लाट मी झेपावणारी, तू समुद्राचा किनारा!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 July, 2012 - 09:33

गझल
लाट मी झेपावणारी, तू समुद्राचा किनारा!
तू मला फेटाळ, पण दे पळभरासाठी निवारा!!

सोडली मी नाव माझी मध्यभागी सागराच्या;
काळजी घेण्यास माझी धावुनी येईल वारा!

ठेवुनी साक्षीस ज्याला घेतल्या प्रेमात शपथा;
आज माझ्या सोबतीला तोच आहे एक तारा!

आज माझे नाव येता, रंगते लोकांत चर्चा
मी बुडालो त्या क्षणी केला न कोणीही पुकारा!

एकटा दिसलो तरीही एकटा असतो कुठे मी?
भोवती माझ्या स्मृतींचा नेहमी असतो पसारा!

जाउनी हृदयास भिडते थेट हृदयातील गाणे;
का उगा फुलवू असा गीतात शब्दांचा पिसारा!

मी कधी येवू? कसा भेटू तुला?.... तेही कळेना;
भोवती तुझिया फुलांचा सारखा असतो पहारा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

ठेवुनी साक्षीस ज्याला घेतल्या प्रेमात शपथा;
आज माझ्या सोबतीला तोच आहे एक तारा!

एकटा दिसलो तरीही एकटा असतो कुठे मी?
भोवती माझ्या स्मृतींचा नेहमी असतो पसारा!

मी कधी येवू? कसा भेटू तुला?.... तेही कळेना;
भोवती तुझिया फुलांचा सारखा असतो पहारा!... व्वा... छानच!

मस्त, छानच..... Happy

लाट मी झेपावणारी, तू समुद्राचा किनारा!
तू मला फेटाळ, पण दे पळभरासाठी निवारा!!

सुरुवातच जबरी........ Happy