सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं वाट्यांचा साइझ पण बघायला पाहिजे.. वर्षु जमलं तर मिलीलिटर दुध ते दे गं.. आणि वापरलेल्या ब्रेडचा फोटो पण टाक म्हणजे प्रत्येकाला त्याप्रमाणे अंदाज येइल.. आणि अंडं कोंबडीचंच होतं ना? Wink नाही म्हणजे नॉर्मल साईझचं होतं ना? १ ब्रेड्/अंड्याचे २ होणं ठीक आहे पण ५ ब्रेड आणि २ अंडी हे म्हणजे जरा जस्तच व्हेरिएशन झालं म्हणुन विचारत आहे Happy

चिमुरी..'मिलीलिटर दूध!!!..''. Lol . होहो.. कोंबडीचंच अंडं,बदकाचं किंवा कबुतराचं (जे इथे सर्रास खातात ) नै कै!!!!!
५ ब्रेड-२ अंडी.. एक स्लाईस-१ अंड/डी .. उलटं कॅरेमल..,ओघळ कॅरेमल..
उद्या निघतेय सुट्टीवर..
अब तुम्हारे हवाले पुडिंग साथियों... ,
कोणत्या गाण्याचा रेफरंसे हे ओळखालच तुम्ही सर्व पटकन!!! Biggrin

मला जबरदस्त टेंम्प्ट होतय फोटो आणि प्रतिसाद बघुन .. पण ना मोठ्ठा कुकर आहे ना मायक्रोवेव्ह Sad
आता याला पन पर्याय सुचवा Wink

नाही चिकटल भांड्याला.. Happy

<फरक इतकाच की मी ते कॅरमल थंड होईपर्यंत नाही ठेवत. कॅरमल करुन त्यावर लगेच पुडिंग्चे मिश्रण ओतायचे आणि कुकरला लावते.>
बहुदा या मुळे..

मी_चिऊ, मस्त झालय की तुझ पुडिंग पण सोनेरी ओघळ कसले? मधाचे की पाकाचे (तेच ते कॅरॅमल )

बाकी सग्ळेच सुटलेत.. Lol
वर्षूतै मी पण १-२ दिवसात नक्की करतेच Happy

ए बायांनो..........काय स्वयंपाक, पोळ्या, चहा बिहा करता का नाय? का फक्त रोज वर्षूच्या पुडिंगातच रमल्या?

मस्त झालय की तुझ पुडिंग पण सोनेरी ओघळ कसले? >> अग पुडिंग खरतर परवा केलेल आणि काल नवर्याने अर्ध खाउन अर्ध फ्रिजमधे ठेवलेल, बहुदा त्यामुळेच काही कॅरॅमल चे पाणी झालेल. Happy मग मी सजावटीसाठी (आणि संपवण्यासाठीही Wink ) ते पुडिंगवर ओतल.. Proud

मी आत्ताच केले आहे आणि बहुतेक जमले आहे. Happy
१५ मिनिटात होत नाही. मला ३० मिनिटे लागली.
प्रमाण
१७५ मिली फुल फॅट दूध
१/४ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
१ मध्यम अंडे
२ मोठ्या ब्रेडच्या स्लाईस.
७० ग्रॅम साखर.
कॅरॅमल करून घेतले आणि थोडे गार झाल्यावर फ्रीझर मधे सेट करून घेतले.
दूध मावे ला २० सेकंद कोमट करून घेतले आणि त्यात साखर, १ अंडे आणि २ कडा काढलेले ब्रेडचे स्लाईस अगदी घट्ट पिळून घातले. सगळे मिक्सरमधून छान फिरवून घेतले. कॅरॅमल घालून वरून अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावली आणि कुकरला शिट्टी न लावता ३० मिनिटे उकडले.

हा झालेला फोटो.
photo-6.JPG

हा उलटा केलेला:
photo-7.JPG

आणि हा तुकडा कापलेला:
photo-8.JPG

वॉव. एम्बी सहीच झाले आहे. अभिनंदन.
मी_चिऊ, तुझेही मस्त झाले आहे. लेयर्सचा फोटो मस्त आलाय.

आशू Lol भारीच

हे एम्बी...मी_चिऊ वॉ>>>>>>>>व... क्या ब्बात है!!!!.
मस्तच जमलंय.. एम्बी चं संशोधनही सुप्पर्ब आहे!!!
हुश्श्य!!!! माझा जीव (पुडिंगच्या)भांड्यात पडला!!!! Proud

ए बायांनो..........काय स्वयंपाक, पोळ्या, चहा बिहा करता का नाय? का फक्त रोज वर्षूच्या पुडिंगातच रमल्या?>>>>>

हा हा हा हा .... मलाही तसच वाटतय..... स्वयंपाकाला सुट्टी दिसतिये सगळी कडे.... मला वाटतं राष्ट्रीय पदार्थ म्हणुन हे पुडींग खपुन जाईल.

हुश्श्य!!!! माझा जीव (पुडिंगच्या)भांड्यात पडला!!!!>> म्हणूनच मी इकडे टाकले गं माझे संशोधन Happy
मी पण हे पुडिंग आजवर असंख्य वेळा बिघडवलेले आहे. पण आज पहिल्याच फटक्यात छान जमले.
अजून १ टीप म्हणजे..केकचे भांडे असेल तर त्यात करा.
ब्रेडच्या साईझ वर नक्कीच अवलंबून आहे. इकडचा(टोक्यो) चा ब्रेड स्लाईस मोठा आहे. भारताच्या कदाचित दुप्पट असेल. त्याचे २ स्लाईस लागले म्हणजे भारताचे कदाचित ४-५ लागतील नाहीतर १ अंडे तरी वाढवावे लागेल.
वजन च द्यायचे झाले तर
कडांसहित एका स्लाईसचे वजन ४८ ग्रॅम आहे!!

वॉव एम्बी, सहीच झालं आहे पुडींग! फोटो अतिशय टेंप्टींग आहे Happy
चिऊ तुला पण मस्त जमलं आहे गं!

मी वर्षूवैनींना Happy सांगतेय मघापासून काढा ते 'सोप्प' शब्द नावातून.. बाया उगीच उड्या घेताहेत पुडींग करायला. Proud

उद्याला उपोषणाला बसा आता पुडींग नही जमेगा तो..

हो गं एम्बी..धन्स... इकडली ब्रेड ची स्लाईस पण मोठी असते..भारतातील साईझ आठवत नाहीत्यामुळे एक महत्वाची टिप द्यायची राहून गेली.. ती तू दिलीस थांकु थांकु!!!

एम्बी - मी कंप्लिट 'जे'. तुझं काय यम्मी झालंय. ब्रेडचं वजन बघता, तु जवळ जवळ अख्खा ब्रेडचा पॅकेट वापरलास इकडच्या प्रमाणे.

माझं पुडिंग अगदी फ्लॉप झालं. आधी गरम असताना ते हॉट वॅक्स सारखं होतं. म्हणजे नणंदने जाहिर केलं कि जर हे आळुन घट्ट नाही झालं तर आज वॅक्सिंग करुन टाकु दोघी. Sad छान गोल्डन कलर, नुसत्या वरच्या लेयरचा नाही, पुर्ण पुडिंगचाच. सुरी घातल्यावर वॅक्ससारख्याच छान लांब तारा येत होत्या आणि चटके पण अगदी कडक - सेम हॉट वॅक्ससारखेच.

नंतर ते थोडं घट्ट झालं. म्हणजे एखाद्या पेस्ट सारखं. पण जबरी यम्मी, मग आम्ही ते वाटीत घेवुन टेरेसमधे बसलो आणि चमचे चाटत चाटत संपवुन टाकलं. दोघींना भांडी स्वच्छ करायची सख्त ताकीद आहे, जे भयंकर कठिण आहे. भांडं पाणी घालुन ठेवलं आहे, संध्याकाळी घरी गेल्यावर ठरेल कि साफ करायचं कि कचर्‍यात टाकायचं. Sad

Pages