माझी आजी पाच पाच बर्नरची चूल फक्त दगड आणि मातीचा वापर करून करायची. खेड्यात चुली शेणाने सारवतात. तिला आजूबाजूला चूल बनवायला बोलवायचे. त्या चुलीला धुराडे पण असायचे. लहान असताना कुणाकडे जाताना मला घेऊन जायची तेव्हां चूल बघताना बघत बसायचो. त्यामुळे ही आवड निर्माण झाली.
चूल
चूल म्हणल्यावर कुणीही सांगेल की तीन दगडं किंवा दोन-दोन-दोन अशा सहा वीटा लावून चूल मांडतात. पण ही ढोबळ माहिती झाली.
मुळात चूल आणि चुला असे दोन प्रकार.
जेवणावळीना किंवा मोठ्या प्रमाणात जेव्हा जेवण तयार करतात तेव्हा स्वयंपाकी मांडतात तो तात्पुरता दगड किंवा वीटांनी बनवलेला तो चुला.
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.