मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९९ साँग्स?
वरुन आठवले.

कृपया ९ साँग्स हा एक सुंदर चित्रपट पाहून टाका. ब्रिटिश आहे, मस्त आहे! अगदी आदिम soundtrack. अंग अंग पे रोमांच.

संबाटा!!! मुलाखत दिली नाही गमंत मधी!

बऱ्याच दिवसांनी अत्यंत सुरस अशी मुलाखत ऐकली. आणि जीव अगदी खुश झाला. एकीकडे सलील कुलकर्णीच्या जराशा जास्तच तुपकट मुलाखतीवर झणझणीत अनफिल्टर्ड उतारा पाहिजे होता. आणि गंमत म्हणजे वेगळ्या फॉर्ममधे प्रचंड पॉपुलर झालेल्या त्याचबरोबर माझ्यासारख्या चोखंदळ माणसालादेखील भुलवणारा हा कलाकार. नाव आहे संबाटा.

संबाटा खरा रॅपर आहे. म्हणजे ऑर्गनिकली त्या परंपरेतला. घेटो मधून येणे, अनफिल्टर्ड लिहिणे, अतिशय नैसर्गिक संगीतलयाची जाण असणे, फ्लो मधे लिहिणे, स्वतःविषयी प्रचंड प्रमाणात क्लॅरिटी असणे, संगीतासाठी बरेच कष्ट घेणे, अगदी सगळे. पण त्याचबरोबर अतिशय जेन्युईन बोलणे, हातचे न राखणे, जसे आहे तसे या सगळ्या बाबतीत ही मुलाखत अत्यंत भारी झाली आहे.

भाषेविषयी या माणसाचे विचार एवढे नैसर्गिक आणि प्रामाणिक वाटले की याच्या लिरिक्सला नावे ठेवणारायांची कीवच येते. आत्मप्रौढीचा अतिरेक ना करता एखाद्या रॅपरलाच बोलता येईल असे सतत तीक्ष्ण नेमके आणि चिल बोलणे, खोचक उत्सुक प्रश्न आणि त्यांना दिलेली कधी कधी प्रचंड काव्यात्मक होणारी उत्तरे, त्यातला सहजपणा हे एवढे लुभावणारे आहे या मुलाखतीत! खूप मस्त वाटले.

आणि लोकप्रियता विचाराल तर अगदी माझ्या अगदी वाह्यात भावंडांना देखील आपला वाटणारा असा हा रॅपर.

मला तसेही भारतीय रॅपविषयीच जराशी आढीच आहे पण या माणसाचे पोटेंशियल प्रचंड आहे. खूप लोकांना यात काय आहे असे वाटू शकते पण ही मुलाखत वाटल्यावर या माणसाविषयी त्यांचे मत बदलू शकते आणि हा का आवडतो सगळ्या पोराना ते कळू शकेल.

जरूर ऐका.

https://youtu.be/wnPHgJOW88o?si=DrZX1_oYThSVHXSq

मागच्या काही दिवसात तीन मुलाखती पाहिल्या. पहिली झाकिर खानने घेतलेली आमिर खानची. झाकिर खान स्टँड अप, चाचा विधायक है हमारे ही सिरीज व त्याच्या सतारवादनामुळे आवडतो. मुलाखत मात्र फार सखोल नाही, जुनैद खानच्या येत्या पिक्चरचे प्रमोशन आहे. तरीही काही भाग श्रवणीय आहे.

दुसरी रणवीर अलहाबादिया आणि मनोज वाजपेयी. गवर्नर नावाचा पिक्चर येत आहे त्याचे प्रमोशन. ही फार प्रामाणिक झाली आहे. मनोज वाजपेयी फार उत्कटतेने बोलत आहे आणि फक्त या पिक्चरबद्दल नसून सगळ्या आयुष्याबद्दल मतं व अनुभव सांगितले आहेत. फारच आवडली ही मुलाखत. बाकी रणवीर आता आवडेनासा झाला आहे, अतिशय डिल्युजनल वाटतो. ते एनर्जी, जन्मोजन्मीचे कर्म, सैतान, भूत, ज्योतिष, देवधर्म यावरच कुणीकडूनही घसरायचे असते, त्यामुळे त्याचे प्रश्नही डिल्युजन प्रोव्होक करणारे वाटतात. मी मधेमधे बघणं सोडून दिले होते पण ही फार आवडली. मनोज वाजपेयी खरंच एकदम आरस्पानी वाटला.

तिसरी निखिल कामत याने घेतलेली रणबीरची मुलाखत. सप्राईजिंगली अतिशय सखोल मुलाखत झाली आहे. दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारले आहेत आणि मोकळेपणाने नकारात्मक गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत. रणबीर कपूर कुठेही मुलाखती देत नाही, तेवढ्या पुरतेच प्रमोशन करतो आणि सोशल मीडिया वर नाही. त्यामुळे हे काही तरी वेगळे होते. इंट्रोव्हर्ट आहेत हे दोघेही. मेंटल हेल्थ, पितृशोक, अपयश, पॉलिटिक्सची नावड, आनंद दुःख यांची व्याख्या, डील करण्याची प्रोसेस, अगदी जिद्दू कृष्णमूर्तींचा सुद्धा उल्लेख आहे. निखिल कामत एक स्टॉक इन्व्हेस्टर आहे, आणि नेट वर्थ तीन अब्ज आहे. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी आहे. तो रेग्युलर पॉडकास्टर नाही. ते लक्षात येते येथे. ही आवर्जून पाहावी अशी.

मुश्ताक़ अहमद भटचा हिज़्बुल मुजाहिदीन दहशतवादी ते भारतीय सेनेतील ऑनररी कॅप्टन हा प्रवास. त्याला बोलतं केलंय प्रखर गुप्ताने.

मुश्ताक़ने दहशतवादी बनण्यासाठीची कारणं, निर्णय, ट्रेनिंगदरम्यान त्याला POJK, पाकिस्तान, अफगाणिस्तानात आलेले अनुभव, त्याचा भ्रमनिरास आणि त्यानंतर त्याने उचललेली पावलं, पाकिस्तानातून होणारा पैसे पुरवठा, कारगिल, दिल्ली आणि काश्मीरमधली सरकारं, काश्मीरमधल्या बेपत्ता लोकांच्या कहाण्यांमागचं सत्य अश्या सगळ्यांना स्पर्श करत जाणारी ही ४ तासाची मॅरथॉन मुलाखत काश्मीरमध्ये इंटरेस्ट आणि वेळ असल्यास जरूर पहा.

प्रखर गुप्ताने फारसा अभ्यास न करता मुलाखत घेतली आहे हे जाणवतं. कारण त्याला हुरियत, हिज़्बुल मुजाहिदीन वगैरे अतिरेकी संघटनांची नावं माहीत नाहीत किंवा वफ़ा वगैरे सामान्य उर्दू शब्दांचा, हिस्टरी शीटर, CDR सारख्या सामान्य शब्दांचा अर्थ माहीत नाही. पण अस्स्खलित काश्मिरी टोनमध्ये हिंदी आणि उर्दू बोलत मुश्ताक़ भट खिळवून ठेवतात.

मुलाखत १८+ व्यक्तींसाठी आहे.

मुश्ताक़ अहमद भटचा हिज़्बुल मुजाहिदीन दहशतवादी ते भारतीय सेनेतील ऑनररी कॅप्टन हा प्रवास >>>> ह्या व्यक्तीच्या मुलाखतीचा काही भाग FB वर बघितला होता. त्यात त्याने POJK मध्ये जाणे, ISI वाल्यांची वागणूक, गेलेल्या तरुणांना फसवले गेल्याचे उमगणे, त्यांचे गुलमर्ग मार्गे परत येणे वगैरे वर्णन केले होते.

ही YouTube वरची मुलाखतही पाहीन हळूहळू.

Hindu Terror Origin, 26/11 Attacks, Ishrat Jahan Case, Malegaon Blast, Beant Singh| RVS Mani |EP-431 : https://www.youtube.com/watch?v=yjSi1QafxT8

R.V.S. Mani is a former Under Secretary in the Internal Security Division of Ministry of Home Affairs and a public commentator on national security. He was conferred the Padma Shri in 2026 and is the author of The Myth of Hindu Terror: An Insider's Account of the Ministry of Home Affairs (2006–2010).

In this episode of the ANI Podcast with Smita Prakash, R.V.S. Mani speaks about the origins of the "Hindu Terror" narrative.

He also discusses the truth behind the 26/11 Mumbai terror attacks, Ishrat Jahan case, Beant Singh assassination, Pakistan-backed terror funding through fake currency and India's evolving internal security strategy.

RVS Mani यांची अजून एक मुलाखत तीन महिन्यांपूर्वी पाहिली होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इशरत जहॉ फाईल शेवटची चिदंबरम यांच्या ताब्यात होती. त्यानंतर ती सापडत नाही किंवा गायब झाली.

https://www.youtube.com/watch?v=DttNy_l1Ra8&t=5561s

मिलिंद फाटक
हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये काम करताना जाणवलेला फरक अशा अनेक विषयांवर स्पष्ट मते . . .

https://www.youtube.com/watch?v=qvQMbOQw2bo&t=2s

डिग्री घेतली तरी नोकरी नाही, काय चुकतंय? | Vivek Sawant | NEET Paper Leak | Think Bank

मला फार आवडली मुलाखत. एकुणच शिक्षणाबद्दल मूलगामी विचार आहेत. सरकार वगैरे ठीक आहे, आपण आपल्या पातळीवर आपल्या मुलांबरोबर काही वापर करू शकू असे मुद्दे सापडले.

आज मित्र म्हणे वर शिवदुर्ग रेस्क्यू टीममधील दोन सदस्यांची मुलाखत पाहिली.

आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह, दरीत अपघाताने पडलेले लोक, पाण्यात वाहून गेलेले, भीषण अपघातात मृत्यू पावलेले, डोंगरदर्‍यात अडकलेले वन्य प्राणी वगैरे अशा कितीतरी कठीण घटनांमध्ये ते कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन करतात, हे ऐकून अंगावर काटा आला. लोहगड केस मधे सुद्धा हीच टीम होती.

एवढी सगळी जोखीम पत्करून हे काम करतात तेही सगळं स्वखर्चाने, यांना अजिबात सरकारी फंडींग वगैरे मिळत नाही असं ते सांगतात. त्यांची संस्था काही मोबदल्याची अपेक्षा न करता निव्वळ समाजसेवा, लोकांना मदत म्हणून हे सगळं करते, . हे स्तुत्य आहेच पण सरकारने थोडीतरी यांच्या कामाची दखल घ्यावी असं वाटलं.

https://www.youtube.com/watch?v=gC7J1wT2okY&t=2725s

+१ अंजली!
अलिकडेच त्यांचे फेसबुक पेज फॉलो करायला सुरुवात केली होती. सिया-केतनच्या रेस्क्यूबद्दलही त्यांनी इतर केसेसप्रमाणेच साधी पोस्ट टाकली होती. त्याचं नंतर एवढं मोठं प्रकरण होईल असं वाटलं नसणार त्यांनाही.
खूपच आदर वाटला त्यांच्या कामाबद्दल. ग्रेट.

मिरजेला तंबोरा, सतार, वीणा इ. वाद्ये बनवली जातात माहित असेल. तर या कलाकारांची मुलाखत वजा व्यथा आहे. २००० कारागीर असलेल्या मिरजेत आज जेमतेम ६० कारागिर उरले आहेत. बोलणार्‍या व्यक्तीचं नाव नाही समजलं पण पोटतिडकीने बोलत होते. मुलाखत/ मनोगत फार आवडलं.
मिरजेची तंतुवाद्य बनवण्याची कला शेवटचा श्वास घेतेय!।

हे माझ्या फीडमधे आलं होतं काल आणि मी हिस्ट्रीत टाकून ठेवलेय, नंतर पाहायला. Sad ! असंच मुरादाबादची तांबे आणि पितळेच्या मूर्ती, भांडी बनवणारे कलाकार यांची क्लिप पाहिली होती. लोक इतकं पाडून मागतात, धंदा बसत जातो आणि त्यामानाने मेहनत खूप मग नवीन पिढी भाग घेत नाही फारच वाईट वाटले होते. त्यांनी तरी एवढ्या गरिबीत कशाला दिवस कंठत कला जोपासावी, मुख्य प्रवाहातील लोक तमाशा बघत बसतात. सर्वांचीच जबाबदारी आहे ही!

अस्मा खान हिचा ट्रेव्हरने घेतलेला इंटरव्ह्यू पाहिला. स्वातीने टिपापावर लिहिलेलं वाचलं होतं, आणि मलाही पॉप झाले इन्स्टावर.
https://youtu.be/sKrKI5nAXco

जबरदस्त मुलाखत आहे. अस्मा खान एक शेफ आहे, तिचं लंडन मधे रेस्टॉरंट आहे. तिला नुकतेच शेफ्स टेबल या मॅगझिनसाठी निवडण्यात आले होते. मुलाखत मुलाखत असूनही गप्पांच्या स्वरूपात आहे, थोडी chill. पण तरीही काही तरी भरीव ऐकल्यासारखे वाटलं. अस्मा कलकत्त्याला लहानाची मोठी झालेली, निव्वळ पॅशनपोटी वकीलीचे रितसर शिक्षण घेतलेलं असूनही याकडे वळली. लहानपणी दिसायला साधारण म्हणून कुणाचीच लाडकी नव्हती. तिचा तो संघर्ष. बहिणीने कायम दिलेली उमेद, तिचा दृष्टीकोन वगैरे सगळं इंटरेस्टींग आहे.

या क्षेत्राची विशेष माहिती मला तरी नाही. त्यामुळे मास्टर शेफ त्यातला धिंगाणा बघून फक्त दोन चार शेफ माहिती होते. त्यात प्रचंड चढाओढ , फूड रेसिझम, मिशेलीन स्टार मिळवण्यासाठी धडपड किंवा पाताळयंत्रीपणा. भारतीय स्वयंपाकाला झटपट, स्वस्त आणि मस्त लेबल लावून जागतिक पातळीवर कसलाही मान न मिळू देणं. सगळ्याला करी ह्या एकाच शब्दात गुंडाळून टाकणं हे सगळं आवडलं.

शिवाय सगळे मास्टर शेफ पुरुषच आहेत, एकही स्त्री नाही. घरातील स्वयंपाकाला यांना आई, बायको लागते पण जिथे पैसा, प्रसिद्धी आहे तेथे हे सगळं पुरुषांच्या नियंत्रणात. मिशेलीन स्टार मिळवण्यासाठी गोऱ्या कातडीचे असणं आणि प्रचंड ओव्हररेटेड फ्रेंच वा इटालियन क्वुझिनचेच पदार्थांचे कौतुक करणं. मोठ्या थाटात एक इंच फूड वाढून डेलिकसीच्या उलट्या बोंबा मारणं वगैरे. सगळीकडे श्रीमंती आणि दिखाऊपणाचा वरचष्मा. शिवाय या क्षेत्रातील रेस्टॉरंट्स मधे होणारा अब्यूज. मोठ्या शेफ्सनी इतरांना बुली करणं, चटके देणे, आक्रस्ताळेपणा करणं हे ऐकून गॉर्डन रामसी आला डोळ्यापुढे. भयंकर आक्रमक वागणं, भांडी फेकणे व दोन घटकांचे वाटी भर सुद्धा नसणारे काय आहे न कळणारे असं एक गाजर वाढणं. शिवाय हे सगळे उद्दाम शेफ - एजिस्ट, रेसिस्ट आणि सेक्सिस्ट आहेत. तरी मिशेलीन स्टार यांनाच. या सगळ्यात स्वतःचा ठसा उमटवणं.

तिचा हा सगळा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. जमलं तर पाहा. Very resilient, intelligent, strong and a kind women. Intelligent and successful people are unkind these days, so she stands out. "I don't care about the Michelin star at least no one cries or is threatened in my kitchen" - म्हणाली.

श्री. द. महाजन यांची मुलाखत.
https://youtu.be/VYD8iFDKNhQ?si=pd9PmN6F0FfOqhmn
ते आता ९४ वर्षांचे आहेत! वनस्पतींचा चालताबोलता ज्ञानकोश असं त्यांना म्हटलं जातं. या मुलाखतीत बोलताना वयानुसार थोडा पसरटपणा आला असला तरी तल्लख बुद्धिमत्ता, वनस्पती आणि एकंदरीत पर्यावरणाबद्दलचं ज्ञान, अद्ययावत माहिती आणि त्याबद्दलची आत्मीयता/ पॅशन बघून नतमस्तक व्हायला झालं.

>>>>>>त्याबद्दलची आत्मीयता/ पॅशन बघून नतमस्तक व्हायला झालं.
+१ शिवाय फार सुसंबद्ध आणि व्यवस्थित मांडणी. ते ही ९४ व्या वर्षी.
मात्र गुलमोहरावर कावळे बसलेले मी पाहीलेले आहेत. गुलमोहरावर, पक्षी बसत नाही हे मला पटले नाही.
.
खूप माहीती आहे. खूपच कळकळ आणि पॅशन आहे.

मास्टर शेफ अमेरिका आणि मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया यांत जमीन अस्मानाचं फरक आहे. अमेरिकाचा एखाद दुसराच भाग पाहिला असेल. त्यापेक्षा अधिक पाहवलं नाही. ऑस्ट्रेलियाचा तर अगदी लळाच लागला. स्पर्धक आणि जजेस मध्ये खेळीमेळीच नव्हे तर जिव्हाळा दिसायचा.
ऑस्ट्रेलिया हासुद्धा स्थलांतरितांचा देश. इथल्या मास्टरशेफमध्ये स्थलांतरित - पूर्व आशियाई - कोरियन - व्हिएतनामी, इंडोनेशियन , दक्षिण आशियाई - भारत श्रीलंका बांग्लादेश , युरोपीय - स्पेन , ग्रीक . मी पाहिलेल्यांत दोन अरब स्त्रिया होत्या
किमान एकदा एक भारतीय विजेता ठरला आहे. भारतातले शेफ्सही गेस्ट जज म्हणून येतात. शिवाय जुन्या जजेसमधला एक भारतात फिरून आला होता.
भारतीय अन्नघटक , चवी आणि पद्धतीबद्दल जजेस आणि स्पर्धकांना चांगली माहिती होती आणि त्याबद्दल कौतुकही होतं. चवींच्या वैविध्याबद्दल. रोटी, चटणी हे शब्द अभारतीय स्पर्धकही वापरत.

मास्टरशेफ अमेरिकात खवीस वाटलेला गॉर्डन रामसे ऑस्ट्रेलियात गेस्ट जज म्हणून आला तेव्हा प्रेमळ वागला.

अस्मिताने अन्यत्र सुचवलेली आरपारवरची मोहसिना मुकादम यांची मुलाखत पाहिली. त्यांचे लेख लोकसत्तेत वाचले आहेत. त्यामुळे आणि चिनूक्सचे लेखन वाचले असल्याने फार अशी नवी माहिती मिळाली नाही. पण तरीही मुलाखत आवडली. अनेक विषयांना स्पर्श केला आहे. खाद्य संस्कृतीच्या इतिहासाचे स्रोत कोणते , जिन्नसांचं आणि पदार्थांचं मूळ ,
धर्म आणि जातीनुसार (दोघी घाबरत घाबरत ज्ञाती म्हणत होत्या) खाद्यसंस्कृतीतले सारखेपण आणि फरक , इ.
त्यांनी चिनूक्स आणि त्याने संपादित केलेल्या सूपशास्त्र या पुस्तकाचं कौतुक केलं.
मोहसिनांना ईटीव्ही / कलर्स मराठीवरच्या मेजवानी या कुकरी शो मध्ये पाहिलं होतं. त्यांचा मेक ओव्हर छान वाटला.

मात्र गुलमोहरावर कावळे बसलेले मी पाहीलेले आहेत. गुलमोहरावर, पक्षी बसत नाही हे मला पटले नाही >> गुलमोहोराच्या फुंलांवर सुर्यपक्षी (सनबर्ड) देखील खूप येतात.

Pages