बाधला त्या पावसाला पावसाळा आपला

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2012 - 08:21

काय तो सोसेल आताचा उन्हाळा आपला
बाधला त्या पावसाला पावसाळा आपला

त्याच त्या लोकांमधे हा खेळसुद्धा तोच तो
आपला झाला निराळा की निराळा आपला

सारखे वेधून घेती लक्ष त्या रस्त्याकडे
दोष झाका चाहुलींचा अन उगाळा आपला

तू नव्या कोर्‍या घरी आषाढ बरसवलास ना
हे इथे आभाळ आले की उमाळा आपला

टाकले जे नांव त्याला रोज नांवे ठेवणे
गाजतो आहे जगामध्ये जिव्हाळा आपला

आगप्रतिबंधक हवे ना यातले काहीतरी
मन जळाले पूर्ण की मग देह जाळा आपला

हे नको बाबा मला मन... वेगळे मन दे मला
जो न आहे आपला त्याचाच चाळा आपला

आजसुद्धा सूर्य गेला पश्चिमेला नेमका
मांडला मी एक साधा ठोकताळा आपला

चालते कोठे तसेही फार बहुसंख्यांपुढे
पांढरा होईल हाही केस काळा आपला

'बेफिकिर' असल्याप्रमाणे धावणे मृत्यूकडे
याहुनी काहीच नाही अर्थ बाळा आपला

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

काय तो सोसेल आताचा उन्हाळा आपला
बाधला त्या पावसाला पावसाळा आपला...व्वा अर्थगर्भ मतला

त्याच त्या लोकांमधे हा खेळसुद्धा तोच तो
आपला झाला निराळा की निराळा आपला....ह्म्न!

आगप्रतिबंधक हवे ना यातले काहीतरी

मन जळाले पूर्ण की मग देह जाळा आपला

मन जळाले पूर्ण की मग देह जाळा आपला....खल्लास मिसरा

हे नको बाबा मला मन... वेगळे मन दे मला
जो न आहे आपला त्याचाच चाळा आपला.........सलाम या शेराला...

पावसाळ्याची सुरवात झाली म्हणायची तर! :--)

सुप्रिया.

तू नव्या कोर्‍या घरी आषाढ बरसवलास ना
हे इथे आभाळ आले की उमाळा आपला

अह्हाहा.... फार आवडला हा शेर. Happy

<<<<<<चालते कोठे तसेही फार बहुसंख्यांपुढे
पांढरा होईल हाही केस काळा आपला>>>>>>

आणखी एक शेर अ‍ॅड केला ( Proud )

चालते कोठे तसेही फार बहुसंख्यांपुढे
पांढरा होईल हाही केस काळा आपला...क्या बात!!!!

केस काळा आपला...क्या बात है बेफीजी हझलेचा मूड दिसतोय .............

माझंही काँट्रीब्युशन देवून ठेवतो .......................

ही गगनचुंबी इमारत लिफ्टही नाहिय इथे
चढ जिना संपेलतोवर तोच माळा आपला

समजली माझी मला किंमत अताशा नेमकी
का उगी दुसर्‍याकुणावर जीव भाळा आपला

बेफिकीरजी,
तुमची प्रत्येक गझल खूप काही सांगून जाते!
"आगप्रतिबंधक हवे ना यातले काहीतरी
मन जळाले पूर्ण की मग देह जाळा आपला "
हा एकदम भारी शेर आहे.

संपूर्ण गझल आवडली. व्वा व्वा!

मतला आणि ठोकताळा ह्या शेरांतली गंमत फार आवडली.

बेफिकीरजी! तुमची ही गझल भन्नाटच आहे! मतला तर लाजवाब आहे!
फक्त काही शेरात दोन मिस-यांतली एजजीवता जरा फिकी वाटली.
“आपला” हा रदीफ, आपला आवडता दिसतोय. मला तो चालवायला अवजड वाटतो. असो.

तुमच्या या पूर्ण गझलेवर मी माझी काही मते नम्रपणे नमूद करू इच्छितो..........

शेर नंबर १: मतला
इथे उला मिसरा प्रश्नार्थी आहे, ज्यात “काय तो सोसेल” असे म्हटले आहे. तो म्हणजे कोण? तर, तो म्हणजे पावसाळा! हे सानी मिसरा वाचायला लागल्यावर उदाहरणार्थ “बाधला त्या पावसाला” असे म्हटल्यावर चटकन लक्षात येत नाही. पूर्ण सानी मिसरा वाचल्यावरच ट्यूब पेटते.

पण उला व सानी मिस-यांत अजून एकजीवपणा आणायचा असेल तर, उला मिसरा विधानात्मक करायला हवा व “सोसेल” ऎवजी “झेपला” असे करायला लागेल. म्हणजे उला मिस-यात “झेपला” व सानी मिस-यात “बाधला” असे आले की, तो म्हणजे पावसाळा हे सानी मिस-याच्या सुरवातीलाच discloseहोते व दोन मिस-यातला एकजीवपणा पक्का होतो. म्हणून मतला मी असा वाचला........

“झेपला होता जरी त्याला उन्हाळा आपला;
बाधला त्या पावसाला पावसाळा आपला!”

टीप: इथे, आपला पावसाळा, आपला उन्हाळा, आपला उन्हाळा पावसाला झेपणे व आपला पावसाळा पावसाला बाधणे ही प्रतिके अतिशय सुंदर व व्यमिश्र (complex) आहेत. या मतल्याच्या अर्थांचे पदर उलगडायचे म्हटले तर, पानेच्या पाने खरडावी लागतील. यातच या मतल्याचे कामयाबपण स्पष्ट दिसते आहे. कृपया आपण व इतरांनी देखिल या मतल्याचे त्यांना उमगणारे गद्य अर्थ जर प्रकट केलेत तर फार बहार येईल!
.....................................................................................................
शेर नंबर २:
इथे दुसरी ओळ अत्यंत ताकदवान आहे, जिच्यात एक सामाजिक सूक्ष्म सत्य सांगितले आहे, जे सर्वांना नेहमी प्रचीत होते.
पण उला मिसरा मला तितका तोलामोलाचा वाटला नाही. शिवाय उला
मिस-यात सानी मिस-या बद्दल कुठलीच पुरेशी हिंट मिळत नाही. त्यामुळे दोन्ही मिस-यांचा एकजीवपणा कमी झाल्यासारखा वाटतो.
म्हणून आम्ही हा शेर असा वाचला...........

“आपले परके कशाचे? काळ खेळे खेळ हा.......
आपला झाला निराळा! की, निराळा आपला!”

.................................................................................................

शेर नंबर ३:
या शेरातील दोन ओळींतील नाते खूपच धूसर आहे. शिवाय सानी मिस-यातील शेवटच्या भागात “उगाळा आपला” इथे आपला दोष उगाळा असे गृहीत धरावे लागते.
“चाहुलींचा” शब्दाऎवजी “चाहुल्यांचा” असे हवे. कारण चाहुल किंवा चाहुली असा एकवचनी शब्द आहे. त्याचे अनेकवचन होते “चाहुल्या”. म्हणून “चाहुल्यांचा” असा शब्दप्रयोग हवा.
आपल्या या शेराचा अर्थ थोडा अस्पष्ट वाटतो. असा अर्थ आहे का?..............
त्या रस्त्यावर सारखी कुणाची तरी चाहुल येत आहे, जी चुकीच्या गोष्टींची चाहुल आहे, जिच्यामुळे त्या रस्त्याकडे सारखे लक्ष वेधून घेतले जात आहे. म्हणून सानी मिसरा म्हणतो की, त्या चाहुल्यांचा दोष झाका व आपल्यातलाच दोष उगाळा. मला वाटते, आपण हे उपहासाने म्हणत असावेत.

आता कोण सारखे लक्ष त्या रस्त्याकडे वेधून घेते? असा प्रश्न उला मिसरा उच्चारल्यावर निर्माण होतो, ज्याचे स्पष्ट उत्तर सानी मिस-यात अपेक्षीत आहे.
तर आपली दुसरी ओळ म्हणते की, चाहुल्यांचा दोष झाका व आपल्यातला दोष उगाळा.

इथे कुणाच्या तरी चाहुल्या रस्त्याकडे सारखे लक्ष वेधत आहेत, असा अर्थ स्पष्टपणे व्यक्त होत नाही. शिवाय आपण म्हणता, त्या चाहुल्यांचे दोष झाका. का बरे? असा प्रश्न पडतो. म्हणजे नको त्या माणसांच्या येण्याच्या त्या चाहुल्या आहेत काय? त्यांच्यात काही दोष आहेत काय? कुठल्या प्रकारे ती माणसे दोषी असावीत? अन् मग त्या चाहुल्यांचा दोष का बरे झाकावा? पुढे जावून, आपल्यातला दोष का उगाळावा? असे सर्वच प्रश्न अनुत्तरीत राहतात.

म्हणून आम्ही तिसरा शेर असा वाचला................
(इथे आपल्या मनातलाच तंतोतंत अर्थ नाही. पण, मानवी प्रवृत्तीचे एक सत्य निरीक्षण सरळ सरळ मांडले आहे.
शेर असा आहे....................

“हीच प्रवृत्ती दिसे चोहीकडे आता मला;
दोष दुस-यांचा उगाळा, गुण उगाळा आपला!”
.....................................................................................................
शेर नंबर ४:
हा शेर चांगला वाटला. फक्त सानी मिस-यात अजून सफाई व स्पष्टता आणण्यासाठी थोडी शब्दयोजना बदलावाशी वाटते.
हा शेर आम्ही असा वाचला.....................

“तू नव्या को-या घरी आषाढ बरसावलास ना?
दाटले आभाळ की, दाटे उमाळा आपला?”
.................................................................................

शेर नंबर ५)
इथे, मला सानी मिसरा सुंदर वाटला. उला मिसारा अजून स्पष्ट व त्या तोलामोमलाचा हवा. म्हणून आम्ही हा शेर असा वाचला......................
इथे जगा ऎवजी गाव हे प्रतिक आम्ही घेतले. आपला अर्थ इथेही प्रकट होतो.
शेर असा आहे..............

“आपले तंटेबखडे.......गावचर्चेचा विषय!
गाजतो गावात आताशा जिव्हाळा आपला!!”
.................................................................................
.................................................................................................
शेर नंबर ६:
या शेरातील अर्थ नीट व स्पष्ट व्यक्त होत नाही.
मन व देह यांच्यातील एक तरी गोष्ट आगप्रतिबंधक असायला हवी होती असे बहुधा आपणास म्हणायचे आहे. म्हणजे दोहोतील एक पेटले तरी, दुसरे शाबूत राहील. पण तसे नसल्याने आधी मन पूर्ण जळते व मग देह जळतो.
पण इथे सानी मिस-यातल्या शेवटच्या भागात आपण म्हणता देह जाळा आपला. हे जरा विचित्र वाटते!

वास्तविक आपणास म्हणायचे असावे की, मन पूर्ण जळाले की, देहही पूर्णपणे जळण्याची पाळी येते. पण असा अर्थ सानी मिस-यात व्यक्त होत नाही.
म्हणून थोडा बहुत तसाच अर्थ ठेवून (तोच नव्हे), आम्ही हा शेर असा वाचतो...............
इथे सामान्य माणसाच्या जीवनातील व्यथा आम्ही मांडतो, जो आजन्म जळतोच व शेवटी त्याला देहही जाळण्याची पाळी येते!
म्हणून मी हा शेर असा वाचला...............

“काय सांगावी व्यथा सामान्य जनतेची तुला?
जन्म जळला पूर्ण, आता देह जाळा आपला!”
..................................................................................

शेर नंबर ७:
हा तुमचा शेर ठीक आहे. पण सानी मिस-यात त्याचाच चाळा आपला यातील अर्थ पूर्णत: स्पष्ट होत नाही.
म्हणून आपण वापरलेला चाळा आपला हे शब्दप्रयोग चालवायला व मानवी जीवनातील एक सत्य सांगायला आम्ही असा शेर लिहिला.....................

“एकही माणूस नाही, जो न दु:खी जाहला;
दु:ख मी घोटीत बसलो, तोच चाळा आपला!”

इथे चाळा म्हणजे वेड, खूळ लागणे. दु:ख घोटीत बसणे म्हणजे दु:खाचा नको तेवढा शोक करणे.
..............................................................................................

शेर नंबर ८:
या शेरातला उला मिसरा फारच साधा वाटला. आज सुद्धा सूर्य पश्चिमेला गेला, या निरीक्षणात कुठलीही असामान्यता दिसत नाही. त्यामुळे असे विधान करायला, ठोकताळा वा अंदाज वगैरे लागत नाही.

म्हणून हा शेर पूर्ण बदलून अजून एक सामान्य माणसाच्या जीवनातले निरिक्षण आम्ही मांडले आहे, जिथे उला मिसर-यातले निरिक्षण मांडायला खरोखरीच ठोकताळा किंवा अंदाज आवश्यक वाटतो. असो.
तो शेर असा आहे.............

“ठेवली हातावरी त्या भाकरीनेही तुरी.....
मांडला मी एक साधा ठोकताळा आपला!”
टीप: ठोकताळा हा कफिया काबिलेतारीफ आहे!
..........................................................................................................
शेर नंबर ९:
या शेराचा स्पष्ट अर्थ प्रकट होत नाही.
आपल्या मनात असा अर्थ आहे का?.............

नाही तरी बहुसंख्य लोकांपुढे कुणाचेही (म्हणजे कितीही माणूस बुजुर्ग असला तरी) काही तसे फार कुठे चालते? म्हणजे बहुसंख्य लोक द्न्यानी, वयोवृद्ध व अनुभवी लोकांचे तरी कुठे काही फारसे ऎकतात?
सानी मिस-याप्रमाणे आपल्याला असे म्हणायचे आहे का?........
की, माझे केस आता काळे आहेत. वय व पोच दोन्ही वाढल्यानंतर तेही पांढरे होतील. पण त्याचा काय उपयोग? कोण ऎकणार आहे तेव्हा सुद्धा माझे?

असा शेराचा अर्थ असेल तर, तो सानी मिस-यात व्यक्त होत नाही. म्हणून तुमच्याच मनातल्या अर्थाच्या जवळ जाणारा, पण स्पष्टवक्ता शेर आम्ही असा लिहिला...............

“कोण देतो आज आदर पांढ-या केसांसही?
प्रश्न नाही..........पांढरा की, केस काळा आपला!”
...................................................................................

शेर नंबर १०:
आपल्या नावाचा सार्थ वापर आपण या शेरात केलात.
पण आम्ही अजून एक सामान्य माणसाच्या आयुष्यातले सूक्ष्म सत्य असे मांडतो........

“येत नाही मरण म्हणुनी फक्त जगतो रोज मी;
याहुनी काहीच नाही अर्थ बाळा आपला!”
...............................................................................

आपली ही गझल मी अशी वाचली................

झेपला होता जरी त्याला उन्हाळा आपला;
बाधला त्या पावसाला पावसाळा आपला!

आपले परके कशाचे? काळ खेळे खेळ हा.......
आपला झाला निराळा! की, निराळा आपला!

हीच प्रवृत्ती दिसे चोहीकडे आता मला;
दोष दुस-यांचा उगाळा, गुण उगाळा आपला!

तू नव्या को-या घरी आषाढ बरसावलास ना?
दाटले आभाळ की, दाटे उमाळा आपला?

आपले तंटेबखडे.......गावचर्चेचा विषय!
गाजतो गावात आताशा जिव्हाळा आपला!!

काय सांगावी व्यथा सामान्य जनतेची तुला?
जन्म जळला पूर्ण, आता देह जाळा आपला!

एकही माणूस नाही, जो न दु:खी जाहला;
दु:ख मी घोटीत बसलो, तोच चाळा आपला!

ठेवली हातावरी त्या भाकरीनेही तुरी.....
मांडला मी एक साधा ठोकताळा आपला!

कोण देतो आज आदर पांढ-या केसांसही?
प्रश्न नाही..........पांढरा की, केस काळा आपला!

येत नाही मरण म्हणुनी फक्त जगतो रोज मी;
याहुनी काहीच नाही अर्थ बाळा आपला!

...............प्रा.सतीश देवपूरकर

टीप: माझी मते पसंत पडली नाहीत तरी आपली प्रांजळ मते जरूर कळवावीत.
वाचायला आवडतील!

आपल्या गझलांचा चाहता.........
..........प्रा.सतीश देवपूरकर
..........................................................................................................

देव सर आपण धन्य आहात

_/\_ ;..................... प्रणाम स्वीकारावा

मी आज एक गोष्ट आपणास सांगू इच्छितो ;

मी गझल करायला सुरुवात केल्यापासून आजपावेतो मी दुर्दैवी ठरलो ; तो असा की खूप शोध घेऊनही मला व माझ्या गझलेला त्रिभुवनात एकही गुरु मिळालाच नाही
पण मी आपल्याला पर्यायी गझलेत माझा गुरू करून घेतले आहे एकलव्यासारखे ...........आणि गझल सोडून पर्यायीगझल-साधना करतो आहे...............

फक्त एक विनंती
द्रोणाचार्यासारखी माझ्याकडून काहीच्याकाही गुरुदक्षिणेची मागणी करू नये मी देणार नाही ........

तरी आशिर्वाद असू द्यात .............

आपण माझेच काय सार्‍या 'माबो'चे.............. सार्‍या मराठी गझल्कारान्चे(_ पर्यायी_) गुरू होवू शकता............मी सुरुवात केली आहे बाकीजणही मागोमाग येतीलच अशी अपेक्षा

(पर्यायी हा शब्द "गझलकारान्चे" च्या आधी वापरू की "गुरू" च्या हे समजले नसल्याने कंसात वापरत आहे )

आपला पर्यायी एकलव्य

वै. व. कु.

चालते कोठे तसेही फार बहुसंख्यांपुढे
पांढरा होईल हाही केस काळा आपला

---- हा आणि आगप्रतिबंधक आवडला.

जयन्ता५२

मस्त !

प्रोफेसर साहेब,

पहिल्या, दुसर्‍या व सूर्याच्या शेरातील पर्याय छान आहेत. चर्चाही चांगली:-) लोभ असू द्यावात

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार

धन्यवाद फिकीरजी, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल!
आपला मतला खरोखरीच divine व बहुअर्थी आहे. म्हणून मतल्याचा खुद्द आपल्या मनातील गद्य अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता आहे. इतर शायरांना अशी विनंती करण्याची काही सोय नाही. कमयाब शेराची फोड करणे किती अवघड असते, व अर्थांचे किती पदर वा तरंग उठू शकतात, ही बाब स्पष्ट करण्यास तुमचा हा मतला मला आदर्श वाटला. माझाच शेर जर मी चर्चेस घेतला असता तर लोकांनी त्यातून नाही नाही ते अर्थ काढले असते व मूळ उद्देश बाजूलाच राहिला असता. म्हणून हा विनंतीचा प्रपंच!
.............प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................................

इतर शायरांना अशी विनंती करण्याची काही सोय नाही.>>>>>>>>>>>>>>>>

आदरणीय देवसर .....................
बेफीजीच तवढे आपणास आपल्या सोयीनुसार वागवतात असे का म्हणायचे आहे आपणास
की इतरांपुढे (उदा. आम्ही )तुमची नेहमीच गैरसोय होते असे म्हणायचे आहे
नेमके काय ते स्पष्ट होत नाही आहे
कृपया खुलासा करा

बाधला त्या पावसाला पावसाळा आपला

असेल असेल नक्कीच ! कोसळतोय धो धो आठवडाभरापासून ....

हे नको बाबा मला मन... वेगळे मन दे मला
जो न आहे आपला त्याचाच चाळा आपला

खल्लास !

पुनशः धन्यवाद !

मस्त गझल, आजच वाचली.
>>हे नको बाबा मला मन.. वेगळे मन दे मला .. >>काय मागणं आहे ! अगदी अल्टिमेट .

अवांतर- 'बाबा'च्या या गोड वापरामुळे आजच फेबुवर वाचलेल्या (क्रांतीने शेअर केलेल्या ) नजीर अकबराबादींच्या या ओळी आठवल्या, इथे द्याव्याशा वाटल्या..

हैं आशिक़ और माशूक जहाँ वां शाह बज़ीरी है बाबा ।
नै रोना है नै धोना है नै दर्द असीरी है बाबा ।।
दिन-रात बहारें चुहलें हैं और इश्क़ सग़ीरी है बाबा ।
जो आशिक़ हैं सो जानें हैं यह भेड फ़क़ीरी है बाबा ।।
हर आन हँसी, हर आन ख़ुशी हर वक़्त अमीरी है बाबा ।
जब आशिक़ मस्त फ़क़ीर हुए फिर क्या दिलगीरी है बाबा ।।१।।