कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by कुमार१ on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sharadg सर,पहिल्या लशी नंतर आपल्यास त्रास झाला... इस्पितळात जावे लागले का? तसेच माइल्ड होता का? आपण सविस्तर सांगितल्यास इतरांस फायदा होईल धन्यवाद

रेव्यु,
तुम्ही चांगली काळजी घेत आहात.
मनाने खंबीर राहायचे. बाकी काही नको .
शुभेच्छा !

रेव्यु, लस घेतली आहे का तुम्ही? माझ्या ओळखीत एका साठीच्या वरच्या काकूंना म्हणजे त्या घरातल्या सगळ्यांना कोरोना झालाय पण त्या काकूंचे लशीचे दोन्ही डोस झालेत त्यामुळे त्यांना खूप कमी त्रास होतो आहे. जवळपास काहीच नाही.

जिज्ञासा
दोन्ही लशी झाल्या आहेत
धन्यवाद

कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल. >>>> इथे कॅनडात (तसच युकेमध्ये) कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये बारा ते सोळा आठवड्यांचं अंतर ठेवतायत. युकेमध्ये असाही एक रिसर्च प्रकाशित झाला आहे की हे अंतर सोळा आठवडे ठेवलं तर लशीची परिणामकारकता अजून वाढते. त्याचं नक्की कारण अजून शास्त्रज्ज्ञांना कळलेलं नाही पण उपलब्ध डेटा आधारे हे निष्कर्ष काढलेले आहेत. (मला आत्ता लिंक सापडत नाहीये). डॉ.कुमार, तुमच्या वाचनात ह्याबद्दल काही आलं आहे का ?

PCT टेस्ट चा काय उपयोग >>

Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.

तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.

सारांश : PCT च्या रक्तपातळीचा उपयोग रुग्णाचे भवितव्य आजमावण्यासाठी होतो. जेव्हा आजार बरा होऊ लागतो तेव्हा ती पातळीही कमी होऊ लागते.

पराग
तो जरा वादग्रस्त मुद्दा आहे. कोविशिल्ड लसीचे मूळ तंत्रज्ञान AZ कंपनीचे आहे. युरोपीय अभ्यास गटाने सुद्धा दोन डोस मधील अंतर जास्तीत जास्त बारा आठवडे असावे असे म्हटले आहे, कारण तसे मानवी प्रयोग झालेले आहेत. आणि त्यातून अँटीबॉडीजची पातळी अधिक वाढते असे दिसून आलेले होते.

आता युरोपमधील काही देशांनी त्यांच्या मनानेच हे अंतर 16 आठवडे करायचे ठरवले आहे. परंतु इथे दिलेल्या बातमीत (https://www.reuters.com/world/europe/spain-extend-gap-between-astrazenec...)
याबद्दल स्पष्ट इशारा आहे. असे अंतर वाढवण्यास अभ्यास गटाची मान्यता नाही. ज्या त्या देशांनी आपापल्या जबाबदारीवर हे करावे असा तो इशारा आहे.

मास्कमुळे लिपस्टिकसह सौंदर्य प्रसाधन व्यवसायात ७० टक्के घट
https://www.loksatta.com/nagpur-news/70-percent-cosmetics-business-inclu...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
या नन्तर आर्थिक मन्दि येउ शकते अशिहि एक सांखिकिय माहिति आलि होति.

कुमार सर,
माझा विलगीकरण काळ संपल्यावर CBC, CRC, D DIMER व क्रियातीनिन तपासणी केलीय व फॅमिली डॉक्टर म्हणतात काही प्रॉब्लेम नाही. पण पुन्हा RTPCR टेस्ट केली नाही. तर ही किंवा कोविड निदर्शक अन्य कोणती तपासणी करणे आवश्यक आहे काय?

शरद
मागच्या भागात यावर लिहिलेले होते. महाराष्ट्र कोविड वैद्यकीय दलानुसार सौम्य आणि मध्यम कोविडच्या रुग्णांनी पूर्ण बरे झाल्यानंतर पुन्हा rt-pcr चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

त्रिसूत्री पाळायची. बस्स !

आपल्यातील काही जणांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना मध्यम अथवा तीव्र आजारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागलेले आहे. अशा रुग्णांच्या गरजेनुसार विविध प्रयोगशाळा रक्ततपासण्याही केल्या जातात. एव्हाना मुख्य निदान चाचणी (rt-pcr) बद्दल सर्वांना पुरेशी माहिती आहेच. त्या व्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या पूरक चाचण्यांचे महत्त्व दाखविणारा तक्ता :
cov lab profile.jpg

Press Trust of India
@PTI_News
AIIMS chief warns against rushing for CT scan in cases of mild COVID-19, saying it has side effects and can end up doing more harm than good

टीममधला बंगलोरचा मुलगा आता बरा होतोय पण त्याने आज त्याची कथा सांगितली.
त्याला मारच २१-२२ च्या सुमारास सोमवार, मंगळवार खूप गळून गेल्यासारखं झालं. बुधवारी अंगातली शक्ती पार गेली तेव्हा टेस्ट केली जी निगेटीव आली. उजव्या नाकपुडीची टेस्ट केली. गुरुवारी अर्धवट शुद्ध हरवल्यावर दवाखान्यात नेले तेव्हा डाव्या नाकपूडीची टेस्ट केली जी +व आली. (डॉ. कुमार, हे असं होऊ शकत?)

सीटी स्कॅन केले तर फुफ्फुसात ४-५ गाठी. लगेच अ‍ॅड्मिट केले. पहिले ३ दिवस ऑक्सीजन खूप कमी होता. डॉ.नी तो जगेल असं वाटत नाही असं सांगितलं होतं. पण चौथ्या दिवशी किंचीत सुधारणा झाली. २ आठवडे आयसीयु मधे राहून परतला तर हाडाचा सापळा झाला होता. घरी बायको, मुलं तिच्या माहेरी गेली होती ती तिथेच अडकली होती व त्याचे ८५चे वडील एकटेच घरी. हे नक्की कसे माहिती नाही पण झाले होते.
तो घरी आला तेव्हा बायको घरी नसल्याने वडिलांपासून वेगळे राहून २ आठवडे त्यालाच अंगात काहीही शक्ती नसताना स्वयंपाक करावा लागला व वडिलांना द्यावे लागले. ते कसे केले माहिती नाही पण मागच्या आठवड्यात टेस्ट निगेटीव आली व बायकोमुले परत आली. आतापण डोळे नीट झाले नाहीत पण हळूहळू काम सुरु केले त्याने.
भयंकर अनुभवातुन गेला.

मी पण कोव्हिड असताना, आणि माईल्ड नाही तर फुफ्फुसात प्रसारित झाला असताना ही आधी टेस्ट निगेटिव्ह आली असंच ऐकलं आहे. फॉल्स निगेटिव्ह्स भारतात खूप जास्त आहेत का? का टेस्ट किट्स, टेक्निशिअन, वापरली जाणारी केमिकल्स इ. साखळीची रिलायबिलीटी यथातथाच आहे?
गरज नाही, माईल्ड आहे, सिस्टिम वर ताण असली कारणे न देता स्कॅन करुन घ्यावा असं वाटू लागलं आहे. हॉस्पिटल मिळालं तर अ‍ॅडमिट ही व्हावं. त्या फालतू दाभाडकर बलिदानाचा मला मनस्वी तिटकारा आहे, आणि जगजाहीर स्वार्थी लोकांबद्द्ल नितांत आदर आणि प्रेम आहे. अशीच लोकं जगाला तारुन पुढे नेऊ शकतात यावर नितांत श्रद्धा आहे.

माझ्या दिरांना आठ दिवसापासून ताप आहे परवा ब्लड टेस्ट ,कोरोना टेस्ट केली. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आणि मलेरिया डिटेक्ट झाला. त्यानुसार औषधे सुरू केली.
पण ताप कमी होईना आणि कोरडा खोकला सुरू झाला म्हणून शंका आली आणि काल सीटीस्कैन केले. तेव्हा 4% कोविड आहे असे निदान झाले.
आधी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने घरात आयसोलेट झाले नाहीत, त्यामुळे संपर्कात आलेल्या सगळ्यांची टेस्ट करावी लागणार.

अमितव,
दाभाडकर बलिदानाचा मला मनस्वी तिटकारा आहे, आणि जगजाहीर स्वार्थी लोकांबद्द्ल नितांत आदर आणि प्रेम आहे. अशीच लोकं जगाला तारुन पुढे नेऊ शकतात यावर नितांत श्रद्धा आहे. >>>> मग कोवीड पेशंट्सवर अथक उपचार करून स्वतःला कोवीड होऊन मरणापर्यंत जाऊन परत आलेले, मृत्यु झालेले डॉक्टर स्वार्थी होऊन घरी बसले असते तर चालले असते का? सैनीक कशाला जातात कळत नाही देशासाठी बलिदान द्यायला. भारतातले पोलीस कोवीडमधे कशाला स्वतःला धोक्यात टाकुन लोकांना शिस्त लावायला जातात व स्वतः कोवीडला बळी पडतात?

राग, तिरस्कार एका जागी पण त्यामुळे सरसकट काय लिहिताय, ते कोणाला लागु होतं याचं भान असु द्या.

टेस्ट केली जी निगेटीव आली. उजव्या नाकपुडीची टेस्ट केली. गुरुवारी अर्धवट शुद्ध हरवल्यावर दवाखान्यात नेले तेव्हा डाव्या नाकपूडीची टेस्ट केली जी +व आली. >>>

यामध्ये डाव्या किंवा उजव्या नाकपुडीचा संबंध नसतो. चाचणी आजाराच्या कितव्या दिवशी पॉझिटिव येईल यामध्ये व्यक्तिगणिक बदल होऊ शकतात. म्हणूनच जर लक्षणे असतील, तर पहिली निगेटिव्ह आल्यावर पुन्हा एकदा करून बघावी अशी पद्धत आहेच. तसेच नाकातून नमुना घेणे हे तसे कौशल्याचे काम आहे. त्यामुळे तंत्रज्ञागणिक देखील काही वेळेस बदल होऊ शकतात.

कायच्या काय

डॉकटर व पोलीस आपले नित्यकर्म करतात

अवांतरा बद्दल क्षमस्व.
दाभाडकरांनी कसलं बलिदान केलं नक्की? ते तोवर हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉ र्डमध्ये होते. ऑक्सिजन चालू होता. बेड मिळाला नव्हता. डोक्टरांनी सांगितलं यांना व्हेंटिलेटर असलेल्या ठिकाणी घेऊन जा. आमच्याकडे ती सोय नाही.

माझा बेड त्या अमक्याला द्या , असं त्यांनी इस्पितळाच्या कोणाही कर्मचार्‍याला सांगितलं नाही. अ ला आपला बेड ब ला देता येत नाही. ते इस्पितळ प्रशासन किंवा मनपा इ. ठरवतात.
त्यावेळी इस्पितळात ४ बेड उपलब्ध होते.

रेव्यु जी, माफ करा, तुमचा प्रश्न मी उशिरा वाचला. लसीच्या पहिल्या डोसचा दंडामध्ये थोडेसे दुखण्याशिवाय मला काहीही त्रास झाला नाही.
खरंतर माझे सप्टेंबरमध्ये कॅन्सरचे मोठे ऑपरेशन झालेय, त्यामुळे मला खूप भीती होती.
शिवाय एक डोस झाल्यामुळे मला आत्ता कोविडचाही विशेष त्रास झाला नाही. पत्नीला मात्र आठवडाभर दवाखान्यात ठेवणे व रॅमिडिसीविर साठी पळापळ करावी लागली.

पोलिस, डॉक्टर, सैनिक, शिक्षक आणि हो शेतकरी ही आपापली कामं करतात. आपणही तीच करतो. प्रामाणिकपणे केली की झालं. या सर्वांचा मी ऋणी आहे. ती कामं करताना त्यांना सर्वोच्च दर्जाची उपकरणे, सुरक्षा साधने मिळोत. आणि ते प्रोफेशन म्हणूनच करायला लागो. त्याला त्याग आणि बलिदानाची पुटे न चढो, इतकीच प्रार्थना. असो.

टेक महिंद्राने करोनावर नवे औषध शोधले असून त्याच्या पेटंटसाठी प्रक्रिया सुरू
121050200662_1.html#:~:text=IT%20company%20Tech%20Mahindra%20is,to%20a%20senior%20company%20official.

माझ्या बाबांची करोना टेस्ट ३वेळा negative आली, ct test मध्ये score १७आला, lung infection झाले होते. Oxygen level खूपच drop झाली होती, ताप होता, weakness होता. गंभीर परिस्थिती होती, icu मध्ये oxygen चे machine लावले होते, त्याशिवाय श्वास घेता येत नव्हता त्यांना. dr ना सुरुवातीला वाटले वाचणार नाहीत पण त्यांनी चांगली झुंज दिली, आता बरे होऊन घरी आले आहेत.
Bills घ्यायला गेलो होतो तेव्हा dr ह्यांना म्हणाले तुमचे सासरे fighter आहेत, मनःस्थिती फारच strong ठेवली होती असे, त्याचा उपचारांना फायदा झाला.

किल्ली,
बाबांना तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा !

Pages