साद

साद घालू लागले

Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 June, 2023 - 07:32

साद घालू लागले ते गाव माझे
उमटले मातीत तेथे नाव माझे

पावले रक्ताळली वाटेत केव्हा
मांडले पून्हा तरी मी डाव माझे

लगडले टप्पोर मोती जोंधळ्याला
पेरले मातीत भक्तीभाव माझे

वाहती जखमा जुन्या पून्हा नव्याने
ओळखीच्या माणसांचे घाव माझे

सांडले तू गंध तेथे त्या फुलांचे
आजही घेतात येथे ठाव माझे

© दत्तात्रय साळुंके

वृत्त मंजुघोषा -
गण:- - र त म य- राधिका, ताराप, मानावा, यमाचा
एकाच शब्दात दोन ल एकापाठोपाठ = गा
जोडाक्षरा आधी लघु = गुरू जर लघु अक्षरांवर जोडाक्षराचा आघात होत असेल

शब्दखुणा: 

तू लहर..

Submitted by mi manasi on 5 April, 2023 - 15:01

प्रेमगीत !

तू लहर प्रेमाची
वाट वादळाची
लाट प्रकाशाची
चंद्र ताऱ्यातली...

दरवळतेस तू
माझ्यात परंतु
शोधता थकतो
बात तुझ्यातली...

तू हवीशी हवीशी
मोकळी जराशी
मनाची मनाशी
गाठ बंधातली...

मी जसा निजलासा
जागविशी असा
जशी झंकारते
तार वाद्यातली...

तू नाहीस भुलावा
नच काही कावा
जादुई रात्र ती
आत मनातली...

तू ते संगीत माझे
सूर ताल जे ते
मनाने घातली
साद सुरातली...

मी मानसी

शब्दखुणा: 

साद

Submitted by आर्त on 12 June, 2021 - 07:35

घातलेली साद तू, मी ऐकली नाही
साद प्रेमाने तशी तू घातली नाही

भोगल्या मी तू दिलेल्या त्या व्यथा साऱ्या
प्रेम मिळण्याची व्यथा मी भोगली नाही

भूतकाळाने शिकवले वेगळे काही
माणसाशी प्रीत वेडी चांगली नाही

जे प्रवासी भेटले, ते पांगले सारे
भाग्य माझे! वाट माझी पांगली नाही

घाबरट हे सत्य इथले, न्याय ही भित्रे
आज खोट्यालाच भीती वाटली नाही

शस्त्र झाले सर्व बोथट, वार ही थकले
राजनीतीची लढाई संपली नाही

रोज पडले कैक, त्यांना मी उचलले मग
का कुणी माझीच तिरडी उचलली नाही?

विषय: 

साद

Submitted by नीधप on 9 December, 2014 - 05:25

फेसबुकावर एका मित्राने साकुराच्या बहराचा एक अप्रतिम फोटो टाकला होता. आणि कुठले गाणे सुचते असे विचारले. त्यावर मी अतिशहाणपणाने गाणे सुचत नाही. मी स्वतःच काही लिहिन, उधार शब्द नकोत असे बाणेदार उत्तर दिले. तर मित्र म्हणे लिहा लवकर... आता आली का पंचाईत!! मग लिहिले.. ते हे.

----------------------------------------------
स्तब्ध निवळशंख पाणी
बर्फाळ गुलाबी आसमंत
ओलसर स्वच्छ शांतता
पहाटेची वेळ
गार पडलेले नाक
पापण्यांवर झुरझुर बर्फ
तसलेच झुरमुर वय

अशी एक साद घातली होती

तुझा प्रतिसाद
आला
की नाही आला?
आला तर कुठल्या दिशेने आला?
आठवतही नाही..

ती साद आठवते

शब्दखुणा: 

साद

Submitted by मी कल्याणी on 31 March, 2013 - 22:15

पापणीतल्या स्वप्नांना
आशेची साथ दे..
अंतरीच्या भावनांना
सप्तसुरांचा नाद दे..

आकाशातल्या चांदण्यांना
सुगंधी श्वास दे..
ओंजळीतल्या पाखरांना
भरारीचा ध्यास दे...

इंद्रधनुच्या सतरंगांना
आनंदाची साथ दे..
नादमयी सप्तस्वरांना
मोहक हास्याने दाद दे..

सप्तर्षीच्या त्या तेजाला
निरांजनाची वात दे..
सत्यस्रुष्टीतील स्वप्नांना
मनापासून साद दे.....

शब्दखुणा: 

साद

Submitted by उमेश वैद्य on 27 April, 2011 - 09:22

साद.......
मना संधीचे आज सुटतील वारे
तक्षणि सोड हे खीन्नतेचे किनारे
जरी वाळले काष्ट तुझी डोलकाठी
नवोन्मेषतेचे फुट्ती धुमारे

किती काळचा तू असा 'ऐल' वासी
गड्या रे असा का अससी उदासी?
नसे थांग तुजला जरी पैलतीर्
पुढे चालता स्पष्ट होईल सारे

उठी शोध घे चंदनी मंजुषा त्या
वाळू मधे खोल पुरल्यास का त्या?
उकरुनी काढी, उघडी तया रे
अंतरी मयूर, फुलती पिसारे

तुला ठाव भूमी स्वाधीनतेची
तरी काय ओढी अशी अल्पतेची?
हाकारीसी ना जरी तारु बा रे
प्रासाद तेथील मिटतील दारे

रवि शुक्र ध्रुवा परी मार्गदर्शी
स्तंभावरी दीप क्षितीजास स्पर्शी
घे रोख त्यांचा करती इशारे
विरतील दाही दिशांचे पसारे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साद तुझी .....

Submitted by गिरिश देशमुख on 1 December, 2010 - 00:11

MAn.jpg
साद तुझी प्रीतीला
आज हवी होती ...
साथ तुझी साथीला
आज हवी होती ...

तगमगता दीप मी
तू तेजाळ मशाल
ज्योत तुझी वातीला
आज हवी होती ...

जगण्याचे ऋण हे
फिटता श्रमलो मी
खैरात तुझी रातीला
आज हवी होती ...

बीज ते सृजनाचे
मनी कसे रुजेना
ओल तुझी मातीला
आज हवी होती ...

छेडीता ते सूर तू
आस मनी जागते
साद तूझी प्रीतीला
आज हवी होती....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - साद