सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिस्टर्ब कसलं.. ती इथेच कुठे तरी टीपी करत बसेल आणि मग जळायचं नाहीतर कडक व्हायचं (अजुनपर्यंत कोणांचंच कडक झालं नाहिये ना?) म्हणुन तिला हलवत आहोत.. नाहीतर यायची संपवुनच... Happy

सबर का फल मीठा होता हय!!!!>>>>> सब्र का फल मीठा पुडिंग होता है...

अगं वर्षु, ३१ला मैत्रिणीने तिच्या घरी जेवायला बोलावलं होतं.. म्हणाली की मदत करायची असेल तर लवकर घरी ये.. म्हटलं थीक आहे.. त्याआधीच ही रेसिपी वाचली होती.. म्हटलं तिच्याकडे करुन बघु.. नशीब माझं, की तिच्या घरी न करता स्वतःच्या घरीच ट्राय केलं.. करतानाचं लक्षात आलं की किती मोठे ब्रेड ते कुठेच लिहिलं नव्हतं, पण घरी नेट नसल्याने ते विचारता आलं नाही.. केलं तसंच.. खीर झाली, मी थोडी खाल्ली, भाच्याला चारली त्याने आवडीने खाल्ली म्हणुन त्याला दिवसभर रागवणार नाही असं प्रॉमिस केलं, उरलेली फ्रिज मधे ठेवली.. नंतर त्याचं काय झालं कोण जाणे.. कदाचीत घरच्यांनी संपवली असेल, पण मी विचारायचं धाडस केलं नाही.. एकतर मी किचनमधे कधीच जात नाही, त्यातुन कधीतरी असले प्रयोग केले की घरच्यांना वैताग येतो, म्हणुन आता परत नीट पुडिंग करुन दाखवायचंच आहे..

चिमुरी... आता मात्र Rofl श्या!! सर्व स्माइलीज खिंकाळून झाल्यात आतापर्यन्त... Proud
तू असं कर्ना.. घरचे कुणी घरी नसताना परत प्रयोग कर हाकानाका !!!!

अमृता, पुडिंग सेट झालं ना व्यवस्थित म्हणजे जिंकलीच की लढाई.. Happy

वनी (वर्षु पेक्षा हे लिहायला सोप्पं पडतय), घरचे नसताना केलं तर मग काळं झालेलं भांडं कोण घासणार गं Lol आई घरात असताना केलं की म्हणता येतं ना आता मी इतकं केलय तर तेव्हडं भांड्याचं कॅरेमल काढुन घासुन टाक म्हणुन... Wink

ज्यात हे पुडिंग करायचंय, त्या भांड्याला आतून अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावून घेतली आणि त्यात कॅरमल ओतून सेट केलं आणि नंतर दूध ब्रेडचं मिश्रण ओतून कूकरमध्ये वाफवलं तर !!! कॅरामेल पुडिंगबरोबर विभक्त न होता सोबतच येईल का? :अजून एक कल्पनाविलासः

कॅरामेल पुडिंगबरोबर विभक्त न होता सोबतच येईल का? :अजून एक कल्पनाविलासः>>>>> त्यासोबत फॉइलही येइल का??? नाही म्हणजे ती वेगळी करणं सोप्पं जाइल का? नाहीतर भांड्याला अर्धं कॅरेमल राहिलेलं चालेल, नाही का? :कल्पनाविलासाचा थोडासा विस्तारः

सेट नव्हत झालं बहुदा नीटपणे. ताटात काढल्याकाढल्या ढेपाळलं. Proud चव छान आहे पण. अगदी खीर नाहीये. चमच्याने खाता येतय. अंड्याचा वास मगाशी बहुदा नाकात बसला असावा आता तसा काही येत नाहीये.
कॅरॅमल चिकटल आहेच. आज संध्याकाळी कॅरेमल चहा. Proud

पुढच्यावेळी अजुन जोमाने करेन. Happy थँक्स वर्षू
विडिओ आता नंतर बघेन.

देवा... ये तुच खाली ये.. आणि दाखव या बायांना करुन कॅरमल कस्टर्ड>>>>>> Lol देवाला तरी जमेल की नाही शंकाच आहे.. त्यापेक्षा वनीलाच सांगावं करुन दाखवायला.. Happy

अश्विनी, मी मजा करत होते बरं का...

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये पदार्थ घालून शिजवला तर फॉईलचा काही दुष्परीणाम नाही का होत पदार्थावर?

हमनाम एक काम कर. आज हक्काच्या माणसाला शुटींग घ्यायला सांग आणी करुन दाखवच या सगळ्यांना Happy

बाकी मला एक प्रश्न पडलाय बहुदा वर्षु चायना मधे आणी आपण भारतात आहोत. वापरलेल्या दुधाच्या घट्टपणावर पण सेट होणे अवलंबुन असते. आपल्याकडे गाईच्या दुधाचे दही नीट सेट होत नाही पण म्हशीच्या दुधाचे होते. आणी तेच जर आटवुन केले तर छानच होते. असे काहीतरि Happy

वर्षा अगदी योग्य मुद्दा.. ब्रेड चं प्रमाण देखील त्याच्या साइझवर अवलंबुन आहे.. ३ ब्रेड घालुन होइल व्यावस्थित. आणि मलई न काढता दुध वापरलं तर अजुनच चांगलं होइल हा अंदाज.. या अंदाजावर लवकरच प्रयोग करण्यात येणार आहेत

पातेलं टाकून देता येतं पण चुरता येतं का?>>>>>> Rofl

मेरी हमनाम.. आली गं आली माझ्या मदतीला!!!!
आयला... आता दूधाच्या क्वालीटी पासून ब्रेड च्या साईझ पर्यन्त निबंध पुन्हा लिहायचा???
त्यापेक्षा मी नेक्ष्ट टायमाला आले ना कि आपण पुगटग करू या..
क्या बोलते??

वर्षु ताई..... कुठल्या मुहुर्तावर लिहिलस बाई..... सगळ्या बाया येड्या झाल्या जणु......

नाही तर काय ! आता मी तर केलंही नाहिये आणि वरचे प्रश्न सुटल्याशिवाय करणारही नाहिये पण ते खुटखुटीत कसं होईल आणि कॅरमल पातेल्याला न चिकटता कसं काढता येईल वगैरे भुंगे डोक्यात चालू आहेत Lol

वर्षु, अभिनंदन ! मी आज संध्याकाळी पुडिंग करणार आहे. कालचा १२० चा स्कोअर पाहिला, म्हटलं माझ्या पुडिंगचे फोटो, त्यातल्या चुका, माझे अश्रु आणि दुसर्‍यांचं खिंकाळणं.... असे मिळुन पुढचे ३० करु आणि तुझ्या धाग्याला १५० चा स्कोअर करुन देवु. पण भलतंच. इ़कडे तर पुर आलाय. काल रात्रीपासुन आतापर्यंत ४३ पोस्ट्स. काय तो टीआरपी तुझ्या रेसिपीचा. Wink

बाय द वे, आजच्या माझ्या रेसिपीनंतर २०० होतातच. बघच तु. Proud

वर्षू नील, हे किती दिवस टिकते? जरा सरळ पार्सलच पाठवा ईकडे. तुम्ही येउन करेपर्यंत कदाचीत या धाग्यामुळे अ‍ॅडमिनला बाकी सर्व बीबी बंद करावे लागतील जागेअभावी Wink

आता मीपण आले तुमच्यात. म्हणजे प्रयत्न करायचे असे ठरवणार्‍यात. पण चुकले तरी संपवणारी व्यक्ती (घो) टुरवर आहे म्हणुन त्याची वाट पहात थांबलेय. तो आला कि त्याला गिनीपिग करतेच.

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये पदार्थ घालून शिजवला तर फॉईलचा काही दुष्परीणाम नाही का होत पदार्थावर?>>> +१ मीही मघाशी लिहिता लिहिता थांबले. फॉईल फारतर भांडे झाकण्यासाठी वापरता येईल.

Pages