अभय-गौळण

रंगताना रंगामध्ये

Submitted by अभय आर्वीकर on 18 March, 2011 - 09:08

रंगताना रंगामध्ये

यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी
दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी
पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला
घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी
सोडीयेली धार कशी? सररररर
रंगताना राधा बोले अररररर
बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे
तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे
मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे
रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे
आतातरी थांब ना रे.....!
कान्हा, आतातरी थांब ना रे.....!

अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,
रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II

माळ तुटली कशी? मोती गळले कसे?
कंकण टिचकून हातात रुतले कसे?

गुलमोहर: 

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)

Submitted by अभय आर्वीकर on 10 December, 2010 - 00:17

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)

राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट
मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे
मला समजू नको भोळीभाळी रे ......॥१॥

कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार
बोलीचालीत अंगार सखे, भरला गं
तुझ्या पदराला हात राधे धरला गं ...॥२॥

राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते?
सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते
नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला
मुरलीचा मोह नच पाडी रे
मला समजू नको भोळीभाळी रे ......॥३॥

गुलमोहर: 

चोरटा मुरारी - गौळण

Submitted by अभय आर्वीकर on 9 December, 2010 - 00:08

चोरटा मुरारी - गौळण

शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
सांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥

शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥

यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
पकडाया जाता, होतो फ़रारी
चव हा चाखी, ओठ हा माखी
टांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥

व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥३॥

गंगाधर मुटे

गुलमोहर: 

चेंडू मारियेला

Submitted by अभय आर्वीकर on 7 December, 2010 - 22:52

चेंडू मारियेला

यशोदे तुझा कृष्ण निराला
राधेश्याम! चेंडू मारियेला
कशी जावू यमुने तीराला
घनश्याम! चेंडू मारियेला .... ॥धृ०॥

रंगी श्रीरंग, नरनारी संग
मारी पिचकारी, भिजवितो अंग
दिसरात हर जागियेला .... ॥१॥

रगडी गुलाल, गळा,मान,गाली
राधा लाल लाल, शरमिली झाली
चराचर सुर लाजियेला ....॥२॥

माधवाचा घोष, जाहला जल्लोष
बेधुंद नाचताती, मुरलीचा जोष
अरविंद क्षण पाहियेला .... ॥३॥

गुलमोहर: 

वेणी सोडुनिया : गौळण

Submitted by अभय आर्वीकर on 6 December, 2010 - 21:30

वेणी सोडुनिया : गौळण

गुपचिप आला हा उघडोनी ताला
झोपेमधी होते याने रंग टाकीला
गौळण सांगे राधा, गौळणीला .... ॥धृ०॥

नाही गडे याचा, जराही भरोसा
नख मारूनिया दिला, पदराला खोसा
बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो
वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ..... ॥१॥

करुनिया चाल, डिवचितो गाल
वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल
असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी
चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ..... ॥२॥

कुणी गडे याला, जरा समजावा
बोलताती सासू दीर, मार किती खावा
वळणाचा घाट, हा अडवितो वाट
अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला ..... ॥३॥

गंगाधर मुटे
...................................................

गुलमोहर: 

राधा गौळण

Submitted by अभय आर्वीकर on 26 May, 2010 - 12:10

राधा गौळण

डोईवर घागर खांदी दुपट्टा
पाठीशी वेणी
भरीतसे राधिका पाणी....... ॥धृ॥

हलवित हात कमर लचकते
पैंजण वाजत हळूच दचकते
नाकी नथणी,लोंबतं कुंडलं
झुलतसे कानी ........॥१॥

चालत बोलत रूप मिरवते
शोधित कान्हा नजर फ़िरविते
कान्हाईची आठव झाली
झुरतसे नयनी ........॥२॥

तितुक्यातच हा रांगत आला
परमात्म्याचा संगम झाला
अभय जनांनी रूप लोचनी
साठविले ध्यानी ........॥३॥

गंगाधर मुटे
...................................................

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अभय-गौळण