छपरावर उष्मा थयथय नाचत होता

Submitted by pradyumnasantu on 4 June, 2012 - 22:15

छपरावर उष्मा थयथय नाचत होता

ढग एक तरंगत आकाशी वांझोटा

मातीत बियांच्या शेकोट्या झालेल्या

कुत्र्याच्या छातीत फुलला होता भाता

*

पोत्यात तळाशी तांदूळ होते थोडे

पण भात रांधण्या पाणी? झिजले जोडे

एक घोट जळाचा मिळेल का हो सांगा

पुसताच सर्वजण फिरवित त्यांची तोंडे

*

ऐकले अचानक शब्द सुखद सोनेरी

"पर्जन्य करितसे वसुंधरेला ओली"

ते ऐकुन जिव्हा चाटत तिकडे गेलो

तो ती तर होती कविता कुणी केलेली

*

भरलेले तेथे कवि संमेलन जंगी

पावसाविषयीच्या कविता अनेक रंगी

कोरडा एकटा होतो मी पाषाण

दाखवीत होतो भिजल्यागत वरपांगी

**

गुलमोहर: 

अच्छाssछा !!

इथे बा सी मर्ढेकर स्टाईल आजमवलीत हो़य

गुड कीप इट अप प्रद्युम्न जी