१ वाटी कडवे वाल
प्रत्येकी एक लहान चमचा: हळद, तिखट, मीठ आणि जीरं पूड
आलं-लसूण-हिरवी मिरची ह्यांचं वाटण एक मोठा चमचाभर
वाटीभर खवलेला ओला नारळ, ५ लवंगा आणि एक पेरभर दालचिनीचा तुकडा ह्यांचं बारिक वाटण
एक मोठा कांदा : बारिक चिरून
बचकाभर कोथिंबीर : धुऊन चिरलेली
पळीभर तेल
आंबटाला एक टोमॅटो (एकाच्या आठ फोडी) किंवा कैरी २-३ मोठ्या फाका किंवा कोकम (आमसूल)
गुळाचा खडा (साधारण सुपारीएवढा)
चिमुटभर हिंग
पाव चमचा जीरे
३ वाट्या आधणाचं पाणी
*वालाला छानसे मोड आणून सोलावं.
*सोललेल्या डाळींब्यांना बारिक चिरलेला कांदा, आलं लसूण मिरचीचं वाटण, हळद, तिखट, मीठ आणि जीरपूड चोळून बाजूला ठेवावं.
*एका जाड बुडाच्या पातेल्यात, तेल गरम करून त्यात जीरं, हिंग घालून वर डाळींब्या ओताव्या. (मोहरी घालायचची नाही.)
* हलक्या हातानं ५-७ मिनिटं सवताळाव्या (परताव्या). आलं लसणाचा तसंच डाळींब्यांचा उग्र वास जायला हवा.
*आधणाचं पाणी ओतून एक उकळी येऊ द्यावी.
* आता ह्यात खोबरं, लवंग, दालचिनीचं वाटण, गुळाचा खडा आणि आंबट घालावं. (वर दिलेल्या आंबटांच्या यादीतलं काही नसेल तर काहीही आंबट घालु नये. चिंच तर अजीबात नाही.)
*पुन्हा एक उकळी आली की कोथिंबीर पेरून झाकण ठेवून शिजु द्यावं.
*धीर धरवला नाही तर डाळींब्या वगळून बिरड्यातला रस्सा (?) प्यायला सुरवात करावी.
* वाल सोलण्याआधी कढत पाण्यात टाकून ठेवावे. सालं पटापटा निघतात.
*सवयीनं दोन्ही हातांनी वाल सोलता येतात, (टीव्ही बघत).
*नारळ नसल्यास सुकं कोबरं चालेल, पण चव तीतकी अप्रतीम येत नाही.
* पांढरं बिरडं करायला हळद आणि तिखट घालायचं नाही. वाटणात मिरं घ्यायचं.
*नारळाच्या दुधात शिजवलेलं बिरडं छानच लागतं.
* नुस्त्या डाळींब्या उरल्या(च) तर दुसर्या दिवशी त्यात तांदुळ फुलवून वालाची खिचडी होते.

