अभय कविता

चेंडू मारियेला

Submitted by अभय आर्वीकर on 7 December, 2010 - 22:52

चेंडू मारियेला

यशोदे तुझा कृष्ण निराला
राधेश्याम! चेंडू मारियेला
कशी जावू यमुने तीराला
घनश्याम! चेंडू मारियेला .... ॥धृ०॥

रंगी श्रीरंग, नरनारी संग
मारी पिचकारी, भिजवितो अंग
दिसरात हर जागियेला .... ॥१॥

रगडी गुलाल, गळा,मान,गाली
राधा लाल लाल, शरमिली झाली
चराचर सुर लाजियेला ....॥२॥

माधवाचा घोष, जाहला जल्लोष
बेधुंद नाचताती, मुरलीचा जोष
अरविंद क्षण पाहियेला .... ॥३॥

गुलमोहर: 

वेणी सोडुनिया : गौळण

Submitted by अभय आर्वीकर on 6 December, 2010 - 21:30

वेणी सोडुनिया : गौळण

गुपचिप आला हा उघडोनी ताला
झोपेमधी होते याने रंग टाकीला
गौळण सांगे राधा, गौळणीला .... ॥धृ०॥

नाही गडे याचा, जराही भरोसा
नख मारूनिया दिला, पदराला खोसा
बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो
वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ..... ॥१॥

करुनिया चाल, डिवचितो गाल
वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल
असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी
चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ..... ॥२॥

कुणी गडे याला, जरा समजावा
बोलताती सासू दीर, मार किती खावा
वळणाचा घाट, हा अडवितो वाट
अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला ..... ॥३॥

गंगाधर मुटे
...................................................

गुलमोहर: 

मरण्यात अर्थ नाही

Submitted by अभय आर्वीकर on 5 December, 2010 - 00:46

मरण्यात अर्थ नाही

संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे
.....................................................

गुलमोहर: 

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 26 November, 2010 - 09:09

किती चाटणार भारतपुत्रा? : नागपुरी तडका

कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय
किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? ...!!

जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी
गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी
दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही
आनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही
चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय ...!!

राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली
भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली
कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला
स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला

गुलमोहर: 

‘रानमेवा’ काव्यसंग्रह.

Submitted by अभय आर्वीकर on 11 November, 2010 - 23:58

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 20 October, 2010 - 05:02

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!

अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ
बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....!

पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!

कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड
फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!

मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण
कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!

सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
.
. गंगाधर मुटे

गुलमोहर: 

गंधवार्ता

Submitted by अभय आर्वीकर on 10 October, 2010 - 22:39

गंधवार्ता

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssचं गंधवार्ता
.
.
.
.
.
गंगाधर मुटे
...................................
गंधवार्ता = मागमुस, सुगावा

शब्दखुणा: 

तृप्ततेची चमक आणि फटाकडी

Submitted by अभय आर्वीकर on 7 October, 2010 - 09:07

आता काही देणे घेणे उरले नाही

१) तृप्ततेची चमक

तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे

जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!

२) मर्यादा सहनशीलतेची

तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो
तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो
तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो
तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पैसे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पैसे

आई म्हणते -- पैसे जोड
ताई म्हणते -- पैसे जोड
भाऊ म्हणतो -- पैसे जोड
सगळी नाती म्हणतात --
'पैशाला पैसे जोड'

मी म्हंटले -- माणसे जोड
याला म्हंटले -- माणसे जोड
त्याला म्हंटले -- माणसे जोड
सर्वांना म्हंटले --
'माणसाला माणूस जोड'

मोडता पैशातला पैसा
होते माणसामाणसांची तोडफोड

- बी

प्रकार: 
शब्दखुणा: 

हिशेबाची माय मेली?

Submitted by अभय आर्वीकर on 22 September, 2010 - 06:12

हिशेबाची माय मेली?

कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?

पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?

तिला घाबरावे असे काय आहे
अशी काय ती तोफ़ लागून गेली?

किती नाडती आडदांडे तराजू
कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?

कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी
कशी दरवळावीत चंपा चमेली?

म्हणाले 'अभय' 'ते' तुरुंगात डांबू
''जरी आमुची तूच तक्रार केली..!''

गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अभय कविता