निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राम राम मंडळी. कस्काय बरं हाय ना. Happy

* फोटो डाऊनलोड व्हायला वेळ लागत असल्याने डिलीट केलेत, एक-दोन दिवसात रीसाईज करून टाकतो. Happy

गूगल ड्राईव्ह वापरून फोटो अपलोड केलेत. फोटो दिसत आहेत ना?
आणि डाऊनलोड व्हायला वेळ लावत आहेत का?
प्लीज चेक करा आणि कळवा. Happy

नलिनी, spider mite नाही पण दुसर्या काही छोट्या किड्यांचा बंदोबस्त मी हिंगाने केला होता.
घरात खडे हिंग आहे का? तो नसला तर पावडर हिंग २ चिमूट, अर्धी चिमूट हळद, १-२ थेंब गोडेतेल, झाडाला त्रास होणार नाही इतकं कोमट पाणी असं मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झाडांवर फवारा.

जिप्सी, फोटो दिसले, (नेहेमीसारखेच मस्त आहेत) आणि डालो व्हायला वेळही नाही लागला. गुगल ड्राईव्हवरून कसे टाकायचे फोटो? (हे लिहिलं, आणि सेव्ह केल्यावर पुन्हा पान उघडतांना एवढा वेळ लागला ते फोटो दिसायला! Happy )

मला नाही दिसले फोटो,जिप्सी.खरंच खूप स्लो डाऊनलोड होत असावेत.
सायली,फोटो छान.तू कसा टाकलास?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स. हो गूगल ड्राइव्ह वापरून फोटो अपलोड करायचा हा पहिलाच प्रयत्न होता, सो इमेज साईज आहे तीच ठेवली होती (पिकासामध्ये आहे तीच साईज ठेवायचो) म्हणुन डाऊनलोड व्हायला वेळ लागत आहे. Sad

आता काहि फोटो रीसाईज करून टाकतो, ते पहा आणि कळवा पुन्हा डाऊनलोड व्हायला वेळ लागतो का ते?

गुगल ड्राईव्हवरून कसे टाकायचे फोटो?>>>>त्याच्यावरच काम सुरू आहे. पूर्ण झाल्यावर इथे कळवेनच. Happy

मायबोलीकर सरीवा म्हणजेच डॉ. मानसीताई यांच्या बागेतील दुर्मिळ पिवळा कांचन Happy

प्र.चि. ०१

प्र.चि. ०२
आणि हा पांढरा कांचन आणि त्याची पाने

प्र.चि.०३

प्र.चि. ०४

जिप्सी, बहुतेक ३-४ सेकंद लागले सगळे फोटो दिसायला. प्र.चि. ०२ मधला हिरवा रंग किती vivid आहे!! खूप आवडला. सगळेच फोटो छान.

कांचन्=आपटा ना? by default गुलाबी फुलं असतात तो? पण ती फुलं थोडी वेगळी दिसतात या yellow beauties पेक्षा...confused...

पांढर्‍या कांचनाची पाने नेहमीच अशी मॅग्निशियम डेफे शियंसी मुळे क्लोरोसिस झाल्यासारखी दिसतात का ?

धन्यवाद Happy

कांचन्=आपटा ना? by default गुलाबी फुलं असतात तो? >>>>नाही, कांचन वेगळ आणि आपटा वेगळा. हां दसर्‍याला मात्र कांचन "आपटा" म्हणुन विकतात.
कांचन मध्ये गुलाबी, पांढरा, रक्तवर्ण आणि पिवळ्या रंगाची फुले फुलतात.

हा माझाच जुना धागा कांचन फॅमिलीवरचा Wink

माझं नाव "कांचन"

पांढर्‍या कांचनाची पाने नेहमीच अशी मॅग्निशियम डेफे शियंसी मुळे क्लोरोसिस झाल्यासारखी दिसतात का ?>>>>मेधा याबद्दल काहीच माहिती नाही. Sad

जिप्सी फोटो मस्त गुगल ड्राइव्ह इथे कसे डकवले ते सांग ना प्लीज पिकासाचा प्रॉब्लेम झाल्याने फोटो इथे टाकणं किती कठीण झालंय

जिप्सी फोटो मस्त गुगल ड्राइव्ह इथे कसे डकवले ते सांग ना प्लीज पिकासाचा प्रॉब्लेम झाल्याने फोटो इथे टाकणं किती कठीण झालंय>>>>>हेमाताई त्याच्यावरच काम सुरू आहे. जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याच्या प्रयत्नात आहोत (मायबोलीकर Sano आणि मी). काम पूर्ण झाल्यावर स्क्रीनशॉटसहित देईनच. थोडी lengthy प्रोसेस आहे, तीच सोपी करून सांगण्याच्या प्रयत्न आहे.

गूगल ड्राईव्ह व्यतिरीक्त अजुन कुणाला एम्बेडेड लिंक द्यायचे ऑप्शन माहित असल्यास प्लीज सांगा.

जिप्सी,हे फोटो लगेच दिसले.

फ्लिकरवरून टाकताना मी एम्बेडेड लिंकच दिली हाेती.तिथेही साईझ निवडणे सोपे आहे.

Pages