महात्म्याच्या कविता

~ गांधी नंतर ~

Submitted by Ramesh Thombre on 27 May, 2012 - 02:44

या देशाने काय पाळले गांधी नंतर ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.

विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर

देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर

शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर

गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर

देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो,
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?

नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - महात्म्याच्या कविता