इथे अपण तीन वेगवेग़ळे प्रकार करणार आहोत. तसे सोपे आहेत. (मला जमले म्हणजे सोपेच असणार ना !)
१) भाकरीसाठी
सपाट वाटी तांदळाचे पिठ, सपाट वाटी कणीक, मीठ, थोडेसे तेल.
२) पालेभाजीसाठी.
आवडती पालेभाजी, (मी भोपळ्याची पाने वापरलीत, करडई, मेथी, मूळ्याचा पाला, शेवग्याची पाने वगैरे चालतील ) हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी दाण्याचे कूट (हवे असले तर), तेल, मीठ, हिंग, किंचीत हळद, लसणाचे तूकडे.
३) चटणीसाठी
एक टेबलस्पून गार्लिक पावडर ( भारतात मिळते का ते माहित नाही. त्या ऐवजी वाटलेला लसुण दोन टेबलस्पून, जर गार्लिक प्रेस मधून काढलेला लसूण असेल तर जास्त छान स्वाद येतो ), एक टेबलस्पून लाल तिखट, दोन टेबलस्पून क्रंची पीनट बटर (किंवा दाण्याचे कूट ) मीठ, हिंग.
भाकरी
१) एका बोलमधे तांदळाचे पिठ घ्या व त्यात मीठ घाला.
२) कपभर पाणी उकळत ठेवा.
३) तादळाच्या पिठावर एका हाताने उकळते पाणी थोडे थोडे घाला (सगळे लागणार नाही.)
४) चमच्याने भरभर घोटत रहा. पिठल्यापेक्षा घट्ट असू द्या.
५) मग त्यात कणीक घालून मळा, थोडे तेल लावून चांगले मळा.
६) मऊसर गोळा होईल.
७) आता प्लॅस्टीकच्या कागदावर हाताने गोल थापा. दोन कागदांच्या मधे ठेवून हलक्या हाताने लाटले तरी चालेल.
८) मंद आचेवर हि भाकरी टाका. पाणी लावायची गरज नाही. दोन्ही बाजूने भाजून घ्या.
पालेभाजी साठी
१) भाजी नीट करुन, धुवून, चिरुन घ्या.
२) डाळ धुवून घ्या, व जरा वेळ भिजत ठेवा. मिरच्या व लसणाचे तूकडे करा.
३)कूकरमधे किंवा प्रेशरपॅन मधे तेलाची फोडणी करुन, त्यात मिरच्या व लसूण टाका.
४) ते परतून त्यावर डाळ टाका व जरा परता. किंचीत हळद टाका.
५) मग त्यावर पालेभाजी टाका. जरा परतून थोडे पाणी घाला.
६) झाकण ठेवून, प्रेशर आल्यावर चार मिनिटे शिजवा. (शिट्या मोजायची गरज नाही)
७) प्रेशर गेले कि झाकण उघडा. मीठ टाका व पाणी आटवून टाका.
८) वरुन दाण्याचे कुट टाकून परतून घ्या.
लसणाच्या चटणीसाठी
१) पॅनमधे तेल गरम करुन हिंग आणि गार्लिक पावडर किंवा लसुण टाका.
२) गॅस बंद करुन त्यात लाल तिखट टाका, व ढवळा.
३) पीनट बटर किंवा कूट टाका, हवे असेल तर मीठ टाका(पीनट बटरमधे मीठ असते.)
मी जरी वेगवेगळे लिहिले असले तरी, हे भाजी भाकरी एकाचवेळी करता येते. भाकरीच्या तव्यातच चटणी करता येते.


