परतफेड
बंटी आणि बबली या सिनेमाच्या स्टाईलने अनेक दुकानदारांना लुबाडणाऱ्या काही जोड्या सक्रिय झाल्या होत्या. जोडीतील स्त्री इतरांना बोलण्यात गुंतवून पुरुष हातचलाखीने दुकानातील कॅश चोरायचा किंवा याच्या उलटसुद्धा व्हायचे. सीसीटीव्ही वरून लक्षात यायचे तोपर्यंत उशीर झालेला असायचा. या टोळीतील जोड्या वेश बदलण्यात वाकबगार होत्या. लूकआउट नोटीस जारी करूनसुद्धा फारसा फरक पडत नव्हता, कारण यांची वेश बदलण्याची किमया अद्भुत होती. प्रत्येक वेळेस या जोड्यांची वेशभूषा, केशभूषा आणि पेहराव वेगवेगळा असायचा. "धूम 2" मधल्या ऋतिक रोशनला या जोड्यांनी आपल्या आदर्श मानले होते.