आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाटा / बिर्ला जशी सुप्रसिद्ध आडनावे आहेत तशीच एकेकाळी मुंबईत काही उद्योग आडनावांशी निगडीत होते.

झारापकर - शिवणयंत्रे आणि हप्त्याने खरेदी
सामंत - साळगावकर - चक्का / लोणी
किर्लोसकर - शेती अवजारे / मासिक / इंजिन
बेडेकर - लोणची / मसाले
कुबल - लोणची / मसाले
खामकर - मसाले
पिंगे - चाटे - कोचिंग क्लासेस
काणे - मामा काणे - हॉटेल
केळकर - विश्रांती भुवन
पेठे - सोन्याचे दागिने
लागू - मोती
दाते - झेरॉक्स

बरीच नावे आहेत.

गायनॅक मधला एक टाका, शिरोडकर स्टीच म्हणून प्रसिद्ध आहे.

खरच काही नेहेमी येणारी आडनावे आजुन इथे आली नाहीत जसे

गोखले, दिघे, गुप्ते, खंडागळे, रेडकर, पुरोहित, सुर्वे, हजिरनीस,

तुळजापुरचे पुजारी हे दीक्षितच >>
तुळजापुरची भवानी बहुतेक देब्रा दीक्षितांची कुलस्वामिनी आहे बहुतेक.
मी माहेरची दीक्षित. आमचेही कुलस्वामिनीचे मुळ पीठ तुळजापूर आहे. तिथे हे कळले.

"बेडेकर/कुबल".....

दिनेश...यावरून पु.लं.चा 'बिगरी ते मॅट्रिक एक बिकट वाट" हा धमाल लेख आठवला. "मसाल्याची बेटे कोणती ?" मास्तरांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून वर्गात सदोदित सुषुम्नावस्थेत असलेल्या एका विद्यार्थ्याने उत्तर दिले होते..."बेडेकर आणि कुबल..". संतापलेल्या मास्तरांनी मग त्यालाच तिथल्यातिथे कुबल कुबल कुबलला.

अशोक, प्रत्येक गावातली अशी घराणी असतातच. कोल्हापुरात वणकुद्रे म्हणजे भांडी आणि सोळंकी म्हणजे आईसक्रीम आहे तसेच. त्यांनी कमावलेली नावे आहेत हि.

रोहन, धागा लई स्पीडात पळतोय. तूमागे विचारलं होतंस ना. नाडू म्हणजे प्रदेश. तमिळनाडू तर माहितच असेल. मंगळूर वगैरे भागाला ते लोक अभिमानाने तूळूनाडू (तूळू बोलणार्‍यांचा प्रदेश) म्हणतात. नाडकर्णी त्यावरूनच आलेला असावा. माझी एक मैत्रीण नाडगिर म्हणून होती. Happy

महेश, अशी आडनावे असतील तर मुली आडनाव बदलणार नाही हे आधीच सांगू शकतात. Happy

"सोळंकी = आईकक्रीम" ही मात्र नक्कीच कमाई आहे या लोकांची. आज त्यांच्या पिढीतील [जे इथेच वाढले] मुलामुलींचे मराठी ऐकले की कुणाला पटणारही नाही की यांचे आजोबा-पणजोबा चक्क राजस्थानातून येऊन इथलेच झाले आहेत.

१९६९ साली कोल्हापूरात सीमाप्रश्नावरून फार मोठी जाळपोळ झाली आणि समितीच्या लोकांनी कोल्हापुरातील कन्नड हॉटेल्स आणि कर्नाटक स्टेटच्या एस.टी. चे जाळपोळीसाठी लक्ष्य ठरविले....'गोकुळ' पेटविले गेले...जे 'कामत' ग्रुपचे हॉटेल...पण त्याच्या जोडीने दंगलखोरांनी हकनाक स्टेशनसमोरील तसेच व्हीनस कॉर्नर नजीक असलेल्या 'सोळंकी आईसक्रीम पार्लर्स' ना देखील आग लावली.....कर्नाटक दंगलीचा आणि राजस्थानच्या या सोळंकींचा काय संबंध ?

व्यथित झालेल्या सोळंकी बंधूनी दुसर्‍या दिवशी 'आम्ही सोळंकी आडनावाचे लोक म्हणजे कन्नड नसून राजस्थानी आहोत...सीमप्रश्नी आम्हाला लक्ष्य करू नका' अशा अर्थाची पाचसहा भलीमोठी पोस्टर्स करून घेतली आणि शहरातील मोक्याच्या जागी लावली होती.

आणि मुलांची लग्ने होत नाहीत म्हणून मुलींनी न आवडलेले आडनाव असेल तरी लग्न केलेच पाहिजे असं थोडीच आहे.
मुलीला चष्मा आहे यावरून स्थळ नाकारणे आणि मुलाचे आडनाव बेक्कार आहे म्हणून स्थळ नाकारणे दोन्हीही सेमच आणि पसंद अपनी अपनी...

नंदिनी, नाडकर्णी नावचा तमिळनाडूशी संबंध नसावा असे वाटते, नाडकर्णी कारवार पट्ट्यातले - सदाशिवगड वगैरे. तो एक प्रकारचा हुद्दाच आहे, देशपांडे वगैरेप्रमाणे. जिल्ह्याचे (सरकाराचे) आर्थिक व्यवहार पाहणारे/ नोंदी ठेवणारे. कन्नडमध्येही नाड म्हणजे प्रदेश/ जिल्हा असेच आहे ना?

माझ्या माहितीतील एका गृहस्थाच्या मुलीसाठी स्थळ सुचविले गेले, पण त्या मुलीने पुढील काही गोष्टी होण्याअगोदरच नकार दिला>> मी ही एक स्थळ "खोपडे" या आडनावा मुळे नाकारले.

साप्ताहिक सकाळ च्या एक लेखिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव कावळे. त्या वरुन त्या वैतागायच्या. त्यांचे बाबा म्हणायचे आपण चांगल्या आडनावाचा नवरा बघू. आता लग्नानंतर त्या बारलिंगे आहेत Happy

पारशी लोकांची आडनावेही भारी आहेत / असतात.... व्यवसायावरून बेतलेली असावीत का?
मास्टर, दारुवाला, बाटलीवाला, इंजिनियर, पस्ताकिया, भरुचा, आवारी, मारावाला, पावा, इराणी, असुंदरिया, दस्तुर, कँटीनवाला, खंबाटा, वाडिया, आगा, फर्निचरवाला, हिलूवाला, खाटलावाला, जालनावाला, जंगलवाला, लकडावाला...

सुसाट सुटलाय धागा.... Proud दिवसभर नव्हतो आज.

जबरदस्त माहिती. मी २-३ दिवस कामात असणार आहे. हेडर अपडेट करायला जरा वेळ लागेल... Sad

फार चांगल्या विषयावर चर्चा चालु आहे. काही आड्नावे प्राण्यांच्या नावावरुन आहेत किंवा
काही आड्नावे अवयवा वरुन आहेत त्यांचा इतिहास काय असावा. उदाहरण डोके ,डोळे

मुळातच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आडनावांची विविधता आहे असं काही लोकांचं मत इतके दिवस ऐकून होते ते खरंच दिसतंय. वरती इतरांनी लिहिलंय तसं मूळ ठिकाण, व्यवसाय/वृत्ती, पदवी, अशा आणि बर्‍याच घटकांवर अवलंबून आडनावं असतात. मी घरी वडिलांकडे एक पुस्तक पाहिलं होतं (पंचांग नव्हे) ज्यात देब्रा, कोब्रा, कर्‍हाडे, सारस्वत, दैवज्ञ आणि बर्‍याच जातीच्या आडनावांचं संकलन आणि त्यांचं गोत्र अशी माहिती एकत्र केली आहे. विचारून इथे नाव सांगेन.

सगळ्यात महत्वाचं - माझ्या दृष्टीने - असं की प्रत्येक घराण्याला मौखिक इतिहास असतो. पिढ्यानुपिढ्या चालत आलेला. त्यात आडनावांतला बदल, स्थलांतर अशा अनेक गोष्टी असतात. दुर्दैवाने तो कुठेही डॉक्युमेन्टेड नाही. ज्यांचे कुलवृत्तांत आहेत त्यांची गोष्ट अलाहिदा. पण आपण आपल्याला माहित असलेला घराण्याचा इतिहास तपशीलात कुठेतरी लिहून ठेवला पाहिजे. जसे राजपूतांशी संबंधित भाट असतात तसंच महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरच्या भटजींकडे अशा वह्या असतात ज्यात तुमच्या घराण्याची वंशावळ मिळते. जेव्ह कुणी आपल्या घराण्यातलं तिथे जातं ती व्यक्ती (प्रत्येक ज्ञातीचे, जातीचे भटजी ठरलेले असतात) त्याचं अपडेशन करते. निदान अशी पद्धत होती. नेहरू घराण्याचीही तिथे तशी नोंद होती. नेहरूंना त्यांच्या आजोबांचं का पणजोबांचं हस्ताक्षर दाखवल्याचा एक खूप प्रसिद्ध किस्सा आहे. लहानपणी ऐकलं होतं की यातल्या खूपशा वह्या भटजींनी परदेशी संशोधकांना विकल्या. खखोदेजा. आपल्या देशात काहीही शक्य आहे!
खरंतर अशा वह्या, मौखिक इतिहास, मध्ययुगातली इनामं व इतर कागदपत्रं आणि यादवकाळ आणि थोडीशी आधी असलेली ताम्रपट आणि शिलालेख यात मिळणारी विविध दानपत्रं याचा सलग मागोवा घेऊन अनेक कुळांचा त्यांच्या स्थलांतरांचा बर्‍यापैकी सुसंगत इतिहास उभा करता येऊ शकतो. फक्त हे बृहद्विश्वकोशापेक्षा जास्त आवाक्याचं काम आहे कारण त्याला विविध भाषा, लिप्या, मौखिक इतिहास आणि पुरातत्वीय पुरावे याचं दस्तावेजीकरण आणि विश्लेषण करणे, इ. असंख्य कौशल्ये गरजेची आहेत.

मला एवढं मोठं काम करायला जमणार नाही, तो माझा आवाका नाही. पण माझ्या घराण्यावर मला कधीतरी काम करायचंय.
आम्ही खळदकर. सासवडजवळ खळद नावाचं एक गाव आहे. ते धरून आसपासच्या साडेतेरा गावांचं (गुरोळी, बेलसर, एखतपूर, पारगाव मेमाणे, इ - माबोकर गिरिश प्लीज अपडेट) इनाम ज्यांना मिळालं ते कुलकर्णी ब्राह्मण कुटुंब आणि त्यांचे वंशवेल, वंशाचे फाटे वगैरे खळदकर आडनाव लावतं. आम्ही खुद्द पारगाव मेमाणे चे. आमच्याकडे १५ पिढ्यांची वंशावळ आहे. (बाबांनी मधे कुलवृत्तांत लिहायचा म्हणून बरीच माहिती संकलित करून ठेवली आहे). आमच्या मौखिक इतिहासाप्रमाणे आमचं आधीचं आडनाव केसकर. बाबांच्या मते केसकर हे म्हसवड आणि आसपासच्या परिसरातलेच फक्त. तिथे कुठे केस नावाचं गाव आहे का पहायला पाहिजे. त्याच्याही आधी आमचं आडनाव बोंबे होतं अशीही एक वदंता आहे. साधारण अडीचशे तीनशे वर्षांपूर्वी आम्ही खळदकर झालो म्हणे.

मला या 'कर' आडनावांबद्दल फार मजा वाटते. तुमच्या मूळ भौगोलिक स्थानाचा तुम्हाला कधीच विसर पडू देत नाहीत. एक मूळ जुन्यापुराण्या मातीत रुजलेलंच असतं कायम!

आणखी आठवेल तसं, वेळ मिळेल तसं लिहेनच इथे.

रोहन - हा धागा सुरू केल्याबद्दल ऋणी आहे Happy

>>मला या 'कर' आडनावांबद्दल फार मजा वाटते. तुमच्या मूळ भौगोलिक स्थानाचा तुम्हाला कधीच विसर पडू देत नाहीत. एक मूळ जुन्यापुराण्या मातीत रुजलेलंच असतं कायम! >> अगदी खरं. मस्त पोस्ट वरदा. लिंबूचं ऐकलं नाहीस ते बरं केलंस! Wink

अशोकजी... [मात्र 'सिंह' ची मिळत नाहीत हेदेखील एक विशेष] ते सगळे शीख जमातीत सिंग म्हणून गेले.. Proud
कोकणात बलुतेदारांच्या पुढच्या पिढ्यानी व्यवसायाशी संबंधित आडनावे न लावता गावावरून लावायला सुरूवात केली. त्यामुळे सरसकट गांवाचे नांव + कर अशी आडनावे भरपूर आहेत.

आमच्या बरोबर एक 'नागडे' होता (आडनावाचा) त्यांना हे नांव कोणी दिलं असेल ?

इथे दीक्षित आडनावाविषयी चर्चा वाचली. दीक्षित आडनाव कायस्थांमध्येही असते. दैवज्ञ ब्राह्मण आणि कायस्थ यांच्यात दवणे अशी एक पोटजात असते. दवणे म्हणजे दक्षिणेकडचे म्हणजे कदाचित दक्षिण कोंकणातले असावेत. शृंगारपुरे, चित्रे हे दवणे असतात असे मला एकाने सांगितले होते.यावरून त्या त्या घराण्याचे स्थलांतर कळते.काही घराण्यांमधे एखादा अतिशय कर्तृत्ववान पुरुष निपजतो आणि त्याचे पुढचे वंशज अभिमानाने त्याचेच नाव आडनाव म्हणून स्वीकारतात. याचे सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे शंकरशेठ हे आडनाव. हे घराणे मुळचे मुरकुटे पण शंकरशेठ आणि त्यांचे सुपुत्र जगन्नाथ यांनी अशी कर्तबगारी गाजवली की जगनाथांनंतरच्या पिढीत शंकरशेठ हेच आडनाव बनले .हंबीररव,जयवंत,मनोहर, ही आडनावे अशीच आली असावीत. पाठारे प्रभूंमध्येही धुरंधर,धराधर,धैर्यवान,त्रिलोकेकर ही आडनावे कुणा पूर्वजाच्या पूर्वजाच्या पराक्रमावरून आली असावीत.
विश्वनाथ खैरे यांनी मराठी ग्रामनामांचा इतिहास असा एक प्रबंध लिहिला आहे. वरदा यांनी म्हटल्याप्रमाणे हे सर्व ज्ञान जपले गेले पाहिजे. त्र्यंबकजी अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक आज तत्कालीन ग्रामीण समाजरचना समजून घेण्यासाठी मोलाचे मानले जाते.
मुंबईमध्ये तर अशा मौखिक इतिहासाची फारच गरज आहे कारण इथले सर्व आद्य नागरिक-कोळी,भंडारी,आगरी इ. धर्मांतरित झाल्याने त्यांचे पिढ्यान्पिढ्या चालत आलेले दस्त-ऐवज,जमिनीची कागदपत्रे,इनामवतने हे सर्व चर्चच्या ताब्यात गेले.(ही कागदपत्रे कदाचित अजूनही चर्चेसच्या आर्काईव्ज मध्ये असतील,कारण पोर्च्युगेझ लोक दस्त ऐवजांचे महत्त्व जाणत होते). त्यांचा शोध लागला तर अपरांतामध्ये एकेकाळी शिखरावर असलेला बौद्धधर्म आणि त्यानंतरचा शैव संप्रदाय यांना गेल्या पाचशेसहाशे वर्षांत उतरती कळा का आली,कान्हेरी,मंडपेश्वरच्या इनाम जमिनींचे काय झाले या प्रश्नांवर प्रकाश पडू शकेल.

आणखी काही -

पांड म्हणजे जमिनीचं एक पारंपरिक माप. देशपांडे मधला पांडे या शब्दावरूनही आला असेल (जमीनमोजणी संबंधित अधिकारी). श्री वि सोवनींचं एक शब्दार्थांवर फार सुंदर पुस्तक आहे (सकाळमधे सदर यायचं त्याचं) त्यात पण असंच दिलंय बहुदा
चौगुले, देशमुख, देसाई, कुलकर्णी, बक्षी, फडणीस (फडनवीस), खासनीस, चिटणीस, पेशवे, मोकाशी, इनामदार ही नावं अधिकारपद किंवा वतन, इनामाचा अधिकार दर्शवणारी

दीक्षित, अग्निहोत्री, श्रोत्री इ. नावं विशिष्ट धार्मिक विधीपरंपरेशी संबंधित

नाडकर्णी आणि कुलकर्णी एकच अर्थ - प्रादेशिक महसूल अधिकारी

ओझा किंवा झा हे बिहारी आडनाव म्हणजे उपाध्यायचंच अपभ्रंशित रूप आहे. उपाध्याय > उवज्झा > ओझा > झा

कुमांऊ गढवाल मधे खूपसे मराठी कुळाचे ब्राह्मण आहेत. खेर, पंत, खरे, इ. दुसर्‍या बाजीरावाबरोबर तिकडे गेलेले म्हणे. नक्की माहित नाही पण त्यातल्याच एकांनी तसं मला सांगितलं होतं. पंजाबातही असं आहे म्हणे. पानिपतच्या वेळी तिथे गेलेले आणि तिथेच राहिलेले. त्यातलं गंभीर हे आडनाव आत्ता पटकन आठवतंय.

जसं फलटणजवळ निंबळक/ निंबाळ आहे तसंच विजापूर जिल्ह्यात पण एक निंबाळ आहे (आता तिथे गुरुदेव रानड्यांचा आश्रम आहे)

सर्वांनीच कमी-अधिक भर घातली आहे. मस्त. खास करुन वरदा आणि अशोकदा यांचे सविस्तर प्रतिसाद मी अपेक्षितच धरले होते.

व्यवसाय-धंदा किंवा लढाई-मोहिमेमुळे तर कधी परागंदा झाल्याने पुर्वापार कुटुंबे भारतभर स्थलांतरीत होत गेलीत. मराठ्यांच्या बाबतीत पानीपत हे उत्तरेतील स्थलांतराचे मुख्य कारण आपण नेहमीच लक्ष्यात घेतोच. पण त्याच वेळी आपण दक्षिण दिग्विजय विसरतो.

१६७५ - १६७८ या काळात शिवाजी राजांनी कर्नाटक, आंध्रा आणि तामिळनाडू येथे जी मोहिम चालवली त्यात अनेक मराठी कुटुंबे स्थलांतरीत झाली. शिवाय भोसले घराण्याची दुसरी शाखा तंजावर येथे होतीच. आज तिथे त्यांना तंजावर मराठा असे संबोधले जाते. यातही अनेक मराठी आडनावे आहेत. खास करुन राव. ह्यावर बरीच माहिती मिळवणे बाकी आहे.

नंदिनी.... तु सध्या चेन्नई आसपास आहेस का? तुला ह्याबद्दल कही माहिती असल्यास लिही.. Happy

माझ्या नवर्‍याचं आडनाव अग्रवाल. अगरवाल, अग्गरवाल नव्हे, अग्रवाल! ही कम्युनिटी युपीमधली आहे. पण त्यांचा मूळ पूर्वज राजा अग्रसेन. हा राजस्थानचा होता. त्यामुळे सगळे अगरवाल आणि त्यांचे आडनाव-थोथोबबं* एकच.

युपीतल्या अग्रवालांच्यातही बीसा अग्रवाल हे स्वत:ला उच्च मानतात. दुसरे असतात ते दसा अग्रवाल. म्हणजे ही १०, २० वगैरे त्यांची कुळं असतील. ९६ कुळी असतात तसे.

या अग्रवालांच्यात बरेचजणं आपापली गोत्रच आडनाव म्हणूनही घेतात. उदा. गोयल, बन्सल. ही ठराविकच गोत्र आहेत त्यामुळे हे अग्रवालांपैकीच आहेत हे त्यांना त्यांना लगेच कळतं.

* आडनाव थोडं थोडं बदलेले बंधु

रच्याकने, इथे वाचून बर्‍याच लोकांचं मूळ राजस्थानात आहे असं आढळतंय. म्हणजे बाकी बंजर असलेल्या राजस्थानात या बाबतीत मात्र चांगलीच सुपिकता दिसतेय. Happy

"पांडे" संदर्भात वर वरदा यानी मत मांडलेले दिसले.

"पांडे" पद अस्तित्वात आणले ते देवगिरी-दौलताबादच्या कृष्णदेवराय या राजाने. ह्या पांडे मंडळींचे काम जमीनजुमल्याविषयी तसेच त्यामधून सरकार दप्तरी महसूल जमा करण्याच्या नोंदी ठेवण्याचे काम असे. विभागवार अशा पांडेंची नियुक्ती असल्याने दर दहा पांडेंसाठी एक सुपरव्हायझर पांडे नियुक्त केलेला असायचा. तो 'देशपांडे'. 'अ' नामक व्यक्ती जर देश पठारासाठी नियुक्त असेल तर त्या व्यक्तीचा दर्जा 'देशपांडे'. त्याच चालीत मग 'घाट' भागासाठी 'घाटपांडे'....नागपूर प्रांतात 'प्रांतपांडे' सापडतात तर वर्‍हाडात 'वर्‍हाडपांडे'. या घराण्यांनी हेच नाव आपले आडनाव म्हणून स्वीकारले, जे वस्तुतः व्यवसाय वा नोकरीनिर्देशक आहे.

अशोक पाटील

त्र्यंबकजी अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक आज तत्कालीन ग्रामीण समाजरचना समजून घेण्यासाठी मोलाचे मानले जाते. <<<
+१०००००००

कुमांऊ गढवाल मधे खूपसे मराठी कुळाचे ब्राह्मण आहेत. खेर, पंत, खरे, इ. दुसर्‍या बाजीरावाबरोबर तिकडे गेलेले म्हणे. नक्की माहित नाही पण त्यातल्याच एकांनी तसं मला सांगितलं होतं. <<
येस हेच ते. मला पण हेच सांगण्यात आलं होतं.

कर्नाटकात बरेचदा गावाचे नावच आडनाव म्हणून वापरतात. उदा. कुमठा, गोकर्ण इ. नाहीतर नावाच्या अद्याक्षरातलं पहिलं अद्याक्षर गावाचं नाव असतं. उदा. के व्ही कामथ मध्ये के = कुंदनपूर.

बाकी आपल्या मराठी लोकांच्यात आडनावात जितकी विविधता दिसते तितक्या प्रमाणात इतर कोणत्याच प्रांतात दिसत नाही. त्यांची जी काय १००-२००-५०० आडनावं असतील तीच पुरवून पुरवून वापरलेली असतात. आपण १०००० आडनावं ऐकली तरी अजून निदान १००० आडनावं न ऐकलेली असू शकतात.

विदर्भात ऐकलेली, वाचलेली काही आडनावे

जिवतोडे, आगलावे, डोईफोडे, माणूसमारे, वाघमारे, मरसकोल्हे
लांबट, पसरट, उघडे
फूलझेले, घडयाळपाटील

शिजवलेल्या पदार्थांची आडनावे कुणीतरी विचारलेली त्यात आणखी भर : श्रीखंडे, पुरी आणि वडाभात Happy

हो, मामी. एकुणातच स्वतःच्या गावावरून ओळख राखणे ही दक्षिणभारतीय (महाराष्ट्रासकट) पद्धत दिसते. कर लावा, वार लावा किंवा गावाचं नाव तसंच्या तसं लावा.

Pages