राडा
______
स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.
आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.
उभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....