माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल दिनेशदांच्या कृतीने चटपटे मशरुम्स करायला घेतले. बदल एवढाच केला होता की टोमॅटो केचप ऐवजी दोन ताजे टोमॅटो चिरुन घेतले. मोठ्या आचेवर मिनिटभर कांदा आणि मग टोमॅटो परतला. मशरुम्स घातले. पाच मिनिटं सगळं ठीक होतं. त्यानंतर जे भसाभसा पाणी सुटायला लागलं ते थांबायचं नावच घेईना. पाणी सुटू नये म्हणून मीठ घातलं नव्हतं, आच मोठ्ठी होती, झाकण ठेवलं नव्हतं. ते पाणी दहा मिनिटं झाली तरी आटेचना. मूळ कृतीत कणिक पेरायला सांगितली होती त्याऐवजी भाजीचा रागरंग बघून बेसन पेरलं. जे अपेक्षित होतं तेच झालं, मशरुम्सचं पिठलं Proud

mushrooms.jpg

चवीला बरं लागत होतं म्हणून फेकावं नाही लागलं. पण नक्की चुकलं काय ? बरेचदा मी पास्त्यात घालायचे मशरुम्स अव्हनमध्ये शिजवते. त्याला पाणी नाही सुटत. त्याव्यतिरिक्त पालक-मशरुम्सची ग्रेव्ही करते. कोरडी भाजी केली नव्हती कधी मशरुम्सची.

अगो Lol तु का चु हे मला माहिती नाही, पण एकूण वर्णन वाचून असं वाटतंय की मशरूम घातल्यावर त्याला झरे फुटून विहिर भरावी तशी कढई पाण्याने भरून गेली Lol

अगो,
मशरुम्सच्या भाजीला पाणी सुटतेच. अगदी ३-५ मिनीटे मध्यम आचेवर. झाकण अजिबात नाही.
मी एवढेच पाळते.
किंवा मसाला वेगळा शिजवुन, शेवटी मीठ मिरपुड तेलावर saute केलेले मशरुम्स वरुन मसाल्यात टाकणे असेही करता येईल.

हे फार बेसिक आहे. कदाचित तुला माहित असेलच...

१.मश्रूम्सना पाणी सुटतेच पण टोमॅटो ताजे वापरल्याने त्याला सुद्धा पाणी सुटले असणार.( असा माझा अंदाज Happy )
२. मश्रूम्स सॉटे करताना पॅनमध्ये फक्त मश्रूम्स घालून मोठ्या आचेवर परतायचे, पाणी सुटले तरी ते आटेपर्यंत हलवायचे. कोणत्याही भाज्यांबरोबर मश्रूम्स परतायचे नाहीत.
३. मी दिनेशदांची कृती वाचली. तू ताजे मश्रूम्स वापरलेस की कॅन्ड ? त्यांनी कॅन्ड लिहिलेत आणि कृतीत जास्त वेळ परतायला सांगितले नाहीये. कॅन्ड मश्रूम्सना तेव्हढे पाणी सुटत नाही.
४. केचप ऐवजी फ्रेश टोमॅटो मुळे तुझ्या पदार्थाचा रंग लालसर दिसत नाहीये. केचप नसेल तर टोमॅटो प्युरी / टोमॅटो मार्क वापर ( ह्याला ईंग्रजी शब्द मला माहित नाही )

धन्यवाद, इथे येऊन मला दिलासा दिल्याबद्दल Wink
मंजूडी, हो, रोरावणार्‍या पुराच्या पाण्यात मशरुम्स गटांगळ्या खात आहेत असे दृश्य होते Lol
सायो, चव आवडते गं फार नुसत्या मशरुम्स्ची Happy
सोनाली, रैना , संपदा ... दहा मिनिटं झाली तरी ते पाणी आटायचे नावच घेईना. आच सर्वात जास्त सेटिंगवर होती. मग काय करणार ? शेवटी केले पिठले !
संपदा, तुझी शक्यता योग्य वाटते आणि दोन्ही टिप्स पाळेन पुढच्यावेळी. नुसते मशरुम्स परतेन आणि ताजे टोमॅटो घेणार नाही. मशरुम्स ताजे वापरले होते.
विश मी लक ... Happy

हायला, लाजो. खतरी प्रश्न.
मशरुम्स ओल्या फडक्याने साफ करायचे हे माहीत होते. आत्तापर्यंत तसेच करायचे. पण आमीरखानचा पेस्टीसाईडसवरचा एपिसोड पाहून ह्यावेळी पाण्यात घालून चोळून धुतले. पण टिपून घेतले होते गं. त्यातून अजिबात पाणी निथळत नव्हते.

मशरुम्सना थोडे पाणी सुटते पण काल फारच हाताबाहेर होती परिस्थिती. तू म्हणतेस तसेच असणार लाजो. खूप खूप धन्यवाद ! Happy
लोला Proud

लाजो, संपादन करुनही ते हिंदी वाक्य अजून चुकलेलंच आहे Proud
उद्या-परवात करुन बघते परत मशरुम्स सगळ्या टिप्स वापरुन Happy

तांदळात टोके/किडे/धनूरं झाले आहेत, म्हणून आधी उन्हात ठेवून मग एरंडेल तेलाचा हात लावला (काय तो भयानक वास... Sad ) पण अजूनही काही दिसत आहेत.
आमच्याकडे हवा बरीच दमट असते, त्यामुळे असेल की तेल कमी पडलं? दुसरा काही उपाय आहे का यावर?

अजून एक. जे प्लास्टिकच्या पिशवीतले पॅक्ड तांदूळ आहेत त्यांना पण आधीच तेल लावून ठेवू का? की त्यात किडे होण्याची वाट पाहू? Uhoh

की त्यात किडे होण्याची वाट पाहू? <<<<<< धारा भयंकर हसु येतय या वाक्यावर तरिही......."तांदुळाला बोरीक पावडर लाव. पोरकिडे-टोके होणार नाहीत"

तांदूळ उन्हात कधीच ठेऊ नयेत, चव जाते.....स्वानुभव!! (ज्याच्याकडून घेतले, त्यानीही हेच सान्गितले.)
मी बोरीक पावडर लावून ठेवते. जे टोके/किडे/धनूरं झाले आहेत, ते चाळून - घॉळून काढण्याशिवाय ऊपाय नाही.

>>>की त्यात किडे होण्याची वाट पाहू? <<< काय गं Rofl बोरीक पावडर +१. उन्हात ठेऊ नको +१ मी पण एकदा घालवली आहे चव तांदळाची हा प्रयोग करून Proud

अरे वा, एक महिनाभर कुणाचंच काही चुकल नव्हतं वाटतं.
Happy

धारा , टोके खूप जास्त असतील तर आत त्यांचि अंडीही असतात जी काही केल्या जात नाहीत.
दुसर्‍या पोत्यात टोके पडण्याआधीच योग्य ती काळजी घे.

धारा, तु ही माझ्याच बोटीत. Proud

मी केलेला उपाय सांगते. सगळे तांदुळ एका मोठ्या पेपरवर काढ. त्या तांदळांना बोरीक पावडर चोळ हाताने चांगली आणि तसेच पेपरवर ठेव बाहेर कुठेतरी. बरेचसे टोके निघुन जातात बो पा मुळे. तांदुळ नेहमीच्या डब्यात भरताना त्यात कडुनिंबाचा पाला (हा हारवाल्याकडे मिळतो. २ रुपयाचा भरपुर येतो.) टाकुन ठेव. बो पा ने टोके मरतात तांदळातच. म्हणुन व्यवस्थित धुवुन घे तांदुळ ३-४ वेळा.

>> अरे वा, एक महिनाभर कुणाचंच काही चुकल नव्हतं वाटतं.
Lol

तांदूळ आणल्याबरोबर, त्याला बोरिक पावडर लावणे किंवा कडुलिंबाची पाने टाकून ठेवणे. गोळ्या पण मिळतात किडे होऊ नयेत म्हणून.

धन्यवाद सर्वांचे. Happy

नुकतीच कळालेली माहिती: योडी म्हणतेय तसे केल्याने(तसेच पेपरवर ठेव बाहेर कुठेतरी) एका नातेवाईकाकडे घरभर किडे आणि धान्य मात्र किडेविरहित असला प्रकार झालेला... शेवटी त्यांना पेस्ट कंट्रोल करावा लागला कारण कपड्यांमधून घुसून ते किडे चावायचे. Uhoh

कडुलिंबाची पाने टाकून ठेवते लगेच. बोरिक पावडर उद्या लावीन. Happy

अरे वा, एक महिनाभर कुणाचंच काही चुकल नव्हतं वाटतं. >>> माझा नंबर कुठेही पहिलाच. Wink

Pages