि मनु क्षत्रिय होता, तसेही राजे क्षत्रिय असल्याने प्रस्थापित व्यवस्थेची जबाबदारी क्षत्रियांची आहे" असा युक्तिवाद केला आहे.

हे म्हणजे 'माझाच गणपुले' टाईप झालं. अहो काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात जातिवादावर चर्चा किंवा बोलणं हे मनु, मनुवाद, मनुस्मृती या keywords भोवती फिरत नव्हतं का? तत्कालीन लिबरल पुरोगामी नेत्यांची भाषणं ऐकली तर रँडम पॉज केलं तरी मनुवादी मनुवादी इतकंच ऐकू येईल.
आता अलीकडे मनुवाद ऐवजी ब्राम्हणवाद शब्द प्रचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे दिसतंय. मग आता फक्त ब्राम्हण दोषी आणि मनुचा काही संबंध नाही असं ठरलंय का?
पुरोगामीज प्लिज अपडेट द मासेस.

व्यत्यय, अगदी सहमत. प्रत्येक मुद्द्याशी सहमत.
गंमत अशी की अशी मते बाळगणाऱ्या उच्चवर्णीयांना स्ववर्णीयांचा रोष पत्करावा लागतो आणि अन्यवर्गीयही यांच्याकडे अविश्वासानेच बघतात. हे वागणे खरेच आहे की दिखाऊ अशी शंका सुरुवातीला त्यांच्या डोळ्यांत दिसते. मात्र, आतापर्यंत कधीही अन्यजातीयांच्या असूयेला निदान मलातरी सामोरे जावे लागलेले नाही. उलट प्रेमच मिळाले आहे. अर्थात समूहसंभाषणात ( आपलेआपलेच श्रोते असताना, माझ्या उपस्थितीचा अपवाद) बोलण्यात थोडीशी कटुता असतेच. तीही दलितांमध्ये फार नसते. हा अर्थात वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि मत.
ता. क. : खंत बाळगणे ठीक. पण ओझे नको. आणि आपल्या वर्तनाने त्या सलाची भरपाई करीत आहात हे तर खूपच आवडले. (थोडे पेट्रनाय्झिंग वाटले तर क्षमस्व)

सरळ मनूवर बिल फाडायचे सोडून ब्राह्मणांवर बिल फाडत आहेत. मनू किती बदनाम केलाय लोकांनी.

Submitted by चक्रम माणूस on 24 July, 2019 - 12:34
मी हेच बोललो होतो सनव जी.

कटुता वगैरे जेव्हा बहुसंख्य शेजारी परजातीचे असतात व आपण एकटे त्यांच्या मध्ये राहतो, कामाच्या ठिकाणी ग्रुपमध्ये सर्व / मेजॉरीटी इतर जातीचे असतात तेव्हा लक्षात येते. अशावेळी बहुसंख्यांच्या पोटात शिरून रहावे लागते.

पण अशी सामाजिक व्यवस्था निर्माण आणि मजबुत होण्यात आपल्या पुर्वजांचा सहभाग होता हे कटु वास्तव सध्याचे ब्राह्मण अंगावर पडलेल्या पालीसारखं झटकुन टाकताहेत असं जाणवतंय. >>> माझा विरोध आहे तो ह्या घाउकपणाला. माझे लॉजिक याबाबतीत जात धर्म विरहित कन्सिस्टंट आहे, आणि अनेक ठिकाणी अशी पोस्ट दिसेल. एका जातीतील, समाजातील वाईट लोकांनी जे केले, जे करत आहेत त्याची जबाबदारी जे लोक ते स्वतः करत नाहीत त्यांच्यावर येत नाही.

मुस्लिमांच्या बाबतीत असला घाउकपणा फॅसिझम असतो, ब्राह्मणांच्या बाबतीत केला की पुरोगामीपणा असतो.

माझा विरोध फक्त घाउक क्रिमिनलायझेशनला आहे. बाकी बाबतीत अनेकदा लिहीलेले आहे ते पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही. पण इथे आजकाल तुम्ही एकतर स्वघोषित लिबरल असता, नाहीतर हिंदुत्त्ववादी. रंगीत चित्रपट ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टीव्हीवर पाहिल्यासारख्या इथल्या पोस्ट्स अनेकजण वाचतात. त्यामुळे ही माझी मते - व्यत्यय यांनी जे स्पेसिफिक मुद्दे आहेत तेच वापरूनः
१. माझ्या सध्याच्या सुस्थितीला माझी उच्च जात, थोडी फार का होईना, कारणीभुत आहे याची कायम जाणीव असते >>> नक्कीच.
२. एक हिंदू समाज म्हणून मलाही लाज वाटते, वाईट वाटते. ब्राह्मण म्हणून स्पेसिफिक नाही. हा ७०% लोकांनी ३०% लोकांवर केलेला अन्याय आहे. ३% लोकांनी ९७% टक्क्यांवर नाही
३. जातीवर आधारित आरक्षणाचे समर्थन मी ही करतो. मला थेट इम्पॅक्ट झाल्याचे आठवत नाही. झाला असता तर तेव्हा कदाचित स्वाभाविकपणे चिडलो असतो. तेव्हा इतके व्यापक हित वगैरे कळत नव्हते.
४. आरक्षण हा गरीबी हटाओ उपक्रम नाही याची मला जाणीव आहे. >>> मलाही. आर्थिक गटांना आर्थिक मदत हवी, आरक्षण नव्हे असे मला वाटते.
५. क्रीमी लेयरला आरक्षण मिळू नये. पण त्याकरता केलेल्या उपायांत आरक्षणाची अजूनही गरज असलेल्या लोकांनाच ते मिळत नाही अशी अवस्था येउ नये.
६. माझ्या जातीच्या ओळखीमुळे मी आवर्जून फायदे घ्यायला गेलेलो नाही पण नेहमीच्या इन्टरअ‍ॅक्शन्स जे आपोआप मिळाले ते नाकारलेले नाहीत.
७. मला इतर कोणत्याही जातींकडून प्रत्यक्षात कडवटपणा जाणवलेला नाही - सर्वसाधारणपणे. कधीतरी अनुभव येतो. पण त्यात जनरलायझेशन करणार नाही. उलट उच्च जातीबद्दलच्या अजूनही असलेल्या सामाजिक कल्पनांमुळे मिळालेल्या चांगल्या वागणुकीचीच उदाहरणे जास्त आहेत.

>>आता या मानसिकतेतून मुक्त होताना बंडाची ठिणगी उडणारच. सामंजस्य आणि समरसता येण्यास वेळ लागणारच. त्यासाठी काही शतके जावी लागतील. एकदोन पिढ्यांमध्ये होणारे हे काम नाही.<<
कदाचित तुम्हाला अभिप्रेत नसेल, पण या वाक्यातुन साधारण असाच अर्थ ध्वनित होतोय कि बंडाची ठिणगी (व्हायलंट अथवा नान-व्हायलंट) समर्थनिय आहे. मला एक सांगा - पुर्वजांनी केलेल्या अत्याचारा करता आजच्या पिढिला दावणीला धरणं इर्रॅशनल नाहि? अशा इर्रॅशनल वागण्यामुळे दुसर्‍या बाजुकडुन हि ठिणगी पडली तर त्याचंहि तुम्ही समर्थन करणार का?

आपण एकत्र बसलो आहोत असे समजून चर्चा करूयात. घुसळण होणे गरजेचे असते. ज्या गोष्टींचा बागुलबुवा करू त्यावर साधकबाधक चर्चा कधीही होणार नाही. मला एक बाजू स्वच्छ माहीत आहे. दुसरी बाजू म्हणजे अंधारात चाचपडल्यासारखी आहे.

ही दुसरी बाजू म्हणजे..
- अलिकडे म्हणजे गेल्या पंधरा वर्षात मागच्या पिढ्यांनी जे काही केले त्यासाठी आम्हाला का जबाबदार का धरता म्हणून सुरू झालेला युक्तीवाद आता कुठल्याही तोंड फोडणा-या, कोंडी फोडणा-या चर्चेला द्वेष म्हणून संपतो.
- सुशिक्षितांना सामाजिक आकलन खरेच नसते का ?
- आरक्षण का दिले हे वारंवार सांगण्याची पाळी सर्वात हुषार अशा गटाला सांगण्याची वेळ का यावी ?
- महात्मा फुलेंना शिवराळ म्हटले जाते. त्या काळच्या स्थितीत फुले शिवराळ होते की सुधारणावादी ? या विषयावर समाजातील क्रीमचे वाचन नसते का ?
- उघड्या डोळ्यांना कुणावर अत्याचार होतात, कुणाची आर्थिक स्थिती कशी आहे हे दिसत असताना सोशल मीडीयात ब्राह्मणांना णावे ठेवण्याची फॅशन आलेली आहे इथपासून ते सर्वात जास्त तिरस्कार ज्या जातीचा केला जातो ती म्हणजे ब्राह्मण अशी मते मांडण्याचे काय कारण ? कुठली अशी जात आहे जिच्यावर इतर जाती मनापासून प्रेम करतात ?

माझ्या वैयक्तिक पातळीवर मी कसं वागायचा प्रयत्न करतो ते सांगतो. दुसर्‍या कोणी तसंच वागावं हा अजिबात आग्रह नाही
* माझ्या सध्याच्या सुस्थितीला माझी उच्च जात, थोडी फार का होईना, कारणीभुत आहे याची कायम जाणीव असते
* तळागाळात खितपत पडलेल्या खालच्या जातीच्या लोकांच्या हालपेष्टांना जी अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण माझ्या पुर्वजांनी केलेला अन्याय आहे याची मला जाणीव आहे. किंबहुना मला या वास्तवाची लाज वाटते
* मला आणि माझ्या मुलांना अडचणीचे असुनही मी जात्याधारीत आरक्षणाचे समर्थन करतो कारण मला त्यामागची मिमांसा पटलेली आहे.
* आरक्षण हा गरीबी हटाओ उपक्रम नाही याची मला जाणीव आहे. म्हणुन मी उत्पन्नावर आधारीत आरक्षणाची मागणी करत नाही.
* सध्याच्या जात्याधारीत आरक्षणामध्ये काही सुधारणा (क्रिमी लेयर, २ पिढ्यांनी फायदा घेतल्यावर तिसर्‍या पिढील आरक्षण नाही इ.) शक्य असल्या तरी त्याच्या इम्प्लिमेंटशन मध्ये येउ शकणार्‍या अडचणींची मला जाणीव आहे. त्याबाबत मी खुप आग्रही नाही.
* मी स्वतः जात मानत नसल्याने "माझी जात" असा अभिमान नाहीच आहे. तरीही माझ्या आडनावावरुन लोक जेव्हा माझी उच्च जात ओळखतात तेव्हा स्वजाती(?) पासुन लांब रहायचा माझा प्रयत्न असतो. >>>
या सर्व मुद्द्यांना मम.
फक्त शेवटचा मुद्दा माझ्या बाबतीत उलट घडतो.
सरकारी कार्यालयाशी सतत संपर्क येत असल्याने असेल.
पण मी तथाकथित upper caste असल्याने सततच्या कडवटपणाचा अनुभव येतो.
आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा असं म्हणून बऱ्याचदा दुर्लक्ष करते पण काहीवेळा असह्य होत..
सर्व कागदपत्र असून फाईल मुद्दाम अडवून ठेवणे किंवा सांगितलेल्या सूचना मुद्दाम न ऐकणे ( कार्यालयीन heirachy मध्ये subordinate असलेल्यांनी) किंवा ऑफिस मध्ये ठरवून इतर सर्व जातीतील सहकाऱ्यांनी (पक्षी: subordinates) ठरवून असहकार पुकारणे इ. प्रसंग बऱ्याचदा येतात.

यावेळी कसं वागायचं ते समजत नाही.

private sector मध्ये काम असतं तर एवढी झळ लागली नसती असं वाटतं..

राज, बंड हा शब्द अलीकडे बरेच वेळा ' रूढींविरुद्ध बंड पुकारणे', ' मन बंड करून उठणे' या तऱ्हांनी अहिंसक अर्थाने वापरला जातो. मलाही असाच अर्थ अभिप्रेत होता हे मी वर लिहिले आहेच. विद्रोह हा शब्द पूर्णपणे अहिंसक ठरला असता.
Consent = agreement to do something.
Assent = approval, expression of approval.
Dissent (विद्रोह) = difference of opinion, strong disagreement or dissatisfaction with a decision or opinion.
विद्रोहाची ठिणगी, असंतोषाची ठिणगी हेही वाक्प्रचार रूढ आहेत. आणि त्यात हिंसक अर्थाची छटा बहुधा नसतेच. ठिणगी हा शब्द स्पार्क याचा प्रतिशब्द म्हणूनही वापरला जातो आणि तोही हिंसक अर्थाने नसतो.
शब्दार्थाला माझ्याकडून पूर्णविराम.

>> म्हणजे एकूण ब्राह्मण वाइटच. हा नवा अर्थ आहे.
>> माझा विरोध आहे तो ह्या घाउकपणाला.

घाउकपणा पार्श्वभागासारखा असतो बहुतेक, दुसर्‍याचा दिसतो पण स्वतःचा नाही Happy Light 1

@हीरा : नाही हो, ओझं वगैरे नाही बाळगत. किंवा भरपाई करतोय असाही विचार कधी नसतो जोपर्यंत अशी चर्चा होत नाही.

>>private sector मध्ये काम असतं तर एवढी झळ लागली नसती असं वाटतं
खरंय, private sector मध्ये असलेल्याचा फरक नक्कीच असणार. शेवटी हे सगळे अनेक्डोटल एव्हिडन्स झाले. प्रत्येकाचं मायलेज वेगळं

मी अनेक वेळा मुस्लिम धर्म स्विकारण्याची तयारी केली होती. पार अगदी ठरवलं होतं पण तिकडे सुध्दा शिया, सुन्नी वाद व अनेक पंथ/मतप्रवाह असल्याचे अभ्यासताना आढळले व आपसात पटत नाही हे कळल्यानंतर रहित केले. नाहीतर इस्लाम खूप सुंदर धर्म आहे.

>>शब्द स्पार्क याचा प्रतिशब्द म्हणूनही वापरला जातो आणि तोही हिंसक अर्थाने नसतो.<<
मान्य आहे आणि मी तसा घेतला देखिल नव्हता. मुद्दा एव्हढाच आहे कि - आज इतक्या वर्षांनंतरहि हा स्पार्क शिलगवण्यांत किंवा तो पेटता ठेवण्यांत काय हशील आहे. ठिणगी देणार्‍यांना जाब विचारण्याचं धैर्य आपण का दाखवु नये?..

>> म्हणजे एकूण ब्राह्मण वाइटच. हा नवा अर्थ आहे.
>> माझा विरोध आहे तो ह्या घाउकपणाला.

घाउकपणा पार्श्वभागासारखा असतो बहुतेक, दुसर्‍याचा दिसतो पण स्वतःचा नाही >>> दिवे घेतले, Happy पण यात तुम्हाला काय विरोधाभास दिसला माहीत नाही. पहिले वाक्य ज्याबद्दल आहे त्याबद्दलच दुसरेही आहे.

चांगली चर्चा.
आता सगळे मुद्दे संपले असे वाटत असताना पुन्हा चर्चा झाली हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. मला स्वतःला यातल्या अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता नाही.

माझ्या मते मला जे म्हणायचे आहे ते सर्वांना जाणवते या सरळसोट भावनेने लिहीले होते. पण कुठेतरी संवाद हरवला आहे त्यामुळे ती पोकळी मला जाणवली.
आरक्षणाच्या आडून हिणवणे, मेरीट वरून एखाद्याचे खच्चीकरण होईल अशा चर्चा होणे हे आजही सर्रास घडत असते. या गोष्टी का आहेत याचे लोकशिक्षण होत नाही. ते कोण करणार ? उलट त्यावरून समाजात फूट पाडली जाते.
मी जे अनुभवले आहे त्यावरून दलितांना मराठ्यांबाबत त्यांच्या सरंजामी वृत्तीबाबत उकसवले जाते तर मराठ्यांना दलित कसे पुढे चालले बघा. तुमच्या जागा त्यांना मिळतात असे सांगितले जाते. आरक्षित माणसाला "मग काय, तुम्हाला आहे ना आरक्षण, गाडीतून उतरून थेट प्रवेश. आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही " असे ऐकवण्यात कित्येकांना सुख मिळते.

या गोष्टी काही एकमेकांबाबतच्या प्रेमापोटी येत नाहीत. एकाच बाजूने द्वेष केला जातो असे मला वाटत नाही. त्यामुळे आपण त्यावर नको बोलूयात.
भारतातली विशिष्ट उतरंड म्हणजेच ब्राह्मणवाद आहे. त्यातून हे सर्व निर्माण होते असे मला वाटते. ही उतरंड जोपासणारा दलित सुद्धा ब्राह्मणवादी असतो. बायकोला मारहाण करणारा दलित सुद्धा ब्राह्मणवादीच असतो.

कारण त्याच्या डोक्यातून ब्राह्मणवाद पूर्णपणे नष्ट झालेला नसतो.
इथे महात्मा गांधीच आठवतात. आंख के बदले आंख का न्याय करोगे तो दुनिया मे सभी अंधे मिलेंगे असे ते म्हणतात.
त्यामुळे विषमतावादी व्यवस्था डोक्यातून पूर्ण गेल्यानंतर दुसरा ती पाळतो म्हणून मी का नीट वागावे असे विचार चुकीचे आहेत. एक मनुष्य यातून बाहेर पडला तर त्याने बाकीच्यांना बाहेर काढले पाहीजे. किमान आपण प्रतिक्रियावादी होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.

शीर्षकास आक्षेप घेतल्याने काय उत्तर द्यावे या विचारात इतके दिवस गेले. तरीही मला व्यवस्थित उत्तर सुचलेले नाही हे मी मान्य करीत आहे.

एकुणात काय कामु ब्राह्मणवादाऐवजी वर्चस्ववाद शब्द मानायला तयार नाही.
<<आरक्षणाच्या आडून हिणवणे, मेरीट वरून एखाद्याचे खच्चीकरण होईल अशा चर्चा होणे हे आजही सर्रास घडत असते>>
इथे जात नसते तर केवळ स्वार्थाच्या आड आल्यानं घडत असते.

>>म्हणजे एकूण ब्राह्मण वाइटच. हा नवा अर्थ आहे.
हे घाउक विधान तुम्ही केलेत. पण तरीही इतरांच्या घाउकपणाला तुमचा आक्षेप आहे यात मला विरोधाभास वाटला.
जाउदे, किस पाडण्यात अर्थ नाही. सोडुन द्या.

ब्राह्मणवाद हा शब्द ब्राह्मणांबद्दल नाही असे वेळोवेळी सांगण्यात येते. !!

>>> ह्यातच सगळं आलं!!

साम्यवाद पाळणारे साम्यवादी, नक्षलवाद पाळणारे नक्षल, दहशतवाद जोपासणारे दहशतवादी तसं ब्राहणवाद वाले ब्राह्मण का नाही?

Pages