अख्खे काळे उडीद - १ कप,
वाटलेले आले - २ टेबलस्पून,
वाटलेला लसूण - २ टेबलस्पून,
लोणी - १०० ग्रॅम,
टोमॅटोचा गर - दीड कप,
गरम मसाला पूड - २ टीस्पून,
लाल तिखट - १ टेबलस्पून,
फ्रेश क्रीम - १ कप,
मीठ - चवीनुसार
१. उडीद चार-पाच कप पाण्यात आठ ते दहा तास, किंवा रात्रभर भिजत ठेवावेत.
२. चार-पाच कप पाण्यात भिजवलेले उडीद, मीठ, लाल तिखट आणि वाटलेले आले टाकून शिजत ठेवावे. उकळी आल्यानंतर मंद आचेवर एक तास किंवा उडीद मऊ शिजेपर्यंत ठेवावे.
३. जाड बुडाच्या पातेल्यात लोणी गरम करावे. त्यात वाटलेला लसूण अर्धा कप पाण्यात मिसळून टाकावा. दोन मिनिटे परतावे.
४. टोमॅटोचा गर, लोणी, गरम मसाला पूड आणि शिजवलेली डाळ टाकून मंद आचेवर साधारण एक तास शिजू द्यावे. अधूनमधून ढवळावे. गरज वाटल्यास पाणी टाकावे.
५. फ्रेश क्रीम टाकून दहा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. डाळ दाटसरच असावी.
६. पावाबरोबर गरम वाढावे.

दाल पख़तूनीसह पुदिना पराठा चांगला लागतो (संजीव कपूर यांची आवडती डिश!).
पराठा, किंवा पावाबरोबर खाण्यासाठी डाळ दाटसरच असावी. भाताबरोबर खायची हे आधीच ठरवल्यामुळे मी डाळ जराशी रस्सेदार केली. पराठे वगैरे (अवघड प्रकार) करायला मला जमणार नाही.
पुदिना पराठ्याची पाकृ कोणाला हवी असल्यास मी पुस्तकातील पाकृ लिहून देईन.
मूळ रेसिपीत दिलेले आले, लसूण, गरम मसाला आणि लाल तिखट यांचे प्रमाण मला जरा जास्त वाटले. म्हणून मी ते प्रत्येकी एक टीस्पून वापरले. लोणी सुद्धा दोनच मोठे चमचे वापरले. क्रीम संपूर्ण डाळीत न टाकता केवळ माझ्यापुरते बाऊलमध्ये वरून थोडेसे टाकले.
>>वाटलेला लसूण अर्धा कप पाण्यात मिसळून टाकावा>> अश्यापद्धतीने पाण्यात मिसळून लसूण का वापरतात? मला काही समजले नाही. माहिती असल्यास तुमच्यापैकी कोणी सांगेल का मला?
वरील फोटो/पाकृ पाहून माझे काही चुकले असेल तर जरूर सांगावे. माझा पुढील प्रयोग अधिक यशस्वी होईल! 
धन्यवाद!

