माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे मला चिकन खिम्याची रेसिपी मिळाली नाहि म्हणुन मी कुठून तरी बघुन खालिल प्रमाणे केला:
चिकन खिम्याला आधी मिठ, हळद, आलं लसूण लावला. गरम तेलात दालचीनी, तमालपत्र, लवंगा घातले, मग थोडि आ.ल. पेस्ट घालुन कांदा परतवला, लाल झाल्यावर टोमॅटो घालुन छान परतवले, त्यात लाल तिखट, मिठ, धणा पावडर, चिकन मसाला घालून परतवले. मग वरचा खिमा घालुन पुन्हा परतवले.
हे सर्व छोट्या कुकरात केले, मग झाकण लाऊन १ शिट्टी होउ दिली.
पण खूपच बकवास झाला होता, कसाबसा संपवला Sad
कसा करायचा नक्की? काय चुकला माझं?

पराठ्याचे सारण सैल झाले तर त्यात थोडा भाजलेला रवा किंवा तांदळाचे पिठ घालायचे. चवीसाठी थोडे मिठ आणि हिरव्या मिरचीचे वाटणही घालावे लागेल.

चिकन खिमा, नीट धुवून फडक्यावर निथळून घ्यायचा, म्हणजे त्याचा वास जातो.
बाकि कृतीत मलातरी काही चूक दिसत नाही. आणखी थोडा शिजवायला हवा होता.
चिकन खिमा, कूकरच्या बाहेरही शिजेल.

पराठ्याचे सारण थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावे. तेवढा वेळ नसल्यास बेसन पीठ किंवा तांदळाची पिठी मिक्स करावी.

आशु२९, खिम्याची कृती लिहिते लवकरच. पण मला वाटते खिमा कुकरमध्ये शिजवला हे चुकले असावे. मी बाहेरच शिजवते.

बटाट्याचे पराठे करताना बटाट्याचे मिश्रण जेवढे सैल तेवढीच सैल कणीक भिजवून घ्यायची. म्हणजे पराठे लाटायला सोपे होतात, फुटत नाहीत.
घरी मायक्रोवेव असेल तर एका मायक्रोवेवप्रूफ पसरट डिशमध्ये सैल झालेले बटाट्याचे मिश्रण पसरवून हाय पॉवरवर १+१ मिनीट असे मायक्रोवेव करा. थोडावेळ तसेच ठेवून मग हाताने छान मळून घ्या. मिश्रण आळलेले असेल तसेच त्याचा चिकटपणाही गेलेला असेल.

आशु२९, खिम्याची कृती लिहिते लवकरच. पण मला वाटते खिमा कुकरमध्ये शिजवला हे चुकले असावे. मी बाहेरच शिजवते.>> मला वाटते नसावे, कारण मी नेहमी कुकरलाच करते.
चांगला होतो.

पण खूपच बकवास झाला होता, कसाबसा संपवला >> बकवास म्हणजे नक्की कसा? म्हणजे चिवट झाला की वास येत होता की कडवट वाटला?

कडवट किंवा चिवट नव्हता (प्रॉब्लमॅटीक नव्हता) पण असा खमंग वगैरे नव्ह्ता, त्यात माझ्या हातुन पाणि चुकून जास्तच पडले होते, एकुण चवदार लागला नाही Sad

आज पंजाबी भाजी करण्यासाठी tomoato gravy केली. कांदा घातला नाही. फक्त टोमॅटो आणी मसाले,आले,लसुण वापरले. आता ती आंबट लागत आहे. Happy तर आता आंबट पणा कमी करायला काय करता येइल?

माझ्या मैत्रीणीने पुरण केले आहे ते कमी गोड झाले आहे. पुरणाचा गोडवा वाढवण्यासाठी काय करावे? पुन्हा थोडी साखर घालुन शिजवले तर चालेल का?
(मैत्रीण माबोवर नाहीये.)

थोड्स तुप घेउन ... त्यावर पुरण परतायच कोमट झाल की त्यात परत आवष्य्कते नुसार साखर टाकाय्ची.. विरघळे पर्यत परतावे.

मी क्वचित कौतुकाने केलेली कोणतीही वाटणाच्या रस्श्याची भाजी थोडीतरी ब्राम्हणी चवीचीच होते. म्हणजे सगळी कृती काटेकोरपणे केली तरी अपेक्षित झणझणीत चव येत नाही व साखर किंवा गुळ नाही घातला तरी थोडीतरी गुळचट वाटते. कांदा परतून वाटायचा असतो का अश्या प्रकारच्या वाटणांत? मी कांदा, लसूण, आलं, मिरच्या, खोबरे असे सगळे मिक्सरला वाटून घेते व नंतर तेलावर परतते. भाजी घरच्यांना आवडते पण मला फरक जाणवत रहातो.

मी भाजलेला कांदा, आलं, लसुण, हिमी, कोथिंबीर, हळद, मसाला (जो वापरणार असाल तो) असं सगळं मिक्सरला बारीक करुन घेते. त्यानंतर फोडणीत अजुन थोडे हळद, तिखट, मसाला घालुन २-३ मिनीटं परतवुन त्यावर कांद्याचा मसाला घालुन पुन्हा परतते.
माझ्याकडुनही खुप तिखट/मिरच्या वापरल्या जात नाहीत आणि साखर/गुळाच्या बरणीकडे सारखा हात जातो! पण असा रस्सा करताना मात्र मनाला आवर घालावा लागतो आणि हात सोडुन तिखट घाल, असा नवर्‍याचा सल्ला मानावा लागतो!

कांदा भाजून घेतला तर चांगले. गॅसवर अख्खा कांदा नीट भाजला जात नाहि. त्यासाठी कांदा बारिक चिरून, तेल न घालता कढईत परतता येतो. मिरी आणि लवंग
पण वापरायची. लाल मिरच्या भाजून घ्यायच्या.
आले आणि लसूण मात्र न भाजताच घ्यायचे.

सुमेधाव्ही... सेम पिंच
मी कितीही झणझणीत भाजी केली तरी माझ्या मैत्रिणी म्हणतातच ब्राह्मणी झालीये म्हणून. Sad

माझ्या कडे नाचणिचे १ किलो पिठ पडले आहे... मि वाफवुन खाण्यासाठि आणले होते पण ते थोडे काळपट आहे आणि त्यात थोडि कचकच पण लागते... उरलेल्या पिठाचे काय करता येइल? त्या पाकिटावर puttupodi साठि म्हनुन लिहिले होते...

काल नवर्‍याने पिठलं बनवायचा प्रयत्न केलाय. मी पाण्याला उकळी आल्यावर त्यात मावेल तितकं बेसन घाल आणि पिठलं हाट अशी सुचना दिली होती. Happy पण त्यानी नक्की काय घोळ घातलाय कोण जाणे,बहूतेक त्याने पाणी उकळायच्या आतचं बेसन टाकलंय आणि ते पण जरा जास्तच. पिठलं कच्चंच वाटत होतं. बराच वेळ प्रयत्न करुन त्याने शेवटी ते पिठलं फ्रिजमध्ये काढून ठेवलंय. आता मी त्याचं काय करू?

थालपीठ आवडीने खाणारी मी एकटीच आहे. तिखट-मीठाच्या पुर्‍यांमध्ये ढकलता येईल का ते पिठलं?

पेरू, अख्ख्या नाचणीच्या पिठात थोडी कचकच लागते. त्याच्या भाकर्‍या करता येतील.
मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले तर बरे. तसे चाळल्यास अनेक उपयोग करता येतील.
(ढोकळा, लाडू वगैरे)

अल्पना,
मिस्सी रोटी करता येईल.

अल्पना, ओली शेव करता येइल. पिठलं थोडं आळव्वुन शेव पाड आणि वाफवून घे. त्यावर कांदा कोथिंबीर तिखट लिंबू पिळुन नवर्‍याला नवीन डीश खाय्ला दे Happy

अल्पना, १) घरात भाकरीचे पिठ असेल तर मस्त पिठल्याच्या भाकरी करता येतील.

२) कांदा तेलावर परतून हे घट्ट शिजलेले पिठले त्यात कुस्करून घालायचे, पाण्याचा हबका मारून एक वाफ काढायची.

Pages