संत्रे

संत्रा बर्फी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. साधारण चार ते पाच मोठ्या संत्र्यांची साले
२. अडीच वाट्या साखर
३. चार टेबलस्पून मिल्क पावडर
४. एक वाटी काजू किंवा बदामाची पावडर
५. एक टिस्पून लिंबाचा रस
६. चमचाभर तूप

क्रमवार पाककृती: 

१. संत्र्यांची साले सगळे दोरे काढून कूकरमध्ये उकडून घ्यावीत.

Image0109.jpg

कडूपणा उतरेल अशी भिती वाटत असेल तर सालांचा जाडसर पांढरेपणा धारदार सुरीने खरवडून घ्या. सालं उकडण्यासाठी कूकरच्या दोन शिट्या पुरतात. साले थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. वर दिलेल्या प्रमाणासाठी ही पेस्ट एक वाटी व्हायला हवी. पेस्टची किंचीत चव घेऊन बघा. कडसर चव असेल तर एकाऐवजी अर्धी किंवा पाऊण वाटी पेस्ट घ्या.
२. नॉनस्टीक पॅनमध्ये किंवा कढईत चमचाभर तूप गरम करून एक वाटी संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि अडीच वाट्या साखर त्यात घालावी.
३. साखर विरघळून मिश्रण उकळले की त्यात लिंबूरस घालून नीट मिसळून घ्यावा.
४. नंतर काजू किंवा बदाम पावडर आणि मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करावे.
५. गॅस मंद ठेवून मिश्रण परतावे. त्याचा गोळा फिरू लागला की गॅसवरून खाली काढून ताटात थापावा.
६. आवडीप्रमाणे बदामाचे काप किंवा वर्ख लावून सजावट करावी. हव्या त्या आकारात बर्फ्या कापाव्यात.

ही तयार बर्फी (वडी म्हणा हवंतर डोळा मारा )

orange burfi 1.jpg

वड्यांच्या फिनिंशिंगसाठी माफी द्या.
आणि जुन्यापान्या मोबाईलच्या तिसर्‍या जगातील कॅमेर्‍याने फोटो काढलेला आहे.

वाढणी/प्रमाण: 
बाजारात काजू कतली मिळते त्या आकाराच्या साधारण पंचवीस बर्फ्या होतात.
अधिक टिपा: 

१. गेल्या वर्षी मानुषीने संत्र्याचे सोप्पे सरबत लिहिले होते. त्यातली संत्र्याचे साल उकडण्याची युक्ती भारीच आवडली होती. प्रत्यक्षात ते साल उकडून त्याची पेस्ट केल्यावर त्याचा जो स्वाद आला होता तो भयंकरच आवडला होता. तीच पेस्ट इतर गोड पदार्थात वापरता येईल असं वाटून जरा एक दोन प्रयोग केले. त्यातला केक पारच फसला. ही संत्रा बर्फी मात्र पहिल्याच प्रयत्नात बर्‍यापैकी जमली. नंतर करून करून प्रमाण योग्य जमले.
२. ह्यात संत्र्याच्या सालीचा स्वादच इतका मस्त असतो की इतर केशर, वेलची इत्यादी स्वादांची गरज पडत नाही.
३. आता संत्र्यांचा मोसम चालू होतोय. नक्की करून पहा.

माहितीचा स्रोत: 
काजू कतलीच्या बर्‍याच पुस्तकांतून आणि नेटवर वाचलेल्या पाककृती आणि स्वप्रयोग.

झटपट संत्रा केक

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हा अगदी नो कटकट केक आहे. दुसरे म्हणजे अंडे टाकून वा न टाकता सुद्धा होवु शकतो पण मग दही प्रमाण ज्यास्त घ्यावे.

सामानः
दिड कप गव्हाचे पीठ्(आजकाल मी आशिर्वाद चे आणते चांगलेय),
१ अक्खे naval orange( हि गोड असतात, साली विशेष कडवट नसते),
१ संत्र्याचा ताजा जूस् (रस काढण्याआधी साल मस्त ग्रेट करून घ्या),
१ अक्खे अंडे,
१ मस्त फेटून हलके झालेले egg white शेवटी शेवटी फोल्ड करून घालायचे.
पाव कपाच्या जराशीच वर Organic agave nectar/अर्धा कप ब्रॉउन साखर्/अर्धा कप रोजची साखर.(मला गोड कमी लागते. पण हे प्रमाण अगदीच अगोड नाही करत. स्मित)
पाव कपच्या जरासेच वर कनोला तेल,
मीठ चवीप्रमाणे,
१ लहान चमचा बेकींगपॉवडर + अर्धा चमचा बेकिंगसोडा,
२ मध्यम आकारच्या चमचे घट्ट दही,
पंपकीन स्पाईस १ चमचा.

क्रमवार पाककृती: 

कृती:
अंडे टाकूनः
अवन आधी ३५० डिग्री वर तापायला ठेवा १५ मिनीटे तरी तापला पाहिजे.
१)सर्वात आधी पीठात स्पाईस, बेपॉ व बेसो घालून मिक्सीत फिरवून घ्या नाहीतर चाळून घ्या.
२)एक अक्खे संत्रे सालीसकट कापून, त्याच्या बिया काढून मिक्सीच्या भांड्यात टाका. प्युरी करून झाली की मग संत्रा रस टाकून प्युरी करून घ्या. रस काढण्याआधी साल किस्सोन घ्या. किसलेली साल बाजूला ठेवा.
३) मग १ आक्खे अंडे + वॅनिला + तेल + साखर्/अगेव मिश्रीत दही टाका. मिक्सी फिरवा.
४)मग हळू हळू पीठ टाकत जा. मग सगळ्यात शेवटी egg white fold करा. मग त्यात बेरीज,किसलेली साल व ऑक्रोड (हवेच असेल्यास)टाका.
६) केक पॅनला तेल व पीठ लावून मग वरचे मिश्रण ओता. वरून फॉइल लावून अवन मध्ये टाका.
नोटः हा केक ५० मिनीटे भाजा. बरोबर ३० मिनीटाने अवनचे टेंपरेचर ३०० वर आणा. मग अलगद स्वःताला न भाजून घेता केक पॅनची फॉइल काढा. केक मात्र अवनच्या आतच ठेवा आणखी २० मिनीटे. स्मित

अंड्याशिवायः
वरच्या स्टेप ३) व ४) मधील अंडी वगळून बाकी सर्व सेम.
इतका मस्त वास येतो संत्र्याचा की कधी खातो असे होते.
( अंडे अजीबात घालत नसाल तर दही चार मोठे चमचे व तेल अर्धा कप असे घ्या.)

अधिक टिपा: 

संत्र्याचा ज्युस ताजाच घाला.
बाहेरील ज्युस मध्ये प्रीसर्वेटीव असतात ते अवन मध्ये कडवट होतात हाय टेंप वर.
मिश्रण एकदम वर पर्यंत भरू नका. केक फुगतो व फॉइलला चिकटेल. फॉइलला आतील बाजूस जरासे तेल लावून जस्ट वर ठेवून द्या. काढायला बरे पडते.

बेकिंग सोडा टाकायचा नसेल तर बेकींग पॉवडर टोटल दिड चमचा टाका.