स्वच्छंदी

आज त्याची पावले उंबऱ्याला लागली

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 5 August, 2019 - 04:30

आज त्याची पावले उंबऱ्याला लागली

- महेश मोरे (स्वच्छंदी)

आस ज्याची नेमकी जीवनाला लागली
आज त्याची पावले उंबऱ्याला लागली

बाण नव्हता एकही काळजाला लागला
पण शिकाऱ्याची नजर पाखराला लागली

एकदाही भेटली, बोलली नाहीच पण
वाट बघण्याची सवय अंगणाला लागली

पावसाशी काल तर बाप होता भांडला
आज त्याची एक झळ वावराला लागली

'प्रेम'..असताना तसा रोग होता चांगला
त्यात झुरण्याची चटक माणसाला लागली

ती मजेने बोलली, "मी तुझी आहे कुठे ?"
हाय त्याची मग तिच्या काळजाला लागली

शब्दखुणा: 

हातात नाही आजही...........

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 21 July, 2019 - 02:16

हातात नाही आजही...........
- महेश मोरे (स्वच्छंदी)

बघ हात माझा अन् तुझा हातात नाही आजही
मज दु:ख आहे मी तुझ्या नावात नाही आजही

त्या ज्याकुणाबद्दल जगाशी बोलते आहेस तू
ते नाव माझे पण तुझ्या ओठात नाही आजही

स्वप्नातल्या स्वप्नात 'ती' ताटात आली यारहो,
पण भाकरी आली खरी पोटात नाही आजही

घोटामध्ये एकाच जी मज लाविते झिंगायला
ती बाटलीमधली नशा पाण्यात नाही आजही

अख्खी पटावर जिंदगी लावून खेळावे अशी
ती सोंगटी लाखातली डावात नाही आजही

.......... शेवटी

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 19 July, 2019 - 03:07

.......... शेवटी

- स्वच्छंदी

तू मला भेटायला ये...शेवटी

पण खरे सांगायला ये...शेवटी

नाव घेउन कोण मज बिलगायचे ?

तू तरी बिलगायला ये...शेवटी

घाव तू जमतील तितके दे मला

पण जखम बांधायला ये...शेवटी

जिंदगीचा साज सुंदर जाहला

ये प्रिये, उतरायला ये...शेवटी

तो म्हणाला की,"कुणी नाही तुझे."

चल गड्या मोजायला ये...शेवटी

तू

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 14 February, 2019 - 05:57

तू
- महेश मोरे (स्वच्छंदी)

माणसांच्या वेदनेचा आरसा होतास तू
आरसा होवूनसुद्धा वेगळा होतास तू

याचसाठी वाद झाला फक्त त्यांचा अन् तुझा
बोलले नव्हते कुणी ते बोलला होतास तू

फक्त उद्धरण्याकरीता जन्म झालेला तुझा
टाकलेल्या माणसांचा चेहरा होतास तू

पोचला असतास तूही काळजाच्या आत पण
श्वास अंतिम घेतल्यावर पोचला होतास तू

रोज फिरते ही धरा त्या सुर्यबिंबाभोवती
वाटले खोटे जगाला पण खरा होतास तू

लपविले होते उरातच प्रेम पण कळले तुला
फक्त ठोका काळजाचा मोजला होतास तू

शब्दखुणा: 

पुन्हा त्याच गावात आलो

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 27 August, 2018 - 03:15

पुन्हा त्याच गावात आलो
- स्वच्छंदी/महेश मोरे

तुझी भेट घ्याया लिलावात आलो
कळालेच नाही न् प्रेमात आलो

जणू काय जादूच स्वप्नात झाली
दिला हात हाती न् ह्रदयात आलो

जुना फाटका कोपरा पेपराचा
तुला भेटलो चारचौघात आलो

भ्रमंती जगाची जरी खूप केली
फिरूनी पुन्हा त्याच गावात आलो

असा जिंदगीचा लळा लागला की
पुन्हा श्वास घेऊन देहात आलो

शब्दखुणा: 

परवानगी द्या

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 11 August, 2018 - 01:14

परवानगी द्या
- स्वच्छंदी

हात गुंफायची परवानगी द्या
ओठ चुंबायची परवानगी द्या

शोध घेईन मी तिचिया तळाचा
खोल डुंबायची परवानगी द्या

बंद होईल तगमग ह्या जिवाची
राज खोलायची परवानगी द्या

वादळांनो कधीही या, परंतू
रान पेरायची परवानगी द्या

दोष होता कुणाचा सांगतो मी
दोष शोधायची परवानगी द्या

भूक ताटात येताना म्हणाली
कोर मागायची परवानगी द्या

शुभ्र सदऱ्यातही शोभेन मी बस्
झूठ बोलायची परवानगी द्या

गझल...गुलाम शिल्लक आहे

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 6 August, 2018 - 03:15

गझल..............
गुलाम शिल्लक आहे
- स्वच्छंदी / महेश मोरे

तुला जिंदगी करावयाचा सलाम शिल्लक आहे
कधी हारलो नाही ,माझे इनाम शिल्लक आहे

तुझी नि माझी बदामातली पुसून गेली नावे
तरी वाळल्या खोडावरला बदाम शिल्लक आहे

लोकशाहीच हसत बोलली स्वप्नामध्ये मजला
म्हणे माणसामध्ये अजूनी निजाम शिल्लक आहे

दगडापुढती नाही झुकली मान कधीही ज्याची
मला वाटते त्याच्यामधला कलाम शिल्लक आहे

नकोस समजू आयुष्या की डाव संपला माझा
राजा गेला,राणी गेली,गुलाम शिल्लक आहे

विषय: 

Pages

Subscribe to RSS - स्वच्छंदी