इलाज नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
आयुष्याला सलतो आहे..इलाज नाही
विरह तुझा मज डसतो आहे..इलाज नाही
जरी दिली तू टाळी नाही मला एकही
तुझी वाहवा करतो आहे..इलाज नाही
रस्ता बदलुन तू वळणावर वळल्यापासुन
नको तिथे मी वळतो आहे..इलाज नाही
तुला भेटले नाही घरटे हक्काचे अन्
मीही वणवण फिरतो आहे..इलाज नाही
चार विषारी दात काढले तेव्हापासुन
जो-तो येतो, छळतो आहे..इलाज नाही
इतकी वर्षे झाली पहिला गुलाब देउन
हात अता थरथरतो आहे..इलाज नाही
भिजून जावे म्हणतो
©®- महेश मोरे(स्वच्छंदी)
पापणीतल्या थेंबांमध्ये भिजून जावे म्हणतो
मी जाताना तुझी आसवे पुसून जावेे म्हणतो
काठावरती येण्याचीही नको व्हायला इच्छा
प्रेमामध्ये तुझ्या एवढे बुडून जावे म्हणतो
पडदाबिडदा अन् टाळ्यांची वाट कशाला पाहू ?
मी शेवटच्या घंटेआधी निघून जावे म्हणतो
नको एवढ्या निर्दयतेने डाव मोडला माझा
आयुष्या मी तुलाच आता पिसून जावे म्हणतो
उच्चप्रतीचे अत्तर होणे असेल ज्याच्या नशिबी
त्याने पुरत्या आनंदाने सुकून जावे म्हणतो
पण...बोलत नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
माझ्याबद्दल कधी कुणाला सांगत नाही
वळून बघते, हसतेही पण...बोलत नाही
एक चांदणी लुकलुक करते..अन् मावळते
त्याच अदेवर चंद्र रात्रभर झोपत नाही
तिला पाहिजे तसा तसा मी बदलत गेलो
अन् ती म्हणते मनासारखा वाटत नाही
खरे सांगतो..बाई म्हणजे असा डोह की
जन्म संपतो..थांग कुणाला लागत नाही
मी दिसलो की उगाच कुजबुज कुजबुज करते
वेळ बदलते..स्वभाव काही बदलत नाही
जशी यायची.. तशीच येते पाणवठ्यावर
मी ही असतो पाय तिचा पण घसरत नाही
कोठे माझा होतो ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)
तिच्या गुलाबी मिठीत जेव्हा होतो
सांगा ना....मी कोठे माझा होतो ?
तुलना अमुची कशी व्हायची होती
ती मंदिर..... मी पडका वाडा होतो
ती दिसली की बाकी काही नाही
आठवणींनी डोळा ओला होतो
खेळायाचे तर सगळ्यांना असते
वजीर कोणी..कोणी प्यादा होतो
निर्णयांमधे गफलत आधी होते
आयुष्याचा नंतर पचका होतो
आकार तुला कसा द्यायचा होता
मी रबराचा तुटका साचा होतो
देवळातला देव झोपतो तेव्हा
माणसातला माणुस जागा होतो
थांबेल भळभळ कधीतरी
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
8554085101
जखमा जुन्या भरतील अन् थांबेल भळभळ कधीतरी
बस् याचसाठी सोसतो.. संपेल ही कळ कधीतरी
थांबेल श्वासांची तलफ अन् एक वळवळ कधीतरी
त्याच्या जरा आधी गडे! तू ये मला छळ कधीतरी
छातीत खंजिर खोच तू अन् सांग बस् एवढे मला
पाठीवरी उठलेत ते मुजतील का वळ कधीतरी ?
तू दे कळीला जेवढी आहे हवी ती उसंत बस्
उमलेल फुल काट्यात अन् पसरेल दरवळ कधीतरी
नशीब नेत राहिले.........!
- महेश मोरे (स्वच्छंदी)
मला उन्हात ठेवुनी कसे मजेत राहिले
नकोच जायला तिथे नशीब नेत राहिले
खुडून टाकले कुणी, कुणी जखम उरी दिली
उभ्या जगास तेच फुल सुगंध देत राहिले
असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले
जसा गझल लिहायला म्हणून शब्द शोधला
समोर नेमके तिचेच नाव येत राहिले
सुखांस भेटली अधीर वाहवा तुझी-तिची
नि दु:ख मैफलीत फक्त दाद देत राहिले
हुमान..कोडे आहे का ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)
सामान्याला सहजासहजी सुटण्याजोगे आहे का ?
जीवन म्हणजे चकवा, गुंता, हुमान..कोडे आहे का ?
ऐन तिशीतच देह येथला किती लागला वाकाया
जगण्यावर इच्छांचे सांगा इतके ओझे आहे का ?
नजर पेरण्याच्या आधी बस् हवे मला हे बघायला
तिच्या पापण्यांइतके ती'चे मनही ओले आहे का ?
फक्त एकदा फसले होते तिला दिलेल्या शब्दाने
पुन्हापुन्हा हे फसायला मन साधेभोळे आहे का ?
दोन चुंबने दिली मला अन् विचारते की, "भरले का ?"
भरायला सांगा माझे मन म्हणजे पोते आहे का ?
बोलली नाहीस तू............!
- महेश मोरे (स्वच्छंदी)
घालुनी डोळ्यात डोळे अंतरी भिडलीस तू
पण हवे होते मला ते बोलली नाहीस तू
वय गुलाबाचे म्हणू की मी तुझी जादू म्हणू
ऐन चाळीशीतसुद्धा वाटते बावीस तू
मोगऱ्याची वेल जेव्हा लोंबताना पाहतो
पाकळ्यांआडून पडते नेमकी दृष्टीस तू
सर्वकाही द्यायचा देतेस मजला शब्द पण
ऐनवेळेला किती करतेस घासाघीस तू
हक्क नाही एवढाही आज माझ्यावर तुझा
शेर विरहाचा कसा मग लावते छातीस तू
नाव माझे टाळले तेव्हाच कळले हे मला
आजही पाहून मज होतेस कासावीस तू
चार जखमा काळजावर गोंदल्या
- महेश मोरे (स्वच्छंदी)
चार......ओठांवर खुबीने पेरल्या
चार जखमा काळजावर गोंदल्या
बोलले नाही कुणी दोघांतले
पापण्या.. पण आसवांनी बोलल्या
वेळ आली एवढी काट्यावरी
पाकळ्यासुद्धा छळाया लागल्या
मी तुझ्या चौकात जेव्हा थांबलो
चालणाऱ्या चार वाटा थांबल्या
वादळाला त्रास होतो ना ? म्हणुन
मीच उघड्या दोन खिडक्या ठेवल्या
बाप लेकींना जसा सांभाळतो
मी तशा सल-वेदना सांभाळल्या
शेवटी आला तुझा आवाज अन्
मिट्ट काळोखात पणत्या पेटल्या
आहे तो माझा नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
घुटमळतो देहामध्ये तो श्वास स्वत:चा नाही
होता तो माझा नव्हता, आहे तो माझा नाही
पडद्यावर दिसते आहे ती खरी जिंदगी नाही
जो समोर दिसतो आहे तो खरा चेहरा नाही
तू विचार करायचा ना मज चुंबायाच्या आधी
सोडेन हातची संधी इतका मी साधा नाही
तू टप्प्यामध्ये माझ्या आल्यावर मरणारच ना ?
मी वजीर होतो वेड्या कुठलासा प्यादा नाही
शब्दांनी देऊ शकतो मी मनासारखे उत्तर
पण प्रश्न तिच्या मौनाचा तितकासा सोपा नाही