भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 July, 2012 - 07:40

गझल
भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!
मी कशाचे स्वप्न पाहू? सर्व काही भास आहे!!

एक नुसता चेहरा पण रंग पालटतो किती तो;
बिंब हृदयाचे म्हणू? की, फक्त तो आभास आहे!

केवढ्या घाईत माझी प्रेतयात्रा ही निघाली;
पाहिले नाही कुणी छातीत माझ्या श्वास आहे!

तूच चित्ती! तूच ओठी! माझिया स्वप्नातही तू!
तू अहोरात्री जिवाला लागलेला ध्यास आहे!!

कोंडवाड्यासारखी झाली स्थिती माझ्या उराची;
आजही वक्षात माझ्या कोंडलेला श्वास आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!
मी कशाचे स्वप्न पाहू? सर्व काही भास आहे!! ..... अफलतून Happy

गझल अतिशय आवडली सर.

प्रा. साहेब मी याच जमीनीवर गझल करण्याचा प्रयत्न करत होतो
कसाबसा एक शेर सुचलाय....... तो आपणास कसा वाटतो जरूर कळवणे

छे! सुखाची झोप नाही.. कोण कच्कन् चावला तो
वाटला ढेकूण होता........... रक्तशोषी डास आहे

....प्रतीक्षेत
आपला नम्र
क्ष.य.ज्ञ.