दाक्षिणात्य

शेवग्याच्या शेंगाच लोणचे

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. शेवग्याच्या शेंगा - ५
२. चिंच - १ टेबल स्पून
३. मोहरीची डाळ किंवा मोहरी मिक्सरला भरड काढून - २ टेबल स्पून
४. मीठ - १ टि. स्पून
५. तेल - १५० ग्राम
६. मिरची पावडर - १ टे. स्पून

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वछ धुवून पुसून घ्या. सुरीने ह्लके साल काढा. पूर्ण साल काढू नका. दोन ईंचाचे तुकडे करा.
२. चिंच १ कप पाण्यामध्ये भिजत ठेवा.
३. कढईत १५० ग्राम तेल ओतून चांगल तापवून घ्या, त्यात शेवग्याच्या शेंगाचे तुकडे लालसर रंग येई पर्यत तळून बाजूला काढून ठेवा. उरलेल तेल लोणच्यात वापरावे.
४. चिंचेचा रस काढून गॅसवर ५ मिनट गरम करावा.
५. एका पातेल्यात उरलेल तेल, शेवग्याच्या शेंगाचे तळ्लेले तुकडे, मोहरीची डाळ, मिरची पावडर, मीठ, चिंचेचा रस सर्व एकत्र मिक्स करा.
६. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भ्र्रून ठेवा.

अधिक टिपा: 

टिपः शेंगाच्यावरपर्यत तेल हव. बरणीच्या आतून लोणचे भरल्यावर साईड्ने कोरड्या कपड्याने पूसुन घ्या. हे लोणचे वर्षभ्रर टिकत.

माहितीचा स्रोत: 
अम्मा / विजया अक्का

मुरुक्कु (फोटोसह)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पिठ ३ वाट्या
फुटाणा डाळीचं पिठ १ वाटी
लोणी २ चमचे
तिळ २ मोठे चमचे
ओवा २ मोठे चमचे
तिखट मिठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

मुरुक्कु म्हणजे आपल्या चकलीची साउदींडीयन मावस बहिण.
महाराष्ट्रात जशी दिवाळीला चकली हवीच हवी. तसेच इथे कर्नाटकात कृष्णजन्माष्ठ्मीला आणि "बोंबे हब्बा" (म्हणजे बाहुल्यांचा उत्सव्-नवरात्रात दसर्‍या पर्यंत दहा दिवस घरात देविपुढे तर्‍हेतर्‍हेच्या बाहुल्या मांडून आरास करतात). साठी मुरुक्कु खास. ह्या खास वेळी घराघरांतुन ह्या मुरुक्कुचा खमंग दरवळ येत असतो.

योग्य ते प्रमाण घेउन भाजणी करा, ती गरम पाण्यात भिजवा, मग चकल्या करा हा सगळा कुटाणा नवशिक्यांना फार कठीण. म्हणून ही एक सोप्प्या प्रकारची चकली. नो कटकट, मुरुक्कु झटपट ! स्मित

सर्वप्रथम फुटाणा डाळीचे पिठ करून घ्यायचे. मग हे पिठ, तांदळाचे पिठ, लोणी, तिखट, मिठ, ओवा, तिळ हे सगळे व्यवस्थित एकत्र मरुन घ्यायचे. पाणी न घालताच लोणी सगळ्या पिठात निट एकसारखे एकत्र होईल असे मिसळून घ्यायचे. मग गरजे नुसार पाणी टाकुन चकलीला भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे. कढईत तेल तापायला ठेउन एकसारख्या दोन किंवा तिन वेढ्याच्या चकल्या कराव्यात. कडकडीत तेल तापवुन मग मध्यम आचेवर कुरकुरीत मुरुक्कु तळाव्यात. हलका गोल्ड्न ब्राउन रंग आल्यावर काढुन पेपर टॉवेल वर जास्तिचे तेल निथळायला ठेवाव्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. (ठेवायला उरतच नाहीत फिदीफिदी )

चकलीचा अजुन एक वेगळा प्रकार इथे आहे

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

चकल्या तळतानाच्या सगळ्या टिपा ह्याला लागू जसे
प्रखर आचेवर मुरुक्कु तळल्याने लवकर तळले जाउन थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठ मळताना लोण्याचे प्रमाण जास्त झाल्याने तळताना चकल्या हसतात (तेलात विरघळतात)

माहितीचा स्रोत: 
साउदींडीयन मैत्रीण

मेदु वडे

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप उडिद डाळ, जिरे १-२ चमचे भरड्लेले, खोबरयाचे पातळ काप (आवडत असल्यास ) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, चवी पुरते मिठ

क्रमवार पाककृती: 

उडिद डाळ ५-६ तास भिजत घालावि.... सकाळी नाश्त्याला करावेसे असल्यास... रात्रि भिजत घालावे..
नंतर पाणी काढुन मिक्सर मध्ये वाटावे. वाटताना पाणी घालु नये...
नंतर हे वाटण वाडग्यात काढुन हाताने चांगल फेटुन घ्यावे.. त्यामुळे.. त्यात हवा जावुन वाटण हलके होते..
नंतर त्यात जिरे १-२ चमचे भरड्लेले, खोबरयाचे पातळ काप (आवडत असल्यास ) २ हिरव्या मिरच्या बारिक चिरुन, चवी पुरते मिठ घालुन मिक्स करावे.
तळण्यासाठि तेल तापत ठेवुन अग्नि मिडियम हाय वर ठेवावे.. व मेदु वडे सोनेरी रंगावरतळावे.

वाढणी/प्रमाण: 
ह्यात ४ प्लेट होवु शकतील .. ते किती जणांना पुरतील .. हे खाण्यारय वर आहे.
अधिक टिपा: 

वडे तेलात टाकताना. एका वाडग्यात पाणी घेवुन..हात ओला करावा.. व पिठ हातात घेवुन मध्ये भोक पाडुन तेलात सोडावे.त्याने पिठ हाताला चिकटनार नाहि
मिश्रण पातळ वाटत असेल.. आणि गोल वडे येत नसतिल...तर एक चमचा तांदुळ पिठ वापरावे.

माहितीचा स्रोत: 
आई

बिसबीली भात

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी साहीत्य-

तेल ४ टी स्पून
सुक्या लाल मिर्च्या १५
हरबरा डाळ २ टेबल स्पून
उडीद डाळ २ टेबल स्पून
धने: १ टेबल स्पून
जिरे २ टी स्पून
मेथी ८ दाणे
मिरे १८ दाणे
दालचिनी ४ छोटे तुकडे
लवंग ६
सुके किसलेले खोबरे १/२ (अर्धी) वाटी

शिजवण्यासाठी साहित्य-

चिंचेचा लिंबा एवढा गोळा
तुर डाळ १ वाटी
तांदुळ १ १/२ (दिड) वाटी
३ कांदे मध्यन आकारत चिरून
शेंगदाणे १/२ वाटी (ऐच्छीक)
हळद १ टी स्पून
हिंग १/२ टी स्पून
मीठ चवीनुसार
गुळ चवीनुसार
साजुक तुप ४ टेबल स्पून
मोहरी जिरे हिंग कढीपत्ता फोडणी साठी
काजू १० ते १२

सजावटीसाठी-

ओल्या नारळाचा चव
चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

मसाल्याची कृती

१) मसाल्यासाठी सर्व प्रथम एका कढईत तेल घेऊन लाल मिर्च्या थोड्या परतून डीश मधे काढून घ्याव्या, त्याच तेलात हरबरा डाळ थोडा वेळ परतून, त्यातच उडीद डाळ टाकुन परतावे. दोन्ही डाळी लाल झाल्या की त्यातच धने टाकून थोडे परतावे, त्यानंतर जिरे टाकून परतावे, नंतर मेथी दाणे, मिरे, दालचिनी, लवंग टाकून अजून थोडेसे परतावे. सर्वात शेवटी किसलेले सुके खोबरे घालुन मिश्रण चांगले परतून घ्यावे..
हा मसाला थंड झाल्यावर मिक्सर मधुन बारिक पावडर करून घेणे.
२) १ वाटी पाण्यात चिंच अर्धा तास भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा.

३)कढईत अथवा जाड बुडाच्या पातेल्यात (मी कुकरच वापरला) तुरीची डाळ धुवून ६ वाटी घेऊन त्यात हळद हिंग घालून शिजत ठेवावी, डाळ अर्धी शिजल्यावर त्या धुतलेले तांदुळ, कांदा, चवीनुसार मीठ व गुळ घालावा.. तयार केलेला मसाल्यातील अर्धा मसाला पाण्यात कालवून घालावा. (मसाल्याच्या गाठी होऊ नयेत म्हणून पाण्यात कालवून घालतात.) मिश्रण शिजू द्यावे.
भांड्याच्या बुडाला लागू नये म्हणून मधे मधे मिश्रण पळीने ढवळावे.
डाळ तांदुळ शिजल्यावर त्यात चिंचेचा कोळ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे..
गरजेनुसार गरम पाणी टाकत जावे.
४)साजुक तुप गरम करून त्यात शेंगदाने काजू थोडे परतून त्यातच मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून ती फोडणी भाताला द्यावी..
मिश्रण चांगले ढवळावे.
ताटात वाढुन वरून ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर टाकून वाढावे..
याच्यासोबत बटाट्याचे चिप्स छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांकरीता
अधिक टिपा: 

१) हा मसाला साधारण पणे दोन वेळच्या भातासाठी पुरतो.
उरलेला मसाला काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमधे ठेवावा.
२) हा भात जास्ती शिजलेला मऊसर आसट करतात..
३) याच्यासोबत बटाट्याचे चिप्स छान लागतात.
४)ही रेसीपी जागूच्या आग्रहास्तव लिहीली आहे.. धन्यवाद जागू..
५) यातील सजावट दिनेशदांच्या रेसीपींच्या सजावटीवरून प्रेरीत
(दिनेशदा, यासाठी तुम्हाला रॉयल्टी देणार नाही हं..!)

photo(2).JPG

माहितीचा स्रोत: 
सासुबाई

लेमन राईस (लिंबू भात)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी

फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.

अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.

फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.

फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.

शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.

आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.

वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.

वाढणी/प्रमाण: 
जेवणात नुसताच भात असेल तर लाइट लंच म्हणून तीन माणसांना पुरावा.
अधिक टिपा: 

यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.

माहितीचा स्रोत: 
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले मॉम्ज किचन नावाचे पुस्तक आणि माझे इम्प्रॉव्ह

दाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन कप खोवलेला नारळ
एक मध्यम आकाराचा कांदा, चार तुकडे करून
एक टीस्पून लाल तिखट
मीठ

फोडणीसाठी :

शुध्द तूप
कढीपत्ता
मोहरी

क्रमवार पाककृती: 

खोवलेला नारळ व कांदा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावा. त्यात लाल तिखट व मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवावे. आपल्याला चटणी जेवढी दाटसर हवी असेल तितपत किंवा थोडे कमी पाणी घालावे. (नंतर अनेकदा चटणीला पाणी सुटते.)

लहान कढईत तूप गरम करावे. मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात कढीपत्ता घालून परतावा. गॅस बंद करावा. फोडणी गार झाल्यावर चटणीत घालावी. इडली / डोसा / आप्प्यांबरोबर द्यावी. सँडविच/ पोळी/ भाकरी/ भाताबरोबर ही छान लागते.

(फोटो काढायच्या अगोदरच चटणीचा फन्ना उडाल्यामुळे इथे आता चटणीचा फोटो देता येत नाहीए, क्षमस्व!

पण ती अशी दिसते

फोटो, साभार सुजीथकडून!)

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढी!
अधिक टिपा: 

ह्या चटणीत दक्षिणेत घरोघरी थोडेफार फरक आढळतात.

* काहीजण लाल तिखटाऐवजी सुक्या लाल मिरच्या थोड्या तेलात परतून त्या नारळाबरोबर वाटून घेतात.

* काहीजण फोडणीत थोडी उडीद डाळ घालतात, कुरकुरीतपणा येण्यासाठी. तसेच हिंगही घालतात.

* काहीजण नारळाबरोबरच थोडा चिंचेचा कोळही ह्या चटणीत घालतात. त्याने चवीत थोडा आंबटपणा येतो. तोही मस्त लागतो.

* कोथिंबीरही घातली जाते.

माहितीचा स्रोत: 
आपुनका दोस्त/ बडिंग शेफ सुजीथ

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी मूग डाळ
दीड वाटी तांदूळ
१ टेबलस्पून शुध्द तूप
१०-१२ कढीपत्ता पाने
१ टीस्पून जिरे
पाव चमचा मिरी दाणे
मीठ
१०-१२ काजू तुपावर खरपूस भाजून
आवश्यकतेनुसार पाणी

khich1 copy.jpg

क्रमवार पाककृती: 

मूग डाळ कोरडीच थोडी भाजून घ्यावी. भाजून थंड झालेली डाळ व तांदूळ पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावे.
पॅन/ कढईत तूप गरम करून त्यात जिरे तडतडवावेत. कढीपत्ता, मिरी दाणे घालून थोडे परतावे.
त्यात निथळलेले तांदूळ व डाळ घालून व्यवस्थित परतावे. आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून शिजवावे. वाढताना ही खिचडी वरून काजू घालून वाढावी.
सोबत आंध्र स्टाईलने टोमॅटोची चटणी देतात. परंतु कैरीचा छुंदा/ लोणच्याबरोबरही ही खिचडी मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

आंध्रात किंवा दक्षिण भारतात ही खिचडी खास करून नैवेद्यासाठी बनवली जाते. अतिशय सौम्य व रुचकर असा हा पदार्थ आहे. गरम/ गार दोन्ही प्रकारे छान लागते. हिरव्या केळीच्या पानांत किंवा द्रोणात ही गरमागरम खिचडी घालून देतात. वरून साजूक तूप!

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल व दाक्षिणात्य मैत्रीण

मज्जिगे हुळी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोहळ्याचे चौकोनी तुकडे दोन कप
अर्धा कप ओले खोबरे
४-५ हिरव्या मिरच्या
१ चमचा च डाळ, १ चमचा तीळ, १/२ चमचा जिरे
.अर्धी वाटी घट्ट दही - जरासे आंबट असावे.
फोडणी साठी मोहरी, हिंग , सुक्या मिरच्या कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

कोहळ्याचे तुकडे, हळद मीठ घालून थोड्या पाण्यात शिजत लावावेत.

चमचाभर खोबरेल तेलात मिर्च्यांचे तुकडे परतून घ्यावेत. मिर्च्या बाजूला काढून च डाळ, तीळ व जिरे परतून घ्यावे.

मिरच्या व खोबरे बारीक वाटावे. शेवटी च डाळ, जिरे व तीळ घालून ३० सेकंद वाटावे.
कोहळा शिजला की वाटण व दही घालावे. लागेल तसे मीठ घालावे. एखादी उकळी येऊ द्यावी, दही घातल्यावर फार उकळू नये.
आवडत असल्यास खोबरेल, नाहीतर साध्या तेलावर मोहरी , हिंग हळद , सुक्या मिरच्या, कढीपत्ता यांची फोडणी करून भाजीत ओतावी.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

कोहळा, तवशे, मोठी काकडी इत्यादी ( कोकणीत उदुकुळी - पाणीदार ) भाज्यांचा हा टिपिकल प्रकार. दुधी, झुकिनी, स्क्वाश वगैरे घालून पण करता येईल.

मज्जिगे म्हणजे ताक, पण या भाजीत दहीच घालतात, तरी मज्जिगे हुळी का म्हणतात कोण जाणे !

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

अडई

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदुळ (उकडा असेल तर उत्तम, पण नसेल तर घरात जो असेल तो चालू शकेल.)
१/२ कप चणा डाळ
१/२ कप तूर डाळ
१ चमचा उडिद डाळ
५ लाल मिरच्या (तुमच्या चवी प्रमाणे कमी जास्त करु शकता)
हिंग
बारिक चिरलेली कोथिंबिर
कढीपत्याची पानं
मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ आणि बाकीच्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवुन एका भांड्यात साधारणपणे ४-५ तास भिजत घाला. त्याच भांड्यात मिरच्यापण भिजत घाला.
2. ४-५ तासांनी भिजत घालेल्या डाळी + तांदुळ + लाल मिरच्या ह्यांचं मिश्रण ग्रांईंडर मध्ये वाटुन घ्या. वाटतांना त्यात हिंग, कढीपत्त्याची पानं आणि मिठ घाला. खूप बारीक वाटू नका, थोडसं जाडसर ठेवा.
३. वाटलेल्या पीठात बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. आणि तव्यावर डोसे घालतो त्यापेक्षा थोडं जाडसर अडई घाला.

हा फोटो:

Adaai.JPG

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ११-२२ होतात.
अधिक टिपा: 

१. तव्यावर मिश्रण टाकल्यावर कडेने थोडं तेल सोडलं की क्रिस्पी होतात अडई.
२. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116302.html?1200915323 इथे जुन्या मायबोलीवरच्या रिसिपीज आहेत. पण प्रमाण वेगवेगळं आहे.
३. नारळाच्या चटणी बरोबर एकदम मस्त लागतात.
४. मुळच्या रेसिपीमध्ये मेथीचे दाणे नव्हते, पण मी १ चहाचा चमचा मेथीचे दाणे पण वापरले.
५. ह्यात फरमेंट करायची गरज नाही. भिजवुन वाटुन लगेच करता येतं.
६. अश्याप्रकारच्या आणि अगदी ह्याच प्रमाणातली रेसिपी अंतरजालावर उपलब्ध असेल तर मला माहित नाही, आज सकाळी माझ्या मित्राने मला ही रेसिपी दिली आणि मी लगेच करुन पाहिलं. आवडली म्हणुन इथे शेअर केली.

माहितीचा स्रोत: 
तेलगु मित्र.

.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.