सोप्पं कॅरेमल पुडिंग

Submitted by वर्षू. on 28 December, 2011 - 06:01
caramel pudding
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

-१ कप दूध
-१ ब्रेड ची स्लाईस
- १ अंड - अंडं नको असल्यास ब्रेड च्या दोन स्लाईसेस
- दीड कप साखर
- बदामाचे पातळ काप (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

ही माझ्या आई ची अतिशय सोपी पण सुपर टेस्टी कॅरेमल पुडिंग ची रेसिपी .

कुकर मधे बसेल इतक्या साईझ चं, जाड बुडाचं भांड घ्या. या भांड्यात पाऊण कप साखर घालून ,डायरेक्ट मंद गॅसवर वितळत ठेवा. (नंतर वाफवण्याकरता ते भांड कुकरमध्ये बसायला हवे) .मधून मधून सांडशी ने भांडं उचलून वितळलेली साखर नीट ,एकसारखी पसरवत राहा. साखर वितळवाताना आच मंदच पाहिजे. नाहीतर कॅरेमल पटकन ब्राऊन होऊन्,कडवट लागेल.
साखर वितळून सुरेखसा डार्क सोनेरी रंगाची झाली कि भांडं गॅसवरून उतरून थंड होऊ द्या.
बदामाचे काप घालायचे असल्यास लगेच या कॅरेमल वर नीट पसरा.

कॅरेमल थंड होऊन छान कडक होईस्तोवर दूध, उरलेली साखर (जास्त गोड पुडिंग हवे असल्यास चवीनुसार जास्त साखर घाला), ब्रेड ची स्लाईस (पाण्यात भिजवून मऊ झालेल्या ब्रेड च्या स्लाईस ला घट्ट पिळून ,कडा काढून टाकून घ्या),एक अंड ,एलेक्ट्रिक चर्नर किंवा मिक्सर वर एकजीव करून घ्या.
मिश्रण छान फेसाळ झाले पाहिजे,म्हणजे अंड्याचा वास येणार नाही.
हे मिश्रण ,कॅरेमल वर ओतावे.
आता हे भांडं, कुकरमधे उंच स्टँड ठेवून त्यावर ठेवावे. मग कुकर ला प्रेशर न लावता ,वाफ आली कि मिडियम गॅस वर १५ मिनिटे वाफवून घ्या.
कुकर नीट थंड होऊ द्या. मग पुडिंग चं भांड बाहेर काढून सुरीने चारीबाजूने मोकळं करून घ्या ,ज्या डिश मधे काढायचं असेल ती डिश त्यावर उपडी ठेवा.
आता डिश नीट धरून सुलटी करा.. कॅरेमल पुडिंग अलगद डिशवर येईल.. केक सारखे तुकडे कापून आस्वाद घ्या. थंडी च्या दिवसात मायक्रो मधे वॉर्म करून खाता येते. नाहीतर फ्रीज मधे ठेवून द्या.थंड ही खूप चांगलं लागतं.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हे पुडिंग खरोखरच करायला अतिशय सोप्पं आहे. शुअरशॉट रेसिपीये !! मला सह्ही जमतेय म्हंजे कुण्णालाही सहज जमेल Lol
बदाम रात्रभर भिजत घातले होते. सकाळी सालं पटकन काढता आली. आणी मग लहानशा ड्राय फ्रूट स्लाईसरवर काप केले. सुरेख पातळ होतात,मेहनतीशिवाय!!!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, कोशिश करनेवालो की कभी हार नही होती.

आज परत बनवलं हे पुडिंग. यावेळेला व्यवस्थित जमलं. प्रमाण एक कप दूध, अर्धाकप (थोडी कमीच) साखर आणि एक अंडं, तीन ब्रेड स्लाईस. अंडं आधी फेटून घेतलं आणि मग त्यामधे दूध साखर वगैरे घातले. कॅरेमल परवापेक्षा चांगलं बनलं होतं पण अर्धंच आलं पुडिंगसोबत. नशीबाने पुडिंग प्लेटमधे जाताच इंर्डियाच्या टीमच्या शेपटासारखं ढेपाळलं नाही. व्यवस्थित तग धरून राहिलं. गरम गरम खायला इतकं छान लागलं की मस्तच. फोटो काढेन म्हणेपर्यंत अर्ध्याहून जास्त पुडिंग सतिशनेच संपवलं Happy

रेसिपी ठिक आहे. पण ब्रेड स्लाईस एक जास्त घालावा लागतोय. Happy मलई ब॑र्फीनंतर हाच बीबी हिट्ट झालाय.

आशूडी............. Rofl Rofl
( वर्षूतै; मी पण ट्राय करणारे... घाबरू नकोस क्यूंकी मेरे समझमें थोडी थोडी रेसिपी आ गयी है!)
एक परश्न इच्यारू का? ते कॅरॅमल आणि साखर घालून विरघळवलेलं दूध परत ढवळून एकजीव नाही करायचं ना? म्हणजे ते कडक कॅरॅमल आणि त्यावर हे दूध असंच कुकरला शिजवायचं ना? ( मी फारच बावळटासारखा प्रश्न विचारला का?)

शांकली, हेश्शा ! मी खुष. चला अजुन लोक आहेत माझ्यासारखेच प्रश्न विचारणारे. Proud अगं कॅरॅमलच्या कडक लेयर वर हे दुध, अंडं आणि ब्रेडवर मिश्रण ओतायचं. कॅरॅमल त्यामधे एकजीव केलंस तर मग वर तो गोल्डन लेयर कसा दिसेल बरं. माझा चांगला अभ्यास झाला आहे आता या रेसिपीचा. Wink

बिचारी वर्षुताई. आता परत एडिट करते का काय रेसिपी कोणास ठावुक. Proud

शांकली..ट्ठीक पैचाना..मनीमाऊ..गुणी पोर ती..तिने किती छान समजावून सांगीतलंय तुला
आता मला परत एडिट करावं न्हाय लागणारे!! Lol
@नंदिनी.. हैइ शाब्बास... मी सो हॅप्पी!!!! Happy

वर्षू जमलं गं बाई... चव, थलथलीतपणा एकदम पर्फेक्ट झालं होतं रंगालाही जमलं होतं पण कॅरॅमलचा अर्धा थर खाली आणि अर्धा पुडिंगवर असं झालं पण आय अ‍ॅम हॅप्पी Happy
मी वेलदोडा/जायफळ पूड घातली. मस्त लागत होतं.

Caramel Pudding.jpg

भांड्यालाच चिकटलेला हा थर बघ. Proud आता तो काही केल्या निघत नाहीये.

caramel.jpg

अंजली_१२............ काँग्रॅट्स!!!बेस्टच जमलंय तुला...
अगं कॅरेमल चा थोडा थर तळाला चिकटून राहतोच..पूर्णपणे काही निघत नाही..त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं.. Proud

पातेल्यात जे कॅरेमल राहत, त्यात थोड पाणी घालून ठेवायचं, ते पाणी चहा किंवा कॉफी साठी वापरून बघा, मस्त स्वाद लागतो.

आज जाउन परत बनवणार आहे.>>
आणि मी परत बनवल. पण म्हणतात ना 'नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न' तसच. मस्तपैकी कॅरेमल बनवत होते, छान रंग आलेला, तितक्यात दारावर बेल वाजली. रात्री १०.३० वाजता हा. जळल. तरी म्हटल हरकत नाही त्यातच दुध टाकल. ठेवल शिजवायला. मस्त उचलल पण गेल. छान ब्राउन रंग पण आलेला. उत्सुकतेने नावर्‍याला दिल खायला. म्हणतो कसा परवा कॅरेमल खिर दिलेली आज कॅरेमल कडु दिल आहेस. (साखर पण कमी झालेली).
म्हटल असुदे तरीपण मी परत बनवणार. 'प्रयत्न - चुका केल्याशीवाय माणुस शिकणार कसा?'

अरे वाह.. हिट्ट आहे हा बीबी. Happy
वर्षुतै मी तुझ्या पार्टीत, Wink मी बर्याच आधीपासुन बनवते हे..

पण फरक इतकाच की मी ते कॅरमल थंड होईपर्यंत नाही ठेवत. कॅरमल करुन त्यावर लगेच पुडिंग्चे मिश्रण ओतायचे आणि कुकरला लावते.

आता फोटो उद्या टाकते.. Happy

ते कॅरमल थंड होईपर्यंत नाही ठेवत. कॅरमल करुन त्यावर लगेच पुडिंग्चे मिश्रण ओतायचे आणि कुकरला लावते.>> करेक्ट, कॅरेमल थंड होत ठेवले तर त्याचा दगड होणार.

" कॅरेमल थंड होत ठेवले तर त्याचा दगड होणार:.. यस्स!! कडकच हवंय या रेसिपीकरता
स्वाती..पण कॅरेमल गरम अस्तानाच मिश्रण ओतून वाफवलं तर पुडिंग च्या टॉप ला कॅरेमल चा लेयर येणार न्हाय ना..
@ मी_चिऊ- सेम पिन्च.. फोटोची वाट बघत आहे .. Happy

@रीमा.. बेस्टेस्टॉफलक गं बयो!!! Happy

जियो भरत जी जियो.....

हमने बनाया....और हिट हो गया.... मी काल मावेत बनवलं. अप्रतीम झालं. थोडावेळ जास्त ठेवायला लागलं पण झकास झालं. ते ही अंड न घालता. मी १ कपाला २ मोठे ब्रेड घेतले.
धन्स.......

भांड्यात चिकटलेलं कॅरेमल कसं काढायचं. (नाही, नाही, मी अजून बनवून पाहिलेले नाही. बनवण्याआधीच माकाचुची उत्तरं शोधत आहे. :फिदी:)

माझं गॅसवर आहे... तेच ते पुडिंग हो. Proud १५ मि. झाली, उघडुन पाहिलं तर मधे अजुन ओलं लिबलिबीत आहे. सुखरुप बाहेर निघुदे रे बाबा. देवा मला पाव. Proud

वर्षु, कसं वाटतय प्रतिसाद वाचुन? Wink

देवा मला पाव.>>>> देवा मला पुडिंग असं म्हणावं Happy

ऑल द बेस्ट..

मला पण अजुन एकदा करुन बघायचं आहे, न चुकता..

देवा मला पाव.>>> पावाचंच बनवत्येस ना? Wink एक करुन बघ. कूकरचं झाकण काढून जरा फट राखून वर नुसतं ठेव पाच मिनिटं. पटापट कोरडं होईल बहुतेक. खाली पाणी उरलं आहे की नाही ते आधी चेक कर.

एक गोष्ट लक्षात आली का? सोप्पं म्हटल्याने बर्‍याच जणांनी करुन बघितलं ते.. Happy

अमॄता काय झालं????

माअ वाटते हे पुडींग थोडे थंड झाल्यावर भांड्यातुन सर्विंग प्लेटमधे काढतात. अर्थात मी तर फ्रीज मधे ठेवुन काढते. त्यामुळे मस्त सेट होते Happy

सखूबाईचीच टीप इथे टाकणार होते. भांड्यातल्या चिकटलेल्या कॅरेमलशी हाणामारी करु नका. थोडं दोन घोट पाणी टाकून पुन्हा गरम करा. गॅसवर असतानाच चमच्याने हळूहळू निघेल. तळाचा थर सगळा उचकटा आणि विरघळवा. मग ते पाणी चहामध्ये वापरा. भांडंही स्वच्छ, उगाच साखर खाऊन संपवावी लागणार नाही आणि चमचाही शाबूत! Happy

मैत्रिणींनो, मला मधेच गॅस बंद करुन (खर तर २५ मि. झालेली.५) लेकीला घ्यायला जावं लागलं. आता पहाते हाल हवाल. बहुदा पुन्हा गॅस वर Proud
अश्वे, पाणी चेक करते. Happy बाकी सगळ्यांनी फक्त फाको केल्या. Wink

Pages