तू देशील का रे दोन मणी ते मजला

Submitted by pradyumnasantu on 4 June, 2012 - 22:02

रे नकोत मजला हिरे आणखी मोती
सोन्याची देखिल नच मजला खिजगणती
मी मणी घेऊनी जाईन फिरण्या पृथ्वी
गरीबीचा कंठी हार माझिया सजला
तू देशील का रे दोन मणी ते मजला
......
ही बालकवींची अवनी मी भटकीन
अन श्रावणातल्या सरी पिेऊन टाकीन
घेईन शोषुनी चंद्राची शीतलता
नयनांचे शर मी नभामधे घुसवीन
आनंदे गाइन सौंदर्याच्या गजला
तू देशील का रे दोन मणी ते मजला
......
या अमूल्य् ऐशा कोंदणातले मणी
करतिल मला ते कायमसाठी ऋणी
भगवंता पुरवी एक हट्ट हा माझा
तुज पाहू शकावे अशी आस मन्मनी
त्या मण्यांविना बघ प्रकाश माझा विझला
तू देशिल का रे दोन मणी ते मजला

गुलमोहर: 

प्रद्युम्नजी वाह

हळूहळू आपल्या कवितेत गझलियत येवू लागली आहे (म्हणजे गझल वाटावी अशी कविता असे म्हणायचे आहे मला)

मला हे फार आवड्ले...........अभिनन्दन

आता आपल्या गझला येवू द्यात ( गझल करण्यपूर्वी थोडा गृहपाठ आवश्यक आहे तो अजून केला नसेल तर करायला सुरवात नक्कीच करावीत ही विनंती )

पु ले शु

ग(गझल) ले शु !!!

आवडली !