आमटी

कडधान्याच्या गोळ्यांची आमटी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गोळे:
१ वाटी भिजवलेली कडधान्ये, [याचे बाजारात पाकीट मिळते, नाहीच मिळाले तर आपल्या आवडीप्रमाणे सम प्रमाणात एकत्र करून भिजवावी]
१/२ वाटी तांदळाचे पीठ,
२ चमचे तेल,
१/२ इंच आले,
१ हिरवी मिरची,
चवीप्रमाणे मीठ.

आमटी:
३ मोठ्या पाकळ्या लसूण,
४ चमचे दाण्याचा कुट [जाडसर असावा],
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ चमचा लाल तिखट,
१ चमचा गोडा मसाला,
१/२ चमचा साखर,
२ पाने कडीपत्ता,
३-४ वाट्या पाणी,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग,
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

आमटी:
कढईत तेल घेऊन फोडणी करावी. अगदी पातळ चकत्या करून लसूण मंद आचेवर चांगला लाल होऊ द्यावा. आता फोडणीत कडीपत्ता,हळद,हिंग,लाल तिखट, गोडा मसाला घालावा. थोडेसे डावाने हलवून घ्यावे, म्हणजे तिखटा-मसाल्याचा 'रॉ' वास निघून जातो. ३-४ वाट्या पाणी घालावे. साखर,कोथिंबीर, दाण्याचा कुट घालावा. आमटीला मंद आचेवर उकळू द्यावे, गोळे करायला घ्यावे.
A1.jpg

गोळे:
४ ते ५ तसा भिजवलेली कडधान्ये, मिरच्या, मीठ, आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्यावे. वाटताना वरून पाणी घालू नये. एका भांड्यात वाटलेले मिश्रण, २ चमचे तेल आणि त्यात मावेल इतके तांदळाचे पीठ असे सगळे एकत्र करावे. साधारण थालापिठाच्या पीठ सारखा गोळा तयार होतो. याचे छोटे-छोटे गोल-गोल गोळे करून आमटीत सोडावे.
A2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

हे गोळे वाफेवर शिजून आपोआप आमटीत तरंगू लागतात. सगळे गोळे वर येईपर्यंत डावाने हलवू नये. एखादा गोळा फुटून आमटी घट्ट झालीच तर शेवटी वरून थोडे गरम पाणी घालावे.
गोळ्यांची गर्दी झाल्यास, वर आलेले गोळे हलकेच डावाने डिशमध्ये काढून घ्यावे आणि जेवणाच्यावेळी परत आमटीत मिक्स करावे. असे केल्याने खालच्या गोळ्यांना डोके वर काढणे सोप्पे जाते.
बेताचेच तिखट असेल तर पोळीबरोबर न खाता, नुसते खायला पण छान लागते. नुसते खाणार असाल तर, उकळलेल्या आमटीत थोडी काकडी किसून घातल्याने अजून खमंग लागते.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग

टोमाटियोची आमटी.

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी तुरीची डाळ, शिजवून
५-६ मध्यम टोमाटियो
सुकी मिरची, मोहरी कडिपत्ता, हिंग , हळद , तेल फोडणीसाठी
मीठ,
धने जिरं पूड १ च चमचा
मालवणी मसाला १-१/२ च चमचा
.

क्रमवार पाककृती: 

या दिवसात फार्मर्स मार्केट मधे टोमाटियो खूप मिळतात. हिरव्या टोमेटो सारखं दिसणारं फळ- याला बाहेरुन अगदि पातळ आवरण असतं. मेक्सिकन स्वैपाकात याचा साल्सा करतात. दरवेळेस साल्सा काय करायचा म्हणून एकदा आमटी करुन पाहिली.

टोमाटियो चं आवरण काढून, धुउन, मध्यम चिरुन घ्यावेत.
पातेल्यात तेल गरम करून फोडणी करावी. त्यावर चिरलेले टोमाटियो घालावेत म मध्यम आचेवर ४-५ मिनिट परतावेत. मग त्यावर शिजलेली डाळ घालावी. धने जिर्‍याची पूड व मालवणी मसाला घालावा.
चवीपुरते मीठ घालावे व उकळी आल्यावर २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
मालवणि मसाला नसल्यास लालतिखट व थोडासा गरम मसाला घालता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४-५ लोकांना
अधिक टिपा: 

tomatillo (Physalis philadelphica) या नावाने शोधल्यास फोटो अन इतर रेसिपी पण सापडतील. जराशी आंबटसर चव असते. थोडासा चीक पण अस्तो त्यामुळे कच्चे चांगले लागत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग

मुगा घशी/ मुगा मोळो

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड काढलेले मूग ४-५ वाट्या ( साले पण काढायची असतात )
ओलं खोबरं - अर्ध्या नारळाचं कमीतकमी
८-१० बेडगी मिरच्या
२ टीस्पून धणे .
मूठभर काजू, सहा आंबाडे, शेवग्याच्या शेंगांचे दीड्-दोन इंच लांब तुकडे पंधरा सोळा - यातलं काहीतरी एक.

क्रमवार पाककृती: 

थोड्या तेलावर मिरच्यांचे तुकडे व धणे परतून घ्यावेत - करपू देऊ नये.
गॅस बंद करून त्यात पाव चमचा हळद घालावी.
गार झाल्यावर खोबरे, मिरची , धणे, सगळं अगदी बारीक वाटावं. अजिबात खरबरीत लागता कामा नये. काही जण यात एक चमचा तांदूळ पण वाटतात . मी नाही घालत.

मोड आलेले मूग थोडं मीठ घालून पातेल्यात थोड्या पाण्यात शिजत लावावेत.
( असे शिजवून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीज मधे आठ दहा दिवस रहातात )काजू/ शेंगा वगैरे घालायचे असले तर तेही यातच घालावेत.

मूग शिजत आले की ( अगदी गचका होऊ नये ) वाटलेला मसाला व मिक्सरचे भांडे धुतलेले पाणी मुगात घालावे, मीठ चवी प्रमाणे घालावे. आमटी फार पातळ नसते. ( पाहिजे तर शिजलेले मूगच चमचाभर वाटणात घालता येतात.)
एक-दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करावा. मसाला घालून जास्त उकळू नये.
मसाला घातला की दुसर्‍यागॅसवर फोडणी करायला घ्यावी
तेल तापले की मोहरी, ती तडतडली की सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, थोडी हळद घालून आमटीला उकळी आली की फोडणि त्यावर घालून लगेच झाकण लावावे.
गरम गरम भाताबरोबर लगेच खावे ! फोडणी घालून झाकण लावले की भांडे जेवणाच्या टेबलवर गेले पाहिजे.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांदाठी पुरेल
माहितीचा स्रोत: 
आई, मावश्या, आत्या इत्यादी व 'रसचंद्रिका'- सारस्वत स्वैपाकाचे जॉय ऑफ कूकिंग