आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 20 October, 2010 - 05:02

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!

अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ
बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....!

पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!

कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड
फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!

मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण
कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!

सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
.
. गंगाधर मुटे
......... **.............. **............. **.............

गुलमोहर: 

"सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!"
हे अधिक आवडलं.

(अवांतर : "वृक्षवल्ली आम्हां सोयरे"
असं कुणी महान संत उगाच नाही म्हणून गेले.)

शेतीचे संशोधन हा आपल्या आवडीचा विषय असल्यामुळे
झाडांच्या सद्गुणांचे वर्णन छान करू शकलात. कविता
खूप आवडली.

...

साधी सोपी. चांगली आहे मुटे साहेब.

मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण
कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!>>>>> हे छान आहे. Happy

छान कवीता .....

माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!

हे येथे कोण्या MIT च्या researcher ने वाचले तर लगेच आंब्याला वांगी लावायचा Happy

एक नवमतवादी प्रतिसाद ....
१. आशयघनतेचा सांगोपांग विचार करता असे आढळून आले की कवीला आंब्याच्या झाडाला जर वाचा फुटली तर तो काय म्हणेल असा कल्पनाविष्कार निर्माण करावयाची हुक्की आलेली आहे.
२. मुळात आंबा हा फळांचा राजा असल्याने कवीने त्याच झाडाचा विचार करून इतर झाडांवर अन्याय केला आहे हे छान छान म्हणणार्‍या इथल्या प्रतिसादकांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
३. आंब्याबरोबर 'वांगे' या फळभाजीचा उल्लेख करताना वांग्याचा अपमान करून कवीने 'वड्याचे तेल वांग्यावर' काढल्याचे स्पष्ट दिसत आहे. आंब्याचे भरीत होत नाही हे कदाचित कवीला माहीत नसावे.
४. कवी स्वतः कर्माने शेतकरी असल्याने (हे ऐकीवात आहे तसेच वाचनातही) असल्याने कवीने निसर्ग व माणूस यांच्यातला नेहमीचाच जुनाट तुलनात्मक विचार मांडलेला आहे. यात काहीच नाविन्य नाही. कवी शेताबाहेर गेले नसल्याने त्यांचा मराठी साहीत्यातील तसेच अवतीभवती विस्तारलेल्या वा रुंदावलेल्या कक्षांचा बिल्कुल अभ्यास नाही, याची कवीने नोंद घेऊन शेताबाहेर पडावे ही विनंतीवजा सुचना.
५. लाकडांचे फायदे या शास्त्रीय चष्म्यातून पहाताना कवी शेवटी संतसुर्य तुकाराम महाराजांप्रमाणे वचन सांगत असल्याचा जो भास होत आहे ते म्हणजे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हे महाराजाच्या अभंगाचे चौर्यच म्हणायला हवे.
६. काव्यरचना साधी, सरळ आणि सर्वसामान्यांना समजेल अशी असल्याने त्यांना कवी म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार उरत नाही याची त्यांनी नोंद घ्यायलाच हवी हा ठराव सर्वसंमतीने पास केला गेला आहे.
७. नागपुरी तडका अस्सा प्रांताचा उल्लेख करून सदर कवी साहीत्यात प्रांतवाद आणत आहे हे संकेतस्थळाच्या लक्षात आलेच असेल.
८. भाषा अशुद्ध असून कवीला इंग्रजी साहीत्याचा जराही स्पर्श झालेला नाही, किंबहुना कवी त्या वाटेला गेलेलाच नाही हे जाणवते.
९. शेवटच्या द्विपदीत झाडाचे वाचन काहीच नाही हे मांडूनही कवी झाडाला सामर्थ्यवान कशाच्या जोरावर म्हणत आहे तेच कळत नाही.
१०. नोंद घेण्याजोगा एकही शब्द या कवितेत नसल्याने कवीने जाणूनबुजून ठराविक समिक्षकांची, संस्कृतीरक्षकांची, अभ्यासकाची, उगवत्या सुर्यांची, नवकाव्यकारांची, हटके विचार करणार्‍यांची, मर्यादा मोडणार्‍यांची, पलिकडे पाहणार्‍यांची, रसग्रहण करणार्‍यांची, टाईमपास करायला येणार्‍यांची, वाद घालू पाहणार्‍यांची, काड्या घालणार्‍यांची, तटस्थ राहणार्‍यांची, अनुल्लेख करणार्‍याची, कंपुबाजांची, उदो कारांची,............................ गोची केली आहे. याबद्दल कवीचा जाहीर निषेध !!!

नवकवी - कौतुक शिरोडकर यांच्या संमतीने हा प्रतिसाद पोस्टवण्यात येत आहे.
दिनांक - २०१०२०१०
स्थळ - स्वतःच्या घरात
वेळ - रात्रीची (निद्रानाशाचे दुष्परिणाम)

१. Wink

२. Sad

३. Happy Rofl

४. Blush

५. Uhoh

६. Proud

७. Biggrin

८. Lol

९. Wink

१०. Rofl Rofl Rofl

काय राव माझा पण निद्रानाश केला.... Rofl
किंवा
काय राव माझी पण निद्रानाश केली.... Rofl

वरील दोन वाक्यापैकी जी शुद्ध (पाणी न टाकलेली) असेल ती घ्यावी. Happy

तडका नेहेमीप्रमाणे आवडला...

पण त्याही पेक्षा कौतुकरावांचा अभ्यासयुक्त प्रतिसाद आवडला. विशेषत: ६, ८, १०... मारणार्‍याला पण मार खातो आहे असे वाटायला नको... आवडला.

नवकवि, नवसेलिब्रिटी, नव समीक्षक, नव तंगड्याओढे श्री श्री श्री कौतुकराव शिरोडकरम्हाराज की जय Proud

सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!

मुटेजी,
भरदार आणि डेरदार कविता !
शेतकरी अडाणी, कमी शिकलेला असला म्हणुन काय झालं ? त्याच्याकडे अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्यांचा शहरी लोकांना जीवन जगताना नक्कीच उपयोगी पडतील, अस मला वाटतं !
Happy

सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही .

वाचल्याने माणूस 'शहाणा' होतो!

एकदम आवडली ...आजूबाजूच्या गोष्टीपासून असे खूप काही शिकायला मिळते !!!