वेणी सोडुनिया : गौळण

Submitted by अभय आर्वीकर on 6 December, 2010 - 21:30

वेणी सोडुनिया : गौळण

गुपचिप आला हा उघडोनी ताला
झोपेमधी होते याने रंग टाकीला
गौळण सांगे राधा, गौळणीला .... ॥धृ०॥

नाही गडे याचा, जराही भरोसा
नख मारूनिया दिला, पदराला खोसा
बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो
वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ..... ॥१॥

करुनिया चाल, डिवचितो गाल
वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल
असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी
चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ..... ॥२॥

कुणी गडे याला, जरा समजावा
बोलताती सासू दीर, मार किती खावा
वळणाचा घाट, हा अडवितो वाट
अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला ..... ॥३॥

गंगाधर मुटे
...................................................
१९८० च्या सुमारास मी लिहिलेली गौळण. ’’गौळण" एक लोभसवाणा काव्यप्रकार. गोकुळात श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत ज्या कृष्णलीला केल्यात त्याचे रसभरित गेयरूपी वर्णन म्हणजे ’’गौळण". पवित्र आणि वासनारहित प्रेमाचे प्रतीक म्हणजे "गौळण". पण या काव्यप्रकाराची फारशी दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नसावी.
जाणकारांनी या काव्यप्रकाराविषयी अधिक प्रकाश टाकला तर आवडेल.
...................................................

गुलमोहर: 

फार आवडली ही कविता! गंगाधर मुटे, तुम्ही अधिकाधिक लिह हा काव्यप्रकार! प्रामाणिकपणे सांगतोय! चांगला लिहीताय!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा. Happy

सांजसंध्याजी,
तसा माझा फारसा अभ्यास नाहीये. फक्त जुजबी ओळख तेवढी आहे.
हा काव्यप्रकार संत एकनाथांनी खूप चांगल्या तर्‍हेने हाताळला.
कदाचित सर्वात जास्त गौळणी त्यांनीच लिहिल्या असाव्या.

''आज गोकुळात रंग खेळतो हरी" आणि "किती सांगू मी सांगू कुणाला"

ह्या कविता/गीते गौळण या प्रकारातच मोडणार्‍या आहेत.

कवी उत्तमकुमार रचित आणि गोदावरी मुंढे यांनी गायलेल्या गौळणींची कॅसेट मागे महाराष्ट्रभर खूप गाजली होती.
"वाजवितो पावा कृष्णमुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी" हे गीत मला खूप आवडले होते.

यथावकाश याविषयावर आणखी लिहायचा प्रयत्न करीन. Happy

बेफिकिरजी,
धन्यवाद.
माझ्याकडे १९८०-८५ या काळात लिहिलेल्या आणखी ४-५ गौळणी आहेत. यथावकाश त्या येथे टाकतो.
त्यानंतर नव्याने लिहिण्याचा अवश्य प्रयत्न करीन. Happy

आवडली.

छान!

छान, मला फार आवडतो हा काव्यप्रकार Happy
श्री. अजीत कडकडेंचे "वृंदावनी वेणू" हि देखील गवळणच आहे ना?