वास्तवाला स्विकारु जसेच्या-तसे !

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 July, 2012 - 13:41

शब्द नव्हतेच कळले तसे फारसे...
'प्राण झोपेत गेले' म्हणे कायसे !

प्रेम होते जिवापाड माझे-तुझे...
हातच्या कंकणाला नको आरसे !

साथ सच्ची दिली आसवांनी अशी ...
सौख्य-दु:खातले मित्र पक्के जसे !

काहिली जीवनाची शमावी कशी...
विरह आणी ॠतू हे झळांचे असे !

त्राण नाही नवे स्वप्न गुंफायचे...
वास्तवाला स्विकारु जसेच्या-तसे !

राजरस्त्यावरी चालणे हे बरे...
वाट पडताळण्याची नको साहसे !

-सुप्रिया.

गुलमोहर: 

त्राण नाही नवे स्वप्न गुंफायचे...
वास्तवाला स्विकारु जसेच्या-तसे !

सुरेख.
वाट पडताळण्याची नको साहसे ! हा मिसराही उत्तम. ('पडताळणे' चा अर्थ 'व्हेरिफाय करणे' च्या जवळपास जातो असे मला वाटते. इथे 'आजमावणे' असा अर्थ मी घेतला.)

काहिली जीवनाची शमावी कशी...
विरह आणी ॠतू हे झळांचे असे !

त्राण नाही नवे स्वप्न गुंफायचे...
वास्तवाला स्विकारु जसेच्या-तसे ! ... सुरेख Happy

'प्राण झोपेत गेले' म्हणे कायसे !>>>मी निशब्द झालोय हे वाचून !!:(

गझल खूप आतून आली आहे या वेळी असे जाणवले

खूप छान आहे ही गझल सुप्रियाताई
धन्यवाद !!