कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात सर्वांचाच सहभाग आवश्यक असतो. तेव्हा हा विषय शाळेतही घ्यावा. सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा असतात, काय काळजी घ्यावी, कसे सहकार्य करावे इत्यादि माहिती त्यात देता येईल.

ट्र्म्प म्हणत आहेत की प्लाझ्मा थेरेपी क्रांतिकारी आहे.खरे तसे आहे की स्टंट आहे?

दर महिन्यात नवीन औषध आले की राजकारणी क्रांती क्रांती करत नाचतात

Hydroxychloroquine आले तेंव्हा भक्त नाचत होते , मोदी विश्वाला औषध दान करणार म्हणून

आता त्या औषधाला कुणी कुत्रे विचारत नाही ( पण आम्ही तेच खाऊन जगलो )

के तु,
काहीशा रुसव्याफुगव्यानंतर अमेरिकी ‘एफडीए'ने कोविडमध्ये रक्तद्रवाच्या तातडीच्या वापराला काल मान्यता दिली.
खालील प्रकारच्या रुग्णांत त्याचा उपयोग आहे:
१. वय 80 पेक्षा कमी
२. रुग्ण व्हेंटिलेटरवर नसावा
३. रुग्णालयात दाखल झाल्यावर पहिल्या तीन दिवसांचे आतच ते दिले जावे.

मानव,
* तेव्हा हा विषय शाळेतही घ्यावा. >>>
सहमत.

यावरून एक जुनी आठवण सांगतो. माझ्या संपूर्ण वैद्यकीय शिक्षणात प्लेगबद्दल ‘एक ऐतिहासिक आजार’ इतकाच त्रोटक उल्लेख असे. संपूर्ण अभ्यासक्रमात तो कधीही शिकवला गेला नाही.

पुढे नव्वदच्या दशकात गुजरातमध्ये आणि अन्य काही ठिकाणी तो पुन्हा उद्भवला होता. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांमधील मेडिसीन विभागात त्यावरील शिकवणे पुन्हा चालू केले होते.

गेल्या काही दिवसात असंख्य ढकलपत्रातून कोविड-विरोधी अशास्त्रीय औषधांचा प्रचार/ चुकीची माहिती देणे चालू आहे. माझ्या परिचयातील अनेकांनी मला त्याबाबत विचारणा केली. अशा ढकलपत्रांमधून उल्लेखिलेली सर्व रसायने अथवा औषधे कोविडचा प्रतिबंध अथवा उपचार यादृष्टीने अशास्त्रीय आहेत.
संबंधित रसायने वापरून रुग्णांवर शास्त्रशुद्ध प्रयोग झालेले नसून त्यासंबंधी कुठलाही अधिकृत पुरावा सध्या उपलब्ध नाही. अशा रसायनांची यादी :

१. चांदीयुक्त गोळ्या वा द्रव
२. कण्हेरीचा अर्क
३. थायामोसिन, मेथिलीन ब्लू

४. चिंता कमी करणारी औषधे
५. नवजात बालकाच्या नाळेतील मूळ पेशींपासून तयार केलेले उत्पादन.

सर्वांना विनंती की अशा प्रकारची ढकलपत्रे तुम्हाला आल्यास तातडीने डिलीट करून टाका. कृपया पुढे पाठवू नका.

कण्हेरीचा अर्क >>> are these people for real ???? Uhoh
kaner is one of most poisonous herb in ayurveda. It can not be consumed in any form even after due process of purification mentioned in ayurvedic texts. forget consuming they will go in coma and probably die even if they just inhale its vapours.

+१
अक्षरशः 'काहीही' माहिती फिरवली जात आहे.
याबाबतीत जगातला कुठलाही खंड मागे नाही !
जिथे जिथे महासाथ पोचलीय , तिथून असे ज्ञान उगम पावत आहे.

या ढकलपत्रांच्या राज्यात "सर्व्हायव्हल ऑफ दि फिट्टेस्ट" घड्णार. म्हणजे नुसतं शारिरीक दृष्ट्या सक्षम असे नाही तर जरा बुद्धी वापरणारे तरतील.

कण्हेरी ची मुळं अत्यंत विषारी असतात
त्या फॉरवर्ड मध्ये बहुतेक पानं सांगितली असतील
इन एनी केस, कण्हेर ची किंवा कोणत्याही एरवी खात नसलेल्या झाडाची पानं/ फळं/भाग खाणे हे वेडेपणाचे ठरेल.दातपडी, धोत्रा यासारख्या वेगळे परिणाम करणाऱ्या वनस्पती आहेत.मागे एकदा इथे डॉ शिंदे नी गुळवेल शेतात लावलेली त्याचा काढा घेताना त्याबरोबर दुसरी विषारी वेल पण काढ्यात जाऊन विषबाधेची केस सांगितली होती.

अनु, पिवळ्या कणेरीची पानेसुद्धा भयानक विषारी असतात. माझ्या ओळखीच्या एका वैद्यांनी एका पेशन्टसाठी वातविकारावरील तेल बनवले होते. त्यात पिवळी कणेर, काळा धोत्रा,रुई आणि अश्या बऱ्याच पानांचा गर टाकला होता तेल सिद्ध करायला. कामगाराला त्यांनी व्यवस्थित बजावून ठेवले होते काम करताना आणि ते काहीतरी काम करायला थोड्यावेळासाठी निघून गेले. त्या वर्करने ते हलक्यात घेतले आणि ती विषारी वाफ त्याच्या नाकावाटे आत जाऊन जाऊन तो बेशुद्ध पडला. दोन आठवडे आयसीयुत होता आणि थोडा उशीर झाला असता तर गचकला असता. नशीब त्याला प्रोटेक्टिव्ह गॉगल दिला होता काम करताना नाहीतर डोळे सुद्धा निकामी झाले असते.

बापरे
कठीण आहे
'हर्बल' म्हणजे 'सुरक्षित' अशी धारणा असलेल्याना हे किस्से आवर्जून ऐकवले पाहिजेत.

कण्हेरी >>>

यात Oleandrin हे रसायन असते. ते घातक आहेच. प्रयोगशाळेत त्याची सार्स २ वर चाचणी झाली. तेव्हा या विषाणूची संख्यात्मक वाढ ते रोखते असे आढळले.
पण.....
अशा निव्वळ प्रयोगशाळेतील एका प्रयोगावरून प्रत्यक्ष मानवी शरीराबद्दल निष्कर्ष काढायचा नसतो.
मग काय,
काही उतावळ्या लोकांनी याचे ढकलपत्र बनविले !

नुकतेच एका सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे ‘सार्स 2 चे जनुकीय बदल’ यावरील मत वाचले.
त्यांच्या म्हणण्यानुसार या विषाणूचे दरमहा सरासरी दोन जनुकीय बदल होत आहेत. आता सध्याची साथ सुरू होऊन सुमारे नऊ महिने उलटले आहेत.

त्यांच्या मते एखाद्या विषाणूची पुरेशी उत्क्रांती व्हायला हा कालावधी फारच कमी आहे. अन्य उदाहरणे तुलनेसाठी पाहता येतील. जुने करोना विषाणू जवळपास पन्नास वर्षे मानव जातीमध्ये फिरताहेत, तर इन्फ्लुएंझाचे विषाणू शंभर वर्ष फिरत आहेत.

सध्याच्या विषाणूची उत्क्रांती अजून चालू आहे. ती एवढ्या लवकर पूर्ण होईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती कशी काम करते हे दाखवण्यासाठी एक सोपी स्वरचित आकृती खाली देत आहे. त्यातून T आणि B पेशी, अँटीबॉडीज इत्यादींचे काम स्पष्ट होईल.

t and b (2).jpg

जम्बो सेंटर बद्दलच्या या पोस्ट मध्ये तथ्य आहे का(म्हणजे एक दोन पेशंट पुरता योगायोग की नेहमी असे होते?)
तसेच यावर काही कारवाई झालीय का?
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10218036019031939&id=1230273070

>> ते आता मनपाने ताब्यात घेतलय.>>> लज्जास्पद, घृणास्पद, धिकारणीय, जाड चामडिचे अन शोबाजीचे निंदनीय उदाहरण....

साद,
होय, त्यात तथ्य आहे.

कोलेस्टेरॉल कमी करणारी Statins आणि अन्य एका प्रकारची औषधे कोविडमध्ये उपयोगी पडू शकतील असा प्राथमिक निष्कर्ष आहे.

या औषधांना दाहप्रतिबंधक आणि रक्तगुठळीला विरोध करण्याचे गुणधर्म असतात. त्यादृष्टीने त्यांच्यावर अभ्यास चालू आहे.
ज्या रुग्णांना हा आजार होण्याआधी उच्च कोलेस्टेरॉलसाठी ही औषधे चालू असतात, त्यांना या आजारात देखील ती चालूच ठेवल्याने काही फायदा झालेला आहे, असेही निरीक्षण आहे.
अधिक अभ्यासांती यावर अजून प्रकाश पडेल.

होय,
रायकर आणि इतर वर्णनावरून तेच केंद्र दिसतेय.

कुमारजी,अनेक तज्ञ २०२१ला महामारी संपेल असे म्हणत आहेत ते कितपत खरे आहे? फेब्रुवारी २०२१ ला संपेल असे मानायचे का?

के तु
कोविड१९ : पुढील दीड वर्षांचा अंदाज:

संसर्गजन्य रोगांच्या तज्ञ समितीच्या मते ३ प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात :

१. एकूण दोन वर्षांत या आजाराच्या लघुलाटा येऊ शकतात. त्या हळूहळू कमी होणार.
२. यंदाचे थंडीचे काळात आतापेक्षाही मोठी लाट येऊ शकते. मग हळूहळू कमी होणार. ( असेच १९१८ च्या महासाथीत झाले होते).

३. एकूण दोन वर्षे संसर्ग सौम्यपणे धुमसत राहील (slow burn).

जगभरातील भौगोलिक परिस्थितीनुसार यांत कमी अधिक बदल होऊ शकतात.
अर्थात हे सर्व पूर्वानुभवावर आधारित अंदाज असतात. तसेच मतभिन्नाताही दिसते.

ज्या रुग्णांना हा आजार होण्याआधी उच्च कोलेस्टेरॉलसाठी ही औषधे चालू असतात, त्यांना या आजारात देखील ती चालूच ठेवल्याने काही फायदा झालेला आहे, असेही निरीक्षण आहे.>>>oh असे नक्कीच असू शकते, कारण माझ्या सासर्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा पण त्रास आहे,त्यावरील औषधे पण चालू आहेत गेली 4 5 वर्षे
कदाचित त्यामुळेच त्यांना ऍडमिट न करता बरे वाटले असे असू शकते

Pages