तू

Submitted by 'स्वच्छंदी on 14 February, 2019 - 05:57

तू
- महेश मोरे (स्वच्छंदी)

माणसांच्या वेदनेचा आरसा होतास तू
आरसा होवूनसुद्धा वेगळा होतास तू

याचसाठी वाद झाला फक्त त्यांचा अन् तुझा
बोलले नव्हते कुणी ते बोलला होतास तू

फक्त उद्धरण्याकरीता जन्म झालेला तुझा
टाकलेल्या माणसांचा चेहरा होतास तू

पोचला असतास तूही काळजाच्या आत पण
श्वास अंतिम घेतल्यावर पोचला होतास तू

रोज फिरते ही धरा त्या सुर्यबिंबाभोवती
वाटले खोटे जगाला पण खरा होतास तू

लपविले होते उरातच प्रेम पण कळले तुला
फक्त ठोका काळजाचा मोजला होतास तू

पाहिले जेव्हा चितेवर झोपलेले मी तुला
लोक तेव्हा बोलले की चांगला होतास तू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users