चूल

Submitted by मंगलाताई on 10 April, 2023 - 04:50

चूल
चुलीवरची भाकरी चुलीवरचे मटण असे खूप ऐकतो . अशा जाहिराती असलेल्या पाट्यांनी हॉटेल सजवून टाकलेली आहे आणि लोक चुलीवरच्या पदार्थांची चव घेण्यासाठी जाऊन तेथे जेवण करतात . चुलीवरच्या भाकरींची , चुलीवरच्या स्वयंपाकाची वेगळीच चव आहे , अशी एक सर्वसामान्य मान्यता आहे . महाराष्ट्रात चुलीवरच्या जेवणाला पसंती देतात . अनेक पारंपरिक पदार्थ चुलीवर केल्या जातात आणि काही पदार्थ तर चुलीवरच केल्या जातात . चुलीचे महत्त्व या काळातही विशेष असे आहे .
चीन आणि फ्रान्स या देशात चार लाख 80 हजार वर्षांपूर्वी माणसे चुली वापरत असत असा निर्विवाद पुरावा आहे (संदर्भ - कहानी मानव प्राण्याची , लेखक नंदा खरे )
प्राचीन काळात माणसांना आगीने भाजलेले अन्न चवीने सुधारते आणि चावायला सोपे जाते हे सुचले . चाकाचा शोध लागल्यावर , स्व संरक्षणासाठी शस्त्रे तयार झाल्यावर , सर्व क्षेत्रात बरीच प्रगती झाल्यावर फक्त स्वयंपाकापुरती आगीचा उपयोग होऊ लागला यावेळी चूल निर्माण झाली असावी . स्वयंपाकापुरती निर्माण झाल्यामुळे तिला स्थैर्य आले तिची एक विशिष्ट जागा झाली आणि ह्या जागेवर विविध प्रकारच्या चुलींचा जन्म झाला .
गावातील स्वयंपाकघरात असलेल्या भिंतीला धरून चुली घातलेल्या असतात . भिंत आणि चूल यामधे ओट्यासारखी जी जागा असते तिला भानशी म्हणतात . भानशीवर तवा , गोवऱ्या, सरपण इत्यादी ठेवण्यात येते . भानशीच्या मागे असलेल्या भिंतीत एक कोनाडा असतो त्या कोंनाड्यात आगपेटी, दिवा हे ठेवलेले असते . समोरून यू आकाराची चूल असते ही पूर्ण मातीची असते . बहुतेक घरात दिसणाऱ्या चुली या सडीचूल किंवा उल्हाचूल अशाच असतात .सडीचूल म्हणजे एकटी चूल आणि उल्हाचूल म्हणजे मुख्य चुलीतून दुसरीकडे जाणारा विस्तव वळवून त्याचा वापर करणे . काही घरात उल्हा चुली तीन पण असतात . म्हणजे एक मुख्य चूल आणि दोन उल्हे . म्हणजे एका वेळी मुख्य चुलीवर अन्न शिजत असताना दोन्ही उल्ह्यावर
सुद्धा अन्न शिजू शकते . चूल ही साधारणपणे मातीनेच बांधलेली असते . चिकन माती, शेण, रेती याचे मिश्रण एकत्र करून चूल बांधली जाते . हल्ली सिमेंटच्या चुली पण घालतात . लोखंडी पत्र्याच्या , सिमेंट शिटच्या चुली पण असतात . गावात माती सहज मिळते , बायांना चूली घालता येतात त्यामुळे मातीच्या चूलींचे प्रचलन अधिक आहे . कोकणात लाल ( जांभा ) दगड मिळतो तो ठिसूळ असल्यामुळे त्याला लिंपून चूली तयार करतात . काही गावात विट भट्टी असलेल्या गावात विटांचा वापर करून चूली लिंपतात .
भांडी ठेवण्यासाठी उल्ह्यावर आणि चुलीवर तीन उंचवटे असतात. त्यांना टोंगसे म्हणतात . खेड्यातील बाया जेव्हा चूल घालतात तेव्हा आपल्या घरातला तवा , लहानमोठी भांडी त्या उल्ह्यावर आणि चुलीवर बसवून अंदाज घेतात आणि हे उंचवटे निर्माण करतात . लहान आणि मोठी भांडी यांचा अंदाज घेऊन चुलीचा आकार ठरवण्यात येतो. गावात चुली घालण्यात निष्णात असणारी एखादी बाई घरोघरी चुली घालून देण्याचे काम करत असते . तसे गावात सगळ्याच गृहिणींना चुली घालता येतात चुली घालणे ही एक कला आहे . चूल घातल्यानंतर ओटा तयार झाल्यानंतर चुलीला शेणाच्या सारवणाने लिंपून काढणे आणि तडा जाऊ न देता तयार करणे हे महत्त्वाचे असते . एकदा चूल तयार झाली आणि तिच्या वर दोन-चार स्वयंपाक झाले कि ती रमते . अशा चुलीला मग रोज सकाळी सारवण करावं लागतं कधी कधी ते सारवण मातीचं असतं , खडीच असतं , शेणाचं असतं कधी चुन्याचं पण असतं .गृहिणी सर्वात आधी चुलीला नमस्कार करून झाडलोट करून चूल सारवते आणि मग तिच्या दिवसाची सुरुवात होते .चुलीत जाळायचे सरपण चुली शेजारी आणून ठेवते सरपण तपासून ते घरात आणते. ओल्या काड्या वाळवायला घालाव्या लागतात , सुकलेल्या काड्या बाहेर अंगणातच बारीक करण्यात येतात आणि मोठ्या काड्या घरात चुलीजवळ आणून ठेवतात . ज्या भागात तूर पिकते त्या भागात तुराट्याच्या काड्यांनी चूल पेटवण्यात येते. तुराट्याच्या मुठभर काड्या घ्यायच्या त्या पायावर मोडायच्या आणि बारीक करून चुलीत जाळ तयार करायच्या . ज्या भागात जे पीक होत असेल त्या पिकाचा उरलेला भाग हा सरपण म्हणून वापरण्यात येतो .
धांडे ( ज्वारीचे ताट , तुराट्या ( तुरीच्या वाळलेल्या काड्या ) , पर्हाट्या ( कापसाच्या वाळलेल्या काड्या ) ,सनकाड्या (धांड्यातून निघालेली एक काडी जी लवकर पेट घेते )
हे चुलीत जाळ करायला वापरतात .साधारणत: स्वतः च्या शेतातले लाकूड बैलगाडीतून घरी आणतात . उन्हाळ्यात वाळवून इंधन तयार करून ठेवतात . यासाठी बांधावरची बाभळी ,शेतातला आंबा , जांभूळ, रानातला पळस कुऱ्हाडीने तोडून घरी आणतात .ज्या गावांना लागुनच जंगल आहे तिथे जंगलातून मोळी डोक्यावर वाहून आणतात कारण जंगलात आता वनविभागाने बंदी घातली आहे . घरी गाय असेल तर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या थापून त्या वाळवून चुलीत जाळतात किंवा जंगलातून शेणी वेचून आणतात ती पण जाळतात , चुलीसाठी इंधन म्हणून वापरतात . चुलीवर अंघोळीसाठी पाणी गरम करायला हंडे ठेवतात . काही घरात पाणी तापवण्यासाठी वेगळी चूल असते .काही घरी पाणी तापवण्यासाठी चूल न्हाणीघरात असते . एकदा स्वयंपाक करायला सुरुवात केली की वरणाला उकळी आली की उल्ह्यावर ठेवतात .भाताला उकळी आली की भात खाली निव्यावर ठेवतात .भाजी फोडणी घालून फोड मुरली की ती उल्ह्यावर सरकते . मग भाकरीचे आधन ठेवले उकळी आली की मुख्य चुलीवर तवा बसतो परातीत पीठ गरम पाण्याने थापून एका बाजूला दाबून ठेवले की एक एक भाकर थापायला सूरवात होते . दोनदा परवतलेली भाकर चुलीपुढे निखारे काढून चुलीला टेकवून शेकतात . खरपूस झाली की हाताने राख झटकून दवडीत ठेवतात . गरम भाकरी झाल्या झाल्या ताटात गरम भाजी वरण भात असा श्रीमंतांच्या घरचा बेत असतो . एखादा कांदा फोडून , एखादी मिरची तोंडी लावायला घेतली तर यथेच्छ भोजन होते . अन्न शिजल्यावर पहिला घास चुलीला अर्पण केला जातो , दुसरा घास चिमण्यांना , गाईला आणि शेवटचा घास कुत्र्याला दिला जातो .
गावदेवी जवळ किंवा शेतात जेव्हा स्वयंपाक नेतात तेव्हा दगडाच्या चुली मांडून आधी चुलीची पूजा करतात अन्न शिजल्यावर पहिला घास चुलीला अर्पण करतात नंतर ग्रामदेवतेला नैवेद्य जातो . चूल ग्रामजीवनाचे अभिन्न अंग आहे . बैलगाडीतून प्रवास करतांना चूलीचा प्रवास प्रत्येक मुक्कामी असे .नागपूरला महानूभव पंथाचे लोक दसऱ्याच्या आदल्या दिवशी ' पळण 'करतात पळण म्हणजे आपल्या घरचा शिधा घेऊन जायचे आणि गावाच्या बाहेर जाऊन सामूहिक स्वयंपाक करायचा . ज्या दिवशी पळण असते त्या दिवशी गावाच्या शिवेबाहेर किंवा शेतात अनेक चुली पेटलेल्या दिसतात आणि गावातले सर्व लोक तिथे जाऊन स्वयंपाक करतात .
चुलीवर शिजवलेल्या पदार्थांला चोहोबाजूंनी जाळ पोहचतो , पदार्थ एकदम मऊ शिजतो पण एकदम गळतही नाही. जसा हवा तसाच शिजतो . पापडासाठी शिजवायचे पीठ एकदम मस्त शिजतं . सामुदायिक स्वयंपाक करताना खेड्यात अजूनही चुलीवर करतात त्याची चव लाजबाब. ज्वारीचे पापड,तांदळाचे पापड चुलीच्या निखार्यावर भाजले की खरपूस भाजले जातात .आम्ही लहानपणी बटाटा , रताळी भाजून खायचो .ज्यांच्या कडे दुधदुभते असतं त्यांच्या कडे चुलीवर मंद आचेवर किंवा निखार्यावर दुध तापवण्यासाठी ठेवतात . असे तापवल्यामुळे भरपूर साय येते . वांगी , टोमॅटो , मिरची भाजून भरीत करतात . कधी एखादे वेळी जेवायला काही नसेल तर आई थोडी कणीक मळून त्याचा जाड रोटगा चुलीच्या राखेत झाकून ठेवत असे एक तासाने तो रोटगा शिजला की खायला द्यायची .पण आमच्या जीवाला धीर नसल्याने काडीने किंवा फुकणीने ओढून बाहेर काढून बघायचो . आंब्याचे पन्हे करण्यासाठी आंबे निखार्‍यात भाजून घेतात . लहान मुले आंब्याच्या कोई , बटाटे , रताळी निखाऱ्यात भाजून खातात . संक्रांतीच्या सणाला नागपूरकडे मटारू आणि पेंड्या या दोन विशेष फळभाज्या चूलीत भाजून खायची पद्धत आहे .पेंड्या हा मूळप्रकार आहे जमिनीत लागतात . मटारू हा वेलीवर लागतो . हिवाळ्यात तुरीच्या शेंगा शिजवायला ठेवतात रटरट आवाज येतो , एक सुगंध सर्वत्र पसरतो . ऊन ऊन शेंगा खाणे त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य .भुईमूग शेंगा चुलीपुढे राखेत दाबून ठेवतात जरा वेळाने खरपूस भाजून निघतात . दाणे अप्रतिम लागतात . उन्हाळ्यात सुकवलेली बोरे चूलीवर उकळून खाणे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सार्थकी लागणार हे ठरलेले .
लग्न घरी मातीच्या पाच चुली घालतात .मुहूर्त काढून सवाष्णी बोलवून चुली घालतात पाच चुली घालण्याची प्रथा आहे त्यामुळे दोनतीन वर्षे लग्न घरी चुली पुरतात ..चुली घालतांना गाणी गातात . नवीन चुली अक्षयत्रुतीयेला घालतात . चुलीची पूजा केली की बाकीचे विधी करतात . चुली घालण्यासाठी गावाबाहेरून चिकन माती आणणे ती गाळणे, आळे करणे , पाणी घालून भिजवणे , त्यात राख असेल तर ती घालून माती चुलीसाठी तयार करणे हे सर्व गावातल्या बाया करतात आणि मग एक दिवस चूल घालण्याचा ठरतो . ज्या दिवशी चूल घालायची असेल त्या दिवशी आंघोळ करून पूजा करून चूल घालायला बसतात . चूल घालून झाल्यावर ती सुकल्यावर तिला शेणाने सारवतात , मातीने सारवतात आणि मग जिथे चूल मांडायची असेल तिथे नेऊन ठेवतात . भिंतीचाच आधार घेऊन भानुशीला धरून चूल बसवतात . उल्हाचुल भानुशी आणि चूल लिंपून एकजीव करतात आणि मग सारवण करून चूल वापरण्यासारखी होते . चूल घालायला सुरुवात झाली की लहान मुली मला पण चूल घालून हवी म्हणून हट्ट धरतात .त्यांच्या कडे कोणी लक्ष देत नाहीत , पण त्या मुली आपला हेका धरून ठेवतात . शेवटी उरलेल्या मातीतून एकदोन छोट्या चूली घालून देतात . त्याला चूलबोळकी म्हणतात . मुलींच्या आनंदात सगळे घर न्हाऊन निघते . खूप मिरवतात त्या मूली चूल दाखवत .
' घरोघरी मातीच्या चुली ' ही म्हण घरच्या चुलीवरूनच आली पण ती अगदी सार्थ आहे . परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे असे म्हणण्यासाठी तीन शब्द पुरेसे आहे . एखाद्याला राग आला तर तो म्हणतो ' घाल चुलीत ' मला सांगू नको किती राग आला आहे हे दर्शवण्यासाठी चुलीत घाल हे पुरेसे आहे . अशा प्रकारे चुलीशी संबंधित अनेक वाक्प्रचार आणि म्हणी पण आहे . एखाद्या घरी उपासमार असली आणि बऱ्याच दिवसांनी स्वयंपाक झाला तर आज चुल पेटली असे म्हणतात . गावात घरातील सर्व सदस्यांना जेवणाचे आमंत्रण सांगायचे असेल तर चुलीला आमंत्रण असे संबोधतात त्याचा अर्थ घरातल्या सगळ्यांना जेवायला यायचे आहे. . एखाद्या घरावर संकट आले , त्या घरातली परिस्थिती चांगली नसली किंवा कमावता पुरुष नसला आणि त्यांच्या खाण्याची जर सोय होत नसेल तर त्या घरातली चूल विझलीअसे म्हटले जाते .चूल विझणे म्हणजे उपासमार , कुपोषण हे आलेच . चूलीत जाळ करायला लाकडे असतील आणि अन्नाचा कण नसेल तर कसे पोषण होईल . काही आदिवासी भागात , मेळघाटात , चूल पेटते पण सतत उपासमार ,अन्न धान्याची टंचाई असते . बालमृत्यू चे प्रमाण अधिक आहे . सरकारी योजनेचा काही अंशी लाभ होतो . मुलांचे कुपोषण रोखण्यासाठी माध्यान्ह भोजन योजना सुरू आहे . एकिकडे चूल विझणे अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे अन्न उकिरड्यावर टाकून अनारोग्य विकत घेणे सुरू आहे . करोनाकाळात खूप घरी चुली पेटलेल्या नव्हत्या . मृतकाचे घरी चूल पेटत नाही म्हणून शेजारपाजारचे किंवा नातलग अन्न नेऊन देतात अशी प्रथा आहे .
वडार ,पाथरवट ,नंदीवाले , वैदु , भविष्य सांगणारे असे जे फिरून व्यवसाय करणारे भटके लोक आहेत ते आपल्या झोपड्या कुठेतरी रिकाम्या आवारात घालतात आणि त्यांची चूल अंगणात असते . झोपडीबाहेर चुलीवर संध्याकाळी अंधार पडायच्या आत स्वयंपाक होतो ती फक्त तीन दगडाची चूल असते . स्वयंपाक झाला की जाळ बाहेर ओढून पाणी घालून ठेवण्यात येतो . अशा प्रकारे भारतात कुठेही स्वयंपाक करायचा असला तर तीन दगड पुरेसे असतात . तीन दगड लावले आत जाळ घातला की चूल तयार . भारतातल्या गृहिणीवर कितीही संकट आलं तरीही तीन दगडाची चूल तिची मदत करणारच आहे . संकटात कामी येते ती तीन दगडाची चूल . कुठेही स्वयंपाक करता येतो . ट्रक चालवणारे चालक थकले की एखादा निवारा शोधून चूल मांडून स्वयंपाक करताना दिसतात .कधी कधी घरातले सिलेंडर संपते आणि दुसरे सिलेंडर भरलेले नसते त्यावेळी घरा मागच्या मोकळ्या जागेत तीन विटा लावून तयार करून स्वयंपाक करता येतो . त्यावेळी खूप मजा येते चुलीवर स्वयंपाक करायला . पण जेव्हा माझ्याकडे चुल होती तेव्हा रोज रोज चुलीवर स्वयंपाक करायचा कंटाळा येत होता . भांडी खूप काळी होतात त्यामुळे घासताना खूप जोर लावून घासायला लागतात . भांडी घासून बाया अंगणातच सुकायला ठेवतात . भांडे चुलीवर ठेवायचे आधी त्याला बाहेरून राख किंवा मातीचे पातळ आवरण करतात त्याला बुड घेणे किंवा पास घेणे असे म्हणतात त्यामुळे भांडे जास्त काळे होत नाही . घासल्यावर पटकन काळेपणा निघतो. रात्री प्रवास करताना अंधारात फक्त पेटलेल्या चूलींचा जाळ दिसतो अंदाज लागतो की राहुटी आहे स्वयंपाक सुरू आहे .
गावात भंडारा असतो किंवा भागवत सप्ताह असतो त्यावेळी नवीन धान्य निघालेलं असतं , गावातले लोकं धान्य गोळा करून जो स्वयंपाक करतात तो चुलीवरच केल्या जातो आणि त्या स्वयंपाकाची चव कधीही विसरू शकणार नाही अशी असते . पश्चिम बंगाल मधे अष्टमीला नैवेद्य दाखवतात तो स्वयंपाक मोठमोठ्या हंड्या मधून करतात तो चुलीवरच करतात .एकावर एक असे आठ हंडे रचून ठेवतात .खूप सुग्रास असतो प्रसाद .ओरिसातील जग्गनाथपुरी मंदिरात जो भोग लावतात तोही याच पद्धतीने शिजवतात .नवीन धान्य निघाले की गावदेवीजवळ जो भंडारा असतो तो चुलीवरचा स्वयंपाक असतो .
चुलीवर स्वयंपाक करणे हे कौशल्याचे काम आहे . अद्यापही खेडेपाड्यात चुलीला लक्ष्मी मानतात तिची पूजा करतात .
जुन्या काळात जेव्हा गावात चोऱ्या होत असत किंवा दरोडे पडत असत तेव्हा गृहिणी एखाद्या तांब्याच्या भांड्यात सगळे दागिने लपवून चुलीत घालून ठेवत असे त्यावर काड्याबिड्या टाकून झाकून ठेवत असे . आगपेटिचा शोध लागायच्या आधी चकमक करून जाळ तयार करत असत , तेव्हा चुलीत थोडा तरी विस्तव दिवसभर राखून ठेवत असत . त्यामुळे स्वयंपाकाच्या वेळेला जाळ करून स्वयंपाक सुरू करता येत असे . एखाद्याच्या घरचा विस्तव जर विझला तर दुसऱ्या घरून विस्तव मागून चुलीत जाळ करत असत . अशाप्रकारे गावात एकूण विस्तव चुलीत राखून ठेवण्यात येत असे चूल विझू देत नसत .
गँसच्या वापर सुरू झाल्यापासून चुलीवरच्या स्वयंपाक करण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे तरीही आवडीने चुलीवरच्या जेवणाची चव आनंदाने खाणारे खवय्ये आहेतच . जोवर खवय्ये आहेत तोवर चुलीला मागणी राहील . अग्नितत्त्वाची पूजा करायची म्हणून आमच्याकडे चुलीला अग्नीदेवतेच्या रूपात पाहिल्या जाते आणि तिचा आदर केल्या जातो .

©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कित्ती सुंदर लिहिलंय !

एकदम चुलीपाशी बसून आईशी गप्पा मारत जेवतोय अस वाटलं !