निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> व्हॅनिलाचा वेल लावू शकतो का आपण ? आणि कसा?>>
हो. कोकणात खूप ठिकाणी बघितले आहेत व्हॅनिलाचे वेल. दापोलीला कोपरकरांच्या नर्सरीत आहेत. ते त्याचा इसेन्सही करतात तयार. शेंगांपासून केला जातो.
व्हॅनिलाच्या शेंगा तयार होण्यासाठी फुलांचे परागीभवन व्हायला हवे. पण व्हॅनिला वेल मूळची इथली नाही आणि तिचे परागीभवन करणारा कीटकही इथे नाही. मग हे परागीभवनाचे काम दिवसाच्या विशिष्ट वेळी (बहुदा सकाळी अकराच्या आत) माणसांकडूनच केले जाते Happy

परागीभवन करणारे निसर्गातील घटक मधे मानवाचापन समावेश व्हायला हवा आता Wink

सायू मस्त फुल..
याला गणेशवेल म्हणतात हे मला माहिती नव्हत (घोर अज्ञानी मी Sad ).. आंही आपल लाल फुलांची वेल इतक सुटसुटीत नाव द्यायचो.. ती कुठपण कुंपणावर दिसायची.. इतकी आंगवणीनं आणून लावणारी तू खरच धन्य आहेस...

निरु, निरोप कळला Proud
तुम्ही घर बघुन सारचं रिनोवेट करुया अस म्हणाल अशी भिती वाटते मात्र Lol

व्हॅनिलाचे वेल... फोटो प्लीज..

परत एकदा गावी गोविंदपूरला जाणे झाले तिथले काही प्रचि देते..

हि 'तुळशीबाग' Lol

हे एवढुसं पिटूकलं कारलं :

दोडकं :

याला गावात 'इंद्रावन' अस म्हणतात.. याला दाराच्या तोरणाला लावतात. लेकरांच दृष्ट शक्तीपासुन संरक्षण करायच असल्यास ते लावाव असा प्रघात आहे.. याचा वेल असतो ज्याचा फोटो मला घेता नाही आला. खुप कडू असत अस ऐकलं..

निघताना असाच एका पयाटीच्या वावराचा फटू काडला...

आणि खास उबेसाठी हि शेकोटी...

गावाला लागुन असलेल्या पैनगंगेवरसुद्धा जाण झालं त्याचे काही प्रचि...

पैनगंगेतले दगडं म्हणजे गेरु, पांढरे, काळ्या रंगाचे नदीप्रवाहाने घासुन गुळगुळीत केलेले चपटे तुकडे.. खुप सुंदर वाटतात ते म्हणुन बरेच सोबत घेउन आली.. त्यांना घेउन काहीतरी करायचा विचार आहे.. बनवल्यावर फोटो देईलच.. तोवर आटलेल्या प्रवाहाची हि नद बघा...

कात्रज प्राणी संग्रहालयात गेली होती तेव्हा हे दुपारी असे सुस्तावलेले बघायला मिळाले.. जवळच्या मोबाईलच्या कॅमेरातील फोटो म्हणुन असा आलाय ...

गवा अन वाघोबा सुद्धा अहे पण मलाच आठवेना कि मी आधीही टाकले कि नाह ते प्रचि ते...जाऊदेत नाही टाकत...

टीना, किती सुंदर आहे तुमच्या गावची नदी!
तुम्ही भाग्यवान आहात. नदी अजून टिकून आहे.

मला माझ्या लहानपणची माझ्या गावातली नदी आठवली.

असंच उथळ पाणी, रंगीबेरंगी दगडगोट्यांचं पात्र. छोट्याछोट्या बेटांवर फुललेली लिली, मऊसूत वाळूचे काठ. पलिकडच्या काठावरून गुराख्याचा पावा ऐकू येई.
आता बेसुमार वाळूउपसा झाल्याने पूर्वीच्या खुणा कुठे दिसतच नाहीत. बेटं नाहीत, वाळू नाही, लिली नाही, सगळं गायब. Sad

अदिजो, तुम्ही आम्ही नकोच...
पैनगंगा खुप मोठ्ठी नदी आहे.. एवढ्यात नाही आटणार ती...

पैनगंगा/पेनगंगा मुख्यत्वे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातुन वाहते..
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा मधे उगम पावलेली हि नदी पुढे बुलढाणा वाशिम मधुन यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करते.. चंद्रपुरात गेल्याव मधे एन एच ७ या हायवेवर ती महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा ठरवते.
तिची लांबी जवळपास ६५०किमी आहे..
माझ गाव गोविंदपुर तिथले हे सारे फोटो आहेत..तिथ नदीला आट लागल्यामुळे ती उथळ दिसते.. तरीपण पूर आल्यावर मात्र त्या दोन किनार्‍यालगत असलेल्या झाडांपर्यंत पाणी असत..
दुसर गाव आहे वेडद.. तिथ पैनगंगा खुप जास्त खोल आहे आणि बरेचदा तिथ मगरी सुद्धा आढळतात...

कधी डोक्यात न आलेला प्रश्न पडलाय कि हे नाव नेमक कोणी दिल असावं ?

एक किडा असा कि गोंडी भाषेत 'देव' या शब्दाला 'पेन' अस म्हणतात.. त्यावरुन तर पेनगंगा आलं नसावं?
आता शोधकार्य सुरु कराव लागेल..

टीना खूपच सुंदर. नशीबवान आहात. खरोखर आपला गाव, तिथली नदी ह्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच ओढ, जिव्हाळा असतो. आपण तो जपायचा एवढंच खरं. ते इंद्रावन म्हणजे कौंडळ का? गणपतीत बाजारात मिळत ते सजावटीसाठी. Trichosanthes tricuspidata

>>अदिजो, तुम्ही आम्ही नकोच...>>>
Happy मी कधी तुम्ही आम्ही केलं? अगं 'तुमच्या गावची' म्हणजे तुमच्या गावची. आणि 'तुम्ही भाग्यवान' म्हणजे तुम्ही गावातले सगळे भाग्यवान. :))

गावाला लागुन असलेल्या पैनगंगेवरसुद्धा जाण झालं त्याचे काही प्रचि...>>>>>>>>>>>.
जवळच्या मोबाईलच्या कॅमेरातील फोटो म्हणुन असा आलाय ... >>>>>>>>.
.एकही प्रची दिसत नाही. Sad Sad Sad

Pages