राडा

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2019 - 04:19

राडा
______

स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.

आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.

"रिक्षा स्टॅण्डला लावली आहे ना तुम्ही’..."
"असा धंदा करता काय?.."
"बस्स झाली ही तुमची मुजोरी, आता आणखी सहन नाही करणार.."
"पंचवीस वर्षे झाली मुंबईत आम्हाला.."
"ए, तू आवाज चढवून बोलू नकोस.. हात खाली कर आधी.."

हळूहळू चढत्या आवाजाची काही वाक्ये कानावर पडत होती. नक्की काय प्रकरण आहे. कोणाची चूक आहे, कोण मुजोरी करतेय, काही समजायला मार्ग नव्हता. कोणाला प्रश्न विचारायचा प्रश्नच नव्हता. फक्त कोलाहल वाढत होता. आणि तो कोलाहलरुपी हलाहल आवडीने पचवायला बघ्यांची गर्दी भोवताली वाढत होती. एक लांबची सीट मी देखील माझ्यासाठी बूक केली होती.

मागची ट्रेन आली तसे त्यातील दहा टक्के जनता वेळात वेळ काढून तिथे वळली. आसपासचे रिक्षावालेही जमू लागले.
"ए, तू हात तर लाऊन दाखव मला.."
"ए हरामखोर, बाईला बघून नडतोस का?"
"ईन लोगोंका अभी ज्यादा हो गया है बॉस....."

मूळ वादाशी संबंध नसलेले प्रवासी सुद्धा आता मध्ये पडू लागले होते. बायकांमुळे रामायण महाभारत घडले असे म्हणायची एक पद्धत आहे आपल्याकडे, ईथे खरोखरच एक छोटीमोठी चकमक घडायची चिन्हे दिसू लागली.

वादावादीने दुसरा गिअर टाकला आणि ते पाहून शेजारचा भजीवाला काही काळापुरता भजी तळायचा थांबला. भुर्जीवाल्याने आपली अंडी सांभाळून आत ठेवली. सरबतवाला नुसतेच सरबत घुसळत राहिला. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांनी संभाव्य धक्काबुक्कीच्या भितीने आपला धंदा सावरून घेतला. मिनिटाला दोन भेल बनवणारया भेलवाल्याचेही हात थबकले. ईथे माझेही पाय थांबले. अन कान!, ते तर आधीपासूनच टवकारले होते.

"ए अंगाला हात लावायचे काम नाही भडXXव्या..."
"कॉलर सोड ए भोसXXडीच्या..."

ज्या शब्दांची, ज्या वाक्यांची मन आतुरतेने वाट पाहत होते ते आता कानात पडू लागले होते.

नक्की काय होतेय हे घोळक्यात दिसत नव्हते. पण घोळका आता डावीकडून उजवीकडे आणि पुढे मागे सरकू लागला होता. बहुधा धक्काबुक्कीला वा लाथाबुक्कीला सुरुवात झाली होती. जवळच्या पूलावरून काही मोबाईल कॅमेरे सरसावले गेले. काही साहसी स्वयंछायाचित्रकारांनी गर्दीतच हात वर करून चित्रण सुरू केले. त्यात आपल्या कोणी ओळखीचा दिसतो का हे माझी नजर शोधू लागली. जेणेकरून नंतर ते चित्रण पाहता येईल. मी पुन्हा आजूबाजूला बघ्यांच्या जमावावर एक नजर टाकली. आणि काय पाहिले तर जे कुत्रे उगाचच रोज गर्दीच्या अध्येमध्ये लुडबुडताना दिसायचे, चहापोहेवाल्याच्या आजूबाजूला आशेने घुटमळताना दिसायचे. ते आज मात्र या निर्दयी माणसांच्या भांडणात नाहक आपण तुडवले जाऊ या भितीने पूलाखालच्या कपारीत जाऊन बसले होते.

ईथे एव्हाना भांडणाने टॉप गिअर टाकला होता. लांबच्या स्टॅण्डवरून चारपाच रिक्षावाले धावत आले. आणि त्या गर्दीत मिसळले. त्यांचा आवेश पाहता आता एकदोघांच्या बॅगा हवेत फेकल्या जातील, शर्ट टराटरा फाडून उडवले जातील या आशेने मी श्वास रोखून पाहू लागलो. अचानक झाडांवरचे पक्षीही फडफड करून आडोसा शोधताहेत असे जाणवले, अन ईतक्यात ....

टप ! टप ! टप ....
धो धो धो ...
बघता बघता तो आभाळातून कोसळू लागला. रिक्षांच्या टपावर, स्टेशनच्या छतावर, टपर्‍यांच्या पत्र्यावर आणि कोरड्या पडलेल्या रस्त्यावर त्याचा नाद घुमू लागला. भिजलेल्या पानांच्या सळसळीलाही एक वजन आले. भांडणाची मजा थांबवून मी आडोसा शोधत पळू लागलो. ऑफिसची बस दूरहून येताना दिसली. धावत जाऊन त्यात चढलो. खिडकीशेजारच्या सीटवर आपले बस्तान बसवून एक नजर बाहेर टाकली आणि काय आश्चर्य!

ज्या जागी काही काळापुर्वी घनघोर युद्ध पेटले होते, जणू हाडामासांचा चिखलच जमा होईल असे वाटत होते, तिथे आता माणसांचा लवलेशही नव्हता. नुसता पाण्यामातीचा चिखल रस्त्यावरून वाहत होता आणि त्याला चुकवून दोनचार लोकं ईथेतिथे पळत होती. भजीवाल्याच्या आडोश्याला दहाबारा लोकं जमली होती. आणि त्याने संभाव्य गिर्हाईक लक्षात घेत कढईत भजी सोडली होती. पूलाखाली कुत्र्यांच्या सोबतीला आता काही माणसांनीही आसरा घेतला होता. अवेळी अन अचानक आलेला पाऊस सर्वांची धांदल उडवून गेला होता. एक वणवा पेटायच्या आधीच विझला होता. चोहीकडे फक्त पावसाचेच थैमान चालू होते. निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! आवडली पाऊसकथा. Wink
तुमचा पाऊस भलताच रोमॅंटीक आहे हो.
बादवे शिव्या पुर्णच टायपल्यात मग फुल्या कशासाठी टाकल्यात? Wink

छान!

अर्रे !!
वर्णन मस्त आहे. Happy
शब्दखुणांत 'गर्लफ्रेंड' कशासाठी Wink Lol

धन्यवाद शाली.
आपल्याला आवडली म्हणजे जमली बोलू शकतो.
शिव्यांचा तो असाच एक प्रयोग केला. फुल्याफुल्यांमुळे वाचकांच्या मेंदूला ते अपशब्द आहेत असा सिग्नल मिळतो आणि त्यांच्याकडून त्या शिव्या शिव्यांसारख्याच वाचल्या जातात. तसेच पुर्ण लिहिल्याने फ्लो मध्येच वाचल्या जातात. अन्यथा वाचनात स्पीडब्रेकर आला की मजा गेली Happy

रच्याकने ती बाई कुठं गेली मग?
>>>>
तिला जाऊ दे जायचे तिथे. तशीही ती दिसलीही नव्हती. मी आजही त्या फोटो काढणारया मुलीला शोधतोय Happy

शब्दखुणांत 'गर्लफ्रेंड' कशासाठी
>>>>
पावसासारखी प्रेयसी नाही !

च्रप्स, मानवमामा धन्यवाद Happy

फोटो काढणाऱ्या मुलीला शोधण्याऐवजी स्वत:चा फोटो सह सरळ स्पष्टीकरणासह जाहीरात दे की तू काहीही केले नसताना मुलीने फोटो काढला, म्हणजे मग ती तूझ्या वर अत्याचार (वाईट हेतू) केला असा अत्याचार करू शकणार नाही. जौदे इतकं काय गिल्टी वाटून घ्यायचं. कर नाही त्याला डर नाही.

रिक्षाची चावी काढून घ्याची आणि सरळ जावून घरी झोपायचे सर्वच रिक्षा वाल्यांनी .
शब्दाना कृतीने उत्तर देणे कधी ही उत्तम

हा हा Lol मस्त!

> भडXXव्या..."
"कॉलर सोड ए भोसXXडीच्या. >स्टाईल आवडली.

अरेरे, मग तर पाळण्यातच केली वाटतं!
डायपर घ्यायची औकात नसताना शिशुवर्गात मिसळू नये, आणि वर्गात तर येऊच नये, वर्ग घाण होतो, आणि मग डुकरं मागे लागणारच.

मस्त वर्णन.
पण पाउस कधी राडा करणारे काय माहित Sad

आज पाऊस पडला नाही तर मी घोर तपश्चर्या करून देवाकडून मिळवलेलं वरुणास्त्र आकाशात सोडणार आहे.पण मुंबईत अजून पावसाचा पत्ता नाही मग या गोष्टीतला धो धो पाऊस नक्की कुठल्या एरियात पडला.

आज पाऊस पडला नाही तर मी घोर तपश्चर्या करून देवाकडून मिळवलेलं वरुणास्त्र आकाशात सोडणार आहे.>>> आप नही सुधरोगे Happy
कथा आहे ओ ही. लेखक कथेत धोधो पाउस काय पाडेल नी मुबै बंद काय करेल. Happy

Pages