साद

Submitted by आर्त on 12 June, 2021 - 07:35

घातलेली साद तू, मी ऐकली नाही
साद प्रेमाने तशी तू घातली नाही

भोगल्या मी तू दिलेल्या त्या व्यथा साऱ्या
प्रेम मिळण्याची व्यथा मी भोगली नाही

भूतकाळाने शिकवले वेगळे काही
माणसाशी प्रीत वेडी चांगली नाही

जे प्रवासी भेटले, ते पांगले सारे
भाग्य माझे! वाट माझी पांगली नाही

घाबरट हे सत्य इथले, न्याय ही भित्रे
आज खोट्यालाच भीती वाटली नाही

शस्त्र झाले सर्व बोथट, वार ही थकले
राजनीतीची लढाई संपली नाही

रोज पडले कैक, त्यांना मी उचलले मग
का कुणी माझीच तिरडी उचलली नाही?

पाप माझे पार फिटले, दुःख ही सरले
हासण्याची पण तरी परवानगी नाही.

आर्त
२६.०५.२०२१

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults